Followers

Thursday 27 September 2018

“ जाऊ ”…स्वच्छतेची पाठशाळा---लेख




       शासकीय शाळा म्हटले की, आज ही नाके मुरडणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण शिक्षण क्षेत्रात  खाजगी शैक्षणिक संस्थामुळे मोठी स्पर्धा निर्माण होऊन शासकीय शाळांचे महत्व कमी होऊ लागले होते. मध्यंतरी काही जिल्हयात जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होत होती. परंतु मागील तीन-चार वर्षात बहुतांश शासकीय शाळा या स्पर्धेच्या युगात टिकाव धरण्यासाठी कात टाकत असून शासन ही  त्यासाठी प्रयत्न करत आहे.लातूर जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा हया डिजिटल झाल्या असून यातील काही शाळांमध्ये प्रवेशासाठी वेटींग करावे लागते तर अनेक शाळांची कमी झालेली पटसंख्या वाढत आहे.
      सामाजीक न्याय विभागाच्या वतीने ही राज्यात ठिकठिकाणी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मुला-मुलींसाठी शाळा,आश्रमशाळा,निवासीशाळा व वसतिगृहाच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध्‍ करुन देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. हया शाळांचा ही शैक्षणिक दर्जा चांगला असून नवी दिल्ली येथील मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत सन 2017-18 या वर्षावेळी राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय स्पर्धा घेण्यात आली व या स्पर्धेत देशभरातून साडेसहा हजार शासकीय/खाजगी शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत लातूर जिल्हयातील जाऊ ता. निलंगा व बावची ता. रेणापूर येथील  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मुलींच्या शाळांनी स्वच्छतेचे सर्व निकष पूर्ण करुन  पुरस्कार पटकाविला आहे. ही बाब अत्यंत अभिमानास्पद अशीच आहे.राष्ट्रीय स्तरावर लातूर जिल्हयातील  दोन शासकीय शाळांनी पुरस्कार प्राप्त करुन लातूर जिल्हा शैक्षणिक  पॅटर्न बरोबरच तेथील स्वच्छतेबाबत ही  अत्यंत जागरुक असल्याचे निर्देशक आहे.
        जाऊ ता. निलंगा येथील स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त शाळेला भेट देण्याच योग अलीकडेच मला प्राप्त झाला. निलंगा शहरापासून दोन किलो मीटर औसा रोडवर असलेली ही  समाज कल्याण विभागाची  6 वी ते 10 वी पर्यंतच्या  मुलींची  निवासी शाळा आहे. या शाळेची इमारत प्रशस्त  असून मुख्य  इमारतीच्या समोरच लक्ष वेधून घेणारे  हिरवी गर्द वनराई आहे.
          इमारतीमध्ये प्रवेश करताच समोर दिसतात त्या बोलक्या भिंती त्या भिंतीवर विद्यार्थीनींना सर्वसामान्य ज्ञानाची माहिती व्हावी तसेच अभ्यासक्रमाशी संबंधीत माहिती लिहीली गेली असून जाता-येता त्याचे पठन व्हावे ही त्या मागची भावना.
     प्रवेश व्दारा शेजारीच मुख्याध्यापक श्री. दत्तात्र्य मुखम यांचे दालन. ते स्व:त एवढे हसमुख व प्रसन्न होते की त्यामुळे शाळेतील एकंदरीत वातावरणाचा अंदाज मला बांधता आला.   मी त्यांना  रंगविलेल्या भिंतीबद्दल बोलू लागलो. तेंव्हा त्यांनी  सहजपणे मुलींना सामान्यज्ञान मिळावे व भिंतीवरील विविध  राष्ट्रपुरुषांच्या छायाचित्रांतून त्यांना त्यांच्या विषयी  आदर रहावा ही कल्पना  असल्याचे सांगून प्रवेशव्दाराच्या छताकडे पाहण्याचा संकेत केला. मी तर छताकडे एकटक पाहतच राहिलो., कारण संपूर्ण सुर्यमालेचे ज्ञान फक्त प्रवेशव्दाराच्या मोकळया जागेत दोन्ही बाजूंना टाकलेल्या बाकडांवर पाच मिनिट बसलो तरी  संपूर्ण सूर्यमाला समजली जाते. हया छोटया कल्पना पण मोठा परिणाम साधणाऱ्या   असल्याचा बोध मला यातून झाला.व ही शाळा कशाप्रकारे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविते याचाही प्रत्यय आला.
      श्री.मुखम सरांनी प्रथम मला स्वच्छ विद्यालय पुरस्कार कसा मिळाला याबद्दल एक ही वाक्य न बोलता प्रत्यक्ष या शाळेमध्ये  व परिसरात ही स्वच्छता  कशा  पध्दतीने ठेवली जाते ते दाखविले.  शाळेचा संपूर्ण परिसर तर स्वच्छ  होताच परंतु  शाळेतील कचऱ्याची विल्हेवाट बगीच्या मध्ये कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प उभारुन सेंद्रीय खत निर्माण केले जाते व तेच खत बगीच्यातील झाडांना नियमित टाकले जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांनीच्या सक्रीय सहभागाने एक नर्सरी  ही तयार केली असून  पुढील वर्षीच्या  वृक्ष लागवड मोहिमेत  किमान  15 ते 25 हजार वृक्ष रोप येथून देण्याचे नियोजन करुन ही शाळा पर्यावरणाच्या कामांत ही दक्ष असून शालेय दशेपासूनच विद्यार्थांना स्वच्छता व वृक्षलागवडीचे महत्व अंगी रूजवत पर्यावरण प्रेमी पिढीची पायाभरणी केली जात असल्याचं वाटतं.
       आम्ही प्रथम शाळेतील स्वयंपाक गृह व भोजन गृहात गेलो. एकाच वेळी 200 विद्यार्थी बसण्याची व्यवस्था भोजनगृहात आहे. तसेच विद्यार्थी एका रांगेत  भोजनगृहात प्रवेश करतात.येथे बाजूलाच जेवणापूर्वी हात स्वच्छ कशा पध्दतीने करावेत याचे पूर्ण प्रशिक्षण विद्यार्थींनींना देण्यात आलेले आहे. व एकाच वेळी किमान 20 विद्यार्थ्यांना हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील वॉश बेशीनची स्वच्छता बघतच राहावी अशीच आहे. त्यानंतर आम्ही शौचालये व बाथरुमची पाहणी केली व येथील स्वच्छता ही नीट नेटकी व उत्कृष्ट अशीच होती. त्यानंतर विद्यार्थींनींची शिस्तबध्द निवासव्यवस्था पाहीली तर प्रत्येक वर्गातील शिक्षक ते विद्यार्थी यांची स्वच्छता व शिस्तीची  लयबध्दता दिसून आली.
       संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोग शाळा, मनोरंजन कक्ष अशा सर्व  ठिकाणची शिस्तबध्दता व स्वच्छता पाहताक्षणीच दिसून येत होती. ही शाळा व येथील विद्यार्थी व यांचे मार्गदर्शक शिक्षकवर्ग यांचे परिश्रम म्हणजेच या शाळेला राष्ट्रीय स्तरावर मिळालेला “स्वच्छ विद्यालय पुरस्कार” होय. परंतु हा पुरस्कार मिळाल्याने येथील विद्यार्थी व शिक्षक थांबणार नाहीत तर स्वच्छतेचा हा वसा जीवनभर जपणार असून ते इतरांनाही  सांगणार आहेत. ही शाळा जणू मला स्वच्छतेची पाठशाळाच भासली.
    येथील विद्यार्थी , शिक्षक व इतर कर्मचारी यांच्याशी चर्चा केली असता सर्वजण या शाळेत, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी झोकून देऊन काम करतात. येथील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एक सांघिक भावना रुजलेली असल्याने येथे नवनवीन उपक्रम राबविले जातात व ते यशस्वी ही करुन दाखविले जातात. या सर्वामध्ये ही सांघिक भावना रुजविण्यामध्ये अग्रेसर आहेत ते म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक मुखम सर !
     अशा या शिस्तबध्द शाळेत आम्ही  सकाळी  11 ते दुपारी  3 वाजेपर्यंत  येथे विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी चर्चा केली. तसेच शाळेचा पूर्ण परिसर व इमारतीची स्वच्छता पाहिली व  नक्कीच ही शाळा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांसाठी शंभर टक्के पात्र असून ही जाऊची शासकीय निवासी शाळा म्हणजे इतर सर्व शासकीय व खाजगी शाळांसाठी आदर्शवतच राहील , असे वाटतं.
        दिनांक 18 सप्टेंबर 2018 रोजी  नवी दिल्ली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या शाळेला प्राप्त पुरस्कार मुखम सर यांनी स्वीकारला. तर बावची येथील शाळेचा पुरस्कार श्री. जमादार सर यांनी स्वीकारला. त्याप्रमाणेच लातूर जिल्हयाला स्वच्छ विद्यालयाचे दोन पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. हा विशेष पुरस्कार जिल्हाधिकारी जी.श्रीकांत व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी. अरवत यांनी स्वीकारला.
      आपल्या जिल्हयातील दोन शासकीय शाळांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणे ही बाब अभिमानास्पद अशीच आहे. हया दोन्ही शाळा म्हणजे स्वच्छतेच्या पाठशाळाच आहेत. त्यामुळे जाऊची शाळा सोडत असताना माझे ही  मन अभिमानाने भरुन आले.व मनातल्या मनातच या शाळेला, विद्यार्थी व शिक्षक वर्गाला  व त्यांनी शासकीय शाळेत ठेवलेल्या स्वच्छतेला व यातून तयार होऊन बाहेर पडणाऱ्या सावित्रींच्या लेकींना माझा सलाम. !
                                                                                                                                                   सुनील सोनटक्के                                                             जिल्हा माहिती अधिकारी
                                                                  लातूर

No comments:

Post a Comment