Followers

Sunday 30 September 2018

भूकंपग्रस्तांच्या नव्याने निर्माण झालेल्या समस्या सोडविणार लातूर -उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


    लातूर, दि. 30 :- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात जलसंवर्धनाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. आता भारतीय जैन संघटना आणि राज्य शासनाच्या एकत्रित प्रयत्नातून लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातून दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणार, भूकंपग्रस्तांच्या नव्याने निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यात येणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज किल्लारी येथे दिला.
महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धार समारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, खासदार डॉ.सुनील गायकवाड, खासदार, प्रा. रविंद्र गायकवाड, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री  डॉ.पदमसिंहजी पाटील, माजी मंत्री तथा आमदार  मधुकरराव चव्हाण, आमदार सर्वश्री. अमित देशमुख, बसवराज पाटील, सर्वश्री आमदार राणा जगजितसिंह पाटील, त्र्यंबक भिसे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील, सुरजितसिंह ठाकूर, विक्रम काळे, सुरेश धस, लातूर जिल्हा परिषदेचे  अध्यक्ष मिलींद लातूरे, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, माजी खासदार गोपाळरावजी पाटील, जनार्धन वाघमारे, रुपाताई निलंगेकर, कल्पना नरहिरे, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, संजय कोलते, लातूरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक आर. राजा उपस्थित होते .
  प्रारंभी मुख्यमंत्री श्री.फडणवीस, माजी मुख्यमंत्री व जेष्ठ नेते शरद पवार, माजी लोकसभा अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहमंत्री  शिवराज पाटील व इतर मान्यवरांनी भारतीय जैन संघटनेकडून  जलयुक्त शिवारच्या कामासाठी देण्यात येणाऱ्या मशीनचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन निर्धार समारंभाची सुरुवात झाली.
      1993 मध्ये झालेल्या भूकंपाला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाली असून या वेळी आपलं सर्वस्व गमावलेल्या लोकांसोबत संवेदना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्या आपत्तीच्या परिस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी यांनी चांगले काम केले होते, असे श्री फडणवीस यांनी सांगितले. त्यावेळी पुनर्वसनाचे मोठे काम करण्यात आले परंतु त्याबाबतचे काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यापैकी कुटुंबामध्ये झालेल्या वाढीव सदस्यांमुळे त्यांना आवश्यक असेल तर घर किंवा जागा देण्यात येईल त्याचबरोबर त्यावेळी पुनर्वसनासाठी जमिनी दिलेल्या लोकांनाही जागा अथवा इतर मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यात पाणीपुरवठयाच्या विविध योजना राबविल्या जात होत्या, या भागाचे पुनर्वसन होत असतानाही येथेही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा सुरू केला परंतु काही कारणांनी या योजना बंद झाल्या. त्या सर्व योजना पुन्हा सौरऊर्जेच्या मदतीने कार्यान्वित करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पंचवीस वर्षांपूर्वी यांनी जिल्ह्यात झालेल्या भूकंपामुळे अनेक गावात पुनर्वसनाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली . या गावांपैकी काही कामे प्रलंबित आहेत.पुनर्वसनानंतर अजूनही काही प्रश्न शिल्लक आहेत. त्यातील या भागातील ज्या कुटुंबांना आवश्यक असेल त्या कुटुंबांना घर अथवा प्लॉट देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली . तसेच या भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहेत . त्या या सोलापूरच्या सोलार उर्जेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्याची घोषणाही त्यांनी केली.
        मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील नदी, नाले, तलाव, धरणातील गाळ काढणे व इतर जलसंधारणाची कामे वैज्ञानिक पद्धतीने केल्यास कमीत कमी पावसातही गावे जलपरिपूर्ण होऊ शकतात. मागील वर्षी बहुतांश ठिकाणी कमी पाऊस झाला परंतु जलयुक्तच्या कामांमुळे पिकांना संरक्षित सिंचन मिळाल्याने उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. या कामांमुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पाणी पातळीत किमान चार मीटरने वाढ झालेली आहे तर या भागातील टॅंकरची संख्या 85 टक्क्याने कमी होऊन टंचाईग्रस्त गावांची संख्याही 75 टक्क्यांनी कमी झाली आहे.
      श्री.फडणवीस पुढे म्हणाले की,भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने उस्मानाबाद व लातूर या दोन्ही जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करून या जिल्ह्यातील गावे जलयुक्त व दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .कायमस्वरूपी दुष्काळमुक्तीचा निर्धार करताना या भागातील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केला पाहिजे ,ऊसाचे पीक महत्वाचे  असले तरी इतर पिकांचाही विचार झालाच पाहिजे तरच गावे दुष्काळमुक्त होतील. किल्लारी येथील कारखानाही लवकरच सुरू होईल असे सांगून पालकमंत्री निलंगेकर यांनी इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या काही भागात केलेल्या जलसंधारणाच्या  कामाचे कौतुक केले.
      श्री.फडणवीस यांनी राज्य शासनाच्या जलसंधारणाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून या जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल तसेच भारतीय जैन संघटनेच्या दुष्काळमुक्तीच्या कामात शासन, प्रशासन व लोकांचे पूर्ण सहकार्य मिळेल असे सांगितले तर सद्यस्थितीमध्ये पावसाअभावी पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे परंतु  शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या  पाठीशी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
  प्रास्ताविक करताना मागील चार-पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. येथील भूकंपाने एक पिढी नष्ट केली तर दुसरी पीढी उद्ध्वस्त होऊ  नये  म्हणून किल्लारी गावातील निराधार मुलांना भारतीय जैन संघटनेमार्फत  पुणे येथे पुढील शिक्षणासाठी  नेण्यात  आले,  त्यांना चांगले शिक्षण मिळाल्याने आज ते शासकीय तसेच विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी दिली. लातूर व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यात जलसंधारणाची  विविध कामे पूर्ण करुन हे दोन्ही  जिल्हे  दुष्काळमुक्त  करण्याचा निर्धार भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासनाने केलेला आहे.  15 जून 2019 पर्यंत  हे जिल्हे दुष्काळमुक्त  करण्यासाठी  आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच  लातूर जिल्हयाचे तत्कालीन   जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी आपल्या आठवणींना उजाळा देताना संकट काळात समाजाची त्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती वाढविण्याची गरज आहे. लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील भूकंपाने संकटकाळात त्यावर मात करण्याची शक्ती वाढविण्याबरोबरच माझ्या आयुष्यातही खूप काही शिकण्याची संधी मला मिळाली, असे सांगून त्यांनी शासन व प्रशासनाने भूकंपानंतरच्या काळात केलेल्या कामांची तसेच आपत्तीव्यवस्थापनासंबंधी राबविलेल्या  विविध उपाययोजनांची माहिती दिली.
लातूर,उस्मानाबाद या जिल्ह्यात 25 वर्षापूर्वी भूकंपाने मोठं नुकसान झालं पण लोकांनी उभारी घेतली. राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरु करून  राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला व कामात आमचाही पूर्ण सहभाग आहे व येथून पुढेही राहील असे आमदार बसवराज पाटील यांनी सांगितले.
लातूर व उस्मानाबाद  या दोन्ही  जिल्ह्यात भारतीय  जैन संघटना व महाराष्ट्र सेना यांच्यामार्फत जलसंधारणाची विविध कामे करून पाणी अडविणे व जिरविणे ही कामे होणार असल्याने हे  दोन्ही  जिल्हे  दुष्काळमुक्त होऊन जलपरिपूर्ण  होतील, असा विश्वास व्यक्त करुन  उस्मानाबादचे  पालकमंत्री  अर्जुन खोतकर  यांनी शांतीलालजी मुथा यांना जलयुक्त  शिवार मधील मानद डॉक्टरेट पदवी दयावी असे सूचविले.
           लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पंचवीस वर्षांपूर्वी येथे झालेल्या भूकंपाने भयानक परिस्थिती निर्माण झालेली होती. या संकटावर मात करण्यासाठी विविध संघटनांनी येथे कार्य केले त्यातील बीजेएस  या संघटनेनेही येथील बाराशे विद्यार्थ्यांना पुणे  येथे नेऊन तेथे त्यांचे शिक्षण पूर्ण करुन त्यांचे पुढील जीवन सुकर केले, असे कौतुकाने म्हणाले.
     ते पुढे म्हणाले, नुकताच  मराठवाड्याने आपला 70 वा  मुक्तीदिन साजरा केला. मागील 70 वर्षाच्या काळातही मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.  या भागावर त्याकाळी  निजामाचे संकट, भूकंपाचे संकट त्यानंतर मागील तीन-चार वर्षांपासून पाण्याचे संकट अशी विविध संकटे येत आहेत.  सन 2016 साली या भागात रेल्वेने पाणी आणावे लागले.  लातूर जिल्ह्यात साडेसहाशे टँकरची संख्या होती.  मराठवाड्याच्या  इतर जिल्ह्यातही  मोठ्या प्रमाणात टँकरची  संख्या होती.  परंतु मागील तीन-चार वर्षात  लातूर जिल्हा व मराठवाड्यात  झालेल्या जलयुक्तच्या कामांमुळे या भागातील टँकरची संख्या लक्षणीय कमी झाली असून लातूर जिल्हा टँकरमुक्त झालेला आहे,अशी माहिती त्यांनी दिली.
