Followers

Saturday 24 February 2024

'हे शक्य आहे, आधी स्वत:ला सांगा; न्यूनगंड न बाळगता पुढे जा- प्रशांत गिरबने



लातूर :  आज लातूरचे अनेक युवक जगभरात उच्चपदावर काम करत आहेत, काही शेकडो कोटी रुपयांच्या उलाढालीचे  उद्योग व्यवसाय सांभाळत आहेत, ही तीच मुलं आहेत जी आज तुमच्यासारखी सायकलवर शाळेत जात होती… ही तीच मुलं आहेत जी आज देशात येणाऱ्या परकीय चलनात भर घालत आहेत.  शिक्षण सामर्थ्य देते, कौशल्य त्या सामर्थ्याला बळ देतं हे जितकं खरं आहे तितकेच मला हे करणं शक्य आहे हे आधी स्वत:ला सांगितले पाहिजे आणि कुठलाही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकले पाहिजे असे अनुभवाचे बोल आज विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे महासंचालक श्री. प्रशांत गिरबने यांनी सांगितले.


उद्योग आणि उद्योजकता म्हणजे काय या विषयावर श्री. गिरबने उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. सुरुवातीला माजी कौशल्य विकास मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरचे सुपूत्र असलेल्या श्री.गिरबने यांचा परिचय करून दिला.  कामात कितीही व्यग्र असले आणि वेळ देता येत नसला तरी मी लातूरचा आहे हा पासवर्ड सांगितला की श्री. गिरबने यांची वेळ नक्कीच मिळते असं एक गुपितही श्री. निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.


लातूर ते लंडन असा प्रवास करणाऱ्या गिरबने यांनी आपल्या वाटचालीतील अनुभव आज मेळाव्यास उपस्थित युवक युवतींसमोर मनमोकळेपणाने सादर केले.


कोणते ही काम किंवा कौशल्य याला महत्व दिले गेलेच पाहिजे, तुम्ही काय शिकता यापेक्षा ते कसं शिकता यालाही महत्व आहे. वेल्डिंग, फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, थ्री डी प्रिंटर ऑपरेटर यासारख्या अनेक क्षेत्रात खुप नोकऱ्या उपलबद्ध आहेत मग त्या मिळत का नाहीत हा मुलभूत प्रश्न आहे, ज्याच्याकडे लक्ष द्यायला हवे,  यासाठी गरज आहे  उद्योग आणि कंपन्यांच्या मागणीप्रमाणे मनुष्यबळ विकसित करणे याला. उद्योजकांना जाऊन भेटणे, उद्योग, कंपन्यांमधील रोजगार संधींचा शोध घेणे या गोष्टी प्रत्येकाने करायला हव्यात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापलिकडेही खुप रोजगार संधी आहेत ज्याचा शोध आपण घेतला पाहिजे. यासाठी रोजगार मेळाव्यासारखे व्यासपीठ ही खुप महत्वाचे आहे, त्यामुळेच आजच्या या कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित होते.  मरिन इंजिनिअरिंगसारख्या क्षेत्रात वेल्डिंगचे स्पेशलाईज्ड स्किल लागते, ते काम अतिशय कौशल्याचे आहे… तिथल्या वेल्डरला असा भला मोठा पगार मिळतो हे कुणाला खरे वाटेल का असा प्रश्न करून त्यांनी उपस्थितांना अनेक उदाहरणांसह रोजगार संधींमधील कौशल्याचे महत्व, रोजगार संधींचा शोध, त्याची गरज सांगितली. जगभरात इंग्रजी  भाषेला व्यावसायिक भाषा म्हणून स्वीकारले जाते त्यामुळे मातृभाषेचा अभिमान बाळगतांना, व्यावसायिक भाषा म्हणून इंग्रजी भाषा येणं ही गरजेची असल्याचे प्रतिपादन ही त्यांनी केले. 


रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे व्हायला हवे, पदवीपर्यंत शिक्षण घेतलेली मुलं आज आत्मविश्वासाच्या, कष्टाच्या आणि प्रयत्नाच्या बळावर शेकडो कोटी रुपयांच्या उद्योग व्यवसायाची धुरा सांभाळत असल्याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. रोजगार संधीची उपलब्धता करून देणारे असे कार्यक्रम निरंतर व्हायला हवेत, ती काळाची गरज आहे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी मला हे शक्य नाही म्हणण्यापेक्षा अशक्य काहीही  नाही, मी हे करू शकतो हे स्वत:ला सांगत, मी कोणताही न्यूनगंड बाळगणार नाही हे समजवायला हवे, असे झाल्यास माझ्यासारखा लाजरा बुजरा लातूरकर ही मोठी पाऊले टाकू शकतो, हे स्पष्ट केले.

...

 

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात रोजगार संधीचा खजिना - रोहित पंढारकर



लातूर : शिक्षण, आरोग्य, संरक्षण, कृषी, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, मनोरंजन यासारख्या सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाचे योगदान देत आहेत. या क्षेत्रात येत्या तीन वर्षात जगभरात ४० लाख नोकऱ्यांची संधी आहे, अशी माहिती ओलएक्सचे डेटा सायन्सचे ग्लोबल हेड रोहित पंढारकर यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्यासाठी कोणते शिक्षण घ्यायला हवे आणि त्यातून कोणते रोजगार मिळू शकतील याची माहिती  त्यांनी आज लातूर येथील विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात दिली.  सुरुवातीला श्री. पंढारकर यांच्या वाटचालीचा परिचय माजी मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांनी करून दिला.


जगभरात या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. भले मोठे पगार या क्षेत्रातील लोकांना मिळणार आहेत, भारतात सुद्धा या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे, असे सांगतांना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ? याचा अर्थ खूप साध्या सोप्या शब्दात समजून सांगितला. ते म्हणाले इन्स्टाग्रामवर तुम्ही एखाद्या रिलला लाईक करता, त्यानंतर तुमच्या लक्षात येतं की, त्याच विषयावरच्या इतर रिल तुमच्यासमोर तुम्ही न मागताही समोर येत आहेत म्हणजे काय तर तुमची आवड संगणकाने कोडमध्ये जतन करून ठेवली आहे, तुम्ही क्रिकेट विषयावरील रिल लाईक केली तर सचिन तेंडुलकर, धोनी आणि इतर क्रिकेटरच्या रिल्स तुमच्यासमोर तुम्ही न शोधताही येतात..  कारण तुम्हाला काय आवडतं याचा अंदाज किंवा भाकित संगणकाने किंवा मोबाईलने लावलेलं असतं आणि त्याच विषयावरील इतर गोष्टी ते तुमच्यासमोर सादर करत.


कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक किंवा मशिनकडून आलेली हुशारी. हवमानाचा अंदाज, तुमच्या ह्दयाची गती सांगणारी यंत्रणाही अशाच पद्धतीने काम करते, ज्यामुळे अनेक संकट किंवा धोके टाळण्यास, अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचेही ते म्हणाले. अनेक कंपन्यांची उत्पादनेही याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चाचणीवर पुढे येतात.  कारण ग्राहकाची पसंती आणि गरज यांचे दोन्ही भाकित ते सांगू शकतात.  आपल्या अनेकप्रकारच्या मशिन्समध्ये आपल्याला त्याच्या चालू बंद असण्याचे संकेत मिळतात. वाहन चालवतांना इंधन उपलब्धता दर्शवली जाते या आणि यासारख्या अनेक गोष्टी या याच कृत्रिम बुद्धिमत्तेतून आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात. त्यामुळे या क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन करिअरसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मागदर्शन शिबिरात प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी सांगितले स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक'

 





·   स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ध्येय निश्चित करणे सर्वात महत्वाचे

·       ध्येय प्राप्तीसाठी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करण्याची गरज

·       स्टार्टअपमधील संधी, वैद्यकीय क्षेत्रातील करिअरबाबतही मार्गदर्शन

लातूर : कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. तसेच ते ध्येय प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयीन जीवनापसूनच जोखून देवून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल यांनी सांगितले. महाविद्यालयीन जीवन आणि त्यानंतरची एक-दोन वर्षे सर्व बाबींचा त्याग करून अभ्यासाला महत्व द्यावे, असे त्यांनी सांगितले.


आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


सोशल मिडिया, तसेच इतर करमणुकीच्या साधनांपासून काही दिवस दूर राहून अभ्यास केल्यानंतर यश हमखास मिळाले. दोन-तीन वर्षांच्या त्यागामुळे आयुष्यातील पुढील 40-50 वर्षे सुखाचे आयुष्य जगायला मिळेल. त्यामुळे आपल्या ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करावेत, असे श्री. गोयल म्हणाले.


आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे, तर कष्टाला पर्याय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवूनच स्पर्धा परीक्षेचा पर्याय निवडावा. या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय ठावून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी सांगितले.


जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनीही यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.


करिअरमध्ये नियोजन महत्त्वाचे : डॉ. राजीव रंजन


*स्टार्टअपमधील संधी व आव्हाने याबाबत मार्गदर्शन*


जिद्द आणि एखादी गोष्ट करण्याची धमक असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो. करिअर निवडताना ध्येय निश्चित करण्याची गरज आहे. करिअरमध्ये नियोजन महत्त्वाचे आहे, असे मत राजीव रंजन यांनी व्यक्त केले. ‘स्टार्टअपमधील संधी व आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  यावेळी त्यांच्यासोबत गणेश देसाई यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना राजीव रंजन म्हणाले, आजच्या प्रचंड धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिले तर यशाचा प्रवास अधिक सोपा जातो. पैशाने सर्व काही गोष्टी खरेदी करता येत नाहीत. आनंदी आयुष्य जगणे ही कला प्रत्येकाने आत्मसात केली आहे. यावेळी कुणाल क्षीरसागर यांनी टॅक्सबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.


*‘वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या संधी’बाबत मार्गदर्शन*


वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही. एखादे क्षेत्र जर आपण निवडले तर त्या क्षेत्रात मास्टरी मिळविल्याशिवाय मागे हाटायचे नाही, असा कानमंत्र डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी नमो महारोजगार मेळाव्यात आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात बोलताना दिला. ‘वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या संधी’ बाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय क्षेत्रासह आयुर्वेदिक, होमिओपॅथी याही क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. लातूरने अनेक डॉक्टर घडविले आहे. यावेळी बोलताना डॉ. पल्लवी जाधव म्हणाल्या, जिद्द आणि चिकाटीने यश हमखास मिळविता येते. युवकांनी शिक्षणाबरोबर कौशल्ये वृद्धिंगत करणे आवश्यक आहे.

शेतीकडे सकारात्मक आणि व्यावसायिकदृष्टीने पहाण्याची आवश्यकता-विलास शिंदे



विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर

लातूर, दि. 24 (जिमाका) : गुंतवणूकीच्या तुलनेत निर्माण होणारा रोजगार याचा विचार केला तर शेतीसारखं क्षेत्र शोधून सापडणार नाही. फक्त आता  शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आणि व्यावसायिक होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे यांनी केले. विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात ‘कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम’ या विषयावर ते बोलत होते. 

तत्पूर्वी शेतीकडे पहातांना केवळ शेती करणे एवढेच मर्यादित स्वरूपात न पाहता कशापद्धतीने त्याला कृषी पूरक व्यवसायाची जोड देऊ शकतो, त्यात नावीन्यता आणता येते हे श्री. शिंदे यांनी दाखवून दिल्याचे श्री. शिंदे यांच्या परिचयात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. श्री. शिंदे यांनी व्यग्र दिनक्रमात मराठवाड्याच्या मातीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. विलास शिंदे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमास मार्गदर्शन केले.

अडीच  एकर-तीन एकरच्या क्षेत्राला इंडस्ट्रीसारखे बघून उत्पनादन आणि उत्पन्नाचे नियोजन करायला हवे, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राचा  80 टक्के भाग कोरडवाहू आहे.  शेती म्हणजे धान्य किंवा कापूस पिकवणे नव्हे. शेतीचे मूल्यवर्धन करून त्याला फार्म इंडस्ट्रीचे स्वरूप त्याला द्यायला हवे. त्यातील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. डिजिटल अग्रीक्लचर मार्केटिंग हे शेती व्यवसायाचे भविष्य असून आज ॲग्रो स्टार्टअप्समध्ये आयआयटी- आयआयएमवाले शिरकाव करून रोजगार निर्माण करत आहेत. परंतू आपल्याकडे शेती हा विषय आला की प्रामुख्याने त्यातील नकारात्मक बाबींवर चर्चा होते.
 
आजच्या तरूणांना गाव सोडायचे आहे, शेती सोडायची आहे, ग्रामीण भागातील मुलगी ही शेतकरी नवरा नको म्हणते आहे,  थोडक्यात काय तर शेती आणि शेती रोजगार नको अशी एक मानसिकता तयार होऊ लागली आहे.  त्याची अनेक कारणं आहेत त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे  शेतीचे उत्पन्न शाश्वत राहिले नाही. त्यामुळे गुंतवूणक करून, वेळ देऊन,  कष्ट करून हक्काचे उत्पन्न मिळत नाही असे दिसते. त्या उलट एखाद्या नोकरीकडे आपण बघतो तर एक हमखास पगाराची रक्कम दर महिन्याला घरात येते.  त्यामुळे सोपे करिअर, सुरक्षितता याकडे माणूस वळायला बघतो, तसे प्रयत्न करतो, असे श्री. शिंदे म्हणाले.
एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहाते. त्यातील 45 टक्के लोक महाराष्ट्रात शेतीवर अवलंबून आहे.  या सगळ्यांनी शेती सोडली तर साधारणत:  यातील 30 ते 35 टक्के युवा वर्गाला आज शेती सोडून इतर क्षेत्रात रोजगार उपलब्ध होतील, का ही एक प्रश्न आहे, सरकारी नोकरीतही मर्यादा आहेत. कंपन्यामध्ये तयार होणाऱ्या नोकऱ्यात ऑटोमेशनमुळे मर्यादा येत आहेत.  खरं तर जे पुणे- मुंबईत शोधल्या जातं, अमेरिकेत शोधलं जातं त्यापेक्षा कितीतरी संधी तुमच्या भागात आसपास आहेत. फक्त गरज आहे शेतीकडे वेगळ्या नजरेने, सकारात्मकदृष्टीने बघण्याची. जगभरात जिथे समस्या तिथेच नवीन नोकऱ्या, रोजगार निर्माण झाले हे चित्र आहे, प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते त्या नजरेने शेतीकडे पाहिले तर शेतीक्षेत्राएवढ्या रोजगार संधी कोणत्याच क्षेत्रात नाहीत. तुमच्या गावात, आसपास हजारोनी अशा संधी तुम्हाला सापडतील. यात व्यक्तिगत करिअर घडवू शकता, इतरांच्या हाताला काम देऊन तुमच्या भागात समृद्धी आणू शकता. मराठवाड्यातील तरूण तरूणींनी या नजरेतून शेतीकडे पाहण्याची गरज आहे, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

इस्त्राईल सारख्या देशाने अनेक अडचणींवर मात करत, प्रादेशिक स्थितीवर मात करत ठिबक सिंचन आणि इतर संशोधने केली ती संशोधने जगभर विकली गेली. इस्त्राईलच्या बाहेर मोठ्याप्रमाणात व्यवसाय उभे केले. जगभरातून संपत्ती गोळा केली.  हीच मानसिकता आपल्याकडे तयार होण्याची गरज आहे. पाणी समस्या, उष्ण वातावरण हे इस्त्राईलमध्येही होते. पाणी नाही ही एक नवी संधी आहे, कमी पाण्यातील, कोरड्या मातीतील पिक घेण्याची. अन्न पदार्थ पोषक, पोषणमुल्याने युक्त आहे का याचा विचार आज होत आहे. लोकांना विषमुक्तय शेतीतील अन्नधान्य हवं आहे. लोक साखरेचे सेवन कमी करत आहेत.  जगभरात सर्वोत्तम फळं भाज्या कोरड्या वातावरणात येतात. कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळते.  हे आपण पहात आहोत. अशा स्थितीत फळे, भाजीपाला, बांबू, डाळिंब असे कितीतरी कमी पाणी लागणाऱी  उत्पादने मराठवाड्यात घेता येतील.  जागतिक बाजारात मागणी असलेली उत्पादने घेता येतील पिकांचे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय नियोजन करता येईल. असेही श्री. शिंदे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.
*****

लातूर येथील नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरामुळे हजारोंना मिळाली रोजगाराची संधी.

 









मराठवाड्यातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मिळाले मार्गदर्शन

लातूर : राज्य शासनाने प्रत्येक महसूल विभागात नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून छत्रपती संभाजीनगर विभागाचा मेळावा लातूर येथे 23 व 24 फेब्रुवारी रोजी पार पडला. शासकीय महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात झालेल्या या नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरा त मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. 24 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमधून उद्योजकांनी 4 हजार 548 उमेदवारांची जागेवरच निवड केली. तर 7 हजार 897 जणांच्या निवडीबाबतची कार्यवाही पुढील टप्प्यात होणार आहे. यावेळी झालेल्या करिअर मार्गदर्शन शिबिरालाही युवा वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

जागेवर निवड झालेल्या युवक-युवतींना आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात निवडपत्राचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, प्रेरणा होनराव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत 35 जणांना 1 कोटी 51 लाख 76 हजार रुपये, मुद्रा योजना अंतर्गत 5 व्यक्तींना 18 लाख रुपयांचे धनादेश उपस्थितांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या मेळाव्याचे औचित्य साधून जिल्हा परिषद अंतर्गत 14 संवर्गात अनुकंपा तत्वावर निवड झालेल्या 10 युवक-युवतींना एकाच वेळेस यावेळी नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आले.

इयत्ता दहावी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठीविभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. 23 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश दाखविण्यात आला, तसेच कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते. पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी करिअर विषयी मार्गदर्शन केले.

