Followers

Monday 17 September 2018

काऊ क्लब प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविणार-पालकमंत्री अर्जून खोतकर






उस्मानाबाद, दि.17:- उस्मानाबाद जिल्हा नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. जिल्ह्यात आर्थिक उत्पन्नाचे दरडोई प्रमाण कमी आहे.  यामुळे शेतीपूरक उद्योगांची गरज लक्षात घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यासाठी काऊ क्लब ही संकल्पना राबविण्यात येणार असून नंतरच्या टप्प्यात संपूर्ण राज्यात ही संकल्पना राबविण्यात येईल,असे प्रतिपादन पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित 70 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापनदिनी  केले.  
 मराठवाडा मुक्ती संग्रामात  सहभागी झालेले  उस्मानाबाद जिल्हयातील स्वातंत्र्यसैनिक  आयुष्यभर  क्रियाशील  राहिले  आणि आजही  क्रियाशील आहेत. ज्यांनी या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, आपले प्राणार्पण केले अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची  आम्हाला  सदैव जाणीव राहील. मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेमुळे मराठवाड्याचा विकास झाला.
 मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी श्री. अर्जून खोतकर बोलत होते. यावेळी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ओमराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक राजा राम सामी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी रामचंद्र चोबे, निलेश श्रींगी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. वडगावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  श्री. घाटगे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आडेसहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, तहसिलदार विजय राऊतस्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, विद्यार्थी, विविध विभागाचे प्रमुख, पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते. 
पुढे बोलताना ना. खोतकर म्हणाले की, हैद्राबाद  संस्थान  निजामाच्या  राजवटीतून  मुक्त करण्याच्या  लढ्यात   स्वामी  रामानंद तीर्थ  यांच्या  जीवितकार्याची  पायाभरणी  आपल्या  जिल्ह्यातील  हिपरग्याच्या राष्ट्रीय  शाळेत झाली, याची आजच्या दिनानिमित्ताने  आपल्याला  आठवण  येणे स्वाभाविक  आहे.स्वामीजींच्या  नेतृत्वाखाली  निजाम  राजवटीच्या  गुलामगिरीविरुध्द  लढा देण्यात आला. त्यात आदरणीय गोविंदभाई श्रॉफ , बाबासाहेब  परांजपे दिगंबरराव बिंदू ,गंगाप्रसाद  अग्रवाल , देवीसिंहजी  चव्हाण , भाई उध्दवराव पाटील, दिगंबरराव देशमुख, कॅप्टन  जोशी असे अनेक स्वातंत्र्य सैनिक सहभागी  झाले होते.  त्यांना महिला स्वातंत्र्य सैनिकांनीही या स्वातंत्र्य संग्रामात निडरपणे साथ दिली. या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या जिल्ह्यातील  देवधानोरानंदगाव , चिलवडी  या गावांनी इतिहास रचला. यात चिलवडीचे रामलिंग जाधव, देवधानोऱ्याचे महादेव बोंदर, लक्ष्मण बोंदर, मुरूडचे शिवाजी नाडे, उस्मानाबादचे भास्करराव नायगावकर, जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष नामदेवराव माने अशा सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची  आम्हाला  सदैव जाणीव आहे व यापुढेही राहील. या सर्वांना  मी अभिवादन  करतो.  
ते पुढे म्हणाले, राज्य शासनाने मंजूर केल्याबददल मी या जिल्हयाचा पालकमंत्री या नात्याने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचे विशेष आभार मानतो. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी  शिवसेनाप्रमुख  उध्दव  ठाकरे यांचीही खंबीर साथ व मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच काऊ क्लबच्या माध्यमातून दुर्मिळ होत असलेल्या गीर गायीचे संवर्धन करून त्याद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन दुग्धजन्य पदार्थ गायीच्या गोमूत्र व शेणापासून आयुर्वेदिक औषधे,सौंदर्यप्रसाधने व दैनंदिन जीवनातील उपयोगाच्या वस्तूंची निर्मिती करण्यात येणार आहे. त्या उत्पादित पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच कृषी पर्यटन, ऑरगॅनिक फार्मिंग, ऍग्रो प्रोसेसिंग युनिट,पंचकर्म सेंटर व ट्रीटमेंट सेंटरही  या काऊ क्लब अंतर्गत तयार करण्यात येणार आहे. यामुळे उस्मानाबादच्या शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत मिळण्यास मदत होऊन त्यांचा आर्थिक विकास होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड महामोहिमेत या जिल्हयातील सर्व यंत्रणांनी मिळून 58 लाख 34 हजार इतकी  विक्रमी वृक्षारोपण करून राज्यात नावलौकिक मिळविला. गेल्या काही वर्षात झालेल्या  वृक्षारोपणामुळे उस्मानाबादच्या वृक्षाच्छादनात चार चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्राची वाढ झाल्याने नैसर्गिकदृष्टया जिल्हयाला भविष्यात याचा मोठा लाभ होणार आहे. मात्र या वृक्षांची जपणूक व संवर्धन करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागात दूध उत्पादन वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांतर्गत वैरण विकास कार्यक्रम, कृत्रिम रेतनाची सुविधा गावापर्यंत पुरविणे, वांजपणाचे निदान करणे,गावपातळीवर पशुवैद्यकीय सेवा व मदर डेरी मार्फत योग्य दरात दूध संकलन असे उपक्रम  जिल्ह्यातील 493 गावांमध्ये राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांमुळे  संपूर्ण राज्यासह  जिल्ह्याचेही भविष्य उज्ज्वल होणार आहे. जिल्ह्यात सन २०१७-१८ या वर्षात एकशे अष्ठयाहत्तर गावांची निवड करण्यात आली होती, त्यात पाच हजार पाचशे त्रेपन्न् कामे प्रस्तावित करण्यात आली आणि यातून पाच हजार एकशे सत्याएैंशी कामे पूर्ण झाली असून या कामांमधून अठठावन्न हजार  सहाशे एक्यान्नव टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाल्याने त्यामुळे दोन हजार एकशे बावीस हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण होण्यास मदत झाली. चालू वर्षीच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील अष्ठयाहत्तर  गावांची निवड करण्यात आली असून यामध्ये  याप्रमाणे एक हजार नऊशे एकोणीस  कामे प्रस्तावित करण्यात आली आणि त्यातील एकशे त्र्याहत्तर कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरीत जलसंधारणाची  मोठी कामे  भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यातून सुरू होणार असल्याचेही त्यांनी शेवटी  सांगितले.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणून  जिल्ह्यातील पंच्यान्नव हजार  सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांना  तीनशे त्रेचाळीस कोटी सव्वीस लाख रुपयांची कर्जमाफी दिली. संपूर्ण कर्जमाफी एकूण सेहेचाळीस हजार एकावन्न शेतकऱ्यांना दोनश सेहेचाळीस कोटी  एकोणऐंशी लाख रुपयांची मिळाली. 10 ऑगस्ट 2018 च्या  नवीन शासन निर्णयानुसार शेतकरी कुटुंबातील प्रत्येक पात्र व्यक्तीलाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अशा प्रकारे हे शासन बळीराजासाठी प्रामाणिक काम करीत असून यापुढेही करीत राहील असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना,सौभाग्य योजनाप्रधानमंत्री सहज बिजली हरघर योजना,उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना,मिशन इंद्रधनुष या योजना  जिल्हयातील चारशे अठठयाऐंशी गावांमध्ये मिशन मोडवर राबविल्या असून त्याचा चांगला लाभ अनेक गरजू गावकऱ्यांना मिळाला आहे.
आतापर्यंत विविध विकासकामांसाठी उस्मानाबाद जिल्ह्याला भरीव निधी उपलब्ध करून दिला असून  यापुढेही शासन आणि प्रशासनाकडून विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही  अशी ग्वाही  त्यांनी दिली. 
यावेळी श्री. खोतकर यांनी उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि नागरीक बंधु-भगिनींची सदिच्छा भेट घेवून त्यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

No comments:

Post a Comment