Followers

Saturday 24 February 2024

लातूर येथील नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरामुळे हजारोंना मिळाली रोजगाराची संधी.

 









मराठवाड्यातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मिळाले मार्गदर्शन

लातूर : राज्य शासनाने प्रत्येक महसूल विभागात नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून छत्रपती संभाजीनगर विभागाचा मेळावा लातूर येथे 23 व 24 फेब्रुवारी रोजी पार पडला. शासकीय महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात झालेल्या या नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरा त मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. 24 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमधून उद्योजकांनी 4 हजार 548 उमेदवारांची जागेवरच निवड केली. तर 7 हजार 897 जणांच्या निवडीबाबतची कार्यवाही पुढील टप्प्यात होणार आहे. यावेळी झालेल्या करिअर मार्गदर्शन शिबिरालाही युवा वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

जागेवर निवड झालेल्या युवक-युवतींना आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात निवडपत्राचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, प्रेरणा होनराव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत 35 जणांना 1 कोटी 51 लाख 76 हजार रुपये, मुद्रा योजना अंतर्गत 5 व्यक्तींना 18 लाख रुपयांचे धनादेश उपस्थितांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या मेळाव्याचे औचित्य साधून जिल्हा परिषद अंतर्गत 14 संवर्गात अनुकंपा तत्वावर निवड झालेल्या 10 युवक-युवतींना एकाच वेळेस यावेळी नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आले.

इयत्ता दहावी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठीविभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. 23 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश दाखविण्यात आला, तसेच कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते. पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी करिअर विषयी मार्गदर्शन केले.

24 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 पासूनच रोजगार इच्छुक उमेदवारांची नाव नोंदणी आणि प्रत्यक्ष मुलाखतींना सुरुवात झाली. स्वतंत्र सभामंडपात 16 दालनांमध्ये 32 टेबलवर नाव नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उमेदवारांनी भरलेले अर्ज स्वीकारण्यासाठी 14 दालनांमध्ये 28 टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. या मेळाव्यासाठी ऑनलाईन स्वरुपात 18 हजार 530 उमेदवारांनी नोंदणी केली. तर ऑफलाईन स्वरुपात 12 हजार 945 जणांनी नोंदणी केली. तसेच 7 हजार 288 जणांनी स्वयंरोजगारसाठी नाव नोंदणी केली होती. सकाळपासूनच नाव नोंदणीसाठी युवक-युवतींची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी नाव नोंदणी कक्षांना भेटी देवून युवक-युवतींशी संवाद साधला. तसेच विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनीही विविध दालनांना भेटी देवून मुलाखतीला आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.


नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतानुसार उपलब्ध उद्योजक, आस्थापनेची आणि त्यामधील रिक्त पदांची माहिती देण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी मदत कक्ष तयार करण्यात आले होते. तसेच सर्व आस्थापनांची एकत्रित माहिती असलेला फलक दर्शनी भागात लावण्यात आला होता. विविध आस्थापना, उद्योजक यांच्या दालनांसाठी दोन स्वतंत्र सभामंडप उभारण्यात आले होते. यामध्ये तयार करण्यात आलेल्या कक्षांमध्ये उमेदवारांच्या मदतीसाठी एक-एक स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले होते. 264 उद्योग, स्वयंरोजगारविषयक आस्थापनांची दालने याठिकाणी तयार करण्यात आली होती.


नमो महारोजगार मेळावा दिशादर्शक उपक्रम ठरेल : महसूल मंत्री

राज्य शासनाने प्रत्येक विभागामध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून युवा वर्गाला करिअरच्या अनुषंगाने भविष्याची वाटचाल निश्चित करण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे. नागपूरनंतर आता लातूर येथे असा मेळावा होत असून यानंतर राज्यात प्रत्येक महसूल विभागात मेळावे होणार आहेत. या मेळाव्याचे अतिशय चांगले नियोजन झाले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून तीन युवतींना प्रत्येकी सुमारे अडीच लाखांचे पॅकेज मिळाले आहे. याचप्रमाणे इतरही उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याठिकाणी मिळालेल्या मार्गदर्शनातून भविष्यातील संधींचा वेध घेण्यासाठी आत्मविश्वास युवकांना मिळेल. हा आत्मविश्वास युवा वर्गाला उज्ज्वल भविष्य देईल, असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात सहभागी युवक-युवतींना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आगामी काळ हा कौशल्य विकासाच्या कार्यक्रमांचा आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींसाठी नमो महारोजगार मेळावा उपयुक्त ठरणार आहे. जगातल्या अनेक कंपन्या शाश्वत गुंतवणुकीसाठी भारतात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यावसायिक, उद्योग जगतात विश्वास निर्माण केल्याने  उद्योजकांची भारताला पसंती मिळत आहे. तसेच राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे उद्योगांची संख्या वाढणार आहे. अशा उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नमो महारोजगार मेळावे उपयुक्त ठरतील, असे महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले. लातूर येथील नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराच्या यशस्वी आयोजनाबाबत त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच मेळाव्याला उपस्थित युवक-युवतींना शुभेच्छा दिल्या.

स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करा : आमदार संभाजी पाटील निलंगेकर

तरुणांनी स्वतःच्या क्षमता ओळखून त्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपण स्वतःला सिद्ध केले तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो, असे आमदार संभाजी पाटील यावेळी म्हणाले. तसेच नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सर्वांना रोजगार मिळणार नसला तरी या मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला रोजगार मिळण्यासाठी त्यांना यापुढेही रोजगाराच्या संधींची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे त्यांनी सांगितले.


करिअर घडविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक : विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी मेळाव्याला भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, या मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच यावेळी आयोजित मार्गदर्शन शिबिरामुळे युवक-युवतींना भविष्यात करिअरची दिशा निश्चित करण्यास मदत होईल. करिअर घडविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. त्यामधून यश गाठता येते. त्यामुळे येथे मिळालेल्या मार्गदर्शनातून योग्य करिअरची निवड करून युवक-युवतींनी त्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधींची माहिती मिळण्यास मदत : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

मेडिकल एज्युकेशनचे हब म्हणून लातूरची ओळख आहे. यासोबत युवा वर्गाला विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधीची माहिती होण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोणत्या रोजगारासाठी आपण कोणते कौशल्य आत्मसात करावे, याची माहिती या मेळाव्यातून मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.

यावेळी आयोजित मार्गदर्शन शिबिरात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील तज्ज्ञ रोहित पांढारकर यांनी, तर स्टार्टअप मधील संधी व आव्हाने याविषयी राजीव रंजन आणि गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी अनमोल सागर, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. फिजिओथेरेपी व वैद्यकीय करिअरमधील संधी याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

*****

No comments:

Post a Comment