Followers

Wednesday 13 November 2019

दिब्रिटो यांची निवड संमेलन यशस्वीतेची पहिली पायरी : ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे यांचे प्रतिपादन





उस्मानाबाद, दि. 13 -
जानेवारी 2020 मध्ये उस्मानाबाद येथे होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची झालेली निवड अत्यंत आनंददायी आहे. व्यक्तीगत पातळीवर दिब्रिटो हे आपले स्नेही आहेत. त्यांच्यासारखा विद्वान लेखक संमेलनाध्यक्ष म्हणून लाभणे हे मराठी साहित्य विश्वाचे भाग्य आहे. दिब्रिटो यांची निवड म्हणजे साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेची पहिली पायरी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी केले.

उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयास प्राचार्य बोराडे यांनी बुधवारी (दि.13) सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी स्वागत मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वागताध्यक्ष नीतीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे, कार्यकारिणी सदस्य डॉ. सुलभा देशमुख, कमलताई नलावडे, श्रीकांत साखरे, राजेंद्र अत्रे यांच्यासह स्वागत मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

उस्मानाबादकरांना संमेलनाचे यजमानपद मिळाले, ही मराठवाड्यासाठी समाधानाची बाब आहे. उस्मानाबाद जिल्ह्याशी आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आपले जन्मगावच उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि सासुरवाडी देखील उस्मानाबाद आहे. त्यामुळे आपण साहित्य संमेलनाच्या आयोजनातील एक जबाबदार घटक असल्याचेही बोराडे यांनी नमूद केले. संमेलन घोषीत झाल्यापासून उस्मानाबादकरांनी सुरू केलेले सकारात्मक प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. त्यामुळे यंदाचे संमेलन मराठी साहित्य विश्वासमोर पथदायी पायंडा निर्माण करील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे मराठी साहित्यातील महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांची निवड ही अखिल मराठी सहित्य विश्वासाठी अभिमानास्पद बाब आहे. लेखक धर्म, जात, पंथ याच्यापलीकडे जाऊन आपले चिंतन समाजाच्या हितासाठी मांडत असतो. दिब्रिटो हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांचे चिंतनशील विचार मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आवश्यक असलेली धोरणे निर्माण करण्यासाठी पूरक आहेत. या संमेलनातून असे सकारात्मक प्रयत्न नक्की देशपातळीवर पोहचतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र अत्रे यांनी केले. तर आभारप्रदर्शन रवींद्र केसकर यांनी केले.

*संमेलनाध्यक्ष तीन दिवसांचे नव्हे, वर्षभराचे पद*

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद केवळ तीन दिवसांपुरते नाही. वर्षभर संमेलनाध्यक्षांनी आपल्या संशोधनातून, चिंतनातून देशातील मराठी साहित्य रसिकांना समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. वयोमानानुसार ही दगदग आता आपल्याला जमणार नाही, म्हणून संमेलनाध्यक्ष पदासाठी आपण विनम्रपणे नकार दिला. त्यातून एक सकारात्मक पायंडा निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे. निवडणूक प्रक्रियेतून संमेलनाध्यक्षांची निवड होऊ नये अशी भूमिका यापूर्वी आपण घेतली होती. महामंडळाने त्यात बदल करुन सन्मानाने संमेलनाध्यक्षांची निवड सुरु केली आहे. त्यामुळेच फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यासारख्या सम्यक लेखकाला उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान लाभला असल्याचे मत प्राचार्य रा.रं. बोराडे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment