Followers

Thursday 16 November 2023

मराठा समाजातील युवकांना रोजगारातून स्वावलंबनाचा मार्ग दाखविणारे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

 विशेष लेख:



मराठा समाजातील बेरोजगार युवक युवतींना उद्योग/व्यवसाय उभारण्यास मदत करून त्यांना रोजगारातून स्वावलंबनाचा मार्ग दाखविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या कर्जाच्या व्याजाच्या रक्कमेचा परतावा महामंडळ करते.
मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासाला महामंडळाच्या योजनेअंतर्गत या घटकातील युवक-युवतीना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास कर्जदार युवका-युवतींनी उद्योगासाठी घेतलेले व्याज महामंडळ भरते.यामुळे व्यवसाय उभारणीसाठी युवक-युवतींना दिलासा मिळतो. मराठा समाजातील या युवक युवतींना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ काम करते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून मराठा समाजातील नागरिकांना उद्योग व व्यवसाय करण्याची संधी प्राप्त झाली आहे.या कर्जाच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसाय,दुग्ध व्यवसाय,शेळीपालन,व्यवसायिक वाहने,मेडिकल,कृषी सेवा केंद्र,हॉटेल मालवाहतूक वाहने,ट्रॅक्टर,किराणा दुकान,फुटवेअर,टेलरिंग दूकान, मेडीकल असे विविध प्रकारचे व्यवसाय सुरू केले आहे.
जिल्ह्यातील मराठा समाजातील युवक-युवतींनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन रोजगारातून स्वावलंबनाच्या मार्गाची कास धरावी.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, धाराशिव

‘सारथी’च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण योजनेतून घडले 304 अधिकारी

 योजना ‘सारथी’च्या...



· पुणे येथे दरवर्षी राज्यातील 750 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण
राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. 'शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या ‘सारथी’ संस्थेमार्फत विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम केले जात असून या योजनांच्या माहितीवर आधारित क्रमशः लेखमालेचा हा दुसरा भाग...
‘सारथी’मार्फत संघ लोकसेवा आयोग अर्थात ‘युपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षेसाठीही मोफत प्रशिक्षणाची योजना राबविली जाते. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील लक्षीत गटातील उमेदवारांना राज्य सेवेतील विविध प्रशासकीय पदांवर काम करण्याची संधी मिळावी, हा या प्रशिक्षणामागील उद्देश आहे. गेल्या तीन वर्षात म्हणजेच 2020 पासून या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेले 304 उमेदवार राज्य शासनाच्या सेवेत अधिकारी म्हणून दाखल झाले आहेत. सुरुवातीला दरवर्षी 250 उमेदवारांना या परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येत होते, गतवर्षी या सख्येत वाढ करण्यात आली असून आता दरवर्षी 750 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेतलेल्या 70 उमेदवारांचा सन 2020 मध्ये राज्य सेवा परीक्षेच्या अंतिम निवड यादीत समावेश होता. यापैकी पहिल्या पाच जणांमध्ये ‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेतलेले चार उमेदवार होते. तर 2021 मध्ये ‘सारथी’च्या योजनेतून प्रशिक्षण घेतलेले 104 उमेदवार अंतिम निवड यादीत होते. त्यामध्ये 5 उपजिल्हाधिकारी, 6 पोलीस उपअधीक्षक, 5 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पदावर रुजू झाले. तांत्रिक सेवेमध्ये कृषि सेवेसाठी 67, स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 35, यांत्रिकी अभियांत्रिकीसाठी 16 आणि वन सेवेसाठी 10 उमेदवारांची निवड झाली. गेल्या तीन वर्षात 74 उमेदवार वर्ग-1 चे अधिकारी, तर 230 उमेदवार वर्ग-2 चे अधिकारी म्हणून सुरु झाले आहेत.
मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाती कोणत्याही शाखेतील पदवीधारक, तसेच एमपीएससी राज्य सेवा परीक्षा देण्यासाठी पात्र उमेदवार या योजनेचा लाभ घेवू शकतात. ‘सारथी’मार्फत किंवा इतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांकडून राबविण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा उमेदवाराने लाभ घेतलेला नसावा.
एमपीएससी राज्य सेवा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘सारथी’ने पुणे येथील संस्थांची निवड केली आहे. चाळणी परीक्षेद्वारे राज्यातील दरवर्षी विद्यार्थ्यांची निवड या प्रशिक्षणासाठी केली जाते. या उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यासाठी प्रशिक्षणाचे देण्यात येते. पूर्व परीक्षा प्रशिक्षणाचा कालावधी अंदाजे 8 महिन्यांचा आहे. मुख्य परीक्षा कालावधी सुमारे 3 महिने आणि मुलाखत तथा व्यक्तिमत्व चाचणी प्रशिक्षणाचा कालावधी अंदाजे एक महिन्याचा असतो.
प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यांना पुस्तके आणि इतर आकस्मिक खर्चासाठी एकरकमी 10 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. पूर्व परीक्षा प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या वर्गातील उपस्थिती व चाचणी गुणानुसार दरमहा मासिक 8 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. पूर्व-परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी निशुल्क कोचिंगसोबतच वर्गातील मासिक हजेरी आणि चाचणी गुणांनुसार 15 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी ‘सारथी’च्या संचालक मंडळाने निश्चित केलेली रक्कम अर्थसहाय्य म्हणून दिली जाते.
एमपीएससी परीक्षा प्रशिक्षण योजनेच्या प्रमुख अटी
उमेदवार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला तथा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराच्या नावाचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले नॉन-क्रिमीलेअर, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा ईडब्लूएस प्रमाणपत्र आवश्यक आहे.
‘सारथी’च्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जातात. अर्जदाराची निवड ‘सारथी’मार्फत आयोजित ‘सीईटी’मध्ये प्राप्त गुणांद्वारे केली जाते. या गुणांकानुसार गुणवत्ता यादी ‘सारथी’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते. त्यानंतर कागदपत्रे पडताळणीद्वारे पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रकिया पूर्ण केली जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
जातीचा दाखला किंवा शाळेचा दाखला किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र अथवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पदवी प्रमाणपत्र, दहावी बोर्डचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट साईज फोटो.
प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची संधी
सन 2023-24 मध्ये ‘सारथी’च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. या संकेतस्थळावर योजनेच्या अटी, शर्ती आणि पात्रता निकषांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
- तानाजी घोलप, माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

मराठा समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सक्रिय ‘सारथी’ ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था’

विशेष लेख:


राज्यातील सर्व घटकांच्या विकासाला पूरक वातावरण, सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असते. याच उद्देशाने महाराष्ट्रातील विविध जातसमूहांच्या अस्तित्वाची दखल घेऊन त्या अनुषंगिक सहाय्यक योजना,उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने विविध महामंडळांची, विभागांची निर्मिती राज्य शासन करत असते. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या,युवा पिढीच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे सारथीची स्थापना करण्यात आली आहे. सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम,योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत. राज्यातील 1 लाख 33 हजार 236 विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. पीएच.डी विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती विभागात 2 हजार 109 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण विभागात 25 हजार 107 तर शिक्षण विभागातंर्गतच्या योजनांचा 25 हजार 137 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.तर कौशल्य विकास प्रशिक्षण विभागांतर्गत 20 हजार 743 लाभार्थ्यांना तर सारथीच्या इतर उपक्रमातंर्गत 60 हजार 140 जणांना फायदा झालेला आहे.
संरचना आणि निधीची तरतूद :
राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथी कार्यरत आहे. शासनाकडून या संस्थेस भरीव निधी प्राप्त होत असून सन 2023-24 या आर्थिक वर्षात 300 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून उपकेंद्र कोल्हापूर येथे कार्यरत आहे. त्यासोबतच सारथीचे राज्यात 8 विभागीय कार्यालये कोल्हापूर, खारघर नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. ही संस्था राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली Indian Companies Act 2013 & Rules कंपनी कायदा - 2013 च्या कलम 8 अन्वये नोंदणीकृत असून संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची कालबध्द त-हेने व प्रभावीपणे अंमलबाजावणी करण्यात येते. सारथीच्या संचालक मंडळावर शासनाने बारा संचालकांची नियुक्ती केलेली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून संस्थेचे कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येते. सारथी संस्थेचे संस्थापन समयलेख Memorandum of Association & Article of Association (MoA व AoA) हे Registrar of Companies यांचेकडे चार जून 2018 रोजी नोंदणीकृत केले असून त्यामध्ये नमूद तीन मुख्य उद्दिष्टे व 82 पूरक उद्दिष्टानुसार संस्थेचे कामकाज चालू आहे.
सारथीमार्फत राबवण्यात येत असलेल्या शैक्षणिक प्रगतीच्या योजना
महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग
या उपक्रमातंर्गत सारथीमार्फत युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परिक्षांच्या पूर्व,मुख्य तसेच मुलाखत या तीन्ही टप्प्यांवर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. यासाठी महाराणी ताराराणी स्पर्धा परिक्षा विभाग सक्रियरित्या कृतीशील असून या उपक्रमांतर्गत युपीएससीच्या पूर्व परिक्षेसाठी पाचशे विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थांना दरमहा 13 हजार व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रु.विद्यावेतन दिले जाते.तसेच प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.
उपयुक्तताः- आत्तापर्यंत मागील तीन वर्षांत एक हजार 479 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी 21 कोटीचा लाभ डिबिटी द्वारे देण्यात आला आहे. युपीएससी मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पन्नास हजार रु.एकरकमी दिले जातात. सारथी मुख्यालयातून विद्यार्थ्यांना झूम मिटींगद्वारे मार्गदर्शनही करण्यात येते. त्यांच्या जर काही अडचणी, समस्या असतील तर त्या सोडवण्यात येतात. आत्ता पर्यंत मागील तीन वर्षांत साडेसहाशे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 3.25 कोटीचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे. तर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रु.एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षात 206 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 51 लाखाचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.
यशस्वीताः-
युपीएससी परिक्षांमध्ये सारथीच्या माध्यमातून विद्यार्थी उत्तम यश प्राप्त करत असून आयएएस सेवेत तीन वर्षात बारा,आयपीएस मध्ये 18 तर आयआरएस सेवेत आठ आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये एकुण बारा अशा सारथीमधील 51 विद्यार्थ्यांची युपीएससी परीक्षेत निवड झालेली आहे. तर भारतीय वन सेवेसाठी सारथी संस्थेतील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तसेच युपीएससी सीएपीएफ सेवेसाठी संस्थेतील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
राज्यसेवा प्रशिक्षण मार्गदर्शन –
युपीएससी प्रमाणेच राज्य सेवा परिक्षा अर्थात एमपीएससीमध्ये ही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन,कोचींग सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. एमपीएससी साठी साडे सातशे विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.
उपयुक्तताः-
आत्तापर्यंत मागील तीन वर्षांत 1125 विद्यार्थ्यांना पूर्व परिक्षेसाठी 8.26 कोटीचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 15 हजार एक रकमी दिले जातात.आत्तापर्यंत मागील तीन वर्षात 7367 विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेसाठी अकरा कोटी रुपयांचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.तसेच मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दहा हजार रु.एकरकमी दिले जातात.त्यासोबतच विद्यार्थ्यांना सारथीच्या मुख्यालयातून झूम मिटींगद्वारे तसेच अभिरुप मुलाखत द्वारेही मार्गदर्शन केल्या जाते.मुलाखतीची सर्व तयारी करुन घेण्यात येते.