          आजही मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे व या भागात  दुष्काळी परिस्थिती जाणवत आहे. या भागात जवळपास 70 टक्के सोयाबीनची लागवड होते,  परंतु हे पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेलेले आहे.  त्यामुळे या भागावर दुष्काळाची छाया पडलेली दिसत आहे.  मुख्यमंत्र्यांनी या बाबीचा विचार करावा, अशी विनंतीही पालकमंत्री  संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली. तसेच मराठवाड्यासाठी  समृद्धी महामार्ग हा वरदान ठरलेला आहे. हा महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातून जात आहे परंतु हा महामार्ग औरंगाबाद येथून बेंगलोर -हैदराबादकडे जर करण्यात आला तर या भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल  त्याबाबतचाही  विचार व्हावा  अशी  मागणीही   त्यांनी केली.
            पंचवीस वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेल्या कामाला जनता कधीही विसरणार नाही, असे माजी केंद्रीय  मंत्री शिवराज पाटील -चाकूरकर  यांनी सांगून  अडचणीच्या  काळात सर्वजण  जात-धर्म पक्षभेद विसरून एकत्रपणे काम करतात ते  या भूकंपाच्या वेळी  दिसून आले.  भूकंपाची आपत्ती  आली  त्यावेळी देशात व राज्यात आपत्ती  व्यवस्थापन प्राधिकरण अस्तित्वात नव्हते.  परंतु या भूकंपामुळे देशपातळीवर आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरणाची  स्थापना  झाली, अशी  माहिती  त्यांनी  दिली. मानवी जीवनासाठी हवा, पाणी, अन्न  हे महत्वाचे घटक असून जलसंधारणाच्या  या  कार्यास सर्वांनी  एकत्रित येऊन काम  करावे , असे आवाहन  त्यांनी  याप्रसंगी  केले.
         माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आपल्या मनोगतात 30 सप्टेंबर 1993  रोजी झालेल्या भूकंपाची  माहिती घेतल्यानंतर तातडीने सकाळी सात वाजता किल्लारी येथे पोहोचलो .यावेळी प्रथम काम केले ते मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा अंत्यविधी करणे व दुसरे काम केले ते जखमी लोकांना तत्काळ  उपचार मिळवून देणे , अशा आठवणी  सांगितल्या.या घटनेचे गांभीर्य ओळखून स्वत: येथे उपस्थित राहून येथील मदतकार्याच्या कामाला शिस्त लावली. त्यानंतर दहा दिवसात येथील लोकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून एका महिन्याच्या आत सर्वांना शेडचे घर उपलब्ध करून दिले. भूकंपाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाने व इतर संघटनांनी जेवढी मदत केली तेवढेच मदतकार्य या भागातील लोकांनीही केले होते . या धक्क्यातून बाहेर पडण्याचे काम याच लोकांनी केल्याची माहिती श्री.पवार यांनी दिली.
        श्री.पवार यांनी पुढे सांगितले, या घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या या भागातील लोकांना बाहेर काढण्यासाठी मुंबईवरून राज्यातील इतर तीस-पस्तीस मानसोपचारतज्ज्ञाची टीम तेथे सतत तीन महिने कार्यरत होती. यावेळी केंद्र शासन व जागतिक बँकेने मोठे आर्थिक सहकार्य केले. गावच्या सरपंचांनी कसे काम करावे, हे तत्कालीन किल्लारीचे सरपंच असलेले शंकरराव पडलेकर यांच्या कामाकडे पाहिल्यावर लक्षात येते. शेवटी श्री.पवार यांनी राज्य शासन व भारतीय जैन संघटना उस्मानाबाद व लातूर या दोन जिल्ह्यात जलसंधारणाचे काम हाती घेत आहे. हे काम करण्यापूर्वी त्यांनी जलतज्ञांचा सल्ला घ्यावा व नंतरच कामाला सुरुवात करावी, असे सांगून या कामात सर्वांचे सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
         भूकंप झाल्यानंतर या भागातील निराधार बाराशे विद्यार्थ्यांना भारतीय जैन संघटनेने त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी पुणे येथे नेले,त्यांचे पूर्ण पालकत्व स्वीकारले, त्याबाबतची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.
यावेळी भारतीय जैन संघटना व त्यांचे  पदाधिकारी तसेच किल्लारी ग्रामपंचायतीच्या सरपंच शैलाताई लोहार व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री व उपस्थित इतर मान्यवरांचा स्मृतिचिन्ह व फोटो फ्रेम देऊन सत्कार केला. या समारंभाचे सूत्रसंचालन सुनील कोचेटा व  प्रकाश दगडे यांनी केले तर आभार अभय शाह व  किल्लारी गावचे उपसरपंच अशोक पोतदार यांनी मानले.

किल्लारी गावातील १९९३ च्या भूकंपातील मृतात्म्यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि मान्यवरांनी वाहिली श्रध्दांजली




लातूर,दि.३०- जिल्ह्यातील किल्लारी गावात 1993 च्या भूकंपातील मृतात्म्यांना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी लोकसभा अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे,खासदार रवींद्र गायकवाड, खासदार सुनील गायकवाड, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर,लातूर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

Saturday 29 September 2018

माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द - पालकमंत्री पाटील निलंगेकर





युवकांनी देश सेवेत येण्याचे आवाहन…
         लातूर, दि.29 : देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी, परकीय शक्तीपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी, आपत्ती काळात देशबांधवांच्या मदतीसाठी सज्ज असणारे, कोणत्याही अडचणीत आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारे भारतीय सैनिक हे आपल्या सर्वांसाठी आदर आणि अभिमान आहेत. भारतीय सैनिकांचे काम हे निश्चितच गौरवाचे, कर्तृत्वाचे आणि अभिमानाचे असून यांचे फार मोठे ऋण आपल्यावर आहेत. ते फेडण्यासाठी  युवकांनी देशाची सेवा करण्याची संधी सोडू नये, असे प्रतिपादन कामगार, भूकंप, पुनवर्सन, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर यांच्या कार्यालयाच्या वतीने डी.पी.डी.सी.हॉल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, लातूर येथे आयोजित शौर्य दिन 2018  या सत्कार समारंभात बोलतांना केले.
या कार्यक्रमास लातूरचे महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सुनिल गोडबोले, माजी सैनिक संघटनेचे  कृष्णा गिरी, व्ही.व्ही. पटवारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम तिरुके, उपमहापौर देवीदास काळे, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, बजरंग जाधव, या पदाधिकाऱ्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
पालकमंत्री पाटील निलंगेकर म्हणाले की, भारतीय सैन्य दलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकदवारे अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यामुळे 29 सप्टेंबर हा दिवस भारत वासियांसाठी अभिमानाचा दिवस आहे. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत जावी तसेच माजी सैनिकांचा सन्मान व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. हा दिवस येवढयापुरता मर्यादित न ठेवता त्यांचा सन्मान, लोकाच्या समस्या एकत्रित करुन मांडा सर्व प्रश्नांचे निराकरण केले जाईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.
देशाचे संरक्षणार्थ बलीदान दिलेल्या शहिदांचे कुटूंबिय,वीरपत्नी, वीर-माता, वीर-पिता आणि माजी सैनिक यांना सन्मानाची वागणूक देणे माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून माझी व जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. तिन्ही दलातील सैनिक दिवस-रात्र देशाची संरक्षण करतात त्यामुळे आपण येथे सुरक्षित आहोत. सैनिकांनी केलेल्या कामाची पावती सर्व जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी सर्व माजी सैनिकांनी प्रयत्न करावेत. माजी सैनिकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
 यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत म्हणाले की, सर्व प्रथम देशाची सेवा करत असताना जे वीर जवान देशासाठी शहीद झाले त्यांना मी वंदन करतो. देशाचे सेवा करणे हे भाग्य लागते. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शौर्य या दिनाची जागरुकता व्हावी, नवीन पिढीतील युवकांनी सैन्य दिलात सेवा बजावावी. देशासाठी शहीद झालेल्या जवानाबद्दल कृतज्ञता व सत्कार व्हावा, यासाठी शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे, असे सांगून पुढे म्हणाले की, सैन्य दलातील सेवा बद्दल युवकांनी पुढाकार घेऊन सैन्यात सेवा करावी. त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी माजी सैनिकांनी गावा-गावात जाऊन प्रयत्न करावे. माजी सैनिकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शौर्य दिनाच्या निमित्ताने सैनिकांप्रती आपल्याला असलेली आदराची भावना अधिक वृध्दीगंत व्हावी यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व विरपत्नी, विरमाता, विरपिता, शौर्यपदकधारक आजी / माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना शौर्यदिनानिमित्त पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व मान्यवरांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ देऊन यथोचित्त सत्कार करण्यात आला. प्रारंभी सर्व मान्यवरांनी शहीद सैनिकांना दोन मिनीटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण केली. 
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व आजी/माजी सैनिक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच एनसीसी व सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री.गोडबोले यांनी करुन शौर्य दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला तर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.आर पाटील यांनी केले.   

Thursday 27 September 2018

“ जाऊ ”…स्वच्छतेची पाठशाळा---लेख




       शासकीय शाळा म्हटले की, आज ही नाके मुरडणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण शिक्षण क्षेत्रात  खाजगी शैक्षणिक संस्थामुळे मोठी स्पर्धा निर्माण होऊन शासकीय शाळांचे महत्व कमी होऊ लागले होते. मध्यंतरी काही जिल्हयात जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होत होती. परंतु मागील तीन-चार वर्षात बहुतांश शासकीय शाळा या स्पर्धेच्या युगात टिकाव धरण्यासाठी कात टाकत असून शासन ही  त्यासाठी प्रयत्न करत आहे.लातूर जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा हया डिजिटल झाल्या असून यातील काही शाळांमध्ये प्रवेशासाठी वेटींग करावे लागते तर अनेक शाळांची कमी झालेली पटसंख्या वाढत आहे.
      सामाजीक न्याय विभागाच्या वतीने ही राज्यात ठिकठिकाणी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मुला-मुलींसाठी शाळा,आश्रमशाळा,निवासीशाळा व वसतिगृहाच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध्‍ करुन देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. हया शाळांचा ही शैक्षणिक दर्जा चांगला असून नवी दिल्ली येथील मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत सन 2017-18 या वर्षावेळी राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय स्पर्धा घेण्यात आली व या स्पर्धेत देशभरातून साडेसहा हजार शासकीय/खाजगी शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत लातूर जिल्हयातील जाऊ ता. निलंगा व बावची ता. रेणापूर येथील  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मुलींच्या शाळांनी स्वच्छतेचे सर्व निकष पूर्ण करुन  पुरस्कार पटकाविला आहे. ही बाब अत्यंत अभिमानास्पद अशीच आहे.राष्ट्रीय स्तरावर लातूर जिल्हयातील  दोन शासकीय शाळांनी पुरस्कार प्राप्त करुन लातूर जिल्हा शैक्षणिक  पॅटर्न बरोबरच तेथील स्वच्छतेबाबत ही  अत्यंत जागरुक असल्याचे निर्देशक आहे.
        जाऊ ता. निलंगा येथील स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त शाळेला भेट देण्याच योग अलीकडेच मला प्राप्त झाला. निलंगा शहरापासून दोन किलो मीटर औसा रोडवर असलेली ही  समाज कल्याण विभागाची  6 वी ते 10 वी पर्यंतच्या  मुलींची  निवासी शाळा आहे. या शाळेची इमारत प्रशस्त  असून मुख्य  इमारतीच्या समोरच लक्ष वेधून घेणारे  हिरवी गर्द वनराई आहे.
          इमारतीमध्ये प्रवेश करताच समोर दिसतात त्या बोलक्या भिंती त्या भिंतीवर विद्यार्थीनींना सर्वसामान्य ज्ञानाची माहिती व्हावी तसेच अभ्यासक्रमाशी संबंधीत माहिती लिहीली गेली असून जाता-येता त्याचे पठन व्हावे ही त्या मागची भावना.
     प्रवेश व्दारा शेजारीच मुख्याध्यापक श्री. दत्तात्र्य मुखम यांचे दालन. ते स्व:त एवढे हसमुख व प्रसन्न होते की त्यामुळे शाळेतील एकंदरीत वातावरणाचा अंदाज मला बांधता आला.   मी त्यांना  रंगविलेल्या भिंतीबद्दल बोलू लागलो. तेंव्हा त्यांनी  सहजपणे मुलींना सामान्यज्ञान मिळावे व भिंतीवरील विविध  राष्ट्रपुरुषांच्या छायाचित्रांतून त्यांना त्यांच्या विषयी  आदर रहावा ही कल्पना  असल्याचे सांगून प्रवेशव्दाराच्या छताकडे पाहण्याचा संकेत केला. मी तर छताकडे एकटक पाहतच राहिलो., कारण संपूर्ण सुर्यमालेचे ज्ञान फक्त प्रवेशव्दाराच्या मोकळया जागेत दोन्ही बाजूंना टाकलेल्या बाकडांवर पाच मिनिट बसलो तरी  संपूर्ण सूर्यमाला समजली जाते. हया छोटया कल्पना पण मोठा परिणाम साधणाऱ्या   असल्याचा बोध मला यातून झाला.व ही शाळा कशाप्रकारे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविते याचाही प्रत्यय आला.
      श्री.मुखम सरांनी प्रथम मला स्वच्छ विद्यालय पुरस्कार कसा मिळाला याबद्दल एक ही वाक्य न बोलता प्रत्यक्ष या शाळेमध्ये  व परिसरात ही स्वच्छता  कशा  पध्दतीने ठेवली जाते ते दाखविले.  शाळेचा संपूर्ण परिसर तर स्वच्छ  होताच परंतु  शाळेतील कचऱ्याची विल्हेवाट बगीच्या मध्ये कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प उभारुन सेंद्रीय खत निर्माण केले जाते व तेच खत बगीच्यातील झाडांना नियमित टाकले जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांनीच्या सक्रीय सहभागाने एक नर्सरी  ही तयार केली असून  पुढील वर्षीच्या  वृक्ष लागवड मोहिमेत  किमान  15 ते 25 हजार वृक्ष रोप येथून देण्याचे नियोजन करुन ही शाळा पर्यावरणाच्या कामांत ही दक्ष असून शालेय दशेपासूनच विद्यार्थांना स्वच्छता व वृक्षलागवडीचे महत्व अंगी रूजवत पर्यावरण प्रेमी पिढीची पायाभरणी केली जात असल्याचं वाटतं.
       आम्ही प्रथम शाळेतील स्वयंपाक गृह व भोजन गृहात गेलो. एकाच वेळी 200 विद्यार्थी बसण्याची व्यवस्था भोजनगृहात आहे. तसेच विद्यार्थी एका रांगेत  भोजनगृहात प्रवेश करतात.येथे बाजूलाच जेवणापूर्वी हात स्वच्छ कशा पध्दतीने करावेत याचे पूर्ण प्रशिक्षण विद्यार्थींनींना देण्यात आलेले आहे. व एकाच वेळी किमान 20 विद्यार्थ्यांना हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील वॉश बेशीनची स्वच्छता बघतच राहावी अशीच आहे. त्यानंतर आम्ही शौचालये व बाथरुमची पाहणी केली व येथील स्वच्छता ही नीट नेटकी व उत्कृष्ट अशीच होती. त्यानंतर विद्यार्थींनींची शिस्तबध्द निवासव्यवस्था पाहीली तर प्रत्येक वर्गातील शिक्षक ते विद्यार्थी यांची स्वच्छता व शिस्तीची  लयबध्दता दिसून आली.
       संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोग शाळा, मनोरंजन कक्ष अशा सर्व  ठिकाणची शिस्तबध्दता व स्वच्छता पाहताक्षणीच दिसून येत होती. ही शाळा व येथील विद्यार्थी व यांचे मार्गदर्शक शिक्षकवर्ग यांचे परिश्रम म्हणजेच या शाळेला राष्ट्रीय स्तरावर मिळालेला “स्वच्छ विद्यालय पुरस्कार” होय. परंतु हा पुरस्कार मिळाल्याने येथील विद्यार्थी व शिक्षक थांबणार नाहीत तर स्वच्छतेचा हा वसा जीवनभर जपणार असून ते इतरांनाही  सांगणार आहेत. ही शाळा जणू मला स्वच्छतेची पाठशाळाच भासली.
    येथील विद्यार्थी , शिक्षक व इतर कर्मचारी यांच्याशी चर्चा केली असता सर्वजण या शाळेत, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी झोकून देऊन काम करतात. येथील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एक सांघिक भावना रुजलेली असल्याने येथे नवनवीन उपक्रम राबविले जातात व ते यशस्वी ही करुन दाखविले जातात. या सर्वामध्ये ही सांघिक भावना रुजविण्यामध्ये अग्रेसर आहेत ते म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक मुखम सर !
     अशा या शिस्तबध्द शाळेत आम्ही  सकाळी  11 ते दुपारी  3 वाजेपर्यंत  येथे विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी चर्चा केली. तसेच शाळेचा पूर्ण परिसर व इमारतीची स्वच्छता पाहिली व  नक्कीच ही शाळा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांसाठी शंभर टक्के पात्र असून ही जाऊची शासकीय निवासी शाळा म्हणजे इतर सर्व शासकीय व खाजगी शाळांसाठी आदर्शवतच राहील , असे वाटतं.
        दिनांक 18 सप्टेंबर 2018 रोजी  नवी दिल्ली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या शाळेला प्राप्त पुरस्कार मुखम सर यांनी स्वीकारला. तर बावची येथील शाळेचा पुरस्कार श्री. जमादार सर यांनी स्वीकारला. त्याप्रमाणेच लातूर जिल्हयाला स्वच्छ विद्यालयाचे दोन पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. हा विशेष पुरस्कार जिल्हाधिकारी जी.श्रीकांत व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी. अरवत यांनी स्वीकारला.
      आपल्या जिल्हयातील दोन शासकीय शाळांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणे ही बाब अभिमानास्पद अशीच आहे. हया दोन्ही शाळा म्हणजे स्वच्छतेच्या पाठशाळाच आहेत. त्यामुळे जाऊची शाळा सोडत असताना माझे ही  मन अभिमानाने भरुन आले.व मनातल्या मनातच या शाळेला, विद्यार्थी व शिक्षक वर्गाला  व त्यांनी शासकीय शाळेत ठेवलेल्या स्वच्छतेला व यातून तयार होऊन बाहेर पडणाऱ्या सावित्रींच्या लेकींना माझा सलाम. !
                                                                                                                                                   सुनील सोनटक्के                                                             जिल्हा माहिती अधिकारी
                                                                  लातूर

Sunday 23 September 2018

जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मिळणार आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ - पालकमंत्री दिलीप कांबळे





            हिंगोली,23: केंद्र शासनाची महत्वाकांक्षी  आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला असून, या आरोग्य योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री दिलीप कांबळे बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, आज शुभारंभ झालेल्या आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेसोबतच राज्य शासनाची  महात्मा फुले जन आरोग्य योजनाही एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे. आयुष्यमान जन आरोग्य योजनेचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असून, यात धर्म, जात, पंथ असा भेदभाव असणार नाही. या योजनेअंतर्गत 1300 हून अधिक गंभीर आजारांवर लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहे. हे उपचार देशातील कोणत्याही शासकीय किंवा मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये करता येणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांना देखील सहभागी करुन घेतले जाणार असून हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या महत्वकांक्षी योजनेमुळे देशातील नगारिकांना आरोग्य सुरक्षा प्राप्त झाली असून, नागरिकांनी या योजने अंतर्गत आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेत गंभीर आजारापासून सावध राहावे.
            तसेच या योजनेचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा यासाठी आशाताई सेविकांची जबाबदारी वाढली आहे. तसेच  लोकप्रतिनीधीनी देखील या योजेनेचा व्यापक प्रचार प्रसिध्दी करुन नागरिकांना या महत्वाच्या योजनेची माहिती करुन द्यावी असे ही पालकमंत्री कांबळे यावेळी म्हणाले.
            जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, आज आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांतीकारी योजनेची सुरुवात झाली आहे. सन 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार कुटुंबांची निवड आयुष्मान जन आरोग्य योजनेतंर्गत करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेवून नागरिकांनी आपल्या जीवन आणि आरोग्य सुरक्षीत करावे. तसेच  या योजनेबाबत अधिक माहितीकरीता 14555 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
            आयुष्यमान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत कोणत्याही कुटुंबाना देशात कोठेही लाभ घेता येणार आहे. सर्वांना सांकेतीक क्रमांक देण्यात येणार आहे सदर क्रमांक सांगितल्या नंतर त्याला आवश्यक ते उपचार मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेतंर्गत वर्षातून एक वेळेस पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ वैद्यकीय उपचाराकरीता मिळणार आहे. याकरीता आता लाभार्थ्यांना शिधापत्रिका किंवा कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता लागणार नाही. आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील 117 लाभार्थ्यांची आयुष्यमान भारत जन आरोगय योजने अंतर्गत नोंद झाली आहे. तसेच या योजने अंतर्गत राज्यातील पहिले ई-कार्ड हे हिंगोली जिल्ह्यात तयार झाल्याची माहिती प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.
            यावेळी आयुष्यमान भारत योजने सोबतच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्रितरित्या राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा यावेळी निवडक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते -कार्डचे वाटप करण्यात आले.
            कार्यक्रमाचे सुत्र संचालन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी केले तर डॉ. कवटे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, आशाताई सेविका, नागरिकांची मोठ्या उपस्थिती होती.

“आयुष्यमान भारत” योजना सर्वसामान्य लोकांसाठी आरोग्य कवच आहे -पालकंत्री संभाजी पाटील निलंगेकर





* पालकमंत्र्यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ
   -आरोग्य कार्डचे वाटप
*जिल्हयातील दोन लाख कुटुंबांना लाभ, जिल्हा योजनेत आघाडीवर राहील.

लातूर,दि. 23:- आयुष्यमान भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असून ही योजना गोर-गरीब, गरजू सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत महत्वाची असून ही योजना म्हणजे आरोग्य कवच असल्याचे प्रतिपादन कामगार कल्याण,कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री  संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
येथील डीपीडीसी हॉल मध्ये आयोजित आयुष्यमान भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री  जनआरोग्य योजनेच्या जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुनील गायकवाड,आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी श्रीकांत, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, आरोग्य सभापती प्रकाश देशमुख, उपमहापौर देवीदास काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता राजाराम पवार, आरोग्य उपसंचालक हेमंत बोरसे, जिल्हा शल्यचिकित्सक संजय ढगे, जिल्हा आरोग्यअधिकारी  गंगाधर परगे, जिल्हा समन्वयक  कुलदीप  शिरपूरकर इतर अधिकारी पदाधिकारी  आदि मान्यवर उपस्थित होते .
    पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते  हस्ते आज रांची झारखंड येथून जगातील सर्वात मोठया आरोग्य योजनेचा शुभारंभ झाला आहे.देशातील 50 कोटी लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळणार असल्याने  आजचा दिवस हा ऐतिहासीक असून सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा आहे. आजपासून देशातील गोर-गरीब, गरजू सर्व सामान्य लोकांना त्यांच्या आरोग्यावरील  5 लाख रुपया पर्यंतच्या  खर्चासाठी  शासन मदत करणार आहे. आरोग्यावरील अधिकच्या खर्चाने  मोडकळीस आलेल्या कुटुंबांना आधार मिळणार असून आर्थिक परिस्थिती नसलेल्या गरजू कुटुंबांसाठी ही योजना आरोग्य कवच, असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यापुढे देशात कोठेही आर्थिक परिस्थिती नसल्याने उपचार घेणे, उपचार अर्ध्यावर सोडणे या गोष्टी होणार नाहीत. कारण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरजू लोकांना 5 लाखापर्यंतच्या औषधोपचार शासकीय खाजगी रुग्णालयात विनामुल्य मिळणार आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळणार आहे, असे निलंगेकर यांनी  सांगून लातूर जिल्हयातील प्रत्येक गरजू पात्र लाभार्थ्यांना  या योजनेचा लाभ मिळावा याकरिता लोकप्रतिनिधी प्रशासनाची मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेची  प्रभावीपणे  अंमलबजावणी  व्हावी  याकरिता योजनेकडे फक्त  काम म्हणून पाहता ही एक आरोग्य सेवा पुण्यकर्म म्हणून जबाबदारी पार पाडावी असे  निलंगेकर यांनी सांगितले. या अंतर्गत महाराष्ट्रातील  3 कोटी 65 लाख लोकांचा डेटा बेस तयार झाला असून लातूर जिल्हा ही यात आघाडीवर असून दिनांक 7 ऑक्टोबर 2018 रोजी लातूर येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून या  योजनेचा जास्तीत जास्त फायदा रुग्णांना मिळावा म्हणून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी शासकीय यंत्रणेने सक्रीय सहभाग  देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या योजनेचे कार्ड देशपातळीवरील  कोणत्याही रुग्णालयात चालणार आहे. तसेच हया योजनेतंर्गत  दीडलाख वेलनेस सेंटर उभारली जाणार असून देशातील  50 कोटी नागरिकांना येजनेचा लाभ होणार असल्याची माहिती  खासदार डॉ.गायकवाड यांनी दिली.  तसेच राज्यात महात्मा फुले जनआरोग्य येाजनेबरोबरच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविली जाणार असून या योजनेत समाविष्ट  असलेल्या लातूर जिल्हयातील  रुग्णालयांनी प्रत्येक लाभार्थ्याला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध्करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले. यावेळी  आमदार सुधाकर भालेराव, माजी  खासदार गोपाळराव पाटील यांचीही भाषणे झाली.
      प्रारंभी पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन जिल्हास्तरावर आयुष्यमान भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योनेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात काही लाभार्थ्यांना -आरोग्य कार्डचे वाटप  ही   यावेळी करण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, यांनी केले तर आयुष्यमान भारत  योजनेंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची  माहिती  महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. कुलदीप शिरपूरकर यांनी पॉवर पाईंट प्रझेंन्टेशनव्दारे दिली. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी आभार  मानले. यावेळी रांची झारखंड येथील आयुष्यमान भारत  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हस्ते झाला.तो लाईव्ह कार्यक्रम  येथे दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उध्दव फड यांनी केले.