Followers

Friday 21 June 2019

राज्यस्तरीय योग शिबिरात नांदेडकरांनी अनुभवला चैतन्याचा अखंड झरा...







नांदेड दि. 21 :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरात नांदेडकरांसहीत राज्यभरातून आलेल्या योगसाधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबांच्या योग सादरीकरणाचा चैतन्यदायी अखंड खळखळणारा झरा अनुभवला. यावेळी योगसाधकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पहावयास मिळाला. या उत्साही वातावरणात सहभागी घेवून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळाल्याचा आनंद नांदेडकरांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. 
नांदेड शहरातील शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) येथे राज्यस्तरीय योग दिनासाठी मागील दहा दिवसापासून राज्य शासनाच्या विविध आस्थापना आणि पतजंली योगपीठाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम आज भल्या पहाटे दिसून आला. नांदेड शहरातील  शिबिराकडे जाणारे रस्ते वाहनांच्या व नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरु रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी युवक-युवती , महिला -पुरुष, अबाल वृध्द , शिक्षकवर्ग , विद्यार्थी असे शहरी, ग्रामीण भागातील आणि सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग जाणवत होता. कार्यक्रम स्थळाकडे शिस्तबध्दरितीने लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या लोकांमध्ये उत्साह दिसून येत होता.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रशासकीय यंत्रणातील महसूल, पोलीस, शिक्षण, आरोग्य, महानगरपालिका, होमगार्ड, जिल्हा परिषद, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यासह विविध स्वंयसेवी संस्था व संघटना यांच्या स्वंयसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमस्थळी मुख्य व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या योग प्रात्यिक्षिकांना एका भव्यदिव्य सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. पांढऱ्या शुभ्र पोषाखामधील लाखों नागरिक योगासनाचे विविध प्रकार करीत होते. प्रसार माध्यम आणि वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, गोल्डन वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय सोहळ्याचे निरीक्षण आणि वृत्तांकनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येक क्षणाची नोंद घेत होते. विविध वृत्त वाहिन्यांद्वारे याचे थेट प्रसारण जगभरातील 177 देशातील नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी यांची सुरु असलेली लगबग जाणवत होती.
भारतीय परंपरेतील पाच हजार वर्षांपेक्षा जुन्या योग विद्येला आंतरराष्ट्रीय स्वरुप प्राप्त करुन देतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघातून योगदिन हा जगभरात साजरा केला जावा. या मांडलेल्या प्रस्तावाला जगातून 177 देशांनी पाठींबा दिल्याने सुरु झालेला आंतरराष्ट्रीय योगदिनाचे सलग पाचवे वर्ष असल्याने राज्यस्तरीय शिबिराचा बहुमान नांदेड नगरीला प्राप्त झाल्याने हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवून आपल्या मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती उत्साही दिसत होता.
सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये विविध भागातील जातीधर्मातील लोकांच्या मनामध्ये योगाबद्दल असलेली आस्था त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियातून जाणली.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या पांगरा गावाच्या श्रीमती नंदाबाई कदम म्हणाल्या, शहरापासून दूर असूनही आमच्या खेडेगावात योगाबद्दल जनजागृती वाढत आहे. नियमितपणे योगासाने करणारी अनेकजण आहेत. त्यांना या भव्य योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती. परंतु सगळ्यांना येणे शक्य नसल्याने गावातील 50 महिला आणि पुरुषांचा चमू या कार्यक्रमासाठी आज येथे आलेला आहे . येथील कार्यक्रम पाहून आनंद झाला असून त्याची माहिती आम्ही गावातील इतरांना देणार आहोत.

