Followers

Friday 31 July 2020

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी -पालकमंत्री शंकरराव गडाख



 

*जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे, पण वाढण्याची शक्यता गृहीत धरून उपाय योजनांची तयारी ठेवावी

 *कोरोना बाधित पण लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होम क्वारंटाईन करावे

 *परांडा शासकीय रुग्णालयात ४ महिन्यात व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध न करण्याबाबत चौकशी करणार

 *खासदार निधीतून तात्काळ रुग्णवाहिका खरेदी करण्यास परवानगी

 *आरोग्य विभागातील पदभरती ८ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी

 *पोलीस विभागाने लॉक डाउन मध्ये अधिक कडक कारवाई करून गर्दीवर नियंत्रण ठेवावे

 * खाजगी रुग्णालयांमध्ये तात्काळ रुग्णांवर उपचार  सुरू करावेत

 * जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती डॅश बोर्डवर मिळण्याची व्यवस्था करावी

 उस्मानाबाद, दि.३१(जिमाका):- जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ९४६ इतकी असून त्यापैकी ४९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.कोरोना बाधित  रुग्णांचा मृत्यूदर ४.७ इतका असून हा दर राज्याच्या मृत्युदर पेक्षा अधिक असल्याने मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने उपाययोजनांची काटेकोरपणे

 अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा covid-१९ च्या अनुषंगाने आढावा बैठकीत पालकमंत्री गडाख बोलत होते यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत,आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार कैलास घाडगे- पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर,पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्हि. वडगावे व अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

      पालकमंत्री गडाख पुढे म्हणाले की, आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात जे  कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यातील अत्यंत गंभीर रुग्णांची स्वतंत्र यादी तयार करावी व या गंभीर रुग्णांवर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार करण्याबाबत लक्ष केंद्रित करावे व हे रुग्ण पूर्णपणे बरे होतील यासाठी प्रयत्न करावेत व जेणेकरून जिल्ह्यात  कोरोनामुळे मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. 

       राज्यातील इतर जिल्ह्याची कोरोनाची परिस्थिती पाहता उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या त्या मानाने नियंत्रित आहे परंतु पुढील काळात ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने शासकीय तसेच खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर बेडची उपलब्धता करून ठेवावी. त्यासाठी आवश्यक सर्व इतर सुविधाही उपलब्ध कराव्यात,असे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले.

     जिल्ह्यात  कोरोना बाधित रुग्ण आहे परंतु या रुग्णांना कोविड आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे व त्यांच्या इच्छेनुसार  होम क्वॉरंटाईन करण्याबाबत प्रशासनाने विचार करावा. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा थोडासा ताण कमी होऊन जे गंभीर रुग्ण आहेत. त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल येईल. असे पालकमंत्री गडाख यांनी सांगून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या  व्यक्तींचे स्वॅब तपासणी साठी पाठवल्यानंतर त्या व्यक्तींचा रिपोर्ट येईपर्यंत एकाच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली.

      कोविड च्या अनुषंगाने आरोग्य विभागाने जी पदभरतीची प्रक्रिया राबविली आहे त्या अंतर्गत आतापर्यंत फक्त १०० पदांची भरती केलेली दिसून येत आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये आरोग्य विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांनी  ८ ऑगस्ट २०२० पर्यंत उर्वरित १५० पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश श्री. गडाख यांनी दिले. तसेच प्रशासनाने खासदार निधीतून तात्काळ एक रुग्णवाहिका खरेदी करून ती आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्द करावी असेही त्यांनी सूचित केले.