24 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 पासूनच रोजगार इच्छुक उमेदवारांची नाव नोंदणी आणि प्रत्यक्ष मुलाखतींना सुरुवात झाली. स्वतंत्र सभामंडपात 16 दालनांमध्ये 32 टेबलवर नाव नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उमेदवारांनी भरलेले अर्ज स्वीकारण्यासाठी 14 दालनांमध्ये 28 टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. या मेळाव्यासाठी ऑनलाईन स्वरुपात 18 हजार 530 उमेदवारांनी नोंदणी केली. तर ऑफलाईन स्वरुपात 12 हजार 945 जणांनी नोंदणी केली. तसेच 7 हजार 288 जणांनी स्वयंरोजगारसाठी नाव नोंदणी केली होती. सकाळपासूनच नाव नोंदणीसाठी युवक-युवतींची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी नाव नोंदणी कक्षांना भेटी देवून युवक-युवतींशी संवाद साधला. तसेच विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनीही विविध दालनांना भेटी देवून मुलाखतीला आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.


नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतानुसार उपलब्ध उद्योजक, आस्थापनेची आणि त्यामधील रिक्त पदांची माहिती देण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी मदत कक्ष तयार करण्यात आले होते. तसेच सर्व आस्थापनांची एकत्रित माहिती असलेला फलक दर्शनी भागात लावण्यात आला होता. विविध आस्थापना, उद्योजक यांच्या दालनांसाठी दोन स्वतंत्र सभामंडप उभारण्यात आले होते. यामध्ये तयार करण्यात आलेल्या कक्षांमध्ये उमेदवारांच्या मदतीसाठी एक-एक स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले होते. 264 उद्योग, स्वयंरोजगारविषयक आस्थापनांची दालने याठिकाणी तयार करण्यात आली होती.


नमो महारोजगार मेळावा दिशादर्शक उपक्रम ठरेल : महसूल मंत्री

राज्य शासनाने प्रत्येक विभागामध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून युवा वर्गाला करिअरच्या अनुषंगाने भविष्याची वाटचाल निश्चित करण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे. नागपूरनंतर आता लातूर येथे असा मेळावा होत असून यानंतर राज्यात प्रत्येक महसूल विभागात मेळावे होणार आहेत. या मेळाव्याचे अतिशय चांगले नियोजन झाले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून तीन युवतींना प्रत्येकी सुमारे अडीच लाखांचे पॅकेज मिळाले आहे. याचप्रमाणे इतरही उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याठिकाणी मिळालेल्या मार्गदर्शनातून भविष्यातील संधींचा वेध घेण्यासाठी आत्मविश्वास युवकांना मिळेल. हा आत्मविश्वास युवा वर्गाला उज्ज्वल भविष्य देईल, असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात सहभागी युवक-युवतींना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आगामी काळ हा कौशल्य विकासाच्या कार्यक्रमांचा आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींसाठी नमो महारोजगार मेळावा उपयुक्त ठरणार आहे. जगातल्या अनेक कंपन्या शाश्वत गुंतवणुकीसाठी भारतात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यावसायिक, उद्योग जगतात विश्वास निर्माण केल्याने  उद्योजकांची भारताला पसंती मिळत आहे. तसेच राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे उद्योगांची संख्या वाढणार आहे. अशा उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नमो महारोजगार मेळावे उपयुक्त ठरतील, असे महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले. लातूर येथील नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराच्या यशस्वी आयोजनाबाबत त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच मेळाव्याला उपस्थित युवक-युवतींना शुभेच्छा दिल्या.

स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करा : आमदार संभाजी पाटील निलंगेकर

तरुणांनी स्वतःच्या क्षमता ओळखून त्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपण स्वतःला सिद्ध केले तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो, असे आमदार संभाजी पाटील यावेळी म्हणाले. तसेच नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सर्वांना रोजगार मिळणार नसला तरी या मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला रोजगार मिळण्यासाठी त्यांना यापुढेही रोजगाराच्या संधींची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे त्यांनी सांगितले.


करिअर घडविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक : विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी मेळाव्याला भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, या मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच यावेळी आयोजित मार्गदर्शन शिबिरामुळे युवक-युवतींना भविष्यात करिअरची दिशा निश्चित करण्यास मदत होईल. करिअर घडविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. त्यामधून यश गाठता येते. त्यामुळे येथे मिळालेल्या मार्गदर्शनातून योग्य करिअरची निवड करून युवक-युवतींनी त्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधींची माहिती मिळण्यास मदत : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

मेडिकल एज्युकेशनचे हब म्हणून लातूरची ओळख आहे. यासोबत युवा वर्गाला विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधीची माहिती होण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोणत्या रोजगारासाठी आपण कोणते कौशल्य आत्मसात करावे, याची माहिती या मेळाव्यातून मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.

यावेळी आयोजित मार्गदर्शन शिबिरात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील तज्ज्ञ रोहित पांढारकर यांनी, तर स्टार्टअप मधील संधी व आव्हाने याविषयी राजीव रंजन आणि गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी अनमोल सागर, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. फिजिओथेरेपी व वैद्यकीय करिअरमधील संधी याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

*****

मेळाव्यात रोजगार मिळाल्याने तरूणाईच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यात हजारो तरूणाईंना मिळाला जॉब








लातूर,  (विमाका) : मराठवाड्यातील विविध शहरांसह गावखेड्यातील तरूणाईने विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात सहभाग घेतला. मेळाव्यात या बेरोजगारांना नामांकित कंपनीत लाखांच्या पॅकेजसह रोजगार मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. असेच मेळावे होत रहावेत, अशा भावनाही तरूणाईने व्यक्त करत शासनाचे आभार मानले.

लातूरच्या बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात दोन दिवसीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सहभागी तरूणाईला देशातील नामांकित कंपन्यांनी मुलाखतीद्वारे निवडले. त्याचबरोबर लागलीच ऑफर लेटरही दिल्याने निवड झालेल्या तरूणाईंचा सत्कार आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 

लातूर जिल्ह्यातील दापका तांड्यावर राहून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण करणारी दिव्या राठोड. वर्तमानपत्रातील जाहिरात पाहून नमो महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झाली. यशस्वीरित्या मुलाखत दिली, अन् तिला महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या नामांकित कंपनीत नोकरीची संधी मिळाली. ही संधी मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावर हास्य होते. शिवाय तिने हा रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले.  

नुकताच आयटीआय उत्तीर्ण होऊन मेळाव्यात सहभागी झालेला १९ वर्षीय प्रमोद शिंदे म्हणाला, या मेळाव्यामुळे मला जॉब मिळाला. यामाहा सुझुकीसारख्या नामांकित कंपनीत अप्रेंटिसशीपची संधी मिळाली. दरमहा २१ हजार ५०० रूपयांचे मला मानधन कंपनीकडून देण्यात येणार आहे. नमो महारोजगार मेळाव्यासारख्या उपक्रमातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो आहे. असे मेळावे होत रहावेत, ही ग्रामीण भागातील युवकांसाठी चांगली संधी असल्याचेही त्याने सांगितले.

 जळकोट तालुक्यातील बागवान अब्दुल सत्तार यानेही आयटीआयचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. सुझुकी मोटर्स कंपनीत ट्रेनी म्हणून रोजगार उपलब्ध झाल्यामुळे खूप आनंद झाल्याचे सांगितले.

लातूरच्या बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात लातूरची रूचा पाटील आणि श्रद्धा कळसे, बीडची अश्विनी गुजर शिकतात. महाविद्यालयातील शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पियाजिओ व्हेइकल या कंपनीत आम्ही मुलाखत दिली. या मुलाखतीत आमची निवड झाल्याने आम्हाला आनंद तर झालाच, परंतु आमची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे होणार असल्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले. तर अमोल चिंचोलकर या बीटेकचे शिक्षण घेत असलेल्या तरूणासही रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने शासनाचे त्याने आभार मानले. 

********************

Friday 23 February 2024

महिलांनी उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावीनमो महारोजगार मेळाव्यात ‘नारीशक्ती’ परिसंवादातील सूर




लातूर: आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत असल्या तरी  बऱ्याच महिलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात, विशेषत: उद्योग व्यवसायाची आवड असूनही त्यात पुढे जाता येत नाही. तेंव्हा महिलांनी उद्योगात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास आणि योग्य नियोजनासह पाऊल पुढे टाकल्यास त्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात, उद्योगात यशस्वी होऊ शकतात, असा सूर नमो महारोजगार मेळाव्यात आयोजित ‘नारीशक्ती’ परिसंवादात उमटला.


कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळावा आज येथील निवासी महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी झालेल्या नारी शक्ती परिसंवादात विविध क्षेत्रात ठसा उमटवलेल्या यशस्वी महिलांनी संवाद साधला.


यावेळी परिसंवाद ऐकण्यासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, नगरपालिका प्रशासनचे सहआयुक्त रामदास कोकरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 या परिसंवादात उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, सामाजिक कार्यकर्त्या प्रेरणा होनराव, लातूर मधील कौशल्य ॲकडमीच्या संचालिका वैशाली देशमुख, नव्व्या फॅशन डिझायनींगच्या वसुधा माने, राजर्षी शाहू कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. रेणूका लोंढे, नांदेड येथील कौशल्य उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार, उद्योजिका साधना देशमुख यांचा सहभाग होता. यावेळी निवेदिका अंजली जोशी यांनी परिसंवादात सहभागी महिलांकडून त्यांच्या यशस्वीतेचे गमक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.


उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ म्हणाल्या की, घरातील सर्वजण शिक्षण क्षेत्रात होते, परंतु त्यांना प्रशासनात काम करण्याची आवड होती. त्यादृष्टीने मेहनत घेतली व यामध्ये वडिलांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे त्या आज या पदावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर संधी ही व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असते. आपल्या गरजेप्रमाणे तिचा शोध घेऊन उपयोग केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.


यावेळी डॉ. लोढे म्हणाल्या, महिलांनी डिजिटल साक्षर होण्यावर भर दिला. डिजिटल क्षेत्रात वेगवेगळ्या कामाच्या संधी उपलब्ध होत आहेत. जसे बऱ्याच महिला आपल्या उद्योगाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी युट्यूब चॅनल, वेबसाईट यासारख्या माध्यमांचा वापर करतात. ज्यातून त्यांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ मिळते. त्यातून आर्थिक उत्पन्नात भर पडण्यास मदत होते.


नारीशक्ती परिसंवादात महिलांच्या करिअर संधीवर चर्चा होऊन सहभागी महिलांनी आपल्या व्यावसाईक वाटचालीतील संधी, आव्हाने व त्यांचा सामना कसा केला, याविषयी अनुभव यावेळी सांगितले.

*****

रोजगार मागणारे नव्हे,देणारे झाल्याने आत्म‍िक समाधान








मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत महिला, युवांच्या भावना

विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद 

लातूर :  ‘मी रोजगार मागणारा नव्हे, तर देणारा झाल्याने मला आत्म‍िक समाधान आहे. आज मीच सात-आठ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या व्यवसायातून मला जवळपास पंधरा लाख रूपये वार्षिक उत्पन्न मिळते’ असे अभिमानाने सांगत होते बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती गावचे रामेश्वर फड. निमित्त होते आज लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय महारोजगार मेळाव्याचे. याच मेळाव्यात इतर विविध योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर झालेल्या युवक-युवतींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

रामेश्वर यांनी चित्रकारिता (पेंटिंग) व्यवसायासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 10 लाखांचे कर्ज घेतले. त्यातून आर्ट गॅलरी सुरु केली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे मला प्रोत्साहन मिळाले. मी स्वत: उद्योजक बनलो, याचे समाधान आहेच. इतरांनीही या व अशा  शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे, असे मला वाटते. 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना विभागीय नमो महारोजगार मेळावा कार्यक्रमात  क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देण्यात आले. या कार्यक्रमानंतर लाभार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. हा कार्यक्रम  बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर पार पडला. 

लातूरच्या औसा तालुक्यातील शिवणी बु. येथील लिंबराज माने यांनीही लातूर येथे अलायन्मेंट अँड वॉशिंग सेंटर उभारले. यासाठी त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून कर्ज मिळाले. त्यातून स्वत:चा व्यवसाय त्यांनी सुरु केला. आपल्या हाताला काम मिळण्याबरोबरच मला इतरांच्या हाताला काम देता आले, याचा आनंद आहे. व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन तरूणांनी अशाच पद्धतीने पुढे जायला हवे, असे माने म्हणाले. 

सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या संगीता बरुरे यांनी मोबाइल टॉयलेट या व्यवसायास पसंती दर्शवत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून प्रशिक्षण घेतले. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जवळपास साडेपाच लाख रूपयांचे कर्ज घेतले. त्यातून अभिनव असा हा व्यवसाय सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.  कमी शिक्षण असतानाही इतरांसमोर माझा आदर्श निर्माण होत असल्याने मला अभिमान वाटत आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ प्रत्येकाने घ्यायला हवा, असेही त्या म्हणाल्या.

बीएस्सी झालेल्या लातूरच्या वसवाडीतील शीतल भिसे म्हणाल्या,  मी झेरॉक्स, स्टेशनरी, मल्टीसर्व्हिसेसचा व्यवसाय सुरु केला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मला  एसबीआय बँकेकडून 4 लाख 68 हजारांचे कर्ज मिळाले. आता सर्व खर्च वजा जाता मला दरमहा 20 हजार रुपये उत्पन्न मिळते आहे. 

जनाधार सेवाभावी संस्थेचे प्रकल्प प्रमुख नंदकुमार बिजलगावकर म्हणाले की, त्यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 70 ई-व्हेईकल (कचरा वाहून नेणारी वाहने) घेऊन प्रत्येक महिलेस एक याप्रमाणे ई-व्हेईकल दिले. त्यामधून लातूर शहरातील कचरा वेचणाऱ्या महिलेस दरमहा 18 हजार रुपये उत्पन्न मिळते. यातून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग प्रशस्त् झाला आहे. या महिलांपैकी एकता टेंकाळे यांनी पूर्वी 5 ते 6 हजार रुपये मिळत होते. परंतु या इ-व्हेईकलमुळे 18 हजार रुपये मिळत असल्याने समाधानी असल्याची भावना व्यक्त केली. 

*ग्रामीण जीवनोन्नती, प्रधानमंत्री मुद्रा योजनाही फलदायी*

लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ येथील ज्ञानेश्वरी मुंडे यांचा स्वयंसहायता बचतगटाच्या माध्यमातून लोणचे, मसाले, पापड याचा उद्योग आहे. ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून त्यांना बँकेने 3 लाख 10 हजारांचे कर्ज दिले. त्यांच्या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांनी या उद्योगातून इतर दोन महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. शासनाने त्यांना अनुदानही दिले आहे. यासाठी त्यांनी शासनाचे आभार मानले आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून 7 लाख 37 हजार रुपयांचे कर्ज घेऊन चाकूर तालुक्यातील सुगावच्या 25 वर्षीय प्रेमानंद शिंदे यांनी क्लिनिकल पॅथालॉजी लॅब सुरु केली. याबाबत त्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, मी आता स्वावलंबी आहे याचा मला खूप अभिमान आहे. 

*****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे गंगापूर येथे अनावरण ; अहिल्यादेवींचा राज्यकारभार प्रेरणादायक- उपमुख्यमंत्री अजित पवार

 




            छत्रपती संभाजीनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनता सुखी, समाधानी व सुरक्षित रहावी, सामान्य माणसांना न्याय मिळावा यासाठी राज्यकारभार केला. अहिल्यादेवींनी केलेला राज्यकारभार हा  प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गंगापूर येथे केले.

गंगापूर येथील जामगाव टी पॉइंट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज  झाले. आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील, भूषणसिंह राजे होळकर,'राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठान' चे अध्यक्ष रावसाहेब तोगे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, अरुण रोडगे यांच्यासह पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात महिलांचा सन्मान केला.  त्याच भोसले घराण्यात पुढे महाराणी तारामती व होळकर घराण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तबगार महिलांनी उत्तम राज्यकारभार केला. त्यांचा राज्यकारभार आजही प्रेरणादायक आहे.  ते पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी गावाच्या विकासाचा आराखडा तयार करण्याबाबत अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वांना अभिमान वाटावा, असे स्मारक चौंडीत उभारण्यात येईल व त्यासाठी भरीव निधी दिला जाईल. पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथे किल्ला संवर्धनासाठी तातडीने निधी देऊ असेही त्यांनी सांगितले.

अहिल्यादेवींनी बांधलेले बारव तसेच त्यांनी केलेल्या अन्य कामांचे जतन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. बारामतीत एक हजार कोटीच्या निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी केली असून या वास्तूला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव दिले आहे,असेही श्री. पवार यांनी सांगितले. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींचे स्मरण व्हावे, हाच त्यामागील हेतू आहे. आर्थिक व्यवहार काटेकोर असेल तर त्या राज्याची प्रगती होते, हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्य काराभारावरून दिसते. प्रचंड संर्घषातून त्यांनी काम केले. त्याचा हाच आदर्श आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

 भूषणसिंह राजे होळकर म्हणाले, गंगापूर येथे उभारण्यात आलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आपल्याला प्रेरणा देणारे ठरणार आहे. अहिल्यादेवींचे व्यवस्थापन, सैन्यांची व्यवस्था, मानवतावादी विचार, तसेच रयतेकडे त्यांचे असलेले लक्ष या बाबी महत्त्वाच्या असून त्यांचे परराष्ट्र धोरणही अत्यंत महत्त्वाचे आहे. आदर्श राज्य कसे असावे , हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

यावेळी आमदार सतिष चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील, श्री. रावसाहेब तोगे, माजी सभापती अरूण रोडगे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास  परिसरातील नागरिक मोठ्या संख़्येने उपस्थित होते.

Thursday 22 February 2024

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार -२०२३ प्रदान

 


'अष्टपैलू' अशोक सराफ हे मराठी मातीतील अस्सल हिरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


जगाला हेवा वाटेल अशी मुंबईची फिल्मसिटी बनवण्याचा प्रयत्न


मुंबई :  आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरुन हसवले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही त्यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही. खऱ्या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत, अशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्याचा गौरव केला. मराठी चित्रपटसृष्टी साठी जे जे आवश्यक आहे, त्या सर्व सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्याचा आणि जगाला हेवा वाटेल अशी फिल्मसिटी आपण तयार करू, असे प्रतिपादन त्यांनी केले.


महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा "गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार" ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान आज  करण्यात आला.त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. या समारंभास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मनीषा कायंदे,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक  बिभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.


यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे, म्हणाले की, अष्टपैलू, हा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ आहे. सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची त्यांची भूक अजूनही कायम आहे.  अशोक सराफ हे वयाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय, हा अवघ्या महाराष्ट्रासाठी  केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.


गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली. यावर्षी अशोक सराफ यांचा आपण गौरव करत आहोत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर राज्य केले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही सराफ यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही, असे त्यांनी सांगितले. मराठी रसिकांनीही त्यांच्या अभिनयावर भरभरुन प्रेम केले. त्यांच्याप्रमाणेच सुरेश वाडकर यांनी अत्यंत कष्टपूर्वक आपली सांगितीक कारकीर्द उभी केली. मराठी आणि हिंदीच नव्हे तर विविध भाषांतील त्यांची गाणी विशेष गाजली. सुरेशजींचा सुरेल आवाज आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतो, अशा शब्दात त्यांनी  ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा गौरव केला.


मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईतल्या फिल्मसिटीत शुटीगसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच, मुंबई फिल्मसिटीबाहेर इतर जिल्ह्यात चित्रपटाची शुटींग करायची असेल तर 'वन विंडो सिस्टीम'चा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतलाय. या शुटींगसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. राज्यात ७५ नावे चित्र नाट्यगृह उभरण्यासाठी ९ कोटी ३३ लाखाचा निधी  मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले.


*अशोक सराफ हे मराठी चित्रपटाचा चेहरा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*


आजचा  दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. चित्रपट पुरस्कारांचा बॅकलॉग भरून काढला. आज आपले कलाविश्र्व समृध्द करणारे अनेक मोठे कलावंत येथे आहेत. चित्रपट सृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृध्द करणारी ही मंडळी आहेत. अशोक सराफ यावर्षी ७५ वर्षाचे झालेत. त्यांच्या अमृत महोत्सवात आपण त्यांना महाराष्ट्र भूषण देत आहोत. मराठी चित्रपटाचा चेहरा हे अशोक सराफ आहेत, अशी भावना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. 


ते म्हणाले की, मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, नाटक यामध्ये सर्व पद्धतीच्या भूमिका अशोक सराफ यांनी साकारल्या. त्यांनी साकारलेला नायक हा स्वप्नातील नव्हे तर खऱ्याखुऱ्या जीवनातील नायक वाटायचे. त्यांचे चित्रपट पाहून आम्ही मोठे झालो. याशिवाय, सुरेश वाडकर यांनी गेल्या कित्येक वर्षे त्यांच्या सुरेल आवाजाने रसिकांचे मनोरंजन केले. ज्या लोकांनी आपले जीवन आनंदमय केले, त्यांना पुरस्कार देण्याची संधी आपल्याला मिळाली, अशी भावनाही यांनी यावेळी व्यक्त केली.


*महाराष्ट्राची भूमी ही कलाकारांची खाण: मंत्री सुधीर मुनगंटीवार*


सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्र हे जसे आर्थिक शक्तिकेंद्र आहे तसे ते सांस्कृतिक शक्तिकेंद्र आहे.  महाराष्ट्राची भूमी ही आता कलाकारांची खाण झाली आहे.  या कलावंतांचा सन्मान करताना सांस्कृतिक कार्य विभाग सोनेरी झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


फिल्मसिटीच्या बाहेर जिथे चित्रीकरण असेल तिथे शुल्क आकारले जाणार नाही. मनोरंजन करातून सुट या अगोदरच दिली असल्याचे सांगून जगातील सर्वात उत्तम फिल्मसिटी करू शकतो, असा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 


*रसिक प्रेक्षकांचे प्रेम कायम हृदयात राहील: अशोक सराफ*


महाराष्ट्रातील एक क्रमांकाचा पुरस्कार तुम्ही मला दिलात, याचा खरोकर आनंद आहे. माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमी ने माझा गौरव केला. महाराष्ट्र भूषण मिळणाऱ्यांची यादी भाली मोठी. त्यात मला स्थान दिले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पन्नास वर्षात प्रवासात ज्यांनी मला कळत नकळत का होईना त्यांनी मदत केली आहे, ही सगळी त्यांची किमया आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रसिक प्रेक्षक. जे आवडले तर डोक्यावर घेतात. रसिकांना आवडलं पाहिजे हाच दृष्टीकोन ठेवला. रसिकांनी प्रेम दिले. ते उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. माझ्या ह्रदयात हे प्रेम कायम राहील, अशी भावना यावेळी अशोक सराफ यांनी व्यक्त केली.


*लतादीदींच्या नावे पुरस्कार हा आशीर्वाद: सुरेश वाडकर*


यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लताजींच्या नावाचा पुरस्कार हा आशीर्वाद आहे. आजही लतादीदी आपल्यात आहेत, हीच भावना असल्याचे त्यांनी सांगितले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव श्री. खारगे यांनी केले. सांस्कृतिक दृष्ट्या समृध्द असे आपले राज्य आहे. महान सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यात कलावंतांचा मोठा वाटा आहे. विविध सांस्कृतिक पुरस्कार, महोत्सव आयोजित करून व्यासपीठ निर्माण करण्याचे काम राज्य शासन करीत आहे.तीन वर्षाचे पुरस्कार यावर्षी देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि मान्यवरांच्या हस्ते राजकपूर जीवनगौरव पुरस्कार २०२० ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणी, सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते  मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना प्रदान करण्यात आला.  तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक  जे. पी. दत्ता, सन २०२१ साठी ख्यातनाम गायक  सोनू निगम आणि सन २०२२ साठी विधू विनोद चोप्रा यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावतीने त्यांचे स्नेही श्री. विजय यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 

ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.  सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते स्व. रविंद्र महाजनी (मरणोत्तर), सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्व. रवींद्र महाजनी यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र गश्मिर महाजनी यांनी तर श्रीमती उषा चव्हाण यांच्यावतीने विजय कोंडके यांनी पुरस्कार स्वीकारला.


चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, सन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक  रवींद्र साठे  आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक  नागराज मंजुळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी चित्रपट समीक्षक अशोक राणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचलन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी केले. 0000

विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आज होणार उद्घाटन.

 


आज ‘करिअर कट्टा’ आणि नारीशक्ती परिसंवाद व चर्चासत्र

युवक-युवतींना करिअरच्या वाटा दाखविण्यासाठी विशेष उपक्रम

लातूर: राज्य शासनामार्फत लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आज, 23 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता उद्घाटन होत आहे. लातूर शहरातील बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात आयोजित मेळाव्यात आज ‘करिअर कट्टा’ व नारीशक्ती परिसंवादाचा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. लातूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय मेळाव्यात महिलांसाठी परिसंवाद आणि तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे या मेळाव्याचा लाभ मराठवाड्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन राज्याचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहेत. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही आभासी पद्धतीने कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहेत.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, कौशल्य व रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार रमेश कराड, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती राहणार आहे.

*आज करिअर मार्गदर्शन शिबिरात....*

*करिअरच्या वाटा दाखविणारे दिनेश पवार यांचे मार्गदर्शन*

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. दिनेश पवार हे करिअर विषयक नव्या संधींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ‘चला करिअरचा मार्ग धरू’, ‘युवक विश्व बदलण्याची शक्ती’ आदी विषयांवरील व्याख्याते, तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अशी त्यांची ओळख आहे. दहावी, बारावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात करिअरच्या योग्य संधी आहेत, याबाबत दिनेश पवार यांचे हे मार्गदर्शन युवक-युवतींसाठी बहुमुल्य ठरणार आहे.

*खास महिलांसाठी ‘नारीशक्ती परिसंवाद व चर्चासत्र’*

करिअर मार्गदर्शन शिबिरामध्ये 23 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी स्वतंत्र परिसंवाद व चर्चासत्र आयोजित करण्यात आले  आहे. यामध्ये वैद्यकीय, शिक्षण, व्यवसाय, उद्योग, प्रशासन यासारख्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामिगिरी करीत असलेल्या महिलांचा सहभाग राहणार आहे. या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी याद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. युवतींसाठी हा परिसंवाद अतिशय महत्वाचा असून त्यांच्या त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त ठरणार आहे.

*‘करिअर कट्टा’चे उत्तम गायकवाड देणार रोजगार, स्वयंरोजगाराचे धडे*

केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय अंगीकृत कंपनी एजुकेशनल कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड अर्थात एडसिल कंपनीचे महाव्यवस्थापक असलेले उत्तम गायकवाड यांचे मार्गदर्शन या शिबिरामध्ये लाभणार आहे. रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधीविषयी ते माहिती देणार आहेत.

*मराठवाड्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे : ना. मंगल प्रभात लोढा*

लातूर येथे 23 व 24 फेब्रवारी 2024 रोजी होणाऱ्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात उद्योग, कृषीपूरक उद्योग, स्वयंरोजगार, कर,  माहिती व तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) याविषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच 24 फेब्रुवारी 2024 रोजी भव्य नमो महारोजगार मेळावा होणार आहे. तरी https://nmrmlatur.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून मराठवाड्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य व रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

Wednesday 21 February 2024

मराठवाड्यातील युवक-युवतींसाठी 23 व 24 फेब्रुवारीला लातूर येथे विभागीय भव्य नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर

 



·        ऑनलाईन नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ कार्यान्वित

मुंबई दि. 18: राज्य शासनाने प्रत्येक महसुली विभागामध्ये नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील युवक-युवतींसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळावा अनुक्रमाने 23 व 24 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर येथे होणार आहे. या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता https://nmrmlatur.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. तरी मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी या संकेतस्थळवर ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन राज्याचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लातूर शहरातील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात येणार आहे. यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर होणार आहे. तसेच 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्यात विविध उद्योजक, व्यावसायिक प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्याकडे असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार युवक-युवती यांची मुलाखतीद्वारे निवड करतील.

23 फेब्रुवारीला मार्गदर्शन शिबिरातून मिळणार करिअरच्या नवीन वाटांची माहिती

दहावी, बारावी किंवा पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय, स्वयंरोजगाराच्या संधी, करिअरच्या नव्या वाटांची माहिती युवक-युवतींना व्हावी, यासाठी नमो महारोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी, 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित आणि तज्ज्ञ व्यावसायिक, उद्योजक यांचे मार्गदर्शन होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), कृषि उद्योग, पर्यटन, आर्थिक गुंतवणूक, नर्सिंग यासारख्या विविध क्षेत्रातील रोजगार, स्वयंरोजगारातील संधीविषयी व्याख्यान, चर्चासत्र आदी कार्यक्रम होतील. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय विभाग, बँकामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहितीही दिली जाणार आहे.

24 फेब्रुवारी रोजी भव्य महारोजगार मेळाव्यातून रोजगाराच्या संधी

नमो महारोजगार मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यातील विविध ठिकाणहून उद्योजक उपस्थित राहून शैक्षणिक पात्रता व मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करणार आहेत. यासाठी 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 पासूनच लातूर शहरातील बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दहावी, बारावी, तसेच विविध विषयातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय (सर्व ट्रेड) आदी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवार या मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत.

रोजगार मेळाव्यासाठी येथे करा ऑनलाईन नोंदणी

मराठवाड्यातील युवक-युवतींनी लातूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिरात उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करावी. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी  https://nmrmlatur.in  हे संकेतस्थळ (क्यू आर कोडसह) कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये ‘उमेदवार’ पर्याय निवडून लॉगीन करावे. त्यानंतर वैयक्तिक माहिती, ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार क्रमांक, महास्वयंम नोंदणी क्रमांक यासह इतर माहिती भरून छायाचित्र, सी.व्ही. (बायोडाटा) अपलोड करावा.

*****