Followers

Thursday 30 April 2020

यशोगाथा: लॉकडाऊनच्या काळात प्रशासनामार्फत सिध्देश्वर मंदिरात 65 बेघरांना निवारा !

यशोगाथा:



कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  दि.23 मार्च ते 14 एप्रिल 2020 या कालावधीत 21 दिवसांचा लॉकडाऊन संपूर्ण देशभरात जाहिर केला. आणि जे ज्याठिकाणी आहेत ते त्या ठिकाणी स्तब्ध्  झाले.  त्याच अनुषंगाने लातूर जिल्हा प्रशासनाने साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या अनुषंगाने जिल्हयात संचारबदीचे आदेश लागू केले.
लातूर जिल्हयातून कोणीही व्यक्ती बाहेर जाणार नाही  व बाहेरील व्यक्ती जिल्हयात येणार नाही. त्याप्रमाणेच कोरोना कोवीड-19 च्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार सामाजीक अंतर पाळणे, नाका-तोंडावर रुमाल बांधणे, जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना वगळता इतर सर्व आस्थापना बंदचे आदेश दिले. तर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे नेहमी गजबजलेले रस्ते, चौक निर्मनुष्य  होऊ लागले. बहुतांश लोक विनाकारण घराबाहेर पडत नव्हते. व जे येत होते त्यांना पोलीस त्यांच्या पध्दतीने समजावून घरी पाठवत होते. या लॉकडाऊनचा  लहानापासून मोठया पर्यंत सर्वांवरच परिणाम होत होता.
          लातूर शहरातील बेघर व्यक्ती, तसेच इतर जिल्हयातून  मोल- मजुरीसाठी आलेले कामगार, शहरात आडकून पडले. त्यांच्या जेवणाची व निवासाची व्यवस्था होत नव्हती. त्यावेळी लातूर तालुका  प्रशासन, महानगरपालिका व सिध्देश्वर रत्नेश्वर मंदिर संस्थानच्या संयुक्त विद्यमाने बेघर, स्थालांतरित कामगार अशा 65 लोकांच्या निवाऱ्याची व जेवणाची व्यवस्था तात्काळ करण्यात आली. या 65 लोकांना सिध्दश्वर रत्नेश्वर मंदिर परिसरातील यात्री निवासस्थानच्या सभागृहात निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली. या सर्व लोकांना कोरोना विषाणू विषयी सविस्तर माहिती देऊन येथेच सामाजीक अंतर ठेवून लॉकडाऊनचा पहिला टप्पा व आता दुसरा टप्पा संपेपर्यंत राहणे कसे गरजेचे व त्यांच्या जीवनासाठी किती महत्वाचं आहे, हे समजावून सांगण्यात प्रशासनाला यश आलं. 
           या 65 लोकांमध्ये लातूर शहरातील बेघर, अपंग व्यक्ती तसेच अमरावती येथील मजूर, गंगाखेड येथील वाटसरु व इतर स्थलांतरीत मजूर होते.यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यत व महिला आदिंचा समावेश होता. जिल्हा प्रशासन व मंदिर संस्थान यांनी पहिल्या दिवसापासून येथील लोकांची जेवण, निवास आदि व्यवस्था चोखपणे केली. तसेच या लोकांना सकाळी 7 वाजता चहा, साडे अकरा ते 12 वाजता दरम्यान दुपारचं जेवण व रात्री 8 वाजता जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याप्रमाणेच स्वच्छ बाथरुम, टॉयलेट, कपडयाचे साबण, आंघोळीचे साबण, हँड वॉश व सॅनिटायझरची उपलब्धतता करुन आरोग्य विभागामार्फत प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
       एकंदरित पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्रशासन प्रमुख म्हणून लॉकडाऊनच्या काळात सर्व बेघर, स्थालांतरित मजूर व परराज्यातील मजुरांसाठी अन्न, निवारा, पाणी आदिंची चोख व्यवस्था उपलब्ध करून देत आहेत. स्वत: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी येथील निवारा केंद्राला भेट देऊन लोकांशी संवाद साधला. व प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.
  
प्रतिक्रिया:-
कु.संजना हरिश्चंद्र चव्हाण:-
लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळी मी व आमच्या कुटुंबातील इतर 10 सदस्य लातूर रेल्वेस्टेशन वर होतो. येथून आम्हाला आमच्या मुळ गावी अमरावती येथे जायचं होते. आमचं कुटुंब शहरात विविध ठिकाणी फिरुन खेळणी विकण्याचा व्यवसाय करुन उदारनिर्वाह करते. लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा व इतर सर्व बंद झाले. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला येथील निवाराकेंद्रात आणले व आमची  येथे चांगली व्यवस्था केली जात आहे.त्यामुळे येथील प्रशासनाचे आभार मानते, असे कु. संजना चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
श्री.अशोक शिवाजीराव पाटील, तांडा वस्ती ता.गंगाखेड
श्री.अशोक पाटील हे पंढरपूरला गेले होते.येथून पायी लातूरमार्गे गंगाखेडला जात होते. परंतु महापालिकेच्या पथकाने श्री. पाटील यांना लॉकडाऊन व कोरोना संसर्गाची माहिती दिली व या निवारागृहात आणले. निवारागृहात प्रशासनाकडून सर्व सुविधा मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन लवकरच कोरोनाचा संसर्ग थांबावा व वाहने सुरु व्हावीत. म्हणजे मला माझ्या गंगाखेड तालुक्यातील तांडा वस्तीवर जाता येईल, असे त्यांनी सांगितले.


                                              

यशोगाथा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्यातून भूमच्या खवा क्लस्टरमध्ये 200 टन खव्याची कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणूक


यशोगाथा:
  



* पाच हजार तरुणांना कोल्डस्टोरेजचा आधार
 * या कालावधीत दहा लाख लिटर दूध संकलित

कोविड-१९ च्या आपत्ती मधील लॉकडाऊन परिस्थितीत मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील खवा बनवणाऱ्या छोट्या खवा व दुध उत्पादक शेतकरी या व्यवसायीकांना आलेल्या अडचणीच्या परिस्थतीत खवा क्लस्टर भूम ठरले वरदान.
         मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम,कळंब,वाशी येरमाळा, सरमकूंडी फाटा, या गावांना खवा व पेढा उत्पादनाचे कोठार म्हणून ओळखले जाते. राज्याच्या कानाकोपर्यात व परराज्यातही या ठिकाणावरुन खवा पाठवला जातो. खवा तयार करण्याची नैसर्गिक पद्धती व गुणवत्ता उत्तम असल्यामुळे या ठिकाणी तयार होणाऱ्या खव्याला चांगली मागणी असते. खवा व्यावसायामुळे या परिसरामधील लोकांना चांगील आर्थिक संपन्नता आली आहे. गेल्या अनेक कालावधीपासून राज्यामध्ये दुग्ध व्यावसाय हा शेतीपूरक व्यावसाय म्हणून केला जातो. दुग्ध व्यावसयाचे होणारे बाजारीकरण  व दुधाची वाढती मागणी यामुळे शेतकरी वर्गाला देखिल उभारी मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत या ठिकाणी सहकाराची गंगा कमी प्रमाणात पोहचली आहे. त्यामुळे या ठिकाणी चालणारा दुग्ध व्यावसाय हा खवा व्यावसायावर अवलंबून आहे.  हंगामानुसार येथील खव्याला चांगली मागणी असते, त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकर्यांना देखील चांगला दर मिळतो. राज्यामधील दुध संघाच्या दराच्या तुलनेत खवा उत्पादक व्यावसायिकांचा दर उच्च असतो. तसेच दुधाच्या पैशासाठी शेतकऱ्याना दुध संघाप्रमाणे थांबण्याची गरज नसते. खवा उत्पादक व्यापाऱ्याकडून सात दिवसाला मोबदला दिला जातो तसेच काही खवा व्यापारी शेतकऱ्यांना गाई पण खरेदी करून देतात त्यामुळे येथील लोकांची पहिली पसंती खवा व्यावसायाला आहे.
        साधारण 1960-1962 च्या कालावधीत खवा व्यावसायाला या परिसरामध्ये सुरूवात झाल्याचे येथील जाणकार सांगतात. मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले दुध व खवा तयार करण्यासाठी लागणारे इंधन म्हणून लाकूड या दोन गोष्टी या परिसरात मोठ्या प्रमाणात  असल्यामुळे या परिसरात खवा व्यावसायाला सुरूवात झाली. प्रारंभीच्या कालावधीत ग्रामिण भागात दुध संकलन करण्यासाठी दूध डेअरी हा प्रकार नव्हता त्यामुळे या परिसरात उत्पादित होणारे संपूर्ण दुध हे खवा व्यावसायासाठी जात असे. दुध मोठ्याप्रमाणात उपलब्ध असल्यामुळे उत्पादन ही मोठ्याप्रमाणात होवू लागले. संपूर्ण तयार होणारा खवा हे लोक पुणे,मुंबई,हैद्राबाद,औरंगाबाद,सातारा,नाशिक ,शिर्डी  अशा मोठ्या शहरात पाठवत असत. आज देखिल या शहरात येणारा खवा याच परिसरामधून येतो. त्या कालावधीमध्ये मालाची गरज किती आहे तेवढेच उत्पादन घेतले जात असे कारण जास्त माल तयार केला तर तो विकायचा कोणत्या ठिकाणी हा प्रश्न निर्माण होत असे
          प्रारंभीच्या कालावधीत खव्याचं पॅकेजिंग हे वडाच्या पानात होत असे. माल व्यावस्थित पॅक करुन त्याच्या वरती पोत्याचे आच्छादन घातले जायचे व तयार केलेलं गाठोड पाण्यात भिजवून ते पुढे पाठवलं जात असे. भिजवल्यामुळे  मालाला गारवा प्राप्त होत असे व त्याचा दर्जा जास्तीत -जास्त कालावधीसाठी चांगला रहात असे.
    या जिल्ह्यामधील शेतकर्यांचे अर्थकारण या व्यावसायावर अवलंबून आहे. या व्यावसायाच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. दुग्ध व्यावसायाला खवा उत्पादनाची जोड दिल्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक संपन्नता लाभली आहे. अनेक व्यावसायिक पारंपारीक पद्धतीने हा व्यावसाय करत आहेत. या व्यावसायामध्ये अनेक जनांच्या दुसऱ्या-तिसऱ्या पिढ्या कार्यरत आहेत.
         सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त स्थिती पाहता येथील शेतकरी, महिला , युवक  हे दुध व खवा निर्मिती या व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्र भर असणारे मंदिरे व तेथील पेढा हा भूम  परिसरामधून बनविला जातो. खवा या पदार्थाची टिकाऊ क्षमता हि साधारण तापमानात  एक ते दोन दिवसाची असल्याने तो रोजच्या रोज विकावा लागतो अथवा शीतगृहात ठेवावा लागतो. सदरील शीतगृह सुविधेसाठी पुर्वी येथील खवा उत्पादकांना हैद्राबाद, पुणे, औरंगाबाद येथे जावे लागत असे  ते त्यांना खूप खर्चिक पडत व वेळही खूप लागत असे. तसेच तालुका व परिसरातील खवा व्यावसायिक हे असंघटीत रित्या कार्यरत असल्याने त्यांना व्यवसायात भरपूर अडचणी निर्माण होत असत.
   वरील सर्व खवा व्यवसायातील समस्या पाहता, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील उस्मानाबाद (आकांक्षित जिल्हा) जिल्ह्यामधील  अडचणीवर मात करून श्री. विनोद जोगदंड, यांच्या नेतृत्वाखाली  रियाज पिरजादे, सुनील पाटील यांनी पुढाकार घेऊन दुध व खवा व्यावसायिक शेतकऱ्यां एकत्रित करून उद्योग संचालनालयाच्या सहकार्याने राज्यातील दुध व खवा उत्पादकांसाठी राज्यातील पहिले खवा क्लस्टर एमआयडीसी भूम ता.भूम जि. उस्मानाबाद येथे सुरू केले आहे. यामध्ये खवा उत्पादक शेतकऱ्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर सामुहिक सुविधा केंद्र ( 1000 मे.टन कोल्ड स्टोरेज, प्रशिक्षण केंद्र, अत्याधुनिक  
  खवा तपासणी केंद्र, मूल्यवर्धित उत्पादन केंद्र) ची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे  उस्मानाबाद जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न वाढवत (जीडीपी) जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचाविण्यासाठी मदत होत आहे.
       तालुक्यातील व परिसरातील खवा उत्पादन करणाऱ्या खवा भट्ट्या ह्या लाकूड या इंधनावर आधारित असल्याने येथील परिसरामध्ये रोज अंदाजे ५०० झाडे तोडली जातात व या मुळे निसर्गावर व पावसावर याचा परिणाम होत असल्याचे जाणवू लागल्यामुळे खवा क्लस्टर भूम च्या माध्यमातून  विविध सामाजिक बांधिलकी निधीतून सौर उर्जा प्रणालीवर  आधारित इंडक्शन खवा मशीनवर खवा निर्मिती साठी सामुहिक सुविधा केंद्र बनवण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पातून ३५०, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील  महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे. सर्व खवा उत्पादकांच्या सहकार्याने तसेच शासनाच्या व बँकेच्या मदतीने खवा क्लस्टर भूम ने,  भूम तालुका व परिसरातील सर्व खवा  भट्ट्या या सौरउर्जा प्रणाली इंधनावर करण्याचे धोरण आखले आहे.
जिल्हाधिकारी श्रीमती. दीपा मुधोळ मुंढे (भा.प्र.से.) व जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद  यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी विविध सामाजिक बांधिलकी उपक्रमात निर्मल मिल्क प्रोडक्ट असोशिएशन खवा क्लस्टर  भूम पुढाकार घेत असते.   
निर्मल मिल्क प्रोडक्ट असोशिएशन खवा क्लस्टर  भूमला TATA Institute of Social Sciences (TISS) मार्फत रुरल इनोवेटर अवार्ड प्रदान करण्यात आला आहे. राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत राज्यातील नाविन्यपूर्ण क्लस्टर म्हणून गौरविण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी श्रीमती. दीपा मुधोळ मुंढे (भा.प्र.से.) उस्मानाबाद यांनी विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत 100 KW सोलर सिस्टम बसवून दिल्यामुळे राज्यातील पहिले विजेसाठी स्वयंपूर्ण असणारे सोलर क्लस्टर करण्याचा मान खवा क्लस्टर भूमला मिळाला आहे.
      काही दिवसांपासून जगभरात कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. या रोगाच्या प्रतिबंधासाठी सर्व पातळीवरून खबरदारीच्या आवश्यक त्या उपायोजना सुरू आहेत. प्रत्येक व्यक्ती आपआपल्या परीने शक्य आहे त्या स्वरूपात आपला सहभाग देत आहे. अशा आपत्तीच्या परिस्थितीत ‘सॅनिटायझर, मास्क, स्व स्वच्छता, खान पदार्थ स्वच्छता’ यांचा  जास्तीत जास्त लक्ष देण्यात येत      आहे. सद्यास्थितीत कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था युद्ध पातळीवर कार्यरत आहे. शासनाने घालून दिलेल्या वैयक्तिक स्वच्छता, संचारबंदी व सोशल डिस्टसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करत निर्मल मिल्क प्रोडक्ट असोशिएशन भूम (खवा  क्लस्टर ) समाजाप्रती आपले सामाजिक बांधिलकी या तत्वावर कर्तव्य पार पाडत आहे.          
       लॉकडाऊन परिस्थितीत राज्य व परराज्यातील  मंदिरे परिसरातील पेढा दुकाने, स्वीट दुकाने, लग्न सराई , सण उत्सव बंद असल्याने भूम व तालुका परिसरातील खवा व्यावसायिक, दुग्ध उत्पादक शेतकरी,महिला व पेढा विकणारे साधारणतः ५००० युवकावर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीवर हतबल न होता खवा क्लस्टर भूम व जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजनपूर्वक आणि जबाबदारीने खवा क्लस्टर चे शीतगृह सुविधाचा लाभ खवा उत्पादकासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या भागातील खवा उत्पादकांनी लॉकडाऊन च्या प्रशासकीय नियमांचे उल्लघन न करता व इतरत्र न विकता, आपला उत्पादित खवा क्लस्टर भूम च्या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला आहे. जेणेकरून जेव्हाही सदरील लॉकडाऊन उठल्यावर आपआपला खवा मार्केट मध्ये विकता येईल व खव्याची नासाडी ही होणार नाही. सदरील कोल्ड स्टोरेज मध्ये  खवा साधारणतः 10 ते 12 महिने (-16 डिग्री) तापमानात टिकत असल्यामुळे आतापर्यंत शेतकरी व खवा उत्पादक यांनी 10 लाख लिटर दुधाचा 2.5 कोटी रु किमतीचा 200 टन खवा कोल्डस्टोरेजमध्ये साठवणूक केला आहे. सदरील साठवणूक केलेल्या मालासाठी बँकेमार्फत माल तारण ठेऊन 75 टक्के लोन तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी मा.जिल्हाधिकारी व जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद यांचेमार्फत जिल्हा अग्रणी बँकेकडे पाठपुरावा सुरू आहे.
     खवा क्लस्टर भूम ने  भूम तालुका व परिसरातील सर्व पारंपारिक लाकूड या इंधनावर असणाऱ्या सर्व खवा भट्ट्या या सौरउर्जा प्रणाली इंधनावर करण्याचे धोरण आखले आहे . त्यातून सद्य कोविड१९ या जागतिक महामारीच्या परीस्थितीत ग्राहकांना खवा व पेढा हा पॅकिंग करून एकाच आकर्षक ब्रँड मध्ये उपलब्ध करून कोल्ड रूमच्या वाहनातून ग्राहकापर्यंत देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.  जेणेकरून दूध उत्पादक, खवा उत्पादक शेतकरी, महिला व्यावसायिक यांचे व्यवसाय ही बंद होणार नाही त व ग्राहकांना ही स्वच्छ, उत्तम दर्जाचे, चविष्ट व पौष्टिक पदार्थ योग्य किमतीत उपलब्ध होतील.
      
शब्दांकन:
श्री. रियाज पिरजादे     श्री. विनोद जोगदंड.


Tuesday 28 April 2020

हिंगोली जिल्ह्यात 03 मे पर्यंत पुर्णत: संचारबंदी 03 मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व व्यवहार राहणार बंद


हिंगोली,दि.28: राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली देखील तयार केली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी यांना (कोविड-19) नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आलेले आहेत.
राज्य शासनाने दि. 17 एप्रिल, 2020 अन्वये सुधारीत अधिसुचना निर्गमीत करुन कोरोना (कोविड-19) संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सुचित केले आहे. त्यानुसार खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले होते. यामध्ये एक दिवस आड किराणा माल विक्री दुकाने, भाजीपाला विक्री करणारी दुकाने, दुध विक्री केंद्रे, परवाना असलेले चिकन/मटन शॉप, बेकरी, स्विटमार्ट संबंधीत दुकाने ठरवून दिलेल्या वेळापत्राकानुसार चालू राहतील असे आदेश निर्गमित करण्यात आले होते. तसेच वेळापत्राकानुसार एक दिवसा आड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना खते व बि-बियाणांचा साठा करण्यासाठी तसेच शेतीसाठी उपयोगी साहित्य जसे की, ड्रीप, स्प्रिंकलर, पाईप पुरवठा, कृषि यंत्रे, औजारे, ट्रॅक्टर व त्यांचे सुटे भाग इत्यादी दुकाने व त्यांच्या दुरुस्तीचे दुकाने सुरळीत असणे आवश्यक असल्याने तसेच कृषी विषयक काम व कृषी बागायती कामासाठी लागणारी साहित्य विक्री व उत्पादन करणे, कृषि माल खरेदी विक्री केंद्र ही सर्व दुकाने व जिल्ह्यातील परवानाधारक कृषि सेवा केंद्र सुरु ठेवण्याबाबतचे देखील आदेश निर्गमीत करण्यात आले होते. जिल्ह्यातील ईलेक्ट्रीकल व स्टेशनरी साहित्याचे दुकाने एक दिवसा आड वेळापत्राकानुसार सुरु ठेवण्याचे आदेश निर्गमीत केले होते. तसेच जिल्ह्यातील बोअरवेल मशीन चालू ठेवण्याबाबत परवानगी देण्यात आली होती.
परंतू सद्यस्थितीची आपत्तकालीन परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात कोरोना विषाणुंचा प्रादूर्भावामुळे रुग्णांची संख्या ही वाढतांना दिसुन येत आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील व्यवहार सुरु ठेवण्याबात देण्यात आलेली परवानगी रद्द करुन पुर्णत: प्रतिबंधीत करुन वरील सर्व आदेशातील दुकाने संस्था, व्यवहार,आस्थापना दि. 03 मे, 2020 पर्यंत पुर्णत: बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्यांने बाजारामध्ये, गल्लीमध्ये घराबाहेर फिरतांना आढळुन आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. तसेच संबंधीतावर कारवाई करण्यात येईल, याची जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी 20 हजार कोटी रुपयांची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी


व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद

नांदेड, दि. 28 (जिमाका) :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील विविध  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सचिव यांच्याशी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आज संवाद साधला. यावेळी राज्य शासनाच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यातील महामार्गाच्या कामांबाबत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे श्री. गडकरी यांच्याशी संवाद साधून राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी 20 हजार कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाला देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी  यावेळी केली.
पालकमंत्री अशोक चव्हाण पुढे म्हणाले, राज्यातील महामार्गाच्या कामातील अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करावी. या समितीमार्फत महामार्गाच्या कामांचे प्रश्न सोडविता येतील. अनेक कामे वेळेवर कंत्राटदारांकडून पूर्ण होत नसल्याने या कामांना विलंब होत असल्याचे लक्षात घेऊन त्या कंत्राटदारांची कामे काढून उर्वरित कामांसाठी निविदा प्रक्रियाद्वारे नवीन कंत्राटदारांना कामे सोपवून वेळेत ती पूर्ण करुन घेण्याची कार्यवाही करावी. 
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अंकलेश्वर-चोपडा-बऱ्हाणपूर, गेवराई-शेवगाव-नेवासा-संगमनेर-शहापूर,पोलादपूर-महाबळेश्वर-शिरुर, सागरीमार्ग-खोल-अलिबाग-रत्नागिरी-वेंगूर्ला-रेड्डी-गोवा राज्य सिमा रस्त्यांना राष्ट्री महामार्गाचा दर्जा देवून कामे मंजूर करण्याची मागणी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

उदगीर शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढणार नाही यासाठी उपाययोजना राबवाव्यात -पालकमंत्री अमित देशमुख




* कृषीशी निगडित सर्व उद्योग सुरू  करण्यास परवानगी तात्काळ द्यावी
* लातूर जिल्हा सर्वात अगोदर ट्रॅक वर आला पाहिजे
* काळ्याबाजारात धान्य विक्री करणाऱ्या रेशन दुकानांचे परवाने निलंबित करावेत
* आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव  
   पाठवावा
*  लातूर जिल्ह्यात व शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवली पाहिजे
* पोर्टेबिलिटी द्वारे लाभार्थ्यांना धान्य वाटप झाले पाहिजे
* खाजगी रुग्णालये सुरु न ठेवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा
* प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ई-पास बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी

लातूर, दि.28:- उदगीर शहरात कोरोना  कोविड-19 बाधित तीन रुग्ण आढळून आलेले आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने उदगीर शहरात व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी कोविड-19 आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या  उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

     शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व लॉक डाउन मधील शिथिलता अंतर्गत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी पर्यावरण व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी सुनील यादव, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप कुलकर्णी, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेशकुमार मेघमाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, तहसीलदार स्वप्निल पवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
      पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की,  उदगीर शहरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या घराशेजारील सर्व कुटुंबाची आरोग्य तपासणी झाली पाहिजे. त्याप्रमाणेच कोरोनाचा प्रार्दुभाव उदगीर शहराच्या इतर भागात होणार नाही याकरिता प्रशासनाने अधिक प्रभावीपणे उपायोजना राबवाव्यात. तसेच उदगीर शहरातील कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजना राबविण्यासाठी प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच पोलीस व आरोग्य विभागाने कोरोना पॉझिटिव्ह  केसचा सोर्स शोधून काढावा, असे ही त्यांनी सूचित केले.
    केंद्र व राज्य शासनाने लॉक डाऊन च्या दुसऱ्या टप्प्यात कृषी संबंधित सर्व उद्योग सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. तरी जिल्हा प्रशासनाने उपरोक्त उद्योग सुरू करण्याची परवानगी मागणाऱ्या उद्योजकांना तात्काळ परवानग्या प्रदान कराव्यात.  तसेच उद्योग ठिकाणी ये-जा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना व कामगारांना आवश्यक ट्रॅव्हल पासेस बाबत कृषी सचिवांशी बोलून निर्णय घ्यावा अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केल्या.
    लातूर जिल्ह्यातील 80 टक्के उद्योग हे कृषी क्षेत्राशी निगडित आहेत. त्यामुळे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी यांनी उद्योजकांनी सेल्फ डिक्लेरेशन दिल्यानंतर तात्काळ उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात याव्यात. लातूर मध्ये असलेले सर्व उद्योग सुरू होण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी व लातूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुरू होऊन आपला लातूर जिल्हा लवकरच ट्रॅकवर यावा यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
     लातूर जिल्ह्यातील नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे एप्रिल 2020 मधील अन्नधान्य वाटपाची माहिती घेऊन पालकमंत्री देशमुख यांनी प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचल्याची प्रशासनाने खात्री करावी अशा सूचना देऊन जे रेशन दुकानदार काळ्याबाजारात अन्नधान्याची विक्री करत आहेत त्या दुकानदारांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत असे निर्देश ही त्यांनी दिले. त्याप्रमाणेच शासनाने जूनअखेरपर्यंत लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप करण्याचे दिलेल्या सूचना प्रमाणे पुरवठा विभागाने कार्यवाही करावी असेही त्यांनी सूचित केले.
  जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणाली(SOP) प्रमाणेच  व्यवहार झाले पाहिजेत याबाबतची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा उपनिबंधक यांची राहील असे सांगून पालकमंत्री देशमुख यांनी सध्याच्या आपत्तीकालीन परिस्थितीच्या अनुषंगाने अहमदपूर जळकोट या भागात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवावा असेही त्यांनी सूचित केले.
     लातूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नोंद झाली पाहिजे व परजिल्ह्यातील आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविले पाहिजे. त्याप्रमाणेच लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व रस्त्यावर जे चेक पोस्ट तयार करून त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक वाहनाची व व्यक्तीची नोंद ठेवण्यात यावी. याकरीता आवश्यक मनुष्यबळ महापालिकेने उपलब्ध करावे असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
   जिल्ह्यातील 11 हजार 477 रेशन कार्ड धारकांना पोर्टेबिलिटी द्वारे अन्नधान्य वाटप करण्यात आल्याचे दिसून येत आहे तरी सदरचे धान्य संबंधित लाभार्थ्याला मिळाले की नाही याबाबतची खात्री करून घ्यावी तसेच नवीन रेशन कार्ड मिळण्यास पात्र असलेल्या लाभार्थ्यांनाही अन्नधान्य वाटप करावे अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या. व एक ही नागरिक अन्नधान्य पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.
   जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्सना पीपीई किट, मास्क हे त्यांच्या मागणीप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपलब्ध करून द्यावेत. तसेच जी रुग्णालये आरोग्य सेवा चालू ठेवणार नाहीत त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्यावर कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महामार्गावरील अवैध वाहतुकीबाबत योग्य ती कारवाई करावी. तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पासेस देण्याबाबत जनजागृती करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रूग्णालयात कोरोना विषाणूची लागण होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
       जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना फोर्सचे काम अतिशय चांगले असल्याचे सांगून राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण त्या त्या नागरिकांच्या गावाच्या बाहेरच करावे. तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमेवरील  चेक पोस्टवर पोलीस विभागाने अत्यंत दक्ष राहून काम करावे असेही त्यांनी सूचित केले. त्याप्रमाणेच उदगीर तालुक्यातील काही गावांमध्ये आंध्र, कर्नाटक  व तेलंगणा या राज्यातील किमान शंभर ते दोनशे ट्रक रोज ये-जा करत आहेत त्याठिकाणी कोणता उद्योग आहे का व त्या वाहनांना कोणी पासेस दिले याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने माहिती घेऊन अहवाल द्यावा असे निर्देशही श्री बनसोडे यांनी दिले. तसेच उदगीर शहर कंटेनमेंट झोनमध्ये प्रत्येक कुटुंबाची व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करावी असेही त्यांनी सूचित केले.
  उदगीर शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तीन दिवस कर्फ्यु चे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. तसेच तीन किलोमीटरच्या परिघाचे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला असून त्या भागातील अडीच हजार कुटुंबांचे आरोग्य तपासणी करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली तसेच शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील उद्योगांना परवानगी देण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. त्याप्रमाणेच पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनी पोलीस विभागामार्फत बजावण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली तसेच संबंधित विभाग प्रमुख आणि त्यांच्या विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती बैठकीत सादर केली.

Monday 27 April 2020

कोविड-१९ रुग्णांचे सरकारी तसेच महापालिका रुग्णालयातील उपचार मोफत!:- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख



*पीपीई कीट, मास्क राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध.
*महाराष्ट्रातील कोरोना टेस्ट लॅबची संख्या ६० करण्याचा प्रयत्न.

मुंबई, दि. २७ एप्रिल २०२० राज्यातील सरकारी रुग्णालये तसेच महानगरपालिकांच्या रुग्णालयात कोविड-१९ च्या रुग्णांवर होत असलेल्या  चाचण्या, उपचार, जेवण या सर्व सुविधा मोफत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
झूम ऍपच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते, ते पुढे म्हणाले की, कोविड-१९ च्या संकटाची चाहूल लागताच राज्य सरकारने तातडीने पावले उचलली असून वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत असलेली सर्व महाविद्यालये रुग्णालये यांचे महाराष्ट्रभर जे जाळे आहे त्यामाध्यमातून  तत्परतेने काम सुरु केले. राज्यात फक्त चार टेस्ट लॅब होत्या त्यांची संख्या वाढवून आज सरकारी तसेच खाजगी अशा ४० लॅब कार्यान्वित आहेत आणि त्यात वाढ करुन ६० पर्यंत केल्या जातील. या ४० लॅबमधून दररोज हजार चाचण्या केल्या जास्त आहेत यातूनच आजपर्यंत महाराष्ट्राने सर्वात जास्त एक लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत. चाचण्याची संख्या वाढत आहे परंतु  आणखी जास्त प्रमाणात टेस्ट कीटची गरज आहे ती केंद्र सरकारने दिली पाहिजेत. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती, यवतमाळ, सोलापूरसह अनेक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालये आवश्यक त्या सर्व यंत्रसामुग्रीसह सक्षम करुन कोविड-१९ चा लढा देण्यासाठी सज्ज केलेली होती.
कोविड-१९ चा लढा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पीपीई कीट मास्कची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून आवश्यक असणारी अधिक मास्क कीटची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. राज्य सरकार पारदर्शकपणे काम करत असून रुग्ण संख्या दडवत असल्याच्या विरोधकांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. कोविड-१९ वर अजूनतरी कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही, लोकांनी सावध सतर्क रहावे, कसलेही सामाजिक दडपण घेता कोरोनाची लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे संपर्क साधावा असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे खाजगी हॉस्पिटल्स बंद असून डायलीसीससारख्या रुग्णांची परवड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी मुंबई, पुणे शहरातून जास्त प्रमाणात येत आहेत इतर भागातून नाहीत परंतु मुख्यमंत्र्यासह आम्ही सर्वांनी खाजगी हॉस्पिटल्सना मानवतेच्यादृष्टीने सेवा चालू ठेवण्याचे आवाहन केलेले आहे अशा स्थितीतही खाजगी हॉस्पिटल्स सुरु नाही केली तर सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महसूलमंत्री हे २४ तास कार्यरत असून सर्व मंत्रालयामध्ये समन्वय साधून युद्धपातळीवर कोविड-१९ च्या विरोधात लढा देत आहेत. पालकमंत्रीही या सर्व स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोविडच्या विरोधात लढणाऱ्या वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, पोलीस, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांसह या लढाईत योगदान देणाऱ्या योध्यांचे देशमुख यांनी आभारही मानले..