 जिल्ह्यातील जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांनी कोविड रुग्णावर उपचार करण्याबाबत पुढे यावे. या करीता जिल्हा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत जे रुग्णालय आहेत. त्यांनीही ही कोविड रुग्णांवर उपचार करावेत व पुढील काळासाठी मोठ्या प्रमाणावर बेडची उपलब्धता करून ठेवावी असे आवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले. तसेच परंडा शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर खरेदी करण्याबाबत तेथील लोकप्रतिनिधींनी चार महिन्यापूर्वी पत्र देऊनही त्यावर आतापर्यंत का कारवाई करण्यात आलेली नाही याची चौकशी करून त्यातील दोषीवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

     जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी याकरिता डॅशबोर्ड तयार करून त्यावर रुग्णालय निहाय बेडची उपलब्धतेची माहिती द्यावी. त्याप्रमाणेच पोलिस विभागाने लॉकडाऊन मध्ये अधिक कडक पद्धतीने काम करून गर्दीवर नियंत्रण ठेवावे अशी सूचना पालकमंत्री गडाख यांनी केली. प्रशासनाने दहा हजार रॅपिड टेस्ट किट्सची उपलब्धता करून त्या किट्स तालुकानिहाय उपलब्ध करून द्याव्यात व मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट कराव्यात अशीही सूचना त्यांनी केली.

    उस्मानाबाद शहरात १ ऑगस्ट पासून दुचाकीस बंदी घालण्यात आलेली आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने १ दिवस अंमलबजावणी करून त्याचा पुनर्विचार करावा तसेच आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णय व सूचना याबाबत रोज आढावा घेऊन त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करावे असे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले.

   प्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी covid-19 च्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली तसेच जिल्ह्याचा मृत्युदर ४.७ इतका असून तो कमी करण्या बाबत प्रशासनामार्फत उपाय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. असे सांगितले. तसेच १० हजार रॅपिड टेस्ट किट्स उपलब्ध होणार असून त्यामुळे तपासण्याची संख्या वाढणार आहे असे सांगून आणखी २० हजार रॅपिड टेस्ट किट्स ची मागणी नोंदविली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच प्रशासनामार्फत पुढील काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास जास्तीत जास्त बेड उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी खासदार निधीतून रुग्णवाहिका खरेदी करावे असे सांगितले. तसेच प्रशासनाने कोरोना अनुषंगाने उपाय योजना राबवून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा द्यावा असे आवाहन केले. तसेच यावेळी इतर लोकप्रतिनिधी

 यांनी कोरोनाच्या अनुषंगाने सूचना व प्रश्न मांडून त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

************

कोविड विषाणू तपासणी प्रयोगशाळेसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा -पालकमंत्री शंकरराव गडाख



             

उस्मानाबाद,दि.31(जिमाका):- येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड -19 विषाणू तपासणी प्रयोग शाळेसाठी आणखी काही अत्यावश्यक साहित्याची खरेदी करावी लागणार आहे.त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दयावा अशा सूचना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख यांनी  दि.31 जुलै रोजी केल्या.

       पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी कोविड विषाणू तपासणी प्रयोग शाळेची पाहणी केली. त्यानंतर याबाबत विद्यापीठ सिनेट सदस्य संजय निबांळकर यांनी प्रयोग शाळेस केमिस्ट, लॅब टेक्नीशीन,पॅथोलाजीस्ट आदिची संख्या अपूरी असून ती उपलब्ध करून देण्यात यावी. सध्या या प्रयोग शाळेतून एका शिप्‍टमध्ये 90 नमुन्याची तपासणी केली जात असून ती 2 शिप्‍टमध्ये करण्यात येते. यापुढे 3 शिप्‍टमध्ये तपासणी करावयाची असल्याने वजा 18 व वजा 20 डिग्री सेंटीग्रेटचे फ्रिजर लागणार आहेत.त्यामुळे हे साहित्य खरेदी करण्यासाठी कमीत कमी 30 लाख रूपयेची निधीची आवश्यकता भासणार आहे. तसेच या प्रयोग शाळेसाठी पक्का रस्ता नसल्याने या रस्त्याचे काम आमदार किंवा खासदार निधीतून करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी देखील निबांळकर यांच्या मागणीस दुजोरा देत व पुढील महिन्यात रुग्णांची संख्या वाढणार असल्याने सदरील साहित्य उपलब्ध करून देण्याची त्यांनीही मागणी केली

       यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिबांळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या कामासाठी माझ्यासह इतर सर्व लोकप्रतिनिधी सहकार्य करतील असे आश्वासन दिले.यावेळी आमदार कैलास घाडगे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे,उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,तहसिलदार गणेश माळी,उपकेंद्राचे संचालक गायकवाड, नोडल अधिकारी दीक्षीत, कराळे आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी पालकमत्र्यांनी ही प्रयोग शाळा उभारणीसाठी सतत पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावल्या बद्दल

 संजय निबांळकर व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचे विशेष कौतूक केले.

       त्यानंतर  जिल्हा शासकीय रूग्णालयातील कोविड सेंटरला पालकमंत्री गडाख यांनी भेट देऊन तेथील आरोग्य सुविधा व रुग्णांलयातील रुगण व पुरविण्यात येत असलेल्या सर्व सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनजंय पाटील यांच्याशी चर्चा करून कोणत्या प्रकारच्या अडचणी येत आहेत ? हे जाणून घेऊन या रूग्णांलयामध्ये आवश्यक लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या. तसेच वैराग रोड लगत असलेल्या  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे निवासी वस्तीगृह या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन  पाहणी करून तेथील सर्व परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर खाँजा गाजी रहे दर्गाह  या देवस्थान परीसरात मोहल्ला क्लिनिक सुरू करणाऱ्या कार्यकर्त्याशी संवाद साधत त्यांना आवश्यक असलेली रूग्णवाहिका  डॉक्टरसह  कर्मचारी उपलब्ध करून देण्याची सूचनाही प्रशासनाला केली.

                                              ****


Thursday 23 July 2020

महाराष्ट्र हे जागतिक स्तरावरील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असलेले राज्य घडविणारच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे





*मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उस्मानाबाद येथील  आरटीपीसीआर covid-19 तपासणी प्रयोगशाळेचे ऑनलाइन उद्घाटन

*राज्यातील लॅबची संख्या 2 वरून 131

*प्रत्येक गावामध्ये कोरोना दक्षता समितीची स्थापना करणार

*प्रत्येक लॅबमध्ये संशोधनासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा

*कोरोना वर मात करण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी

उस्मानाबाद, दि.23(जिमाका):- कोरोना विषाणूच्या संकटाने सर्व जग ग्रासले असून या विषाणूची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात 131 प्रयोग शाळा उभारण्यात आल्या आहेत. राज्यातील जनतेला आरोग्यच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून या माध्यामातून महाराष्ट्र हे देशातीलच नव्हेतर जगातील सर्वोच्च व  सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे राज्य घडविण्याचे स्वप्न असून  ते मी घडविणारच असा ठाम निर्धार व विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.             उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परीसरात उभारण्यात आलेल्या उस्मानाबाद कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
     यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमप्रकाश राजेनिबांळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार ज्ञानराज चौंगुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले,जि.प.उपाध्यक्ष धनजंय सावंत,नगराध्यक्ष मकरंदराजे निबांळकर,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्हि वडगावे, कोवीड जिल्हा नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.
 मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, ही प्रयोग शाळा उभारणीसाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो तसेच कोविड सारखी संकटे येतात आणि जातात संकटात जो पाय रोवून उभे राहतो  व पुढे वाटचाल करतो तेच खरे या संकटावर मात करतात. कोरोनामुळे संपूर्ण जग संकटग्रस्त झाले आहे. या संकटाची तुम्ही सर्वजण पाया रोवून उभे राहिलात त्यामुळे तुमचे मन:पूर्वक धन्यवाद देतो असे सांगुन  ते म्हणाले की,संपूर्ण राज्यात आवश्यकता असेल तेथे प्रयोगशाळा सुरू करीत आहोत. 
      तसेच कोरोनाचा काळ गेल्यानंतर प्रत्येक प्रयोग शाळेत एक विभाग संशोधनासाठी सुरु ठेवला पाहिजे. कोरोनाने जगायचे कसे हे शिकविले असून प्रत्येकाने स्वत: व कुटुंबातील सदस्याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच  प्रत्येक जिल्हयात टास्क फोर्स नेमण्याबरोबरच प्रतयेक गावात कोरोना दक्षता समित्या नेमण्याचे  मुख्यमंत्री ठाकरे यांनी सूचित केले. आपण कितीही प्रयोगशाळा उघडल्या तरी त्या पुऱ्या पडणार नाहीत, त्यामुळे जनतेला सोबत घेऊन व जनतेने  सतत हात धुणे,दोन व्यक्तीमध्ये अंतर ठेवणे व मास्क लावण्यासाठी  जनजागृती करून ते नियम कठोर पणे व कटाक्षाने पाळावे लागतील असे त्यांनी नमूद केले. व प्रत्येकाने यापुढील काळात स्वयंशिस्त पाळली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
  हा काळ कोरोना रुग्ण संख्या वाढण्याचा असल्याने कोणीही गाफील न राहता आवश्यक ती काळजी घ्यावी कारण जो पर्यंत आपल्याकडे व्हॅक्सीन (औषध) आपल्या हाताशी येत नाही तोपर्यंत आपण विजय मिळवू शकत नसल्याने जनतेला सोबत घेवून आपल्याला पुढे जायचे आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
    यावेळी आरेाग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, या प्रयोगशाळेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचारी वर्ग हा प्रशिक्षितच असायला हवा. तसेच सर्वानी मिळून काम केल्यास या प्रयोगशाळेचे उदिष्ट पुर्ण होणार असून आयएमएच्या डॉक्टरांची सेवा घेणे गरजेचे आहे.कारण जिल्हयातील मुत्यू दर वाढत असल्यामुळे आवश्यक ती पावले उचलावीत विशेष म्हणजे यापूर्वी तपासणीसाठी इतर जिल्हयावर अवलंबून राहावे लागत होते.मात्र आता ही प्रयोगशाळा सर्व प्रकारच्या तपासणीसाठी उपयुक्त असल्याने जिल्हा स्वावलंबी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      पालकमंत्री शंकरराव गडाख म्हणाले की ही प्रयोगशाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी येथील लोकप्रतिनिधी व जनतेची मागणी पूर्ण झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये या प्रयोगशाळेचा जिल्हयासाठी  नक्कीच फायदा होणार असल्याचे नमूद केले तर कुलगुरू डॉ.प्रमोद येवले म्हणाले की, ही प्रयोगशाळा या विद्यापीठाची दुसरी तपासणी शाळा आहे. मागील महिन्यात या विद्यापीठात 1 हजार 700 नमुने तपासणी ची क्षमता असलेली प्रयोग शाळा औरंगाबादमध्ये सुरू केली आहे. हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले असून उद्योजकाकडून त्यासाठी निधी उभा राहीला आहे. येथील प्रयोग शाळे संदर्भात  विद्यापीठ सिनेंट सदस्य प्रस्ताव सादर केला व लॉकडाऊनच्या काळात हे कार्य सर्वांच्या सहकार्यांने पार पडले, विषाणू बाबत औरंगाबाद येथे संशोधन सुरू केले असून कोरोना सोबत भविष्यात तोंड देण्यासाठी जैविक विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
    प्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या प्रयोगशाळा उद्घाटनाचे प्रस्ताविक केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद अंतर्गत   covid-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आव्हानाला जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी प्रतिसाद देऊन सुमारे 71 लाखाचा निधी प्रशासनाकडे जमा केला अशी माहिती त्यांनी दिली तसेच या प्रयोगशाळेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणावर तपासण्या करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. 

*प्रयोगशाळेसाठी सहकार्य केलेल्या देणगीदारांची यादी*
   उस्मानाबाद जनता सहकारी बँक, जिल्हा सहकारी पतसंस्था, फेडरेशन नॅचरल शुगर, धाराशिव शुगर, भाऊसाहेब बिराजदार सहकारी बँक, गोकुळ शुगर, भाई उद्धवराव पाटील सहकारी पत संस्था, बालाजी अमाईन्स , डी मार्ट ,रिन्यू एनर्जी , श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना, उस्मानाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था, उस्मानाबाद जिल्हा पाटबंधारे, कर्मचारी सहकारी पतसंस्था , शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी पतसंस्था, एन साई  मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, तामलवाडी इंडस्ट्रियल असोसिएशन, रुपामाता अग्रोटेक व इतर जिल्ह्यातील पतसंस्था सहकारी संस्था व छोट्या-मोठ्या आस्थापनांनी मदत केली.
   या कार्यक्रमास सर्व देणगीदार साखर कारखाना,सहकारी बॅक, पतसंस्था व कंपनी व्यवस्थापनाचे चेअरमन, प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी मानले.

Sunday 19 July 2020

सर्व सामान्य नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा तत्परतेने पुरवाव्यात -आरोग्य मंत्री राजेश टोपे




सर्व लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे

जिल्ह्यासाठी १० हजार ॲन्टीजन तपासणीस मान्यता

सह्याद्री हॉस्पिटल उस्मानाबाद व उमरगा येथील साई हॉस्पिटलला प्रायव्हेट कोविड सेंटरची मान्यता

कोविडवर उपायोजना करण्यासाठी आमदारांना 50 लाख रुपये खर्च करण्यास परवानगी

उस्मानाबाद दि.20 (जिमाका) - कोरोना महामारीचे संकट सर्वत्र असून यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर आवश्यक त्या सर्व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देता याव्यात यासाठी सर्व प्रकारचे खास अधिकार दिलेले आहेत. हा आजार सामान्य नसून  जनतेला आरोग्याच्या सर्व सुविधा वेळेवर मिळाव्यात यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करून सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करावेत, असे निर्देश  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी covid-19 च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत दिले.
       उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण  मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली(दि.19जुलै) आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा. अस्मिता कांबळे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास घाडगे- पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. सुरेश धस, राज्याच्या आरोग्य विभागाच्या वॉररुम प्रमुख डॉ. अर्चना पाटील, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राज गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश खापर्डे, विद्यापीठ सिनेट सदस्य संजय निंबाळकर आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.
        पुढे बोलताना ना. टोपे म्हणाले की, जिल्ह्यात ॲन्टीजन तपासणी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने एकाच कंपनीला नेमले असून तपासणीचा दर ४५० रुपये ठरविलेला आहे.  एक हजार लोकसंख्येच्या मागे तीन तपासणी करण्याचे प्रमाण असून जिल्ह्यात १० हजार ॲन्टीजनची आवश्यकता आहे. तसेच क्वॉरंटाईन सेंटरची देखरेख करण्याची जबाबदारी विभागीय अधिकारी यांच्यावर सोपविण्यात यावी. क्वॉरंटाईन सेंटरची संख्या अपूरी पडल्यास मंगल कार्यालय हॉल हे ताब्यात घेऊन त्याचा आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
      तसेच क्वॉरंटाईन उपचार घेत असलेल्या रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे असून त्यांना अंडी व दूध आदी खाद्यपदार्थ कोविडच्या प्रोटोकॉल प्रमाणे द्यावेत.  विशेष म्हणजे या रुग्णांना वेळेवर जेवण मिळावे यासाठी चांगल्या केटरची नेमणूक करावी व क्वॉरंटाईनची स्वच्छता राखण्याबरोबरच सदरील सेंटरचा फोटो काढून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावा व त्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करावी. त्यासाठी पैशाची अडचण भासू दिली जाणार नसल्याचा निर्वाळाही ना. टोपे यांनी यावेळी दिला.
     कोरोना -१९ यावर उपाययोजना करण्यासाठी आमदारांना ५० लाख रुपये खर्च करण्यास परवानगी दिली असून कोरोनावर मात करण्यासाठी जे साहित्य खरेदी करायचे आहे ते खरेदी करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ मान्यता देण्याच्या सक्त सूचनाही यावेळी ना. टोपे यांनी देऊन कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस आरोग्य विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

 * १७ सीएचओंची नेमणूक करण्यास परवानगी
 * ऑक्सिजन सिलेंडर घेण्यास मान्यता देण्यात आली
 * जिल्ह्यात आरएचसीटी स्कॅनसाठी परवानगी
 * आयएमए डॉक्टरांनी वार्डला किमान ७ दिवस सेवा देणे बंधनकारक
 * सह्याद्री हॉस्पिटल उस्मानाबाद व उमरगा येथील साई हॉस्पिटलला प्रायव्हेट कोविड सेंटरची मान्यता
 * खाजगी दवाखान्यात ऑडीटर नेमण्यात येणार
 * जिल्ह्याच्या सीमेवर पल्स ऑक्सिमीटर, पल्स थर्मल याची चांगल्या प्रकारे तपासणी करण्यात येणार
 * प्रायव्हेट दवाखान्यात मोफत सेवा मिळणार
 * दवाखान्याची बांधकाम  तात्काळ पूर्ण करण्यात येणार
 * नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होणार
 *ॲम्बुलन्स शिल्लक ठेवण्यात येणार
 * अर्सेनिक अल्बम-३० गोळ्या खरेदीस परवानगी
 * लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांच्या स्तरावर दर्जेदार क्वॉरंटाईन सेंटर करावे


खाजगी डॉक्टरांनी सेवा देणे बंधनकारक

"अशा महामारीच्या काळामध्ये खाजगी प्रॅक्टिस (IMA) करणाऱ्या डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात रुग्णांना सेवा देणे आवश्यक व बंधनकारक आहे. जे डॉक्टर सेवा देण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांची नेमणूक करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांनी सेवा देण्यास नकार दिल्यास त्यांचे लायसन्स रद्द करण्याचे अधिकार शासनाला आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाने या डॉक्टरवर मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च केलेली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून जनतेची सेवा करावी अशी आर्त साद महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे यांनी घातली". 

    प्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत राबवलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. तसेच सद्य परिस्थितीमध्ये जिल्ह्यात कोरोना चा संसर्गबाबत सविस्तर माहिती दिली.
      यावेळी आ. कैलास घाडगे-पाटील,आ. ज्ञानराज चौगुले, आ. सुरेश धस, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर,खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर व जिप अध्यक्षा प्रा. अस्मिता कांबळे या सर्व लोकप्रतिनिधी यांनी कोरोनाचे उपचार व संसर्ग रोखण्याबाबत आपले प्रश्न मांडून संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली तर याबाबत मंत्री महोदयांनी लक्ष घालून केलेल्या मागण्यांची पूर्तता करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

Thursday 16 July 2020

जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी कोविड-19 च्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा निर्माण कराव्यात-पालकमंत्री अमित देशमुख





*खाजगी रुग्णालयांना कोविड वर उपचार करण्यासाठी येणाऱ्या सर्व अडचणी शासनाकडून सोडवल्या जातील*
 *जिल्ह्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत असलेल्या 13 खाजगी रुग्णालयांनी कोविड रूग्णांवर उपचार सूरू करावेत*

लातूर, दि.15(जिमाका):- जगातील अनेक देशांमध्ये covid-19 ची दुसरी लाट आलेली आहे. तसेच लातूर जिल्ह्यात हे दिवसेंदिवस कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे.  प्रशासनाने जवळपास 7 हजार बेडची व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे. त्या दृष्टीने सध्या बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी कमी असली तरी भविष्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे असलेल्या बेडच्या संख्येनुसार काही बेड कोरोना रुग्ण उपचारासाठी राखीव ठेवावेत व  रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, असे आववाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित covid-19 च्या अनुषंगाने तसेच खासगी रुग्णालयातून कोविंड रुग्णावर उपचार सुरू करण्याबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, IMA चे लातूर जिल्हा अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी यांच्यासह अनेक डॉक्टर्स उपस्थित होते.
         पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की आपण सर्वजण सुरुवातीपासूनच covid-19 याविरोधात लढा देत आहोत. लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तरी लातूर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी व खाजगी डॉक्टरांनी कोविड रुग्णावर उपचार सुरू करणे गरजेचे आहे. तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल व काही अडचणी असतील तर त्या त्वरित सोडविल्या जातील, अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.
         इंडियन मेडिकल असोसिएशन संस्थेने यापूर्वीच covid-19 उपचारासाठी डॉक्टर्सनी कोणत्या प्रकारचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। त्या तत्त्वांचा वापर करून जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांनी रुग्णावर उपचार सुरू करण्याबाबत तात्काळ आपल्या रुग्णालयात सुविधा निर्माण कराव्यात. तसेच जे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करणार आहेत त्याची यादी सात दिवसात आय एम ए नी तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर करावी, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.
           खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करत असताना रॅपिड टेस्टद्वारे रुग्णांची तपासणी करावी. ह्या टेस्ट साठी शासकीय दराने मोबदला अदा करावा. लातूर महापालिकेच्या वतीने लवकरच रॅपिड टेस्ट किट उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत साथरोग प्रयोगशाळेचे दैनंदिन तपासणी करण्याची मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच कन्टेन्टमेंट झोन मध्ये पूल टेस्टिंग प्रायोगिक तत्त्वावर करण्यास सुचित करण्यात आले असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
           निमा संघटनेचे जे आयुर्वेदिक, होमियोपॅथी व यूनानी डॉक्टर्स आहेत. त्या डॉक्टर्सनी नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रचार-प्रसार व प्रसिद्धी करावी असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी करून जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्सनी कोविड रुग्णा बाबत आपली भीती व मानसिकता बदलावी. डॉक्टर लोक येणार असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे पहावे असेही त्यांनी म्हटलं.
         जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे आवश्यक असलेला औषधी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सेस यांना विमा संरक्षण मिळण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जातील असे श्री. देशमुख यांनी सांगून जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी covid-19 च्या रुग्णावर उपचार करण्यासाठी स्वतःहून पुढे यावे. तसेच जिल्ह्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश असलेल्या 13 रुग्णालयांनी कोविड रुग्णनावर उपचार सुरू करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
         जिल्हा प्रशासनामार्फत खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यासंबंधी IMA व निमा या संघटनेशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. खाजगी डॉक्टर्सनी मनात कोणतीही भीती न बाळगता प्रोटोकॉल प्रमाणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले. तसेच खासगी रुग्णालयाच्या कोविड उपचार सुरू करण्याबाबत काही अडचणी असतील त्या सर्व अडचणी सोडविल्या जातील असेही त्यांनी सूचित केले.
      लातूर महापालिकेच्या वतीने अँटीबॉडी ला प्राधान्य देऊन रॅपिड टेस्ट पुढील काही काळात सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. तसेच खाजगी रुग्णालयाकडे उपलब्ध असलेला पूर्ण प्रशिक्षित असलेला पॅरामेडिकल स्टाफ महापालिकेच्या आरोग्य विभागाला उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी केली. त्याचप्रमाणे खाजगी डॉक्टर्सनी मानव सेवा म्हणून त्यांची सेवा दिवसातून किमान दोन-तीन तास महापालिकेला उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
           यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विश्वास कुलकर्णी यांनी कोविड उपचाराच्या अनुषंगाने प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास संघटना तयार असल्याचे सांगितले. पुढील आठ दिवसात काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्याबाबत तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. खाजगी डॉक्टर्स व नर्स ना शासनाकडून विमा संरक्षण देण्याची मागणी केली. खाजगी डॉक्टर्सना येणाऱ्या अडचणी ची माहिती त्यांनी दिली. यावेळी डॉ. अरविंद भातांबरे, डॉ. चेतन सारडा, डॉ. बरमदे,  डॉ. अशोक पोतदार यांनी ही सूचना मांडल्या.

Monday 13 July 2020

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून योग्य नियोजन करा - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर



हिंगोली,दि.13: दिवसेंदिवस कोरेानाचा प्रादुर्भाव वाढत असून, येणाऱ्या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे आणि जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतकुमार माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. केंद्रेकर म्हणाले की, मराठवाड्यातील इतर जिल्ह्यापेक्षा हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी, येणाऱ्या कालावधीत कोरोनाचे संकट वाढण्याचे संकेत असल्याने रुग्णाची संख्या देखील वाढण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. याकरीता खाटांची संख्या वाढण्याची आवश्‍यकता आहे. याकरीता जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांची माहिती तयार करुन तेथील खाटांची उपलब्धतेची माहिती तयार करावी. तसेच पाणी, वीज आणि स्वच्छता गृहाची उपलब्धता आहे अशा वापरात नसलेल्या इमारतीची पाहणी करुन ठेवावी. जिल्ह्यातील तसेच कोरोना बाधीत रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता अतिमहत्वाची असल्याने रुग्ण रुग्णालयात दाखल होताच त्यास ऑक्सिजन मिळावा याकरीता प्राथमिक उपचार कक्षात ऑक्सिजनची सुविधेसह 3 ते 4 खाटांची सुविधा असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील सर्व खाटांवर ऑक्सिजनची सुविधा करुन घ्यावी. तसेच जिल्ह्यातील डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर आणि कोवीड केअर सेंटर या ठिकाणी देखील ऑक्सिजनच्या सुविधेसह खाटांचे नियोजन करावे. रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन तयार करण्याचा प्लान्ट लावावा. तसेच जिल्ह्यातील डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटरमधील 350 खाटांची संख्या ही किमान 2 हजार खाटापर्यंत वाढवावी.  तसेच रुग्णालयात जेवढ्या सुविधा देणे शक्य आहे तेवढ्या देण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा ग्रुप तयार करून वेळोवेळी सूचनांचे अदानप्रदान करावे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात तसेच गल्लीमध्ये कोरोना रक्षक समिती स्थापन करावी. ज्या व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब,हृदयविकार इत्यादी व्याधी असणाऱ्या व्यक्तींची माहिती तयार करावी. जिल्ह्यातील कार्यालये, दुकाने आदी ठिकाणी तपासणी केंद्रे तयार करुन तपासणी करावी. बाधीत किंवा संशयीत रुग्णास होम क्वारंटाईन न करता संस्थात्मक क्वारंटाईन मध्येच ठेवावे. कोरोना विषाणु संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी पहिले पाच दिवस अत्यंत महत्वाचे असतात. तसेच येणारा कालावधी हा चिंताजनक असून याकरीता डॉक्टरांनी या कालावधीत वेळोवेळी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधुन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा. तसेच ज्या भागात रुग्ण आढळला त्याठिकाणी योग्य निर्णय घेवून कडक जनता कर्फ्यू लावावा असेही श्री. केंद्रेकर यावेळी म्हणाले.
यावेळी कृषि, रोहयो, पाणी पुरवठा विभागांचा आढावा घेत विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर म्हणाले की, ज्या शेतातील बियांणांची उगवण झाली नाही अशा बियांणाचे नमुने घेवून तपासणी करावी. तसेच ज्या कंपनीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने उगवण झाली नाही अशा कपंनीच्या मालकावर गुन्हे दाखल करा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी रोजगार हमी योजना अंतर्गत जिल्ह्याला मंजूर झालेल्या 600 विहिरीचा आढावा घेतला. तसेच पर्यावरणांचे संतुलन राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालय, रस्त्यांच्या दूतर्फा, वन विभागाच्या जागेवर आणि माळरानावरील टेकड्यावर वृक्षारोपण करावे असे ही त्यांनी यावेळी निर्देश दिले.
नागरिकांनी देखील अतिमहित्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ही विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यावेळी केले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख यांच्यासह जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर आणि पत्रकार यांची उपस्थिती होती.
यावेळी विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी जिल्हा परिषद परिसरात केलेली वृक्ष लागवडीची पाहणी केली. तसेच हिंगोली येथील डेडीकेटेड कोवीड रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील सुविधांची पाहणी करत जिल्हा रुग्णालयातील उपचाराकरीता भरती असलेल्या रुग्णांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधुन त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.