Followers

Saturday 24 February 2024

'हे शक्य आहे, आधी स्वत:ला सांगा; न्यूनगंड न बाळगता पुढे जा- प्रशांत गिरबने



लातूर :  आज लातूरचे अनेक युवक जगभरात उच्चपदावर काम करत आहेत, काही शेकडो कोटी रुपयांच्या उलाढालीचे  उद्योग व्यवसाय सांभाळत आहेत, ही तीच मुलं आहेत जी आज तुमच्यासारखी सायकलवर शाळेत जात होती… ही तीच मुलं आहेत जी आज देशात येणाऱ्या परकीय चलनात भर घालत आहेत.  शिक्षण सामर्थ्य देते, कौशल्य त्या सामर्थ्याला बळ देतं हे जितकं खरं आहे तितकेच मला हे करणं शक्य आहे हे आधी स्वत:ला सांगितले पाहिजे आणि कुठलाही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकले पाहिजे असे अनुभवाचे बोल आज विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे महासंचालक श्री. प्रशांत गिरबने यांनी सांगितले.


उद्योग आणि उद्योजकता म्हणजे काय या विषयावर श्री. गिरबने उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. सुरुवातीला माजी कौशल्य विकास मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरचे सुपूत्र असलेल्या श्री.गिरबने यांचा परिचय करून दिला.  कामात कितीही व्यग्र असले आणि वेळ देता येत नसला तरी मी लातूरचा आहे हा पासवर्ड सांगितला की श्री. गिरबने यांची वेळ नक्कीच मिळते असं एक गुपितही श्री. निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.


लातूर ते लंडन असा प्रवास करणाऱ्या गिरबने यांनी आपल्या वाटचालीतील अनुभव आज मेळाव्यास उपस्थित युवक युवतींसमोर मनमोकळेपणाने सादर केले.


कोणते ही काम किंवा कौशल्य याला महत्व दिले गेलेच पाहिजे, तुम्ही काय शिकता यापेक्षा ते कसं शिकता यालाही महत्व आहे. वेल्डिंग, फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, थ्री डी प्रिंटर ऑपरेटर यासारख्या अनेक क्षेत्रात खुप नोकऱ्या उपलबद्ध आहेत मग त्या मिळत का नाहीत हा मुलभूत प्रश्न आहे, ज्याच्याकडे लक्ष द्यायला हवे,  यासाठी गरज आहे  उद्योग आणि कंपन्यांच्या मागणीप्रमाणे मनुष्यबळ विकसित करणे याला. उद्योजकांना जाऊन भेटणे, उद्योग, कंपन्यांमधील रोजगार संधींचा शोध घेणे या गोष्टी प्रत्येकाने करायला हव्यात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापलिकडेही खुप रोजगार संधी आहेत ज्याचा शोध आपण घेतला पाहिजे. यासाठी रोजगार मेळाव्यासारखे व्यासपीठ ही खुप महत्वाचे आहे, त्यामुळेच आजच्या या कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित होते.  मरिन इंजिनिअरिंगसारख्या क्षेत्रात वेल्डिंगचे स्पेशलाईज्ड स्किल लागते, ते काम अतिशय कौशल्याचे आहे… तिथल्या वेल्डरला असा भला मोठा पगार मिळतो हे कुणाला खरे वाटेल का असा प्रश्न करून त्यांनी उपस्थितांना अनेक उदाहरणांसह रोजगार संधींमधील कौशल्याचे महत्व, रोजगार संधींचा शोध, त्याची गरज सांगितली. जगभरात इंग्रजी  भाषेला व्यावसायिक भाषा म्हणून स्वीकारले जाते त्यामुळे मातृभाषेचा अभिमान बाळगतांना, व्यावसायिक भाषा म्हणून इंग्रजी भाषा येणं ही गरजेची असल्याचे प्रतिपादन ही त्यांनी केले. 


रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे व्हायला हवे, पदवीपर्यंत शिक्षण घेतलेली मुलं आज आत्मविश्वासाच्या, कष्टाच्या आणि प्रयत्नाच्या बळावर शेकडो कोटी रुपयांच्या उद्योग व्यवसायाची धुरा सांभाळत असल्याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. रोजगार संधीची उपलब्धता करून देणारे असे कार्यक्रम निरंतर व्हायला हवेत, ती काळाची गरज आहे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी मला हे शक्य नाही म्हणण्यापेक्षा अशक्य काहीही  नाही, मी हे करू शकतो हे स्वत:ला सांगत, मी कोणताही न्यूनगंड बाळगणार नाही हे समजवायला हवे, असे झाल्यास माझ्यासारखा लाजरा बुजरा लातूरकर ही मोठी पाऊले टाकू शकतो, हे स्पष्ट केले.

...

 

No comments:

Post a Comment