Followers

Friday 23 February 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे गंगापूर येथे अनावरण ; अहिल्यादेवींचा राज्यकारभार प्रेरणादायक- उपमुख्यमंत्री अजित पवार

 




            छत्रपती संभाजीनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनता सुखी, समाधानी व सुरक्षित रहावी, सामान्य माणसांना न्याय मिळावा यासाठी राज्यकारभार केला. अहिल्यादेवींनी केलेला राज्यकारभार हा  प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गंगापूर येथे केले.

गंगापूर येथील जामगाव टी पॉइंट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज  झाले. आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील, भूषणसिंह राजे होळकर,'राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठान' चे अध्यक्ष रावसाहेब तोगे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, अरुण रोडगे यांच्यासह पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात महिलांचा सन्मान केला.  त्याच भोसले घराण्यात पुढे महाराणी तारामती व होळकर घराण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तबगार महिलांनी उत्तम राज्यकारभार केला. त्यांचा राज्यकारभार आजही प्रेरणादायक आहे.  ते पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी गावाच्या विकासाचा आराखडा तयार करण्याबाबत अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वांना अभिमान वाटावा, असे स्मारक चौंडीत उभारण्यात येईल व त्यासाठी भरीव निधी दिला जाईल. पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथे किल्ला संवर्धनासाठी तातडीने निधी देऊ असेही त्यांनी सांगितले.

अहिल्यादेवींनी बांधलेले बारव तसेच त्यांनी केलेल्या अन्य कामांचे जतन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. बारामतीत एक हजार कोटीच्या निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी केली असून या वास्तूला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव दिले आहे,असेही श्री. पवार यांनी सांगितले. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींचे स्मरण व्हावे, हाच त्यामागील हेतू आहे. आर्थिक व्यवहार काटेकोर असेल तर त्या राज्याची प्रगती होते, हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्य काराभारावरून दिसते. प्रचंड संर्घषातून त्यांनी काम केले. त्याचा हाच आदर्श आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

 भूषणसिंह राजे होळकर म्हणाले, गंगापूर येथे उभारण्यात आलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आपल्याला प्रेरणा देणारे ठरणार आहे. अहिल्यादेवींचे व्यवस्थापन, सैन्यांची व्यवस्था, मानवतावादी विचार, तसेच रयतेकडे त्यांचे असलेले लक्ष या बाबी महत्त्वाच्या असून त्यांचे परराष्ट्र धोरणही अत्यंत महत्त्वाचे आहे. आदर्श राज्य कसे असावे , हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

यावेळी आमदार सतिष चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील, श्री. रावसाहेब तोगे, माजी सभापती अरूण रोडगे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास  परिसरातील नागरिक मोठ्या संख़्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment