Followers

Saturday 24 February 2024

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात रोजगार संधीचा खजिना - रोहित पंढारकर



लातूर : शिक्षण, आरोग्य, संरक्षण, कृषी, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, मनोरंजन यासारख्या सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाचे योगदान देत आहेत. या क्षेत्रात येत्या तीन वर्षात जगभरात ४० लाख नोकऱ्यांची संधी आहे, अशी माहिती ओलएक्सचे डेटा सायन्सचे ग्लोबल हेड रोहित पंढारकर यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्यासाठी कोणते शिक्षण घ्यायला हवे आणि त्यातून कोणते रोजगार मिळू शकतील याची माहिती  त्यांनी आज लातूर येथील विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात दिली.  सुरुवातीला श्री. पंढारकर यांच्या वाटचालीचा परिचय माजी मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांनी करून दिला.


जगभरात या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. भले मोठे पगार या क्षेत्रातील लोकांना मिळणार आहेत, भारतात सुद्धा या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे, असे सांगतांना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ? याचा अर्थ खूप साध्या सोप्या शब्दात समजून सांगितला. ते म्हणाले इन्स्टाग्रामवर तुम्ही एखाद्या रिलला लाईक करता, त्यानंतर तुमच्या लक्षात येतं की, त्याच विषयावरच्या इतर रिल तुमच्यासमोर तुम्ही न मागताही समोर येत आहेत म्हणजे काय तर तुमची आवड संगणकाने कोडमध्ये जतन करून ठेवली आहे, तुम्ही क्रिकेट विषयावरील रिल लाईक केली तर सचिन तेंडुलकर, धोनी आणि इतर क्रिकेटरच्या रिल्स तुमच्यासमोर तुम्ही न शोधताही येतात..  कारण तुम्हाला काय आवडतं याचा अंदाज किंवा भाकित संगणकाने किंवा मोबाईलने लावलेलं असतं आणि त्याच विषयावरील इतर गोष्टी ते तुमच्यासमोर सादर करत.


कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक किंवा मशिनकडून आलेली हुशारी. हवमानाचा अंदाज, तुमच्या ह्दयाची गती सांगणारी यंत्रणाही अशाच पद्धतीने काम करते, ज्यामुळे अनेक संकट किंवा धोके टाळण्यास, अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचेही ते म्हणाले. अनेक कंपन्यांची उत्पादनेही याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चाचणीवर पुढे येतात.  कारण ग्राहकाची पसंती आणि गरज यांचे दोन्ही भाकित ते सांगू शकतात.  आपल्या अनेकप्रकारच्या मशिन्समध्ये आपल्याला त्याच्या चालू बंद असण्याचे संकेत मिळतात. वाहन चालवतांना इंधन उपलब्धता दर्शवली जाते या आणि यासारख्या अनेक गोष्टी या याच कृत्रिम बुद्धिमत्तेतून आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात. त्यामुळे या क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन करिअरसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

No comments:

Post a Comment