नांदेडच्या नागार्जून नगर भागातील उर्दू प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती रिझवाना अंजूम यांनी सांगितले की, आम्ही योगदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह सहभागी झालो आहोत. योगगुरु रामदेवबाबांना प्रत्यक्षात योगासने करुन दाखवतांना पाहता आले, ही कायम स्मरणात राहणारी घटना आहे.
        नांदेडच्या सचखंड विद्यालयातील  अनिल कौर रामगडीया आणि हरजिंदर कौर या शिक्षिका म्हणाल्या  की, आरोग्यपूर्ण जीवनासाठी योगा हा महत्वाचा असल्याचे जाणवल्याने आमच्या विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक नियमितपणे योगा करतात. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने आम्हाला यामध्ये सहभागी होता आले, याचा खुप आनंद वाटतो.
नांदेड येथील गुरुदत्त रिसर्च फाऊडेंशनचे फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे डॉ. राहूल अशोक मैड यांनी सांगितले की, व्यायाम आणि योगासने आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असून त्यामुळे आपणाला शारिरीक दुखण्यांपासून दूर राहण्याची आणि आनंदी जीवन जगण्याची संधी मिळते. यासाठी योगासनांबाबत जणजागृतीसाठी महाविद्यालयातील अध्यापक आणि विद्यार्थी योगदान देतात. तसेच त्याबद्दलची शास्त्रोक्त माहितीही देण्याचा नियमित प्रयत्न केला जातो. आजच्या योगदिनात सहभागी होण्यासाठीदेखील आम्ही लोकांना प्रेरित केले.
        भंडारा जिल्ह्यातील सेंदुरवाफा गावातल्या योगप्रचारक प्रिती प्रकाश डोंगरवार यांनी सांगितले की, योगप्रचारक प्रकल्प, पतजंली योग समिती योगासनासाठी प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात जगभर कार्य करते आहे. शासनाने हा उपक्रम योगदिनाच्या माध्यमातून जगभरात नेवून याला मोठी मान्यता दिली आहे. यामुळे आमच्या उत्साहात भर पडली असून आजच्या योगदिनासाठी आमच्या भंडारा जिल्ह्यातून योग साधकांचे व प्रचारकांचे पथक पंधरा दिवसांपासून नांदेड येथे आलेले होते. मी स्वत: गृहीणी असून मला योगाचे महत्व पटल्याने इतरांना देखील ते सांगण्यासाठी मी हे काम करते आहे. आम्ही नांदेड शहर व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी जावून लोकांना योगासनांबाबत तसेच आजच्या योगदिनाबद्दल माहिती दिली. वर्षभराच्या इतर कालावधीत योगशिबीर, आरोग्यसभा याद्वारे आम्ही लोकांमध्ये जनजागृती करीत आहोत.     
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केलेल्या प्रयत्नांचे फलीत या सोहळ्याच्या रुपाने संपन्न झाल्याने आयोजक, प्रशासन आणि स्वंयसेवक यातील प्रत्येकाला आनंद झाल्याचे दिसून आले.  

योगाच्या माध्यमातून जीवन आरोग्यदायी बनवू या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






§  नांदेडचा एकाचवेळी विक्रमी संख्येने योगा शिबीरात सहभागी होण्याचा जागतिक विक्रम
§  यापुर्वीचा विक्रम मोडीत काढत गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डकडून प्रमाणपत्र मिळविले.
§  2040-50 दरम्यान भारत सर्वात मोठे आध्यात्मिक व सामर्थ्यशली राष्ट्र होणार
§  योग दिनाच्या कार्यक्रमास सुमारे दीड ते दोन लाख लोकांची उपस्थिती
नांदेड दि 21:- प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगास अत्यंत महत्त्व असले पाहिजे. म्हणून योगाच्या माध्यमातून आपलं जीवन कायमस्वरुपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करू या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
नांदेड येथे राज्य शासनाच्यावतीने तसेच विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी योगगुरु स्वामी रामदेवबाबा, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई चिखलीकर-देवरे, प्रविण पाटील चिखलीकर, औरंगाबाद विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, आदींसह हजारो योग साधक उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संयुक्त राष्ट्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला व हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात सर्वात कमी कालावधीत मंजूर झाला. आज जगातील 150 पेक्षा अधिक देशात सुदृढ आरोग्यासाठी योगासने केली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.  
जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमास महाराष्ट्रात येण्याची विनंती बाबाजींना केली असता, त्यांनी ती तातडीने मान्य केली. त्यांना आम्ही हा कार्यक्रम मराठवाड्यातील नांदेड येथे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तेंव्हा त्यांना मोठा आनंद झाला होता. बाबाजी या राज्यस्तरीय शिबिरास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे खूपखूप आभार , असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले . भारताची प्राचीन योग विद्या योगगुरु रामदेवबाबा यांनी संपूर्ण देशाबरोबरच ती जागतिक स्तरावरही पोहोचविली, याचा अभिमान असून आज नांदेडच्या पावनभूमीत प्रत्यक्ष रामदेवबाबा हे आपल्याला योग विद्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आलेले आहेत. या संधीचा लाभ घेऊन नांदेड जिल्हा वासियांनी निरोगी व आरोग्यदायी जीवनासाठी नियमीत योगासने करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
भारत देश हा प्राचीन योग विद्येच्या माध्यमातून अध्यात्म महाशक्तीकडे वाटचाल करत आहे. तसेच या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, राजनैतीकदृष्ट्या भारत अधिक सुरक्षित होत असल्याचे रामदेवबाबा यांनी सांगून सन 2040 ते 2050 दरम्यान भारत विश्वातील सर्वात मोठे सामर्थ्यशाली राष्ट्र होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. तसेच शरीर व मन निरोगी राहिल्याने जीवनमानातही वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योगासने करुन आपले जीवन आरोग्यदायी व सुखकर बनविण्याचे आवाहन रामदेवबाबा यांनी केले.
आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून येथे जमलेल्या प्रत्येक नागरिकांने योगधर्म, मानवधर्म, राष्ट्रधर्म व सेवाधर्माचा प्रामाणिकपणे अंगीकार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
योगा शिबिराची गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
एकाचवेळी एकाच ठिकाणी 91 हजार 323 लोकांनी योगासने करण्याचा पूर्वीचा जागतिक विक्रम नांदेड येथील आजच्या राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी मोडला जाऊन नांदेडच्या पावनभूमीत एक लाख 10 हजारापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी रामदेवबाबा यांनी योग विद्येचे प्रशिक्षण दिले व नवीन जागतिक विक्रमाला नांदेडकरांनी गवसणी घातली.
यावेळी गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनीष विष्णूई यांनी ड्रोनद्वारे प्राथमिक गणनेनुसार नांदेड येथील योग कार्यक्रमास एक लाख 10 हजारापेक्षा अधिक लोक असल्याची माहिती दिली. जागतिक विक्रम नांदेडकरांनी प्रस्थापित केल्याचे गोल्डन बुक प्रमाणपत्र श्री. विष्णुई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांना यावेळी दिले. आयुष विभागाने तयार केलेल्या पवनी या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पतंजलीच्यावतीने स्वदेशी समृद्धी कार्ड अंतर्गत पतंजली कार्यकर्त्यांना मदत देण्यात येत असते. नांदेड येथील पतंजली कार्यकर्त्याचा अपघात होऊन जायबंदी झाल्याने त्या कार्यकर्त्यांला पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला.
मेरा जीवन-मेरा मिशन
रामदेवबाबा यांच्या जीवनावर आधारित मेरा जीवन, मेरा मिशन या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठाचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या आत्मचरित्राच्या पुस्तकांची प्रकाशनापूर्वीची विक्रीची नोंदणी आजपासून सुरु झाली. यावेळी श्री फडणवीस यांनी या आत्मचरित्राच्या 100 पुस्तकांची आगाऊ मागणी नोंदविली असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी रामदेवबाबा यांनी व्यासपीठासह सर्व योग साधकांना शरीराला ऊर्जा प्राप्त करुन देणाऱ्या योगींग-जॉगींग आसनाने सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योगासनांचे विविध प्रकार केले. यावेळी सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत रामदेवबाबा यांनी सूर्यनमस्कार, ताडआसन, त्रिकोण आसन, वृक्षासन, गरुडासन आदि अनेकविध आसनांचे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक, नागरिक, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. जयदीप आर्या यांनी केले. या कार्यक्रमास सुमारे दीड ते दोन लाख नागरिकांची उपस्थित होती. 

Thursday 20 June 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर स्वागत





नांदेड, दि. 20 :-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरासाठी येथील गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आज रात्री 10.20 वा. आगमन झाले. यावेळी त्यांचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, गुरुद्वारा बोर्डाचे इंदरसिंघ मनहस, परमज्योतसिंघ चहेल, डी. पी. सिंघ, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, माजी महापौर अजय बिसेन, राजेश पवार, संतूक हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, संजय कोडगे आदी उपस्थित होते. 

नांदेड येथील राज्यस्तरीय योगशिबिराची तयारी पूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार ; सुमारे दीड लाख नागरिकांचा सहभाग अपेक्षीत




नांदेड, दि. 20 :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या दि. 21 जून 2019 रोजी शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) असर्जन नांदेड येथे सकाळी 5 ते 7.30 वा. राज्यस्तरीय योग शिबिराचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्वामी रामदेव महाराज यांची उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. सर्वस्तदरातील नागरिक, महिला, विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय योग शिबिरात जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे. 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला आहे. जगभरातील  देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित व पतंजली योगपीठाच्या सहयोगाने आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या राज्यस्तरीय योग शिबिरात जवळपास दीड लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. 
स्वामी रामदेव महाराज यांचे आज नांदेड येथे आगमन झाले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती स्वामी रामदेव महाराज यांनी मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिली. नियमितपणे योग केल्याने आपला दिवसच नाही तर आयुष्य चांगले होईल. आजारापासून आपण दूर राहू असे बाबा रामदेव यांनी योग दिनाच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना सांगितले. यावेळी बाबा रामदेव यांनी योग करण्याचे महत्व, योग कसा करता येतो, योगमुळे काय फायदे होतात याची प्रात्यक्षिके दाखविली.
यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस राज्यातील 36 जिल्हा मुख्यालय आणि 322 तालुका मुख्यालय अशा 358 ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान 5 हजार विद्यार्थी (शाळा/महाविद्यालये/एनएसएस/एनसीसी/स्काऊट गाईड) सहभागी होणार आहेत.

Monday 17 June 2019

सर्व नागरिकांनी सुदृढ आरोग्यासाठी नियमित योगासनांचा संकल्प करावा-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत


 लातूर दि 17:- संपूर्ण जगभरात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. या दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सुदृढ आरोग्यासाठी नियमित योगासने करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.
      जिल्हाधिकारी कार्यालयात 21 जून रोजी साजरा करावयाच्या जागतिक योग दिनानिमित्त च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी आनंत गव्हाणे,अतिरिक्त पोलीस अध्यक्ष हिम्मत जाधव, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे,  आयुष्  अधिकारी श्रीमती सय्यद यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी तसेच पतंजली योग,आर्ट ऑफ लिव्हिंग व ब्रह्माकुमारी या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
         जिल्हाधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की, योग दिनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील शेवटच्या घटकापर्यंत योगासनाचे फायदे पोहोचवावेत. नागरिकांना त्यांच्या सुदृढ आरोगयाबाबत प्रबोधन करावे व याकरिता पतंजली योग, ब्रह्माकुमारी या संस्थांनीही अधिक कार्यक्षमपणे पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
        प्रत्येकाने योगासने केली पाहिजेत. ही एक निमित्त चालणारी प्रक्रिया असून "Do Yoga No Roga"  या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने नियमित योगा केल्यास आजार पण दूर जाईल, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगून प्रत्येक नागरिकांनी आपल्या सुदृढ आरोग्यासाठी योगासने करण्याचे आवाहन केले.
      दिनांक 23 जून 2019 रोजी जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सकाळी सहा ते सात या कालावधीत होणाऱ्या सामुदायिक योगासने कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी करून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संबंधित सर्व विभागाने योग्य ती दक्षता घेऊन दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.
प्रारंभी आरोग्य  विभागामार्फत दिनांक 21 जून रोजी होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचे मिनिट टू मिनिट सादरीकरण करण्यात आले व संबंधित शासकीय यंत्रणा ची जबाबदारी व पतंजली योग व ब्रह्मकुमारी या संस्थांचे या कार्यक्रमातील सहभागाची माहिती देण्यात आली.

Monday 3 June 2019

मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीचे गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





                बीड (जिमाका)दि,3 विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाडयाचा सर्वांगिण विकास आणि दुष्काळमुक्तीचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करुअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी येथील गोपीनाथ गड येथे केले.
          गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगड परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडेकेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेपालकमंत्री पंकजा मुंडेराज्याचे दुग्ध विकासमंत्री महादेव जानकरराष्ट्रीय कृषि आयोगाचे उपाध्यक्ष पाशा पटेलमराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराडखासदार डॉ. प्रितम मुंडेखासदार सर्वश्री सुजय राधाकृष्ण विखे पाटीलसंजय ( बंडू ) जाधव,सुधाकर श्रृंगारेप्रताप पाटील चिखलीकरजय सिध्देश्वर स्वामीरणजित नाईक निंबाळकरओमराजे निंबाळकरहेमंत पाटील यासह आमदारपदाधिकारीशासकीय अधिकारी आणि मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. 
          यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेगोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व होते. गरीब आणि वंचिताच्या विकासासाठी ते शेवटपर्यंत झटले. मराठवाड्याच्या विकासाबरोबरच हा भाग दुष्काळमुक्त व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासन सर्वोत्वपरी प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्याने पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी समुद्रात जावू नये यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याशिवाय मराठवाडा वॉटरग्रीड अंतर्गत मराठवाडयात पाण्याचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी इस्राईल सोबत करार करण्यात आला असून पाच विकास आराखडयांना मान्यता देण्यात आली आहे. याकरिता 20 हजार कोटी खर्च लागणार आहे. बंद पाईपद्वारे हे पाणी  गावागावात शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करुन दिले जाईल.
          बीड जिल्ह्याच्या विकासाबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीकृष्णा खोऱ्यातील 25 टी.एम.सी. पाणी मराठवाड्याला मिळण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे. याचा लाभ बीड जिल्हयाला होणार आहे. बीड जिल्हयातील जनतेच्या जिव्हाळ्याचा रेल्वेचा प्रश्न लवकरच सुटणार असून नगर-बीड-परळी रेल्वे लाईनचे काम वेगाने सुरु आहे.
          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि वंचितांच्या कल्याणासाठी कामकाज करतांना अनेक निर्णय घेतले आहेत. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्यात येत आहे. राज्यात विविध भागातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजनांची सध्या अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्यात आल्या आहेत. दुष्काळनिवारण्यासाठी केंद्र सरकारकडून 1300 कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान प्राप्त झाले आहे. या शिवाय निधी लागल्यास शासनाच्या तिजोरीतून दिला जाईल त्यामुळे जनतेने कुठल्याही प्रकारची काळजी करु नयेशासन आपल्या पाठीशी आहेअसे मुख्यमंत्री म्हणाले.
          प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण घडल्याचा उल्‍लेख करीत ते म्हणाले कीगोपीनाथराव मुंडे यांचे व्यक्तीमत्वनेतृत्व क्षमता अफाट होती. त्यांच्या परिसस्पर्शामुळे राज्यात अनेक नेते घडले. मुंडे साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आम्ही निश्चितपणे उभा करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
          विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या सोबत अनुभवलेल्या क्षणांचा उलेख करुन त्यांच्या आठवणी सांगितल्या.
          पंकजा मुंडे म्हणाल्या कीगोपीनाथराव मुंडे हे अखेरच्या श्वासापर्यंत वचितांच्या विकासासाठी झटले. त्यांचे कार्य आजही विसरण्यासारखे नाही. वंचितांसाठी हा दिवस उर्जा देणारा आहे. या दिवसाचे महत्व पाहता गरीब बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून प्रतिष्ठान आणि दिनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी असलेल्या योजना पोहचविण्याचा या मेळाव्याचा व प्रदर्शनाचा उददेश होता असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
          मुख्यमंत्र्यांनी पांगरी येथे आल्यानंतर प्रथम चाराछावणीस भेट दिली व शेतकरीजनावरांचे मालक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. त्यानंतर गोपीनाथगड येथील गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी दर्शन घेवून श्रध्दांजली वाहिली. त्यांनी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याचे आणि या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन केले.
          व्यासपीठावर उपस्थित नवनिर्वाचित सर्व खासदारांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खा. प्रितम मुंडे यांनी केले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना खा. विखे पाटीलनाईक निंबाळकरश्री. जाधवश्री. चिखलीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
          याप्रसंगी आमदार सर्वश्री सुरेश धसभीमराव धोंडेआर. टी. देशमुखसुजितसिंग ठाकूरतानाजी मुरकुटेलक्ष्मण पवारमोहन फडअतुल सावेतुषार राठोडश्रीमती संगिता ठोंबरेस्नेहलता कोल्हेमोनिका राजळेमाधुरी मिसाळ आदीसह भारतभूषण क्षीरसागरस्वरुप हजारीजिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेयमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.             

आपत्ती व्यवस्थापनात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची - महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव







नांदेड, दि. 3 :- प्रगत देशांमध्ये सामाजिक शिस्त, देशाप्रतीचे प्रेम, आदर नागरी कर्तव्यांचे काटेकोर पालन आणि आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण तयारी या तीन गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले जाते आणि त्याला अनुसरूनच आपली जीवनशैलीही पाळली जाते. प्रगत देश या सर्व गोष्टींसाठी अत्यंत जागरुक असतात आणि आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन याविषयीची जनजागृती यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते, असे प्रतिपादन महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत मंच येथे दि. 3 जून ते 12 जून या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर, आव्हान-2019 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख तसेच विशेष कार्य अधिकारी डॉ. अतुल साळुंके, महामहीम राज्यपाल महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बी. वेणूगोपाल रेड्डी, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी हे उपस्थित होते.  
राज्यपाल चे. विद्यासागर राव पुढे म्हणाले ,सध्याच्या काळात प्रत्येक राष्ट्राने आपत्ती व्यवस्थापनाकरिता नेहमीच सज्ज राहायला हवे. खरे तर आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक धडे शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच देणे,  ही काळाची गरज आहे.  भारत देश हा विकसनशील देशांमधील अग्रेसर देश आहे.  एकविसाव्या शतकातील सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे सबंध जग पहात आहे.  अशा या टप्प्यावर भारताकडे असलेल्या युवा शक्तीचा वापर राष्ट्रहितासाठी प्रगतीसाठी योग्य मार्गाने होणे गरजेचे आहे.  
महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष कौतुक करताना म्हणाले की,  राष्ट्रउभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका अत्यंत आवश्यक व मोलाची आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशन अभियानामध्ये या विद्यार्थ्यांचा खूप चांगला उपयोग होणार आहे. हेच युवक - युवती उद्याचे देशाचे भविष्य आहे. या विद्यार्थ्यांना या वयात दिले जाणारे प्रशिक्षण त्यांच्या पुढील आयुष्यभरासाठी उपयुक्त व दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथका तर्फे अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात यावीत, मात्र त्याचबरोबरीने दरवर्षी सुरक्षा कवायतही (Security Drill) आयोजित करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षण शिबिरात राज्याच्या विविध महाविद्यालयांमधून आलेल्या 800 मुले व 600 मुलींचे राज्यपाल श्री. राव यांनी विशेष अभिनंदन केले आणि त्यांना आवाहनही केले की,  या प्रशिक्षणाचा सर्वार्थाने लाभ घ्या आणि समाजाला उपयोगी पडेल असे काम करा. जिल्हा प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांची निश्चितच मदत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमापूजनाने व तद्नंतर दीपप्रज्वलनाने या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात झाली.  त्याचबरोबर एनएसएसच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत गाऊन येथील वातावरण अधिक उत्साही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ. अतुल साळुंखे यांनी केले. या प्रास्ताविकात त्यांनी राज्यभरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाच्या विविध कामगिरीबाबतचा विस्तृत अहवाल महामहीम राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव , उपस्थित मान्यवर तसेच विद्यार्थ्यांना सादर केला.
शेवटी आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठातील संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी केले.
विद्यापीठ परिसरात महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते
विविध कार्यक्रम संपन्न
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या या भेटीदरम्यान महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसही भेट दिली. त्याचप्रमाणे त्यांनी एनडीआरएफच्या आपत्ती व्यवस्थापन प्रदर्शनास भेट दिली. त्यानंतर त्यांच्या हस्ते श्री. गुरू गोविंद सिंघजी अध्यासन संकुलाच्या इमारतीचे भूमीपूजन संपन्न झाले. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर व प्राणी संग्रहालयाच्या नूतन इमारतीचेही उद्घाटन महामहीम राज्यपाल श्री. चे . विद्यासागर राव यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे ,विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, अध्यासन केंद्राचे समन्वयक                    डॉ. दीपक शिंदे, तसेच श्री. गुरू गोविंदसिंघजी अध्यासन व संशोधन केंद्राच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष लड्डू सिंघजी महाजन प्रा. भगवंत सिंघजी गुलाटी,  निरंजन रवींद्र सिंघजी, सरदार रणवीर सिंग, प्रा. गुरुबच्चन सिंग विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता अरुण पाटील, अभियंता कनिष्ठ अभियंता हिरामण वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती.

श्री गुरु गोविंदसिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र इमारतीचे भूमीपूजन व कोनशिला अनावरण महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते संपन्न





नांदेड, दि. 3 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परिसरातील श्री गुरू गोविंदसिंघजी अध्यासन  संकुल व संशोधन केंद्र इमारतीचे भूमीपूजन व कोनशिला अनावरण महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल                   चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले.  तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परिसरात महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.  
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे ,विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, अध्यासन केंद्राचे समन्वयक                    डॉ. दीपक शिंदे, तसेच श्री. गुरू गोविंदसिंघजी अध्यासन व संशोधन केंद्राच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष लड्डू सिंघजी महाजन प्रा. भगवंत सिंघजी गुलाटी,  निरंजन रवींद्र सिंघजी, सरदार रणवीर सिंग, प्रा. गुरुबच्चन सिंग विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता अरुण पाटील, अभियंता कनिष्ठ अभियंता हिरामण वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती.

महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे स्वागत


नांदेड, दि. 3 :- महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे  आज सकाळी येथील  श्री. गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले.  जिल्हा प्रशासनाच्या वतीने महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  
यावेळी त्यांच्या समवेत नांदेड  महापौर श्रीमती  दीक्षा धबाले,  विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, महानगरपालिका आयुक्त लहूराज माळी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांची उपस्थिती होती.