Followers

Saturday 24 February 2024

मेळाव्यात रोजगार मिळाल्याने तरूणाईच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यात हजारो तरूणाईंना मिळाला जॉब








लातूर,  (विमाका) : मराठवाड्यातील विविध शहरांसह गावखेड्यातील तरूणाईने विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात सहभाग घेतला. मेळाव्यात या बेरोजगारांना नामांकित कंपनीत लाखांच्या पॅकेजसह रोजगार मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. असेच मेळावे होत रहावेत, अशा भावनाही तरूणाईने व्यक्त करत शासनाचे आभार मानले.

लातूरच्या बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात दोन दिवसीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सहभागी तरूणाईला देशातील नामांकित कंपन्यांनी मुलाखतीद्वारे निवडले. त्याचबरोबर लागलीच ऑफर लेटरही दिल्याने निवड झालेल्या तरूणाईंचा सत्कार आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 

लातूर जिल्ह्यातील दापका तांड्यावर राहून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण करणारी दिव्या राठोड. वर्तमानपत्रातील जाहिरात पाहून नमो महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झाली. यशस्वीरित्या मुलाखत दिली, अन् तिला महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या नामांकित कंपनीत नोकरीची संधी मिळाली. ही संधी मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावर हास्य होते. शिवाय तिने हा रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले.  

नुकताच आयटीआय उत्तीर्ण होऊन मेळाव्यात सहभागी झालेला १९ वर्षीय प्रमोद शिंदे म्हणाला, या मेळाव्यामुळे मला जॉब मिळाला. यामाहा सुझुकीसारख्या नामांकित कंपनीत अप्रेंटिसशीपची संधी मिळाली. दरमहा २१ हजार ५०० रूपयांचे मला मानधन कंपनीकडून देण्यात येणार आहे. नमो महारोजगार मेळाव्यासारख्या उपक्रमातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो आहे. असे मेळावे होत रहावेत, ही ग्रामीण भागातील युवकांसाठी चांगली संधी असल्याचेही त्याने सांगितले.

 जळकोट तालुक्यातील बागवान अब्दुल सत्तार यानेही आयटीआयचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. सुझुकी मोटर्स कंपनीत ट्रेनी म्हणून रोजगार उपलब्ध झाल्यामुळे खूप आनंद झाल्याचे सांगितले.

लातूरच्या बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात लातूरची रूचा पाटील आणि श्रद्धा कळसे, बीडची अश्विनी गुजर शिकतात. महाविद्यालयातील शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पियाजिओ व्हेइकल या कंपनीत आम्ही मुलाखत दिली. या मुलाखतीत आमची निवड झाल्याने आम्हाला आनंद तर झालाच, परंतु आमची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे होणार असल्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले. तर अमोल चिंचोलकर या बीटेकचे शिक्षण घेत असलेल्या तरूणासही रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने शासनाचे त्याने आभार मानले. 

********************

No comments:

Post a Comment