Followers

Tuesday 26 November 2019

विभागीय माहिती कार्यालयात “संविधान दिन” साजरा





लातूर,दि.26:- येथील विभागीय माहिती  कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने  उपसंचालक (माहिती) यांच्या दालनात भारतीय संविधान दिन” निमित्त  उपसंचालक (माहिती) यशवंत भंडारे यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे सामूहीक वाचन केले. यावेळी लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, उस्मानाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व हिंगोलीचे जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रथम श्री. यशवंत भंडारे यांनी भारतीय संविधानाचे महत्व विशद केले. यावेळी विभागीय माहिती कार्यालयातील सर्वश्री माहिती सहाय्यक मखदूम काझी, लेखापाल अशोक माळगे, वरिष्ठ लिपीक चंद्रकांत कारभारी,श्रीमती मनिषा कुरुलकर, श्रीमती विशाखा शेंडगे, लेखालिपीक चंद्रकांत गोधणे, अहमद बेग,तांत्रिक सहाय्यक भीमा पडवळ, सिनेयंत्र चालक अश्रुबा सोनवणे, वाहन चालक प्रविण बिदरकर, युसूफ मौलाना, संदेश वाहक बालाजी केंद्रे, कमीम शेख, अशोक बोर्डे,श्रीमती गंगा देशमुख आदी उपस्थित होते.

Thursday 14 November 2019

जिल्हयाती सर्व शाळा महाविद्यालयांनी केले लोकराज्यचे सामूहिक वाचन





*जवळपास 1हजार885शाळा-महाविद्यालये,10हजार शिक्षक,3लाख विद्यार्थ्यांचा सहभाग तर दोन शाळा झाल्या “लोकराज्यशाळा”*
   उस्मानाबाद,दि.14(जिमाका):-  "एकाच दिवशी एकाच वेळी" ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये दिनांक 14 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10:30 ते 11:00 या वेळेत शासनाचे मुखपत्र लोकराज्य मासिकातील पंडित नेहरू यांच्यावरील लेखाचे सामूहिक वाचन हा उपक्रम उपक्रम राबविण्याचे निश्चिात करण्यात आले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये लोकराज्यचे सामूहिक वाचन संपन्न झाले. जवळपास 1 हजार 885 शाळा-महाविद्यालयातील जवळपास 10 हजार शिक्षक आणि 3 लाख  विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकांचे सामूहिक वाचन केले. गुगल फॉर्मच्या माध्यमातून संकलित होणारी अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर करण्यात येईल.
मागील वर्षीही दि.1 सप्टेंबर 2018 रोजी हा उपक्रम राबविण्यात आला होता.त्यावेळी एकूण 1 लाख 26 हजार 229 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मिळून लोकराज्य मासिकाचे एकाच दिवशी एकाच वेळी सामूहिक वाचन केले होते.
    या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम आज दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते अकरा या वेळेत भोसले हायस्कूल उस्मानाबाद येथे संपन्न झाला.    यावेळी या कार्यक्रमासाठी औरंगाबाद विभागाचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक गणेश रामदासी, लातूर विभागाचे माहिती व जनसंपर्क चे उपसंचालक यशवंत भंडारे, शिक्षणाधिकारी सविता भोसले, उपशिक्षणाधिकारी सौ. रोहिणी कुंभार, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक दिनकर होळकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील, उपप्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक श्री. सिद्धेश्वर कोळी, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दत्ता त्रय थेटे, विस्ताराधिकारी श्री. संतोष माळी, विस्ताराधिकारी बालाजी यरमुनवाड , विशेष सहाय्यक तानाजी खंडागळे,  अण्णा ई टेक्नो चे प्राचार्य आर .बी .जाधव, पर्यवेक्षक हाजगुडे एन .एन., इंगळे वाय .के., श्रीमती गुंड, के . पी .पाटील आणि तीन हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
****

Wednesday 13 November 2019

दिब्रिटो यांची निवड संमेलन यशस्वीतेची पहिली पायरी : ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे यांचे प्रतिपादन





उस्मानाबाद, दि. 13 -
जानेवारी 2020 मध्ये उस्मानाबाद येथे होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची झालेली निवड अत्यंत आनंददायी आहे. व्यक्तीगत पातळीवर दिब्रिटो हे आपले स्नेही आहेत. त्यांच्यासारखा विद्वान लेखक संमेलनाध्यक्ष म्हणून लाभणे हे मराठी साहित्य विश्वाचे भाग्य आहे. दिब्रिटो यांची निवड म्हणजे साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेची पहिली पायरी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी केले.

उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयास प्राचार्य बोराडे यांनी बुधवारी (दि.13) सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी स्वागत मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वागताध्यक्ष नीतीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे, कार्यकारिणी सदस्य डॉ. सुलभा देशमुख, कमलताई नलावडे, श्रीकांत साखरे, राजेंद्र अत्रे यांच्यासह स्वागत मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

उस्मानाबादकरांना संमेलनाचे यजमानपद मिळाले, ही मराठवाड्यासाठी समाधानाची बाब आहे. उस्मानाबाद जिल्ह्याशी आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आपले जन्मगावच उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि सासुरवाडी देखील उस्मानाबाद आहे. त्यामुळे आपण साहित्य संमेलनाच्या आयोजनातील एक जबाबदार घटक असल्याचेही बोराडे यांनी नमूद केले. संमेलन घोषीत झाल्यापासून उस्मानाबादकरांनी सुरू केलेले सकारात्मक प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. त्यामुळे यंदाचे संमेलन मराठी साहित्य विश्वासमोर पथदायी पायंडा निर्माण करील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे मराठी साहित्यातील महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांची निवड ही अखिल मराठी सहित्य विश्वासाठी अभिमानास्पद बाब आहे. लेखक धर्म, जात, पंथ याच्यापलीकडे जाऊन आपले चिंतन समाजाच्या हितासाठी मांडत असतो. दिब्रिटो हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांचे चिंतनशील विचार मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आवश्यक असलेली धोरणे निर्माण करण्यासाठी पूरक आहेत. या संमेलनातून असे सकारात्मक प्रयत्न नक्की देशपातळीवर पोहचतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र अत्रे यांनी केले. तर आभारप्रदर्शन रवींद्र केसकर यांनी केले.

*संमेलनाध्यक्ष तीन दिवसांचे नव्हे, वर्षभराचे पद*

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद केवळ तीन दिवसांपुरते नाही. वर्षभर संमेलनाध्यक्षांनी आपल्या संशोधनातून, चिंतनातून देशातील मराठी साहित्य रसिकांना समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. वयोमानानुसार ही दगदग आता आपल्याला जमणार नाही, म्हणून संमेलनाध्यक्ष पदासाठी आपण विनम्रपणे नकार दिला. त्यातून एक सकारात्मक पायंडा निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे. निवडणूक प्रक्रियेतून संमेलनाध्यक्षांची निवड होऊ नये अशी भूमिका यापूर्वी आपण घेतली होती. महामंडळाने त्यात बदल करुन सन्मानाने संमेलनाध्यक्षांची निवड सुरु केली आहे. त्यामुळेच फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यासारख्या सम्यक लेखकाला उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान लाभला असल्याचे मत प्राचार्य रा.रं. बोराडे यांनी व्यक्त केले.

Thursday 7 November 2019

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन





सर्वांच्या सक्रिय सहभागातून साहित्य संमेलन यशस्वी करु : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे

उस्मानाबाद, दि. 07 - उस्मानाबाद हा ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. येथे होत असलेले 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वांच्या सक्रिय सहभागातून यशस्वी करु या, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.
उस्मानाबाद येथे 10, 11, 12 जानेवारी 2020 रोजी होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे म्हणाल्या, उस्मानाबाद येथे होणारे संमेलन हे सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहण्याची संधी साहित्यिक, साहित्यप्रेमींना लाभणार आहे. त्यासाठी आवश्यक ते नियोजन संयोजक समितीने करावे. आवश्यक तेथे प्रशासनाचे सक्रिय योगदान राहील, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन म्हणाले, साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हातून  ऐतिहासिक संदेश दिला असून ते संस्मरणीय ठरणार आहे. संमेलनाच्या माध्यमातून उस्मानाबादचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा सर्वांसमोर येईल, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी मनोगतात संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी साहित्य संमेलन आयोजनाबाबत माहिती दिली. प्रास्ताविक संमेलनाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र केसकर यांनी केले. सुत्रसंचालन दौलत निपाणीकर तर आभारप्रदर्शन प्राचार्य डॉ. अनार साळुंखे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, संमेलनाचे कोषाध्यक्ष माधव इंगळे, संमेलन कार्यकारिणी सदस्य कमलताई नलावडे, डॉ. अभय शहापूरकर, प्राचार्य डॉ. सुलभा देशमुख, राजेंद्र अत्रे, आशिष मोदाणी, बालाजी तांबे, मीना महामुनी, इलियास पीरजादे, युवराज नळे, शेषनाथ वाघ यांच्यासह शहर व परिसरातील साहित्यिक, साहित्यप्रेमी नागरिक, महिला, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोधचिन्ह निर्मितीबद्दल विजयकुमार यादव यांचा सन्मान

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे संतश्रेष्ठ गोरा कुंभार यांच्या पावन भूमीत होत आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या बोधचिन्हामध्ये संत  गोरा कुंभार यांची हाती चिपळ्या घेऊन भक्तीरसात तल्लीन झालेली प्रतिमा साकारण्यात आलेली आहे. तसेच संत गोरा कुंभार रचित त्यांच्या साहित्यप्रतिभेची आठवण करुन देणार्‍या ’म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे जग हे करणे शहाणे बापा‘ ह्या ओळी लक्ष वेधून घेतात. उस्मानाबाद येथील विजयकुमार यादव यांनी निर्मित केलेल्या बोधचिन्हाची निवड आयोजक समितीने केलेली आहे. साहित्य संमेलनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल यादव यांचा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्यात पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

Tuesday 5 November 2019

म्हाडाच्या घरकुल सोडतीत 195 लाभार्थी ठरले भाग्यवान


लातूर, दि.5:- औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) औरंगाबादच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लातूर जिल्हयातील अत्यल्प उत्पन्न गटातील 736 सदनिकेसाठी म्हाडाचे सभापती संजय केनेकर यांच्या उपस्थितीमध्ये सोडत झाली.या योजनेत पात्र ठरलेल्या सर्व 195 लाभार्थ्यांना म्हाडाची घरे मिळणार असल्याने हे सर्व भाग्यवान ठरलं आहेत.
यावेळी महापौर सुरेश पवार ,मुख्याधिकारी  आण्णासाहेब शिंदे, महापालिका गटनेता शैलेश गोजमगुंडे, कार्यकारी अभियंता बांधकाम जी.एस. देवणीकर, समाजकल्याण अधिक्षक शाहुराज कांबळे, पत्रकार हरी तुगावकर, अर्जदार पुरुष प्रतिनिधी सुभाष हरबडे, अर्जदार स्त्री प्रतिनिधी श्रीमती ज्योती आचार्य, उपमुख्याधिकारी म्हाडा औरंगाबाद जयकुमार नामेवार, उपअभियंता म्हाडा लातूर मिलिंद अटकळे,मिळकत व्यवस्थापक म्हाडा औरंगाबाद एस.एल.गायकवाड उपस्थित होते.
यावेळी सभापती श्री.केनेकर म्हणाले की, ज्या प्रमाणे एलआयसीच्या लोकांच्या आयुष्याला आधार मिळत आहे. त्याप्रमाणे अत्यल्प व मध्यम उत्पन्न गटांतील लोकांना स्वत:च्या घरांसाठी म्हाडाचा आधार मिळत आहे. सर्व महापालिका ,नगर पालिका व म्हाडा यांनी संयुक्तपणे घरकुलांसाठी  काम केल्यास नागरी भागात एक ही बेघर व्यक्ती  दिसणार नाही, असे त्यांनी सांगितले.
म्हाडामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन अधिकृत घरे निर्माण केली जात आहेत. हे काम अधिक चांगल्या पध्दतीने करण्याचा प्रयत्न असून यातून पुढील काळात नागरी भागात अनाधिकृत वसत्या  वाढणार नाहीत. तरी अत्यल्प व मध्यम उत्पन्न गटांतील जास्तीत जास्त लोकांनी म्हाडाच्या घरकुल योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन श्री. केनेकर यांनी केले. तसेच लातूर जिल्हयात 23 हजार 800 बेघर असून लातूर शहरात सुमारे  6 हजार बेघर असल्याची माहिती त्यांनी दिली.
लातूर शहरातील अतिरिक्त एम.आय.डी.सी. भागात म्हाडाच्या 736 सदनिका तयार होत आहेत. याकरिता पात्र असलेल्या 195 लोकांना म्हाडाच्या घराची लॉटरी लागलेली आहे. या सोडत कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी आण्णासाहेब शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रावळे व बिराजदार यांनी केले .तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म्हाडाचे विनय ठोंबरे, शिवकांत बाळाळसूरे, एस.पी. ढोले, एच.बी. देशमुख, जे.आर. मोमीन, ताटे, महेश वैकुंटे यांनी परिश्रम घेतले.

                                    ****

लोहा-कंधार तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची मंत्र्यांकडून पाहणी





नांदेड दि. 5 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सा.उ.), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या सर्व मान्यवरांनी लोहा तालुक्यातील जाणापुरी, सोनखेड, अंबेसांगवी, किरोडा आणि कंधार तालुक्यातील गुलाबवाडी, घोडज येथील अतिवृष्टी व बेमोसमी पावसामुळे बाधित झालेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी यासह अन्य पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हाती आलेले संपूर्ण पिकं वाया गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी आलेल्या संकटामुळे खचून न जाता धैर्याने सामोरे जावे. आपणास मदत मिळवून देण्यासाठीच हा पाहणी दौरा करत आहोत. आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शासन आणि प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. स्थानिक पातळीवर आमचे कार्यकर्ते प्रशासनाशी संपर्क साधून आहेत, असा दिलासाही उध्दव ठाकरे यांनी दिला.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे टाकले आहे, याची जाणीव झाल्यामुळेच आम्ही आपली भेट घेऊन धीर देण्यासाठी आलो आहोत. शासनातर्फे योग्य अशी मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता राज्य शासनाने दहा हजार कोटी रुपयांची आपल्या मदतीसाठी तरतूद केली आहे. यात आणखी वाढ करण्याचे प्रयत्न केले जातील, असे सांगून मंत्री महोदयांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास दिला.
या पाहणी दौऱ्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, उपविभागीय अधिकारी पी. एस. बोरगावकर, संबंधित तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.
***

Sunday 3 November 2019

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाची पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडून पाहणी





               नांदेड, दि. 3 :- जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज जिल्ह्यात दौरा करुन अतिवृष्टीमुळे पिक नुकसान परिस्थितीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
               राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी बिलोली तालुक्यातील लोहगाव, मुखेड तालुक्यातील सलगरा, नायगाव तालुक्यातील कृष्णूर, नांदेड तालुक्यातील कामठा खु., गाडेगाव, मालेगाव यासह विविध गावांना भेटी देऊन सोयाबीन, ज्वारी, कापूस यासह अन्य शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
               यावेळी आमदार रामपाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, संबंधीत तालुक्याचे तहसिलदार, विविध विभागाचे सर्व संबंधित अधिकारी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        पालकमंत्री रामदास कदम यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे असून नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासन त्वरित पूर्ण करणार आहे. पावसामुळे जवळपास शंभर टक्के शेती पिकांचे नुकसान झालेले दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
               जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनीही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. या आदेशात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी तात्काळ पंचनामे करावेत. या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.  
            जिल्ह्यात परतीच्या अवेळी पावसामुळे शेतातील पिकांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांचे दावे भरुन मंजुरीसाठी विमा कंपनीकडे त्वरित पाठविण्यात यावेत. या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी, नायब तहसीलदार यांनी स्वत: क्षेत्रीय स्तरावर जाऊन पाहणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या आहेत. 

