Followers

Thursday 3 November 2022

लातूर जिल्हा शिक्षणाची पंढरी; आता क्रीडा नैपुण्य असलेले खेळाडू निर्माण व्हावेत - पालकमंत्री गिरीश महाजन

 






·        जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामांचा आढावा

·        अतिरिक्त 50 रोहित्र खरेदीसाठी निधी देण्याचा निर्णय

·        प्रत्येक गावात स्मशानभूमी, दफनभूमीसाठी धोरण ठरवणार

·        तालुका क्रीडा संकुलांच्या निधीत पाचपट वाढ

·        माता व बाल रुग्णालय इमारतीचे काम तातडीने सुरु करा

लातूर, दि. 3 (जिमाका) : कृषी, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि इतर क्षेत्राशी संबंधित विकासकामांना गती देवून जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. लातूर जिल्हा शिक्षणाची पंढरी आहे, आता क्रीडा नैपुण्य असलेले खेळाडू जिल्ह्यात निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षण, आरोग्यासह विविध योजनांची जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर कामे विहित कालावधीत व दर्जेदार होण्यासाठी सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत श्री. महाजन बोलत होते. खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कौशल्याच्या विकासासाठी तालुका आणि जिल्हा क्रीडा संकुलात चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी तालुका क्रीडा संकुलाच्या निधीत पाचपट वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील क्रीडा संकुलांमध्ये सुविधा निर्मितीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. या कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून उभारण्यात येणाऱ्या खुल्या व्यायामशाळेत (ओपन जिम) दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

स्मशानभूमी, दफनभूमीसाठी धोरण ठरवणार

प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी आणि दफनभूमी असणे आवश्यक असून स्मशानभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमी शेड उभारणीसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध नसलेल्या गावांमध्ये खासगी जमीन खरेदीसाठी राज्यस्तरावर धोरण निश्चित करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतागृहांसाठी निधी

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. यासाठी एकरकमी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. महाजन यांनी दिले. तसेच शाळांच्या संरक्षण भिंती, वर्ग खोल्यांची दुरुस्ती, निजामकालीन शाळांचा विकास योजनेचा त्यांनी आढावा घेतला. चाकूर येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या इमारतीची शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी करून अहवाल सादर करावा. उदगीर तालुक्यातील जळकोट येथील सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह तातडीने सुरु करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

50 अतिरिक्त वीज रोहित्र खरेदी करणार

वीज हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून कृषीपंपांना नियमित वीज पुरवठा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. नादुरुस्त वीज रोहित्र त्वरित बदलण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अतिरिक्त 50 वीज रोहीत्रांची खरेदी करण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी. आवश्यकता असल्यास आणखी वीज रोहीत्रांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. महाजन यावेळी म्हणाले.

पालकमंत्र्यांनी रोहित्र इंधनासाठी बैठकीतूनच केला फोन !

वीज रोहित्र दुरुस्तीसाठी आवश्यक इंधनाचा जिल्ह्यात 35 के.एल. रोहित्र इंधनाची आवश्यकता असल्याची बाब लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून देताच पालकमंत्र्यांनी त्वरित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून इंधन उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. येत्या तीन-चार दिवसात हे इंधन जिल्ह्याला उपलब्ध करून देण्याची त्यांनी मान्य केले.

लातूर येथे माता व बाल रुग्णालय उभारण्यासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून या रुग्णालयाची इमारत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात उभारण्याची कार्यवाही त्वरित सुरु करावी. तसेच ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रांच्या अपूर्ण इमारती त्वरित पूर्ण कराव्यात. चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या योजनेचा नियोजनपूर्वक वापर करावा, असे पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासोबतच प्रमुख महामार्गांच्या कामांसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे ते यावेळी म्हणाले.

खासदार श्री. शृंगारे यांनी जिल्ह्यातील रस्ते, वीज आणि आरोग्य समस्या मांडून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच खासदार श्री. निंबाळकर यांनी नादुरुस्त रोहित्र, महामार्गाची दुरवस्था, रिक्त पदे आदी समस्या मांडल्या.

आमदार अमित देशमुख यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विस्तारित व्यवस्था उभारणीच्या कामाला गती देण्याची मागणी केली. 

आमदार श्री. पाटील-निलंगेकर यांनी अतिवृष्टी, शंखी गोगलगाय आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच लातूर येथे होत असलेल्या रेल्वे कोच कारखान्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करण्याची मागणी केली.

आमदार श्री. बनसोडे यांनी उदगीर नगरपालिकेला नागरोत्थान आणि दलित वस्ती सुधार योजनेतून अधिक निधी देण्याची मागणी केली. तसेच जळकोट येथील सामाजिक न्याय भवन वसतिगृह इमारतीचा प्रश्न उपस्थित केला.

आमदार श्री. काळे यांनी सर्व गावांमध्ये स्मशानभूमी शेड आणि दफनभूमी उभारणीचा प्रश्न उपस्थित केला. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी केली.

आमदार श्री. कराड यांनी आरोग्य व पायाभूत सुविधांविषयी समस्या मांडल्या. तसेच याबाबतचे लिखित प्रस्ताव पालकमंत्र्यांना सादर केले.

आमदार श्री. पाटील यांनी वीज बिल आकारणीविषयीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच वसंतराव नाईक तांडा विकास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

आमदार धीरज देशमुख यांनी रेणापूर तालुक्यातील क्रीडा संकुलाचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली. त्याचबरोबर रेणापूर तालुक्यातील पीक नुकसानीची माहिती दिली.

आमदार श्री. पवार यांनी विकास कामांना गती देण्यासाठी आणि प्रभावी अंमलबजावणीतून सुविधा निर्मितीसाठी विविध 264 योजनांचे अभिसरण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच रमाई आवास योजनेच्या प्रस्तावांवर लवकरात लकवर कार्यवाही करण्याची मागणी केली. शाळांच्या इमारती, स्मशानभूमी शेड व दफनभूमीविषयक समस्या त्यांनी यावेळी मांडल्या.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती दिली. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून सन 2022-23 करिता 302 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर असून आतापर्यंत 93 कोटी 74 लक्ष रुपये निधी बीडीएस प्रणालीवर प्राप्त झाला आहे. त्यापैकी                 16 कोटी 19 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. मागील दायित्व व 2022-23 मधील असा एकूण 19 कोटी 4 लक्ष रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 साठी 21 कोटी 90 लक्ष रुपये राखीव ठेवण्यात आला आहे.  अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 124 कोटी रुपयांची तरतूद असून बीडीएस प्रणालीवर 36 कोटी 95 लक्ष निधी प्राप्त झाला आहे. त्यापकी 3 कोटी 71 लक्ष रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजना (ओटीएसपी) अंतर्गत 3 कोटी 17 लक्ष रुपये तरतूद असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.

*****

रोजगार मेळाव्याला प्रतिसाद देणारे महाराष्ट्र पहिले राज्य - उपमुख्यमंत्री