Followers

Tuesday 7 May 2024

 

अभिनव नवोपक्रमांनी साजरा

झाला लोकशाहीचा उत्सव

v वडवळ (ना.), जानवळ, ब्रम्हवाडी, लोदगा, निलंग्यात मतदारांचा उत्साह

v लातूर, उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

लातूर, दिनांक ७ (विमाका) : लातूर, उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हाभरात मतदारांचा उत्साह होता. चाकुर तालुक्यातील वडवळ नागनाथ इथं बीज वाटप, जानवळ इथं श्वानांची माहिती, ब्रम्हवाडी इथं पारंपरिक वेशात महिला, औशातील लोदगा इथं बांबूपासून वस्तूंची निर्मिती आणि निलंग्यात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याचे महत्त्व आदी अभिनव नवोपक्रम मतदान केंद्रांवर राबविण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांपासून दिव्यांग, नवमतदारांनी या उपक्रमांचे कौतुक करत भरभरून प्रतिसादही दिला.


चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील जिल्हा परिषद प्रशालेतील मतदान केंद्रावर संजिवनी बेटाची माहिती फलकांद्वारे प्रदर्शित करण्यात आली होती. संजिवनी बेटावर असलेल्या विविध वनस्पती त्यांचे पर्यावरणीय महत्त्व आदी बाबींचा यामध्ये समावेश होता. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदार उत्साहाने सहभागी होत होते. या मतदान केंद्रांवरील मतदारांना मतदानानंतर विविध प्रजातींच्या बियांचे वाटप याठिकाणी करण्यात आले. या उपक्रमांचा शुभारंभ तहसीलदार नरसिंग जाधव यांच्याहस्ते झाला. याप्रसंगी रेणापूर येथील पर्यावरण प्रेमी शिवशंकर चापुले, मंडळ अधिकारी श्याम कुलकर्णी, तलाठी शंकर लांडगे आदींची उपस्थ‍िती होती.

वनौषधीची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा’ याप्रमाणे प्रत्येकाने कृती करायला हवी. मतदान केंद्रांवर देण्यात आलेल्या बियांची रूजवण करून  रोपटांची निगा राखण्याचे आवाहन श्री. जाधव यांनी यावेळी मतदारांना केले. त्याचबरोबर श्री. चापुले यांनी मतदानाच्या दिवशी वडवळ नागनाथ याठिकाणी मतदान केंद्रावरील वनौषधींची माहिती याबाबतची पार्श्वभूमी सांगितली. त्याचबरोबर लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मतदान करणे अत्यावश्यक आहे, त्याचप्रमाणे पर्यावरणाला अधिक मजबूत करण्यासाठी झाडे लावणे, संवर्धन करणे अत्यावश्यक असल्याचे चापुले म्हणाले. तर मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावरील ज्येष्ठ नागरिक शिवाजी कल्याणे यांनी मतदानाचे महत्त्व यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या पर्यावरणपूरक अशा मतदान केंद्राची स्तुती केली.

जानवळ येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत पश्मी, कारवान या विशेष प्रजातींच्या श्वानांची माहिती असलेले फलक मतदान केंद्रावर लावण्यात आले होते. इथल्या श्वानांची प्रजाती उत्तम म्हणून ओळखल्या जाते. अतिशय हुशार, दिसायला देखणी अशी पश्मी श्वान असतात. ही अफगान जातीचे असतात. शिकार, शेतीची राखणदारी ही प्रजात उत्तम करते. मागील पाच-सहा पिढ्यांपासून श्वानांचे पालन आमच्या कुटुंबात केले जाते, असे गावचे नागरिक तानाजी पवार यांनी मतदानानंतर सांगितले.



गावात ४०० हून अधिक नागरिक श्वान विक्रीपासून उत्पन्न मिळवतात. यापैकीच एक असलेला अतुल काळे या युवकाने कारवान या श्वानाबाबत माहिती दिली. तिन्ही ऋतूमध्ये तग धरणारी प्रजाती कारवान आहे. शिकारी, राखणदारीसाठी कारवान प्रजात उत्तम आहे. चेहरा निमुळता, छाती भरगच्च भरलेली सेफ्टी नाजूक डोके, उंची  २८ ते ३० इंचांपर्यंत असते. खाण्यावरचा  खर्चही अत्यल्प असतो, असेही काळे यांनी सांगितले.

चाकूर तालुक्यातीलच ब्रम्हवाडी येथे मतदान अधिकारी, कर्मचारी यांनी मतदारांना गूळ आणि पाणी देऊन स्वागत केले. तर येथील महिला मतदारांनी पारंपरिक वेशात येऊन मतदानाचा हक्क बजावला.  




भर उन्हातही ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांवर असलेल्या सुविधांबाबत मतदारांनी समाधान व्यक्त केले. यापैकीच निलंग्यातील सखी मतदान केंद्रांवर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सुषमा एखंडे म्हणाल्या, सखी मतदान केंद्रावर उन्हापासून सावली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधांबाबत माहिती देण्यासाठी कर्मचारीही उपलब्ध असल्याने समाधान लाभल्याचे मत श्रीमती एखंडे यांनी व्यक्त केले.

निलंगा येथील मतदान केंद्रावर आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या उपक्रमावर आधारित तृणधान्याचे महत्त्व विषद करणारी माहिती, प्रतिकृती  तयार करण्यात आली होती. यामध्ये पौष्टीक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व आदी विषयाची माहिती मतदान केंद्रांवर लावण्यात आली होती. पारंपरिक तृणधान्याचे दैनंदिन जीवनात महत्त्‌व असून तृणधान्याचा वापर करण्याचा संदेश या मतदान केंद्राच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचे निलंग्याचे सहायक निवडणूक अधिकारी शरद झाडके यांनी सांगितले.    

नवमतदारांमध्ये पहिल्यांदाच मतदान केल्याचा उत्साह

यंदा पहिल्यांदाच मतदान करणारा जानवळ येथील जगदीश पाटील म्हणाला हा मतदानाचा अनुभव माझ्यासाठी खास होता. श्रीमती एखंडे, लोदग्यातील मोहिनी गायकवाड, अनुप सुरवसे, निलंग्यातील प्रणव तरंगे यांनीही पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. हक्क बजावल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. मी मतदान केलं, तुम्हीही करा, मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

लोदग्यात बांबूच्या वस्तूंचे प्रदर्शन


उस्मानाबाद सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतील औसा तालुक्यातील लोदगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मतदान केंद्र क्रमांक 30 वर बांबूपासून निर्मित वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वाहनाचाही समावेश होता.  किनीथोट येथील मंडळ अधिकारी टी.डी.चव्हाण यांनी मतदारांना बांबूच्या वस्तूंची माहिती मतदान केंद्रावर दिली. शेतकऱ्यांना परवडणारा असे बांबू उत्पादन असल्याचे या प्रदर्शनातून सांगण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदारांनीही या प्रदर्शनाबरोबरच याठिकाणी उभारलेल्या सेल्फी पॉइंटचाही लाभ घेतला.

*******