शेतकऱ्यांना त्वरीत दिलासा देण्यासाठी संवेदनशीलतेने सर्वेक्षणाची कामे वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री रामदास कदम


खरीप हंगामातील पिक नुकसानीचा आढावा


नांदेड दि. 3 :- अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना त्वरीत दिलासा देण्यासाठी पिकांच्या सर्वेक्षणाची कामे संवेदनशीलतेने वेळेत पूर्ण करा. यात बाधित शेतकरी वंचीत राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसंदर्भात आढावा बैठक पालकमंत्री श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणवीस, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, महेश वडदकर, एस. पी. बोरगावकर, शक्ती कदम, शरद झडके यांच्यासह तालुका व जिल्हास्तरावरील विविध विभाग, विमा कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री श्री. कदम पुढे म्हणाले, मराठवाड्यातील शेतकरी कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला समोर जात आहे. या परिस्थितीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन त्यांना तात्काळ मदत देण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्यासाठी जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वस्तुआस्थितीदर्शक तातडीने येत्या 4 ते 5 दिवसात पूर्ण करावीत. या कामात पिक विमा कंपनीची मोठी जबाबदारी असून शासकीय अधिकाऱ्यांनी केलेले नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीने ग्राह्य धरावे. तसे लेखी हमीपत्र विमाकंपनीकडून घेण्याचे आदेश पालकमंत्री श्री. कदम यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री श्री. कदम म्हणाले, शेतकऱ्यांच्या बाधित पिकांची पाहणी प्रत्यक्ष गावात शेतीत जाऊन करतांना सोयाबीनचे जास्त नुकसान झाले असून त्याखालोखाल कापूस, ज्वारी, तूर या मुख्य पिकांबरोबर हळद, केळीसह, काढणी केलेल्या इतर पिकांचे नुकसान झाले आहे. हे लक्षात घेऊन ड्रोन, शुटींग व आवश्यक छायाचित्राद्वारे सर्वेक्षण करावे. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लघु उद्योग उभारणीसाठी उपाय योजना कराव्यात, असे निर्देश देऊन चारा पिकांचे नुकसान झाल्याकने जलसंपदा विभागाने गाळ पेरा क्षेत्रात मका लागवड करावी, प्रकल्पातील पाणीसाठा, रस्त्यांची दूरुस्ती यासह विविध विकास कामांबाबत आढावा घेऊन उपयुक्त सुचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यात संबंधीत यंत्रणेकडुन पिक नुकसानीचा पंचनामा करण्यात येत असून सद्यस्थितीत जवळपास 30 टक्कें पंचनामे पूर्ण झाली आहेत. नांदेड जिल्हायात 16 तालुक्यातील 1 हजार 546 गावांमध्ये एकूण 7 लाख 95 हजार 800 शेतकरी खातेदार आहेत. ज्यांचे पेरणी लायक क्षेत्र 8 लाख 10 हजार 661 हेक्ट आर. असून पेरणी खालील क्षेत्र 7 लाख 58 हजार 405 हे. आर. इतके आहे. ज्यापैकी 1 हजार 488 गावामधील एकूण 5 लाख 43 हजार 553 शेतकऱ्यांचे 4 लाख 11 हजार 372 हे. आर. क्षेत्र बाधीत झाल्याचा प्राथमिक नजर अंदाज आहे. ज्यापैकी सोयाबीन क्षेत्र 2 लाख 41 हजार 498 हे., कापूस 1 लाख 17 हजार 195 हे., ज्वारी 22 हजार 124 हे., तुर 6 हजार 006 हे. व इतर पिके 24 हजार 549 हेक्टर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे मदतीसाठी जिल्हास्तरावर यासंबंधाने तक्रार, हरकतीसाठी हेल्पलाईन क्रमांक 02462- 235077 कार्यान्वीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.