यशस्वीताः-
मागील तीन वर्षांत 566 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी 56.60 लाखाचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.सारथीच्या मार्गदर्शातून सन 2021-22,23 या वर्षात वर्ग एक श्रेणीमध्ये 74 तर वर्ग दोन श्रेणीत 230 अशा एकूण 304 विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे.
उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती :
डॉ.पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती सन 2022-23 मध्ये तीनशे विद्यार्थी निवडीसाठीची जाहीरात जूलै 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून यामधील 153 पात्र विद्याथ्यांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती :
महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुलामुलींना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना या वर्षापासून सुरु करण्यात येत असून चार जूलै 2023 रोजी मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठीची जाहिरात ऑगस्ट 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून 75 अर्ज प्राप्त झाले आहेत.
छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF)
या अतंर्गत सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे/ विकसित करणे. संशोधन पुर्ण होईपर्यंत परंतू कमाल पाच वर्षाच्या कालावधी करिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे प्रतिमाह रू.31,000/- अधिछात्रवृत्ती देण्यात येते. यामध्ये 2019 ते 2023 या कालावधीत एकुण 2109 विद्यार्थांचा सहभाग आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम(csms-deep) राबवण्यात येतो. दि.1 फेब्रुवारी 2023 पासून प्रशिक्षणास सुरवात करण्यात आली असून यामध्ये ऑनलाईन प्राप्त झालेल्या एकूण 36,525 अर्जांपैकी अंतिम छाननीतुन सारथी संस्थेने मान्यता दिलेल्या अर्जांची संख्या 27,346 इतकी आहे.
छत्रपती राजाराम महाराज - सारथी शिष्यवृत्ती 2022-23 योजना
यामध्ये एकूण 31.23 कोटी रु. वाटप करण्यात आले आहे. यासाठी इयत्ता 9 वी व 11 वी मध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण, दहावी मध्ये 60% गुण मिळणे आवश्यक आहे. सारथी संस्थेने वरील अटीसह उत्तीर्ण झालेल्या व केंद्राच्या कोट्यामुळे शिष्यवृत्ती अप्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रू.800 प्रमाणे वार्षिक रू.9600/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. तर मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृत्ती (CMSRF)- सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येते.
शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम
सन 2022-23 पासून ही योजना सारथीतर्फे राबवण्यात येते. यामध्ये वार्षिक लाभार्थी संख्या 2500 इतकी असून फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण,कापनीनंतरचे प्रशिक्षण, यामध्ये सामान्य हरितगृह व्यवस्थापन,शेड नेट हाऊस व्यवस्थापन,वनस्पती प्रसार आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याबाबत पाच दिवसाचे प्रशिक्षण दिल्या जाते. शेतकरी उत्पादन कंपनी प्रशिक्षण कार्यक्रम 2023-24 योजनेचा कार्यारंभ आदेश जानेवारी 2023 रोजी देण्यात आला आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचे कामकाज एमसीडीसी स्तरावर सुरु असून ऑक्टोबर 2023 पासून प्रशिक्षणाचे राज्यातील 26 ठिकाणी सुरवात करण्यात येईल. याचे वार्षिक लाभार्थी हजार असणार आहेत.
सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
या कार्यक्रमांतर्गत 35 सेक्टरचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राजमाता जिजाऊ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे प्रयोजन आहे. सदर संस्थेमार्फत वीस हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु करण्याच्या अनुषंगाने डिसेंबर 2022 रोजी सामंजस्य करार करुन कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांना सूचित करण्यात आले आहे. विद्यार्थी नोंदणी सुरु असून 186 अर्ज प्राप्त झाले आहेत.
छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धांचे आयोजन
छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सर्व तालुक्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये विविध वयोगटातील एकूण 61 हजार 535 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर 5290 विद्यार्थ्यांना 10.25 लक्ष रुपयांची पारितोषिके देण्यात आली आहेत. तसेच करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिरांचे ही राज्यभरात विविध जिल्ह्यांत आयोजन केल्या जाते. ज्याचा विद्यार्थांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो.
विभागाकडून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प/योजना
या सोबतच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये सारथी मार्फत श्रीमंत मालोजीराजे - सारथी इंडो जर्मन टुल रूम प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद,पुणे,कोल्हापूर व नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून डिसेंबर 2022 व 6 फेब्रुवारी 2023 पासून 466 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. यापैकी 166 मुलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून नोकरीसाठी त्यांच्या मुलाखती सुरु आहे. तसेच नवीन जाहीरात ही 3 जूलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्यावत,आधुनिक कौशल्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून उद्योगांना आवश्यक रेडी टू वर्क मनुष्यबळ उपलब्ध करणे हे उद्देश आहेत. यामध्ये 24 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच इंडो जर्मन टूल रूम प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी संस्थेमार्फत अदा करण्यात येते.
अशा विविध पद्धतीने सारथी मार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी,आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरुपात उपक्रम,योजना राबवण्यात येत आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय,धाराशिव

नंदन चौधरीला मिळाले व्यवसाय उभारणीस अण्णासाहेब पाटील महामंडळाचे बळ



धाराशिव : कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करायचे म्हटले तर हाती पैसा असेल तर ते शक्य होते.शासनाची योजना किंवा विविध महामंडळाने उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले तर युवावर्ग निश्चितच उद्योजक होऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी तर होईलच सोबत काही जणांना उभारलेल्या उद्योगातून रोजगार देखील उपलब्ध करून देता येतो.जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या परंडा येथील मराठा समाजातील नंदन चौधरी या २६ वर्षीय युवकाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतून ५ लक्ष रुपये कर्ज घेऊन टायर विक्री, टायर रिमोल्डिंग व पंचर दुरुस्तीचा व्यवसाय सुरू करून उद्योजकतेकडे वाटचाल तर सुरू केली.या व्यवसायामुळे आर्थिक सुबत्ता येण्यास नंदनला मदत झाली आहेच.एवढंच नव्हे तर त्याने एका व्यक्तीला या व्यवसायातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
नंदन आता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मिळालेल्या कर्जातून उत्तम प्रकारे टायर रेमोल्डिंग,टायर विक्री व पंचर दुरुस्तीचे दुकान थाटून या व्यवसायातून महिन्याकाठी ३० हजार रुपये कमावत आहे. नंदन चौधरीने वर्ष २०२० कोरोनानंतर परंडा- करमाळा रोड,पेट्रोल पंपासमोर गाडी पंचरचा छोटा व्यवसाय सुरू केला.त्यात दिवसाला त्याला ३०० रुपये शिल्लक राहायचे.त्यानंतर लोकांची नंदनच्या दुकानात नवीन टायरची मागणी वाढू लागली.टायरची वाढती मागणी लक्षात घेता व नंदनने मार्केटमध्ये फिरून ह्या विषयी माहिती घेतली. नवीन टायरचे दर व ग्राहक कोण व कुठले आहेत याचा अंदाज त्याने घेतला.आपण पूर्वी टायर रेमोल्डिंगचे दोन वर्षे पुणे जिल्ह्यातील कूर्डवाडी येथे पगार न घेता काम शिकलो आहेच.त्याचा आपण आता उपयोग करणे अवश्य आहे.हे मनात हेरून नंदनने टायर रिमोल्डिंगसुद्धा टायर विक्रीसोबत केले पाहिजे.जागा तर नंदनकडे उपलब्ध होतीच.या जागेचे महत्व लक्षात घेऊन आणि आपल्याकडे असलेले टायर रिमोल्डिंगचे कौशल्य लक्षात घेऊन आता आपण नक्कीच टायर रिमोल्डिंग,टायर विक्री आणि पंचर दुरुस्तीचे एकत्र दुकान सुरू करून तीन प्रकारचे काम करू शकतो हा नंदनचा विश्वास बळावला.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल कुठून उभे करायचे हा प्रश्न निर्माण झाला.मित्र व परिवाराच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेबद्दल माहिती मिळाली.प्रियदर्शनी अर्बन को.ऑप. बँक.लि.परंडा येथे बचत खाते असल्याने बँकेशी संपर्क केला.बँकेने नंदनला कळविले की,आपले कर्ज हा व्यवसाय उभारणीसाठी मंजुर होईल. अण्णासाहेब पाटील आर्थिक
मागास विकास महामंडळाअंतर्गत कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी अगोदर महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र काढले.बँकेने सांगितलेले महामंडळाकडून कर्ज घेण्यासाठी बँकेला पाहिजे असलेले आवश्यक कागदपत्रे जमा करून बँकने व्यवसायासाठी आवश्यक असलेले ५ लक्ष रुपये कर्ज उपलब्ध करून दिले. उपलब्ध झालेल्या महामंडळाच्या योजनेच्या कर्जातून टायर रेमोल्डिंग मशीन व टायर खरेदी करून व्यवसाय सुरू केला.
या व्यवसायातून महिन्याकाठी नंदनला ३० हजार रुपये शिल्लक राहतात. बँकेला वेळेवर हप्ता भरत असल्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नंदनने घेतलेल्या कर्जाचा वेळेवर व्याज परतावा करत आहे.नंदनने आवाहन केले की,जिल्ह्यातील मराठा समाजातील जास्तीत जास्त युवावर्गाने व्यवसायकडे वळावे.त्यासाठी लागणारे भांडवल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतून उपलब्ध करून घेऊन उद्योग व्यवसायाची उभारणी करून आपण तर स्वावलंबी होतोच सोबतच आपण काही जणांना रोजगार देखील उपलब्ध करून देऊ शकतो.त्यामुळे नंदनच्या जीवनात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेच्या लाभामुळे आर्थिक सुबत्ता तर येण्यास मदत झालीच सोबतच नंदनमध्ये एक उद्योजक तयार झाला.नंदनने महामंडळाच्या माध्यमातून सुरू केलेला हा व्यवसाय मराठा समाजातील इतर युवा वर्गासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

 योजना ‘सारथी’च्या...



· दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश
· दरवर्षी 500 विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण, आकस्मिक खर्च आणि विद्यावेतनाचा लाभ
राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. 'शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या ‘सारथी’ संस्थेमार्फत विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम ‘सारथी’ संस्थेमार्फत केले जात असून या योजनांच्या माहितीवर आधारित क्रमशः लेखमाला...
‘सारथी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘संघ लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण’ योजनेची माहिती आजच्या लेखात आपण घेणार आहोत. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील उमेदवारांना केंद्रीय नागरी सेवेतील प्रशासकीय पदावर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी ‘सारथी’संस्थेमार्फत संघ लोकसेवा आयोग अर्थात ‘युपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचे निशुल्क प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण देण्यासाठी ‘सारथी’ने पुणे येथील तीन प्रशिक्षण संस्था आणि दिल्ली येथील दोन संस्थांची निवड केली आहे. दरवर्षी युपीएससी नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी चाळणी परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणीद्वारे एकूण 500 उमेदवारांची निवड करण्यात येते. या उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यासाठी प्रशिक्षणाचे देण्यात येते. निवड झालेल्या उमेदवारांना ‘सारथी’ने निवडलेल्या पाचपैकी कोणत्याही एका संस्थेत प्रवेश घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
प्रशिक्षणार्थींना ‘सारथी’मार्फत असे मिळते सहाय्य
उमेदवारांना निशुल्क प्रशिक्षणासोबत दिल्ली येथे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना तेथील वास्तव्यासाठी दरमहा 13 हजार रुपये आणि पुणे येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथील वास्तव्यासाठी 9 हजार रुपये दरमहा दिले जातात. तसेच या उमेदवारांचा प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश निश्चित झाल्यानंतर पुस्तके, स्टेशनरी आदी बाबींसाठी एकत्रित 18 हजार रुपये रक्कम आकस्मिक खर्च म्हणून दिली जाते. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी एकरकमी 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या तयारीसाठी एकरकमी 25 हजार रुपये अर्थसाहाय्य मंजूर करण्यात येते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी या आहेत प्रमुख अटी
उमेदवार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील 21 ते 32 वर्षे वयोगटातील असावा. याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा अधिक नसावे. उमेदवाराच्या नावाचे तहसीलदार अथवा सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षीचे उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असावी. उमेदवाराने इतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थाकडून या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा.
अशी आहे उमेदवारांची निवड पक्रिया
‘सारथी’च्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जातात. अर्जदाराची निवड ‘सारथी’मार्फत आयोजित ‘सीईटी’मध्ये प्राप्त गुणांद्वारे केली जाते. या गुणांकानुसार गुणवत्ता यादी ‘सारथी’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते. त्यानंतर कागदपत्रे पडताळणीद्वारे पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रकिया पूर्ण केली जाते.
‘सारथी’च्या प्रशिक्षणातून घडले 12 आयएएस, 18 आयपीएस...
‘सारथी’मार्फत संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचे प्रशिक्षण घेवून 2020 ते 2022 या गत तीन वर्षात 12 उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) आणि 18 उमेदवार भारतीय पोलीस सेवेमध्ये (आयपीएस) दाखल झाले आहेत. तसेच 8 जणांची भारतीय राजस्व (आयआरएस) सेवेत, एका उमेदवाराची भारतीय वन सेवेत (आयएफएस) तर 12 जणांची इतर केंद्रीय सेवांमध्ये निवड झाली आहे.
सन 2023-24 मधील प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत करता येईल अर्ज
सन 2023-24 मध्ये ‘सारथी’च्या संघ लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. या संकेतस्थळावर योजनेच्या अटी, शर्ती आणि पात्रता निकषांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.


- तानाजी घोलप, माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

युवकांना आर्थिक सक्षम बनविणारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची व्याज परतावा योजना

 विशेष लेख



आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकातील, प्रामुख्याने मराठा प्रवर्ग आणि ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशा प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींच्या उद्योग व्यवसायाला हातभार लावून त्यांना सक्षम बनविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना राबविल्या जातात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा आणि गट कर्ज व्याज परतावा अशा दोन वेगवेगळ्या योजनांचा यामध्ये समावेश आहे. या दोन्ही योजनांची अंमलबजावणी https://udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकाभिमुख आणि पारदर्शकपणे होत आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-1)
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची 10 लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी व्यावसायिक अथवा उद्योगासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जावर या योजनेंतर्गत 4.5 लाख रुपयेपर्यंत व्याज परतावा करण्यात येतो. व्याज परताव्याचा कालावधी 7 वर्षांपर्यंत व व्याजाचा दर दसादशे 12 टक्केपर्यंत आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-2)
गट कर्ज व्याज परतावा योजनेत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज घेतले असल्यास 50 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 12 टक्के दराने व्याज किंवा 15 लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा दिला जातो. दोन व्यक्तींसाठी 25 लाख, तीन व्यक्तींसाठी 35 लाख, चार व्यक्तींसाठी 45 लाख आणि पाच व पाचपेक्षा जास्त व्यक्ती असल्यास 50 लाखपर्यंतच्या व्यवसाय, उद्योग कर्जासाठी या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी गटाने त्यांच्या शेतीपूरक व्यवसायासाठी बँकेमार्फत घेतलेल्या कर्जासाठीही व्याज परतावा दिला जातो.
व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी या आहेत अटी
उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य असून या योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गासाठी, तसेच ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशा प्रवर्गासाठी आहे. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. त्याबाबत तहसीलदार यांचे प्रमाणपत्र किंवा पती-पत्नी यांचे आयकर परतावा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक, कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये कमाल वयोमर्यादेचे बंधन राहणार नाही. तसेच गट कर्ज व्याज परतावा योजनेत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एल.एल.पी., कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट, संस्था लाभास पात्र असतील. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय/ उद्योगाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येतो. यासाठी 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार योजनेची अंमलबजावणी केली जाते.
व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रथम ‘एलओआय’ प्राप्त करणे आवश्यक
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ‘एलओआय’ म्हणजेच पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्रासाठी आधारकार्ड (अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वत:च्या ई-मेल आयडीसह), रहिवासी दाखला, वीज देयक, शिधापत्रिका, गॅस देयक, बँक पासबुक यापैकी एक रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर परतावा प्रमाणपत्र (विवाहित असल्यास पती-पत्नी यांचा व अविवाहित असल्यास स्वतःचे आयकर परतावा प्रमाणपत्र), जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि एक पानी प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक आहे. या अहवालाचा नमुना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या https://udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पात्रता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यासमवेत लाभार्थ्यांने त्याला करावयाचा असलेल्या व्यवसायाचा, उद्योगाचा प्रकल्प अहवाल (आवश्यक ते सर्व कागदपत्र) घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करावे. बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर कर्ज मंजूरीबाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने वेबप्रणालीवर सादर करावी. यामध्ये ज्या खात्यामध्ये व्याज परतावा हवा आहे त्याचा तपशील, बँक कर्ज मंजुरी पत्र, बँकेमार्फत वितरीत करण्य कर्जाचा पुरावा (बँक स्टेटमेंट), बँक ईएमआय वेळापत्रक (त्यावर वसुलीचा दिनांक असणे अनिवार्य), प्रकल्प अहवाल, हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा आदी बाबींचा समावेश असावा.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांना संपर्क साधावा. सर्व जिल्हा समन्वयकांचे संपर्क वेब प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनांच्या सहाय्यासाठी महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हानिहाय जिल्हा समन्वयकांशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीशी याबाबत संपर्क साधू नये. तसेच कोणत्याही खाजगी व्यक्ती, संस्थेच्या अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.


- तानाजी घोलप,
माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

नोकरदार तरुणाचे व्यावसायिक बनण्याचे स्वप्न आले पूर्णत्वास !

 यशकथा




• अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची मिळाली साथ
• स्वतःच्या व्यवसायातून दिला नऊ जणांना रोजगार
व्यावसायिक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अजय शेळके या तरुणाला बँकेचे कर्ज घेवून भांडवल उभा करावे लागले. या कर्जाची परतफेड करताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची त्याला साथ मिळाली. 9 लाख रुपयांच्या कर्जासाठी महामंडळाकडून त्याला आतापर्यंत सुमारे 2 लाख 95 हजार रुपये व्याज परतावा मिळाला. त्यामुळे अजयचे व्यावसायिक बनण्याचे स्वप्न पूर्णत्वास येण्यास मदत झाली…!
अजय शेळके हा लातूर तालुक्यातील मुरुड अकोला या खेडेगावातील तरुण. कुटुंबाचा मूळ व्यवसाय शेती. शेतीतील उत्पन्न हे पावसावर अवलंबून असल्याने त्यामध्ये चढउतार ठरलेला. त्यामुळे अजय याने शिक्षण घेवून नोकरी करावी, शेतीवर अवलंबून राहू नये, अशी आई-वडिलांची इच्छा.
अजयने लातूर येथून 2016 मध्ये एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. आता त्याने नोकरी करावी, यासाठी कुटुंबियांचा आग्रह सुरु झाला. स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, हे अजयचे खूप दिवसांपासूनचे स्वप्न होते. मात्र, व्यवसायासाठी लागणारे आर्थिक भांडवल हाती नसल्याने त्याला नाईलाजाने नोकरीचा मार्ग निवडावा लागला. 2017 मध्ये त्याने गोव्यातील एका फार्मा कंपनीत नोकरीला सुरुवात केली.
जेमतेम आठ महिने नोकरी केल्यानंतर त्याच्या मुरुड अकोला गावामध्ये एचपी गॅस एजन्सी देण्याबाबतची जाहिरात त्याला पाहायला मिळाली. यामाध्यमातून आपला व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे अजयला वाटले. त्यामुळे त्याने गॅस एजन्सीसाठी ऑनलाईन अर्ज केला. लॉटरी पद्धतीने त्याची यासाठी निवडही झाली. आता प्रश्न होता आर्थिक भांडवलाचा.
गॅस एजन्सी सुरु करण्यासाठी लागणारी अनामत रक्कम आणि इतर किमान बाबींच्या पूर्ततेसाठी त्याला किमान 10 लाख रुपयांची गरज होती. काहीही करून ही संधी हातची जावू द्यायची नाही, असा त्याचा निश्चय होता. यासाठी अजयने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्याकडून अजयने हे भांडवल उसनवारीवर जमा केले आणि गॅस एजन्सीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता सुरु केली. याच वेळी त्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामहामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची माहिती मित्राकडून मिळाली. महामंडळाच्या लातूर येथील कार्यालयात जावून जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील यांच्याकडून योजना जाणून घेतली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याने पात्रता प्रमाणपत्र (एलओआय) प्राप्त करून आवश्यक बाबींची पूर्तता केली.
अजयच्या व्यवसायाला चिंचोली (ब) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाने 9 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले. या कर्जाच्या व्याजाचा परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामहामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून होवू लागला. पहिल्याच वर्षी जवळपास सव्वा लाखापेक्षा अधिक व्याज परतावा मिळाला. 19 जानेवारी 2019 पासून आतापर्यंत अजयला या योजनेतून त्याच्या 9 लाख रुपये कर्जावर सुमारे 2 लाख 95 हजार रुपये व्याज परतावा मिळाला आहे.
वंदना एचपी गॅस एजन्सी सुरु केल्यानंतर पहिल्या वर्षी अजयकडे जवळपास एक हजार गॅस जोडण्या झाल्या होत्या. दोन डिलिव्हरी व्हॅन, तीन कर्मचारी अशी सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत जवळपास पाच वर्षात त्याच्याकडे 6 हजार गॅस घरगुती जोडण्या आणि 200 व्यावसायिक गॅस जोडण्या आहेत. तसेच डिलिव्हरी व्हॅनची संख्या पाचवर पोहोचली असून 9 कर्मचारी कार्यरत आहेत. एकेकाळी नोकरीच्या शोधात गोव्याला गेलेल्या अजयने व्यावसायिक बनण्याचे स्वतःचे स्वप्न पूर्ण केलेच, सोबतच्या 9 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याच्या या वाटचालीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामहामंडळाचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे तो आवर्जून सांगतो.
कोणताही व्यवसाय, उद्योग सुरु केला की त्याच्या सुरुवातीच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. अशात कर्ज घेवून उद्योग, व्यवसाय करणाऱ्यांना आपल्या व्यवसायाची घडी बसविणे कठीण बनते. कधी-कधी कर्जाचा हा भार उद्योग, व्यवसाय वाढीसाठी अडथळा बनतो. त्यामुळे उद्योग, व्यवसायांना सुरुवातीच्या काळात मदतीची आवश्यकता असते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामहामंडळाच्या कर्ज व्याज परतावा योजनेमुळे माझ्या व्यवसायाच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळाला, असे अजय शेळके म्हणतो.
उसनवारीवर घेतलेले पैसे परत दिल्यांनतर बँकेचे हप्ते नियमित भरण्यासाठी पहिल्या वर्षी या योजनेची मदत झाली. पहिल्याच वर्षी जवळपास सव्वा लाख रुपयांपेक्षा अधिक व्याज परतावा मिळाल्याने माझ्यावरील कर्जाचा आर्थिक बोजा कमी झाला. आतापर्यंत हा व्याज परतावा नियमितपणे मिळाल्याने माझ्या कर्जाची परतफेड होण्यात कोणतीही अडचण आली नाही. माझ्यासारख्या नवव्यावसायिकांना ही योजना अतिशय फायदेशीर आहे, असे अजय शेळके याने सांगितले.
आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील युवकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील, प्रामुख्याने मराठा प्रवर्ग आणि ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशा प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींना उद्योग, व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा व्याज परतावा देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची 10 लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी व्यावसायिक अथवा उद्योगासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जावर या योजनेंतर्गत 4.5 लाख रुपयेपर्यंत व्याज परतावा करण्यात येतो. व्याज परताव्याचा कालावधी 7 वर्षांपर्यंत व व्याजाचा दर दसादशे 12 टक्क्यापर्यंत आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजनेत 50 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 12 टक्के दराने व्याज किंवा 15 लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा दिला जातो या योजनेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी गटाने त्यांच्या शेतीपूरक व्यवसायासाठी बँकेमार्फत घेतलेल्या कर्जासाठीही व्याज परतावा दिला जातो. व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ‘एलओआय’ म्हणजेच पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील यांनी सांगितले. या दोन्ही योजनांची अंमलबजावणी https://udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून होत असून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


- तानाजी घोलप,
माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर