Followers

Thursday 30 April 2020

यशोगाथा: लॉकडाऊनच्या काळात प्रशासनामार्फत सिध्देश्वर मंदिरात 65 बेघरांना निवारा !

यशोगाथा:



कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  दि.23 मार्च ते 14 एप्रिल 2020 या कालावधीत 21 दिवसांचा लॉकडाऊन संपूर्ण देशभरात जाहिर केला. आणि जे ज्याठिकाणी आहेत ते त्या ठिकाणी स्तब्ध्  झाले.  त्याच अनुषंगाने लातूर जिल्हा प्रशासनाने साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या अनुषंगाने जिल्हयात संचारबदीचे आदेश लागू केले.
लातूर जिल्हयातून कोणीही व्यक्ती बाहेर जाणार नाही  व बाहेरील व्यक्ती जिल्हयात येणार नाही. त्याप्रमाणेच कोरोना कोवीड-19 च्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार सामाजीक अंतर पाळणे, नाका-तोंडावर रुमाल बांधणे, जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना वगळता इतर सर्व आस्थापना बंदचे आदेश दिले. तर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे नेहमी गजबजलेले रस्ते, चौक निर्मनुष्य  होऊ लागले. बहुतांश लोक विनाकारण घराबाहेर पडत नव्हते. व जे येत होते त्यांना पोलीस त्यांच्या पध्दतीने समजावून घरी पाठवत होते. या लॉकडाऊनचा  लहानापासून मोठया पर्यंत सर्वांवरच परिणाम होत होता.
          लातूर शहरातील बेघर व्यक्ती, तसेच इतर जिल्हयातून  मोल- मजुरीसाठी आलेले कामगार, शहरात आडकून पडले. त्यांच्या जेवणाची व निवासाची व्यवस्था होत नव्हती. त्यावेळी लातूर तालुका  प्रशासन, महानगरपालिका व सिध्देश्वर रत्नेश्वर मंदिर संस्थानच्या संयुक्त विद्यमाने बेघर, स्थालांतरित कामगार अशा 65 लोकांच्या निवाऱ्याची व जेवणाची व्यवस्था तात्काळ करण्यात आली. या 65 लोकांना सिध्दश्वर रत्नेश्वर मंदिर परिसरातील यात्री निवासस्थानच्या सभागृहात निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली. या सर्व लोकांना कोरोना विषाणू विषयी सविस्तर माहिती देऊन येथेच सामाजीक अंतर ठेवून लॉकडाऊनचा पहिला टप्पा व आता दुसरा टप्पा संपेपर्यंत राहणे कसे गरजेचे व त्यांच्या जीवनासाठी किती महत्वाचं आहे, हे समजावून सांगण्यात प्रशासनाला यश आलं. 
           या 65 लोकांमध्ये लातूर शहरातील बेघर, अपंग व्यक्ती तसेच अमरावती येथील मजूर, गंगाखेड येथील वाटसरु व इतर स्थलांतरीत मजूर होते.यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यत व महिला आदिंचा समावेश होता. जिल्हा प्रशासन व मंदिर संस्थान यांनी पहिल्या दिवसापासून येथील लोकांची जेवण, निवास आदि व्यवस्था चोखपणे केली. तसेच या लोकांना सकाळी 7 वाजता चहा, साडे अकरा ते 12 वाजता दरम्यान दुपारचं जेवण व रात्री 8 वाजता जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याप्रमाणेच स्वच्छ बाथरुम, टॉयलेट, कपडयाचे साबण, आंघोळीचे साबण, हँड वॉश व सॅनिटायझरची उपलब्धतता करुन आरोग्य विभागामार्फत प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
       एकंदरित पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्रशासन प्रमुख म्हणून लॉकडाऊनच्या काळात सर्व बेघर, स्थालांतरित मजूर व परराज्यातील मजुरांसाठी अन्न, निवारा, पाणी आदिंची चोख व्यवस्था उपलब्ध करून देत आहेत. स्वत: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी येथील निवारा केंद्राला भेट देऊन लोकांशी संवाद साधला. व प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.
  
प्रतिक्रिया:-
कु.संजना हरिश्चंद्र चव्हाण:-
लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळी मी व आमच्या कुटुंबातील इतर 10 सदस्य लातूर रेल्वेस्टेशन वर होतो. येथून आम्हाला आमच्या मुळ गावी अमरावती येथे जायचं होते. आमचं कुटुंब शहरात विविध ठिकाणी फिरुन खेळणी विकण्याचा व्यवसाय करुन उदारनिर्वाह करते. लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा व इतर सर्व बंद झाले. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला येथील निवाराकेंद्रात आणले व आमची  येथे चांगली व्यवस्था केली जात आहे.त्यामुळे येथील प्रशासनाचे आभार मानते, असे कु. संजना चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
श्री.अशोक शिवाजीराव पाटील, तांडा वस्ती ता.गंगाखेड
श्री.अशोक पाटील हे पंढरपूरला गेले होते.येथून पायी लातूरमार्गे गंगाखेडला जात होते. परंतु महापालिकेच्या पथकाने श्री. पाटील यांना लॉकडाऊन व कोरोना संसर्गाची माहिती दिली व या निवारागृहात आणले. निवारागृहात प्रशासनाकडून सर्व सुविधा मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन लवकरच कोरोनाचा संसर्ग थांबावा व वाहने सुरु व्हावीत. म्हणजे मला माझ्या गंगाखेड तालुक्यातील तांडा वस्तीवर जाता येईल, असे त्यांनी सांगितले.


                                              

No comments:

Post a Comment