Followers

Friday 17 April 2020

मानक कार्यप्रणाली(SOP) सुरू करणाऱ्या बाजार समित्यांचे व्यवहार 21 एप्रिल पासून सुरु करण्याची परवानगी द्यावी -पालकमंत्री अमित देशमुख





* नागरिकांनी सामाजिक अंतर हा जीवनशैलीचा भाग म्हणून स्वीकारावा
* बाजार समितीने सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करावी
*सर्व बाजार समित्यांनी मानक कार्यप्रणाली ( SOP) सुरु करावी
* जिल्ह्याच्या 10 तालुक्यात 11 कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत

लातूर, दि.17:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वतःची मानक कार्यप्रणाली(SOP) तयार करावी. त्या प्रणालीची तपासणी जिल्हा उपनिबंधक यांनी करून योग्य मानक कार्यप्रणाली असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा व त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दिनांक 21 एप्रिल 2020 पासून आशा कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले.
        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित शेतकरी मालाची खरेदी विक्री समस्यांचे निराकरण बाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा उपनिबंधक सामुर्त जाधव, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील निलंगेकर, जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मन्मथ किडे यांच्यासह इतर सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव उपस्थित होते.
         पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की, जिल्ह्यात एकही स्थानिक कोरोना पॉझिटिव रुग्ण नाही. जे पॉझिटिव रुग्ण आहेत ते बाहेरील यात्रेकरू आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यात कोरोनाव्हायरस चा शिरकाव होऊ नये यासाठी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे. लातूर जिल्हा कोरोना च्या अनुषंगाने शुन्य आहे व तो शून्यच राहिला पाहिजे यासाठी  सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी. प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने कोरोना च्या अनुषंगाने त्यांची मानक कार्यप्रणाली तयार करून घ्यावी. ही कार्यप्रणाली तयार झाल्याशिवाय व त्या प्रणालीची तपासणी झाल्याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समित्याचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी देता येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले.
        कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पणन महामंडळाने कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू करण्याबाबत ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे ही पालन सर्व संबंधित  बाजार समित्या व संबंधित अधिकाऱ्यांनी करावे. जिल्ह्याच्या राज्य व जिल्हा सीमा कडेकोटपणे बंद करून घ्याव्यात. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहनांचे पास डिजिटल पद्धतीने देण्याची व्यवस्था करावी. तसेच समिती या दिवसाला किती वाहने हाताळू शकतात त्या पद्धतीने  त्यानी योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना संदेश देऊन त्यांची ऑनलाइन नोंदणी करावी व त्यांच्या याद्या करून तारखा निहाय त्यांना माल घेऊन येण्यास सुचित करावे व माल आल्यानंतर त्यांचे वेळेत मोजमाप होऊन पेमेंट करण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
          कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाल्यानंतर इतर जिल्ह्यातून व परराज्यातून  कृषिमालाच्या वाहनाला पास मिळाला तर ते वाहन त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येण्यास परवानगी असेल. परंतु कोरोना च्या अनुषंगाने त्या वाहनाचे व वाहनांमधील व्यक्तींचे सॅनिटायजरिंग करण्याची जबाबदारी त्या-त्या बाजार समित्यांची असेल याची नोंद घ्यावी अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली.
          बाजार समितीमध्ये सामाजिक आंतर (सोशल डिस्टेन्ससिंग) पाळणे अनिवार्य आहे किंबहुना कोरोना पासून बचावाचा तो एक पर्याय असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगून सामाजिक अंतर हे लॉक डाऊन कालावधी पुरते न पाळता तो आपल्या जीवनशैलीचा भाग म्हणून स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
        बाजार समिती सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणच्या सुरक्षेबाबतची सर्व व्यवस्था त्यांनीच अधिक सक्षमपणे पार पाडणे आवश्यक आहे. याबाबतचा अतिरिक्त ताण पोलिस यंत्रणेवर येणार नाही याचीही योग्य ती काळजी बाजार समितीने घ्यावी असे श्री. देशमुख यांनी सांगितले व भाजीपाला मार्केटमध्येही सामाजिक अंतर पाळले गेले पाहिजे तसेच मार्केटमध्ये  फळे व भाजीपाला  धुऊन  आणावा असे निर्देश त्यांनी दिले.
        जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी करण्याबाबत बाजार समितीने प्राधान्य दिले पाहिजे. कोरोनाच्या अनुषंगाने सर्व सुविधा निर्माण केल्या गेल्या पाहिजेत. समित्यांमध्ये सामाजिक अंतर पाळले जाते की नाही हे पाहण्यासाठी ड्रोन कॅमेरा ची मदत घ्यावी असे सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिल्या. तर  सुरक्षेच्यादृष्टीने अडते, व्यापारी व हमाल यांना पास देण्याबाबत संबंधित बाजार समित्यांनी एकाच व्यक्तीची नियुक्ती करावी व एकाच आकाराचे ओळखपत्र त्यांना द्यावे व वाहनांची संख्या मर्यादित कशा पद्धतीने राहील त्याचे योग्य नियोजन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनी केले. यावेळी ललित भाई शहा, अशोक पाटील निलंगेकर व मनमथ किडे या  सभापतींनी आपल्या सूचना मांडून बाजार समित्या सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.
        प्रारंभी जिल्हा उपनिबंधक सामृत जाधव यांनी जिल्ह्याच्या दहा तालुक्यात 11 कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत असून या समित्या अंतर्गत 3504 नोंदणीकृत आडते, 2395 व्यापारी व 2826 दलाल असल्याची माहिती दिली. तसेच पणन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व पणन संचालनालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे त्यांनी आवाहन केले. बाजार समित्यांमध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, तूर ,हरभरा, सोयाबीन व गुळ या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात होत असते असे श्री. जाधव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment