Followers

Thursday 7 November 2019

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन





सर्वांच्या सक्रिय सहभागातून साहित्य संमेलन यशस्वी करु : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे

उस्मानाबाद, दि. 07 - उस्मानाबाद हा ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. येथे होत असलेले 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वांच्या सक्रिय सहभागातून यशस्वी करु या, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.
उस्मानाबाद येथे 10, 11, 12 जानेवारी 2020 रोजी होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे म्हणाल्या, उस्मानाबाद येथे होणारे संमेलन हे सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहण्याची संधी साहित्यिक, साहित्यप्रेमींना लाभणार आहे. त्यासाठी आवश्यक ते नियोजन संयोजक समितीने करावे. आवश्यक तेथे प्रशासनाचे सक्रिय योगदान राहील, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन म्हणाले, साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हातून  ऐतिहासिक संदेश दिला असून ते संस्मरणीय ठरणार आहे. संमेलनाच्या माध्यमातून उस्मानाबादचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा सर्वांसमोर येईल, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी मनोगतात संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी साहित्य संमेलन आयोजनाबाबत माहिती दिली. प्रास्ताविक संमेलनाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र केसकर यांनी केले. सुत्रसंचालन दौलत निपाणीकर तर आभारप्रदर्शन प्राचार्य डॉ. अनार साळुंखे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, संमेलनाचे कोषाध्यक्ष माधव इंगळे, संमेलन कार्यकारिणी सदस्य कमलताई नलावडे, डॉ. अभय शहापूरकर, प्राचार्य डॉ. सुलभा देशमुख, राजेंद्र अत्रे, आशिष मोदाणी, बालाजी तांबे, मीना महामुनी, इलियास पीरजादे, युवराज नळे, शेषनाथ वाघ यांच्यासह शहर व परिसरातील साहित्यिक, साहित्यप्रेमी नागरिक, महिला, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोधचिन्ह निर्मितीबद्दल विजयकुमार यादव यांचा सन्मान

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे संतश्रेष्ठ गोरा कुंभार यांच्या पावन भूमीत होत आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या बोधचिन्हामध्ये संत  गोरा कुंभार यांची हाती चिपळ्या घेऊन भक्तीरसात तल्लीन झालेली प्रतिमा साकारण्यात आलेली आहे. तसेच संत गोरा कुंभार रचित त्यांच्या साहित्यप्रतिभेची आठवण करुन देणार्‍या ’म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे जग हे करणे शहाणे बापा‘ ह्या ओळी लक्ष वेधून घेतात. उस्मानाबाद येथील विजयकुमार यादव यांनी निर्मित केलेल्या बोधचिन्हाची निवड आयोजक समितीने केलेली आहे. साहित्य संमेलनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल यादव यांचा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्यात पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment