Followers

Monday 13 April 2020

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुटुंबात साजरी करा- राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आवाहन


लातूर,दि.13:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी नेहमीप्रमाणेच घराघरात उत्साह कायम आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत आपण कुटूंबियांसोबत घरातच जयंती साजरी करायची आहे. घराबाहेर एकजणही पडणार नाही याची दक्षता प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी केले आहे.
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, भारतरत्न बाबासाहेबांनी सर्वांना कायद्याचे राज्य मिळवून दिले. जगात सर्वोत्कृष्ट राज्यघटना भारताला दिली. त्याच सर्वोच्च घटनेचे आणि कायद्याचे पालन आपल्याला करायचे आहे. सद्या देशात राज्यात साथ रोग प्रतिबंध कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच संचारबंदी लागू आहे. देशातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आपल्या हितासाठी या कायद्याचा अंमल केला आहे. त्याचे कोणालाही, कोणत्याही स्थतीत उल्लंघन करता येणार नाही. जिल्हा प्रशासन वेळोवेळी ज्या सूचना करीत आहे, त्याचे पालन करावे लागणार आहे. संबंध मानवजातीवरील मोठे संकट आज ओढवले आहे. आज माणुसकीधर्म जपणे हे अधिक गरजेचे आहे. आपल्यामुळे आपला परिवार, आपल्या देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहणे हेच प्रथम कर्तव्य आहे. देशहित आणि सर्व समाजाचे भले हाच बाबासाहेबांचा विचार आहे, आणि आपण सगळे त्यांच्या विचारांचे पाईक आहोत, असे सांगत राज्यमंत्री बनसोडे यांनी पुन्हा एकदा आपल्या कुटूंबातील सदस्यांसोबत जयंती साजरी करून महामानवाला वंदन करा असे आवाहन केले आहे.
महामानवाला अभिवादन...
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्येकाने आपल्या कुटुंबात, घरात राहूनच अभिवादन करायचे आहे. भीमरायांची प्रेरणा गीते, ग्रंथ आणि विचारधन आपल्या सोबत आहे. आजच्या कठीण स्थितीत आपला विवेक, माणूसधर्म जागृत करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारवरच आपण वाटचाल करू असा विश्वासही राज्यमंत्री बनसोडे यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment