Followers

Sunday 2 September 2018

वाचन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी लोकराज्य वाचक अभियान उपयुक्त ठरेल. प्रा.गायकवाड

लोकराज्य अभियानाचा शुभारंभ

           लातूर,दि.1:-आजचा समाज हा ज्ञानाधिष्ठीत असून हे ज्ञान वाचनातून मिळत असते. त्यामुळे राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य वाचक अभियान हे वाचन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन बसवेश्वर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.श्रीकांत गायकवाड यांनी केले.
       जिल्हा ग्रंथालय वाचनालयाच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकराज्य वाचक अभियानाच्या उदघाटप्रसंगी प्रा.गायकवाड बोलते होते.यावेळी अध्यक्षपदी ग्रंथमित्र पांडूरंग अडसुळे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे,जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के,पत्रकार बाळ होळीकर आदिसह विद्यार्थी,नागरिक व ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        प्रा.गायकवाड म्हणाले की,आजच्या स्पर्धेच्या युगात कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावून जीवनात यशस्वी होण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील अद्यावत ज्ञान,कौशल्य प्रत्येकांनी आत्मसात केले पाहिजे व यासाठी त्या-त्या क्षेत्रातील चांगल्या व दर्जेदार ग्रंथाचे वाचन आवश्यक आहे. 
       या देशात बुध्दाने प्रथम पाली या बोलीभाषेतून लोकांमध्ये ज्ञानाचा प्रसार केला.नंतर ११व्या शतकापर्यंत ज्ञान प्रसाराची प्रक्रिया थंडावली होती.महात्मा बसवेश्‍वर, संत कबीर,ज्ञानेश्‍वर,तुकाराम ते १८ व्या शतकापर्यंत ती काहीशी सुकर झाली,महात्मा फुलेंनी तर इंग्रज सरकारकडे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला.शाहू महाराजांनी शिक्षण आणि वसतीगृहांचा पाया घातला.महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ग्रंथालये आणि शिक्षणाला प्राधान्य दिले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतच सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षणाचा समावेश केला अशी माहिती प्रा.गायकवाड यांनी देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी ग्रंथाला जवळ करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचे आवाहन केले.
      ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे म्हणाले की, २१ व्या शतकात रेडिओ, दूरदर्शन, मोबाईल, वॉट्‌सअप,फेसबुक आदी ज्ञानाची अनंत साधने उपलब्ध झाली आहेत,त्यातून आपल्याला केवळ माहिती मिळते,आपले लक्ष्य गाठण्यासाठी ज्ञानाशिवाय पर्याय नाही, आणि ज्ञानासाठी ग्रंथ व वाचन प्रक्रिया विकसीत होणे गरजेचे आहे, स्पर्धा परीक्षार्थीनी,अभ्यासकांची विविध पुस्तके वाचन करताना लोकराज्य मासिकाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. 
      जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची लोकराज्य व इतर प्रकाशने जास्तीत जास्त वाचक, विद्यार्थी, शिक्षण संस्था, सार्वजनिक ग्रंथालये, स्पर्धा परीक्षार्थींपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात आजपासून लोकराज्य वाचक मेळावे भरविण्यात येत आहेत. महाराष्ट्र वार्षिकी २०१८ तसेच लोकराज्यच्या अंकांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना, विविध विभागांची सखोल माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे,याचा लाभ सर्वांनी घ्यावा,लोकराज्यचे वर्गणीदार व्हावेत असे आवाहन प्रास्ताविकात केले. यावेळी बाळ होळीकर,वाचक अखिलेश स्वामी, जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश रेड्डी यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्यक सोपान मुंडे, लिपीक शफी शेख, ग्रंथमित्र आत्माराम कांबळे, नितीन चालक आदींनी सहकार्य केले.यावेळी असंख्य विद्यार्थी,वाचक उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयाच्या ग्रंथप्रदर्शनाला शेकडो नागरिकांनी भेट देवून लाभ घेतला.

No comments:

Post a Comment