Followers

Sunday 5 April 2020

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविताना नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे -राज्यमंत्री संजय बनसोडे



*लॉक डाऊन च्या काळात एकाही मजुरांचे स्थलांतर होणार नाही याची दक्षता घ्यावी
   * उदगीर विधानसभा मतदार संघातील सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी
           मुख्यालयी थांबावे
        * सर्व लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा उपलब्ध असावा
          * होम कोरानटाईन करण्यात आलेल्या लोकांनी योग्य ती दक्षता घ्यावी

लातूर, दि.5:- शासन व प्रशासन कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचे तंतोतंत पालन सर्व नागरिकांनी करणे गरजेचे आहे. तसेच लातूर जिल्ह्यासह उदगीर विधानसभा मतदार संघातील बाहेरून आलेल्या एकाही मजुराचे स्थलांतर होणार नाही याची दक्षता घ्यावी व या लोकांना लॉक डाउन संपेपर्यंत जेवणाची व्यवस्था करावी असे निर्देश संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
 उदगीर विभागाअंतर्गत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत उपविभागातील सर्व अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या सह  उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे तसेच उदगीर उपविभागातील सर्व गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी ,पोलीस अधिकारी व आरोग्याधिकारी आदी उपस्थित होते.
       कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी संपूर्ण देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन जाहीर करण्यात आलेले आहे. या कालावधीत शासन व प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे व कोरोना विषाणूला हद्दपार करण्याच्या लढाईत सक्रीय सहभागी व्हावे यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच बसून रहावे असे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. तसेच या काळात जिल्ह्यात व उदगीर उपविभागात बाहेरून आलेल्या सर्व मजुरांना प्रशासनाने निवारा,अन्न पाणी, आरोग्य तपासणी चे सेवा उपलब्ध करून द्याव्यात.तसेच येथून एकही मजूर स्थलांतर करणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.
    आरोग्य विभागाने ज्या लोकांना होम कोरंटाइन मध्ये राहण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या सर्व लोकांनी बाहेर रस्त्यावर फिरु नये, घरातच बसून राहावे व आपल्या स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याबाबत सजग रहावे असे आवाहनन राज्यमंत्री बनसोडे यांनी केले. उदगीर उपविभागात सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे सर्व लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोचले पाहिजे करता योग्य ती काळजी घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.
       सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी तसेच नागरिकांनी घराबाहेर न पडता घरपोच किराणा मागवावा प्रशासनाकडं तशा सुविधा देण्यात येत आहेत असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य  असे आवाहन केले
       उदगीर उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लॉक डाऊन च्या काळात मुख्यालयी थांबणे आवश्यक आहे. प्रत्येक गावात तलाठी व ग्रामसेवक यांनी थांबलेच पाहिजे असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. तसेच नगरपालिका भागात तलाठी व बिल कलेक्टर यांनी स्वतंत्रपणे रेशनिंग कार्ड ची तपासणी करावी व ज्या लोकांना रेशन कार्ड ची गरज नाही त्यांचे रेशन कार्ड रद्द करावे व गरजू लोकांना रेशन कार्ड मिळवून देणे असे निर्देश त्यांनी दिले. तहसिल स्तरावर तहसिलदार यांनी इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करावे असे त्यांनी सूचित केले.
      या लॉक डाऊन च्या काळात पोलीस विभागामार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व घरीच थांबून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनी केले. या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रवीण शेट्टी त्यांनी उपयोगात प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. उदगीर तहसील प्रशासन मार्फत लॉक डाऊन च्या काळात  केलेल्या  उपाययोजनांची माहिती तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनी बैठकीत दिली.

No comments:

Post a Comment