Followers

Wednesday 25 November 2020

मतदान केंद्रावर मुक्कामी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगल्या सुविधा दयाव्यात -जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत

 05-औरंगाबाद पदवीधर निवडणूक कार्यक्रम-2020



*जिल्हयातील 88 मतदान केंद्रावर 41 हजार 189 मतदार बाजावणार मतदानाचा हक्क
*सर्व मतदान केंद्रावर किमान पायाभूत सुविधा असल्या पाहीजेत
*पहिल्या प्रशिक्षणास विना परवानगी गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस दयाव्यात
लातूर,दि.18 (जिमाका)- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 05- औरंगाबाद पदवीधर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी जिल्हयातील 88 मतदान केंद्रावर 41 हजार 189 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. या 88 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांना मतदान केंद्रावर चांगल्या सुविधा संबंधित तहसिलदार, तलाठी यांनी उपलब्ध् करुन दयाव्यात, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित 05- औरंगाबाद पदवीधर निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधिक्षक निखील पिंगळे,अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, सर्व उपविभागीय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की, औरंगाबाद पदवीधर निवडणूकीसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत 88 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या सर्व मतदान केंद्रावर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्यासाठी थंडीच्या अनुषंगाने चांगल्या सुविधा स्थानिक प्रशासनाने उपलब्ध् कराव्यात. तसेच पहिल्या प्रशिक्षणास विना परवानगी गैर हजर असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ दयाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी मतदार यादी वर्किंग कॉपीची अत्यंत दक्षतापूर्वक तपासणी करावी. व जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर किमान पायाभूत सुविधांची खात्री करावी व तसे प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी देऊन जिल्हयातील दिव्यांग मतदार (116) व 80 वर्षापुढील ज्येष्ठ मतदार (23) यांच्या घरी जाऊन त्यांना मतदान केंद्रावर किंवा घरुन मतदान करण्याची सुविधा असल्याची माहिती दयावी. व जे मतदार घरुन मतदान करणार आहेत त्यांच्याकडून फॉर्म-12 ड भरुन घ्यावा, असे ही त्यांनी सूचित केले.
प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअरची व्यवस्था जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी करावी. तर घरुन मतदानाची नोंदणी करणाऱ्या दिव्यांग व जेष्ठ मतदार (80 वर्षे पुढील) यांचे मतदान दिनांक 1 डिसेंबर रोजी करताना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे व्हीडीओ चित्रीकरणसह अनुषंगिक कार्यवाही व नोंदी ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले.
मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी दक्षतापूर्वक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुसरे व दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी तिसरे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सर्व प्रशिक्षणाचा लाभ घेऊन मतदान केंद्रावर एक ही चूक होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले. या निवडणूकीच्या अनुषंगाने प्रिसाईडींग ऑफिसरची डायरी व बॅलेट पेपर अकाऊंट हया महत्वपूर्ण बाबी आहेत. यामध्ये कोणाकडून ही हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी, असे ही त्यांनी सूचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी पोलिस बंदोबस्त, पोस्टल मतदान, प्रशिक्षण, पार्किंग व्यवस्था, आरोग्य सुविधा, वेब कॉस्टींग, पोलिंग पार्टी डिस्पॅच व रिसीव्हींग, कोवीडच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना, स्वीप कार्यक्रम आदिंचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.
प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शिंदे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदान संघ निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने झालेल्या तयारीची माहिती दिली. तसेच पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वीप अंतर्गत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे नियोजन सांगितले.
*****

मतदार ओळखपत्र (EPIC) नसल्यास पर्यायी 9 प्रकारचे पुरावे ग्राह्य

 

उस्मानाबाद:दि,16(जिमाका)आगामी विधानपरिषदेची द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २०२० याकरिता मतदानकरताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर
करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या
व्यतिरिक्त खालील नमूद कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत.
1)आधार कार्ड
2)वाहन चालक परवाना
3)पॅन कार्ड
4)पारपत्र (Passport)
5)केंद्र / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज संस्था किया खाजगीऔद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र
6) मा. खासदार / मा. आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र
7)संबंधित पदवीधर/ शिक्षण मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधरशिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र
8)विश्वविद्याल्याद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र
9)सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांग असल्याचे मुळ प्रमाणपत्र
छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच, छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे किंवा पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील.मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणुक आयोगाचे
दि. १०,११,२०२० रोजीचे मूळ आदेश अंतिम राहतील, अशी सूचना अपर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य, शरद दळवी यांनी केली आहे.

छाननीअंती एकूण 53 उमेदवारांपैकी 45 अर्ज वैध तर 8 अर्ज अवैध

 औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020


औरंगाबाद ,दि.13 (विमाका):- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 च्या अनुषंगाने शुक्रवार, दि.13 नोव्हेंबर 2020 रोजी मतदारसंघातील एकूण 53 प्राप्त नामनिर्देशनपत्राच्या छाननी अंती 45 अर्ज वैध ठरले असून 8 अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) बोराळकर शिरीष (पक्ष : भारतीय जनता पाटी) औरंगाबाद 2) सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) औरंगाबाद 3) अब्दुल रऊफ (पक्ष : समाजवादी पार्टी) औरंगाबाद 4) अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष : राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर 5) कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद 6) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद 7) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष : वंचित बहुजन आघाडी) परभणी 8) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : आम आदमी पार्टी) पुणे 9) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष : वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी 10) सचिन अशोक निकम (पक्ष : रिपब्लिकन सेना) औरंगाबाद 11) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष : अपक्ष ) औरंगाबाद 12) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' (पक्ष : अपक्ष ) नांदेड 13) अक्षय नवनाथराव खेडकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 14) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष) बीड 15) ईश्वर आनंदराव मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 16) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष : अपक्ष) नांदेड 17) अंभोरे शंकर भगवान (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 18) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष : अपक्ष) उस्मानाबाद 19) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 20) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष : अपक्ष) बीड 21) घाडगे राणी रवींद्र (पक्ष : अपक्ष) बीड 22) जयसिंगराव गायकवाड पाटील (पक्ष : अपक्ष), औरंगाबाद 23) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष : अपक्ष), हिंगोली 24) पोकळे रमेश शिवदास (पक्ष : अपक्ष) बीड 25) प्रवीणकुमार विष्णु पोटभरे (पक्ष : अपक्ष) बीड 26) भारत आसाराम फुलारे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 27) ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : अपक्ष) परभणी 28) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) नांदेड 29) राम गंगाराम आत्राम (पक्ष : अपक्ष) लातूर 30) वसंत संभाजी भालेराव (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 31) विजेंद्र राधाकृष्ण सुरासे (पक्ष : अपक्ष) जालना 32) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष : अपक्ष) जालना 33) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 34) विवेकानंद शशीकांत उजळंबकर (पक्ष : अपक्ष) लातूर 35) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 36) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 37) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष : अपक्ष) बीड 38) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 39) शेख गुलाम रसूल कठ्ठु (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 40) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 41) समदानी चॉदसाब शेख (पक्ष : अपक्ष) नांदेड 42) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 43) संजय तायडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 44) संजय शहाजी गंभीरे (पक्ष : अपक्ष) बीड 45) संदीप बाबुराव कराळे (पक्ष : अपक्ष) नांदेड.
अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) अतुल राजेंद्र कांबळे 2) छाया सोनवणे 3) सुनील महाकुंडे 4) प्रविण घुगे 5) प्रदिप चव्हाण 6) विजयश्री बारगळ 7) बळीराम केंद्रे 8) शेख फेरोजमीया खालेद.
****

मतदानासाठी 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा

 पदवीधर मतदारसंघ निवडणूक


औरंगाबाद, दिनांक 9 (विमाका) :- औरंगाबाद विभागाची पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2020 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी 1 डिसेंबर 2020 रोजी कर्मचाऱ्यांना नैमित्तीक रजा मंजूर करावी. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान मंगळवार, दि.1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत होणार असून पदवीधर कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात यावी, ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
****

आदर्श आचार संहितेचे पालन करावे - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक



· जिल्हयातील 33 हजार 67 मतदारासांठी 74 मतदान केंद्रावर मतदान होणार
उस्मानाबाद,दि.4(जिमाका:05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदासंघ निवडणूक प्रक्रिया ही लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रक्रिये सारखीच आहे. त्यानुषंगाने उस्मानाबाद जिल्हयातील सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी आदर्श आचार संहितेच पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कले आहे.
प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 05 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ आयोजित आदर्श आचार संहिता अंमलबजावणी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रताप काळे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर म्हणाले की, जिल्हयातील सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी वर्गांने आदर्श आचार संहितेचे पालन करावे. या निवडणुकी साठी जिल्ह्यात 72 मतदान केद्र व 2 सहाय्यक अशी एकूण 74 मतदान केंद्र निश्चित केली असून एकूण 33 हजार 67 मतदार आहेत. निवडणूकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर किंवा होर्डिंग चौकात, सार्वजनिक ठिकाणी तसेच विद्युत व बीएसएनएलच्या खांबावर राहणार नाही याची जबाबदारी नगरपरिषद क्षेत्रासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांच्यावर निश्चित
करण्यात आली असून त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे बोर्ड किंवा कोनशीला झाकून ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये ढिलाई केल्यास संबंधितावर थेट गुन्हा नोंद करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक कालावधीत शासकीय वाहनाचा वापर राजकीय पदाधिकारी यांच्याकडून होऊ नये यासाठी संबधित अधिकारी वर्गांने दक्षता घेणे आवश्यक आहे. या निवडणुकी साठी ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी कोव्हिड -19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सूचित केले. तसेच सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी मास्क सॅनिटायझर याचा वापर करणे आवश्यक आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतदाना पूर्वी आठ दिवस अगोदरच आरोग्याची ॲन्टीजेन व आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार असून मतदानाच्या ठिकाणी देखील वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या पैकी एकानेही सेल्फ क्वारन्टाईन होऊ नये, अशा सूचना देवून जिल्हाधिकारी म्हणाले की, या निवडणुकी साठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी खातेप्रमुखांनी उपस्थित राहणे बंधनकारक असून निवडणुकी संदर्भात तालुका निहाय प्रशिक्षण देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच निवडणुकीची सर्व प्रक्रिया सर्वांनी आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, असे समजून प्रत्येकाने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री.दिवेगावकर यांनी केले.
**

Tuesday 24 November 2020

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर आदर्श आचारसंहितेचे अमंलबावणी करावी-जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी



जिल्ह्यातील 16 हजार 276 मतदारांसाठी 39 मतदान केंद्रावर मतदान होणार

हिंगोली,दि.03: भारत निवडणूक आयोगाने दिनांक 2 नोव्हेंबर, 2020 रोजी 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम -2020 जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी आदर्श आचारसंहितेची अमंलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्व नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जयवंशी बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांच्यासह औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी जयवंशी पुढे म्हणाले की, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया ही लोकसभा-विधानसभा निवडणूक प्रक्रियेसारखीच आहे. त्यामुळे त्या निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाने ज्या पध्दतीने आदर्श आचारसंहिता लागू केली होती. त्याच पध्दतीने या निवडणूकीसाठी सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी -कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेची अमंलबजावणी करावी अशा सूचना दिल्या.
तसेच या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथकांची व कक्षांची निर्मिती करण्यात आली असून संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले. त्याप्रमाणेच सद्या राज्यात कोवीड साथ रोगाचा प्रादूर्भाव असून या कोविड महामारीच्या कालावधीत होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामूळे सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोवीडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन दिलेली जबाबदारी पार पाडावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
या निवडणूकीसाठी जिल्ह्यात एकूण 16 हजार 276 मतदार आहेत. जिल्ह्यातील 39 मतदान केंद्रावर प्रक्रिया होणार आहे. अद्यापपर्यंत ज्या शासकीय-निमशासकीय कार्यालयात अधिकारी-कर्मचारी पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केली नाही त्यांनी दि. 05 नोव्हेंबर, 2020 पूर्वी मतदार म्हणून नोंदणी करावी. तसेच आचारसंहिता कालावधीत कोणतेही शासकीय कार्यक्रम, उद्घाटन, भूमीपूजन करता येणार नाहीत. अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हा दौऱ्यावर येणारे मंत्री यांना भेटता येणार नाही या सर्व बाबींची योग्य ती दक्षता घेऊन आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सूचित केले.
तसेच दिनांक 2 नोव्हेंबर, 2020 ते 7 डिसेंबर, 2020 या कालावधीत औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती दिली. या निवडणूकीसाठी 16 हजार 276 मतदार असून यात पुरुष मतदार 13 हजार 196, स्त्री मतदार 03 हजार 80 इतकी आहे. जिल्हयातील 39 मतदान कंद्रावर मतदान होणार असून यासाठी 12 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती त्यांनी दिली. या निवडणूकीसाठी जिल्हास्तरावर अप्पर जिल्हाधिकारी हिंगोली तसेच तालुकास्तरावर संबंधीत तहसिलदार यांच्या नियत्रणाखाली आदर्श आचार संहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथके, व्हिडीओ संनिरीक्षण पथके आणि व्हिडीओ चित्रिकरण तपासणी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
या निवडणूकीसाठी 48 मतदान केंद्राध्यक्ष, 144 मतदान अधिकारी, 96 आरोग्य कर्मचारी आणि 48 इतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 ही बॅलेट पेपरवर घेण्यात येणार असून त्यासाठी जिल्हास्तरावर एकूण 162 जम्बो लोखंडी मतपेट्यांचे नियोजन केले असून या मतपेट्या सुस्थितीत असल्याबाबत पडताळणी करुन तयार ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी देऊन सर्व नोडल अधिकाऱ्यांना निवडणुक कालावधीत पार पाडवयाची जबाबदारीची माहिती यावेळी दिली.
05-औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम पूढील प्रमाणे आहे.
अधिसूचना जाहीर करणे दि. 5 नोव्हेंबर,2020 (गुरुवार), नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक 12 नोव्हेंबर, 2020 (गुरुवार), नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 13 नोव्हेंबर, 2020 (शुक्रवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर, 2020 (मंगळवार), मतदानाचा दिनांक 01 डिसेंबर, 2020 (मंगळवार), मतदानाची वेळ सकाळी 08.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत. मतमोजणी दिनांक 03 डिसेंबर, 2020 (गुरुवार), निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिनांक 07 डिसेंबर, 2020 (सोमवार) राहील.
****

05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे -जिल्हा निवडणूक अधिकारी जी.श्रीकांत

 


* जिल्ह्यातील 38 हजार 198 मतदारांसाठी 88 मतदान केंद्रावर मतदान होणार
लातूर,दि.3(जिमाका)- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम -2020 जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी- कर्मचारी यांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्व नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे यांच्यासह औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की,औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया ही लोकसभा-विधानसभा निवडणूक प्रक्रियेसारखीच आहे. त्यामुळे त्या निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाने ज्या पध्दतीने आदर्श आचारसंहिता लागू केलेली होती.त्याच पध्दतीने या निवडणूकीसाठी सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे त्यांनी सूचित केले.
तसेच या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक पथकांची व कक्षांची निर्मिती करण्यात आलेली असून संबंधित नोडल अधिकाऱ्यांकनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले.त्याप्रमाणेच सद्या राज्यात कोवीड साथ रोगाचा प्रसार झालेला असून त्यामध्ये ही होणारी निवडणूक पहिली आहे.तर सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोवीडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन दिलेली जबाबदारी पार पाडावयाची असल्याचे त्यांनी सूचित केले.
या निवडणूकीसाठी जिल्हयात एकूण 38 हजार 198 मतदार आहेत. तर 88 मतदान केंद्रावर प्रक्रिया होणार असून यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिककाऱ्यांना संबंधित विभाग व विभाग प्रमुखांनी वेळेत कार्यमुक्त करावयाचे आहे. तसेच या अधिकाऱ्यांना आरोग्याची कोणतीही समस्या नसावी याची दक्षता घ्यावी,असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले.
अद्यापपर्यंत ज्या शासकीय-निमशासकीय कार्यालयात अधिकारी -कर्मचारी पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केली नाही त्यांनी त्वरित मतदार म्हणून नोंदणी करावी. तसेच आचार संहिता कालावधीत कोणतेही शासकीय कार्यक्रम, उद्घाटन, भूमीपूजन करता येणार नाहीत. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हा दौऱ्यावर येणारे मंत्री यांना भेटता येणार नाही, या सर्व बाबींची योग्य ती दक्षता घेऊन आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले.
प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सूचिता शिंदे यांनी दिनांक 2 नोव्हेंबर 2020 ते 7 डिसेंबर 2020 या कालावधीत औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती दिली.या निवडणूकीसाठी 38 हजार 198 मतदार असून यात पुरुष मतदार 29 हजार 661, स्त्री मतदार 8 हजार 535 व इतर मतदार संख्या 2 इतकी आहे. जिल्हयातील 88 मतदान कंद्रावर मतदान होणार असून 31 झोन असून 45 क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्याप्रमाणेच 424 मतदान केंद्राध्यक्षाची आवश्यकता असून मतदानासाठी 212 जेम्बो मतपेटया लागणार आहेत, अशी माहिती श्रीमती शिंदे यांनी देऊन सर्व नोडल अधिकाऱ्यांनी निवडणुक काळात करावयाच्या कामाची माहिती दिली.
05-औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम पूढील प्रमाणे आहे.
अधिसूचना जाहीर करणे दि. 5 नोव्हेंबर,2020 (गुरुवार),नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक 12 नोव्हेंबर, 2020 (गुरुवार),नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 13 नोव्हेंबर, 2020 (शुक्रवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर, 2020 (मंगळवार), मतदानाचा दिनांक 01 डिसेंबर, 2020 (मंगळवार), मतदानाची वेळ सकाळी 08.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत. मतमोजणी दिनांक 03 डिसेंबर, 2020 (गुरुवार), निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिनांक 07 डिसेंबर, 2020 (सोमवार) राहील.
*****

Wednesday 21 October 2020

शेतकऱ्यांनी धीर धरावा, शासन खंबीरपणे पाठीशी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे




*शासनाकडून शेतकऱ्यांना समाधानकारक मदत करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार*
*मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार दीर्घकालीन उपाय योजनांचे प्रस्ताव सादर करावेत*
*पावसाचा पॅटर्न बदलत आहे, त्याप्रमाणे प्रशासनाने तयारी ठेवावी*
*उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी व पुरामुळे 128 लोकांचे जीव वाचवल्याबद्दल मुख्यमंत्र्याकडून प्रशासनाचे कौतुक*
उस्मानाबाद, दि.21(जिमाका):- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसून येत आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची दैनंदिन माहिती प्रशासनाकडून घेतच होतो. परंतु आज येथील शेतकरी बांधवांना भेटून त्यांना दिलासा दिला आहे. तरी शेतकऱ्यांनी धीर धरावा शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांना समाधान मदत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत च्या आढावा बैठकीत केले.
या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हा परिषद चे अध्यक्ष अस्मिता कांबळे, आमदार सर्वश्री ज्ञानराज चौगुले, राणाजगजितसिंह पाटील, कैलास घाडगे -पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक केएम मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी कौस्तुभ
दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांच्यासह जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचली पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने शासनाकडे सर्व प्रस्ताव त्वरित पाठवावेत. शासनाकडून शेतकऱ्यांना समाधानकारक दिलासा देऊन लवकरच सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे आहेत, असे त्यांनी सांगितले.
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना सुचवाव्यात व त्याबाबतचा जिल्हा आराखडा तात्काळ सादर करावा तसेच हा आराखडा करत असताना त्यात कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे त्याचाही काम निहाय क्रम कामनिहाय क्रम ठरवून घ्यावा. मराठवाड्याच्या लातूर उस्मानाबाद हा भाग भूकंपप्रवण आहे त्या शक्यतेचा विचार करून प्रशासनाकडून पुढील काळात या भागात कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यावरील उपाय योजना सुचवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
संपूर्ण राज्यात पावसाचा पॅटर्न बदलत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडून त्याचे आपत्तीत रूपांतर होईल याचा अंदाज बांधता येत नाही. काटगाव तालुका तुळजापूर येथील पुलावरून आठ ते दहा फूट इतके पाणी गेले त्यामुळे या भागातील पिकांची मोठी हानी झाली असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी पुढील काळात ठेवावी लागेल असेही सांगितले.
सोयाबीन गंजी च्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडून विमा संरक्षण मिळण्याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल. तसेच जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी व या पुराच्या
काळात जिल्ह्यातील 128 नागरिकांचे प्राण वाचून जीवित हानी होऊ दिली नाही त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कामाचे तसेच नुकसानीच्या पंचनाम्याचे काम चांगले सुरू असल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले.
राज्यातील मंदिरे खुली करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोविड चा प्रसार होऊ नये यासाठी मंदिरे सुरू केलेली नाहीत. एकाच वेळी सर्व गोष्टी सुरू केल्याने परदेशांमध्ये कोविडची पुन्हा मोठी लाट आलेली दिसून येत आहे. तसेच सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी माझे कुटुंबाची जबाबदारी मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन कोविड चा प्रतिबंध करावा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
यावेळी महसूल मंत्री थोरात यांनी अतिवृष्टीने सोयाबीन तूर ऊस कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुरामुळे जमिनीही खरडून गेलेल्या आहेत. तरी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे विहिरीमध्ये गाळ साठलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेतून तो गाळ काढता येईल असे सांगितले तसेच रोहियो तुन पाणंद व शेत रस्ते घेता येतील असेही त्यांनी सूचित केले.
पालकमंत्री शंकराव गडाख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यतील 3 लाख 74 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन हे पीक होते व अतिवृष्टीने या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले असून आतापर्यंत 50 ते 60 टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी जवळपास 50 ते 60 कोटी खर्च येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार राणाजगजितसिंह सिंह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या
समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही मराठवाड्यातील पाटील जिल्ह्यातील अतिवृष्टी व पंचनाम्याची माहिती सादर केली.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी ची माहिती देऊन ऑक्टोबर महिन्यात दोनशे मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगितले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील एक लाख 56 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची प्राथमिक माहिती असून प्रशासन आतापर्यंत एक लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचून पंचनामे पूर्ण केलेले आहेत उर्वरित पंचनामे पूर्ण करण्याची कार्यवाही वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीच्या काळात वीज पडून दोन नागरिकांचे प्राण गेले त्यामुळे प्रशासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश देण्यात आले.
*काटगाव तालुका तुळजापूर येथील पीक नुकसानीची पाहणी*
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक नुकसान या पाहणी ची सुरुवात काटगाव तालुका तुळजापूर येथील शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करून झाली. यावेळी येथील पुलावरून आठ ते दहा फूट पाणी गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी देऊन यामुळे सोयाबीन, ऊस व द्राक्ष या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी येथील शेतकऱ्यांना धीर दिला व शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असून या नुकसानीबाबत लवकरच मदत देणार असल्याचे सांगितले यावेळी हरिदास माळी व इतर शेतकर्यांची मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. तसेच काटगाव ग्रामस्थांची भेट घेऊन आज येथे तुम्हाला भेटण्यासाठी व या आपत्तीच्या परिस्थितीत दिलासा देण्यासाठी आलो असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. तसेच यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कात्री अपसिंगा तालुका तुळजापूर या गावास भेट देऊन तेथील पीक नुकसानीची पाहणी केली

सर्व शक्तीपणाला लावून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 





उस्मानाबाद,दि.21(जिमाका):- मी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला आलो  असून या भागातील शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी खचलेले आहेत. शेतकऱ्यांनी खचून न जाता त्यांनी धीर धरावा. सरकार म्हणून आम्ही सर्व शक्तीपणाला  लावून त्यांना मदत करून पुन्हा उभे करणार असल्याचा  विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांशी संवाद साधताना दिला.

तुळजापूर तालुक्यातील कात्री या गावी अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची व खरडून वाहून गेलेल्या जमिनीची दि.21 ऑक्टोबर रोजी ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांनी पाहणी केली आणि गावातील शेतकऱ्यांशी ग्रामपंचायतच्या प्रागंणात  संवाद साधुन त्यांची आसवे पुसत त्यांना धीर दिला. यावेळी  राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे,खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.राणाजगजितसिंह पाटील,आ.कैलास घाडगे-पाटील,आ. ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,  कात्रीचे सरपंच किशोर गोडगिरे,  अपसिंगाचे सरपंच वैशाली गोरे,उपसरपंच दिपक सोनवणे आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सद्या ताबडतोबीने काय करायचे ? आम्ही  या भागातील कुठून व कशा प्रकारचे नुकसान झाले आहे हे पाहीले असल्यामुळे  एकही नुकसानग्रस्त शेतकरी पीक नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही यासाठी व्यवस्थीतरित्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असून निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करेल असे आश्वासनही  त्यांनी दिले.

 

यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. यामध्ये अपसिंगा येथील अर्चना युवराज पाटील, सुवर्णा लोके, हिराबाई दत्तु कटकधोंड यांना तात्पुरत्या स्वरूपात  प्रत्येकी  30 हजार रूपयांचे धनादेश देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुख्यमत्रयासह सर्व मंत्री महोदयांनी अपसिंगा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला

***

Wednesday 30 September 2020

मानवतेची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 


कोरोनामुळे होणा-या मृत्युदराचे प्रमाण शुन्य टक्क्यावर आणण्याचा निर्धार- डॉ. तात्याराव लहाने


मुंबई दि. 30 : शासकीय रूग्णालयातील डॉक्टरअधीक्षकप्राध्यापकप्रमुख व्यवस्थापिका (मेटरन), स्वच्छता निरीक्षक आणि सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी कोरोना महामारीच्या संकट काळात निष्ठेने सेवा करीत आहेत. या सर्व कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

कोविड १९ या जागतिक महामारीच्या काळात मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालयद कामा ॲण्ड ॲलब्लेस रूग्णालयगोकुलदास तेजपाल (जीटी) रूग्णालय आणि जे.जे. रूग्णालयातील कोविड वॉरियर्सचा राजभवन येथे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनंदनपर भाषणात राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणालेमाता-पिता-गुरू आणि देव यांचे आयुष्यातील स्थान महत्वाचे आहे. यामध्ये आपण देवाला पाहिले नाही परंतुजेव्हा प्रकृती खराब होते, तेव्हा आपल्याला डॉक्टरच आठवतात आणि हेच आपल्यासाठी देव आहेत. कोरोनाच्या रूग्णांना अतिशय प्रेमाने आणि माणुसकीने शासकीय रुग्णालयात उपचार देण्यात येत आहेत. राजभवन येथील अनेक कर्मचा-यांना कोरोनाने ग्रासले होतेमात्र आज सर्व ठणठणीत आहेत. अशाचप्रकारे आर्थिकदृष्ट्या गरिब रूग्णही पूर्णत: स्वस्थ होणे गरजेचे आहे आणि तेच आपले कर्तव्य असूनपुढेही आपल्याकडून असेच कार्य सुरू रहावे. या कालावधीत कार्यरत असणाऱ्या ज्या  वैद्यकिय कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना श्रद्धांजली अर्पण करूनत्यांच्या कुटुंबियांना सुदृढ आरोग्य लाभावे, ही भावनाही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

            वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनचे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणालेडॉक्टरअधीक्षकप्राध्यापकप्रमुख व्यवस्थापिका (मेट्रन), स्वच्छता निरीक्षक आदींसोबत वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच कर्मचारी उत्तम काम केले आहे. सुरुवातीला कोविड-१९ संदर्भात अधिक माहिती नसल्याने अनेक अडचणींना आणि रूग्णांच्या मृत्युला सामोरे जावे लागत होते. मात्रया परिस्थितीतही सर्व डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी तत्परतेने कार्यरत आहेत. सुरुवातीला तीनच लॅब होत्या मात्र आज १५४ लॅब१४९० व्हेंटीलेटर१६५० आयसीयु बेडतीन लाख सात हजार बेड१८ मेडिकल कॉलेज उपलब्ध आहेत. सुरुवातीला मृत्युदर ५० टक्के होता. आज २.६ टक्के आहे आणि हाच मृत्युदर शुन्य टक्क्यावर नेण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गतही काम सुरू असूनशुन्य टक्के मृत्युदरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य लवकरच पुर्ण करू, असेही डॉक्टर लहाने यांनी यावेळी सांगितले.

            कार्यक्रमात राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांनी अनुभव कथन केले. जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित मानकेश्वरराज्याच्या कोवीड लॅबरॉटरीचे नियंत्रक डॉ. सचिन मुलकुटकर आदींसह ३३ कोविड वॉरियर्सना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


Monday 28 September 2020

अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारलाही साकडे घालू - कृषि मंत्री दादाजी भुसे

 


नांदेड (जिमाका) दि. 27:-  मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहे. परभणी, हिंगोली नंतर आता नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. मी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशीही संवाद साधतो आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनस्तरावर आम्ही प्रयत्नशील असून ही सर्व परिस्थिती केंद्र सरकारच्याही निदर्शनास आणून देत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले. नांदेड तालुक्यातील कासारखेडा या गावातील शिवारांची त्यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   

 

पूरभाजी तुकाराम शिंदे या शेतकऱ्याने कृषि मंत्र्यांचे लक्ष वेधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. त्यांनी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लावलेले सोयाबिन हातचे गेले आहे. शिंदे व इतर शेतकऱ्यांना कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी धीर देत जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल याबाबत दक्षता घेण्याचे आदेश कृषि विभागाला दिले.

 

परभणी,‍ हिंगोली आणि आता नांदेड येथील अतिवृष्टीच्या भागात मी पाहणी करत असून लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सर्व जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. शासनस्तरावरुन याबाबत आम्ही योग्य तो विचार करत असून केंद्र सरकारला लवकरच याबाबत आहे ती वस्तुस्थिती मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असेही त्यांनी स्पष्ट केले.


अतिवृष्टीने शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे -कृषिमंत्री दादाजी भुसे

 



*अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करावेत*
*राज्यातील पीक नुकसानीच्या सर्व पंचनाम्याचे संकलन करून केंद्र शासनाला अहवाल सादर करणार*
*पी. एम. किसान योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळण्यासाठी महसूल व कृषी विभागाने संयुक्त मोहीम राबवावी*
*महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील 30 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 19 हजार 500 कोटीचा लाभ*
*कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पुनर्वित्त पुरवठा झाला पाहिजे*
*विकेल ते पिकेल व स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार व ग्राहकांना शेतकऱ्यांचा माल थेट पोहोचविणार*
*पिक विमा बाबत शेतकऱ्यांच्या ऑफलाइन तक्रारी प्रशासनाने स्वीकारण्याचे निर्देश*
*अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेत मराठवाडा व विदर्भाला अधिक प्राधान्य देणार*
*सर्व बँकाकडून शेतकर्यांना सन्मानजनक वागणूक मिळालीच पाहिजे*
लातूर/उस्मानाबाद, दि.27(जिमाका):- राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे शेती पिकामध्ये पाणी साचले जाऊन सोयाबीन, तूर ,कपाशी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच काही पिकांना जागेवरच कोंबे आलेली आहेत. तरी प्रशासनाने नुकसान झालेल्या सर्व शेती पिकांचे पंचनामे त्वरित करून प्रस्ताव सादर करावेत. राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लातूर व उस्मानाबाद या दोन्हीही जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा व कृषिविषयक योजनांच्या आढावा बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी संसदीय कार्य, पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय चौगुले, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने, ऊस्मानाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कृषी मंत्री भुसे पुढे म्हणाले की, लातूर व उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या सर्व शेतीपिकांचे पंचनामे करून नोंदी घ्याव्यात. या सर्व माहितीचे संकलन करून केंद्र शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच नुकसानीबाबत केंद्रीय पथकाने पाहणी करावी याबाबत केंद्राकडे मागणी केली जाणार आहे. राज्य शासन ही सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
पी एम किसान योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळण्यासाठी अधिक गतिमान पद्धतीने काम करावे. महसूल व कृषी विभागाने यासाठी एक संयुक्त मोहीम राबवावी व या मोहिमेच्या माध्यमातून या योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी देऊन लातूर जिल्ह्यातील तीन लाख 17 हजार शेतकऱ्यांना तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 2 लाख 79 हजार शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत आहे. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा पहिला हप्ता मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सूचित केले.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना ही देशातील एकमेव अशी योजना आहे की अत्यंत कमी कालावधीत व कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही राज्यातील जवळपास 30 लाख 50 हजार शेतकरी बांधवांना राज्य शासनाकडून 19 हजार 500 कोटी चा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना बँकाकडून पुनर्वित्त पुरवठा झालेला आहे का नाही याबाबतची माहिती प्रशासनाने घ्यावी व त्या प्रत्येक शेतकऱ्याला पुनर्वित्त पुरवठा मिळवून द्यावा असेही त्यांनी सूचित केले.
खरिप पेरणीच्या सुरुवातीस सोयाबीन बियाणांच्या उगवणीबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. या बियाणांची पडताळणी करुन अनेक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर काही कंपन्याचे परवाने रद्द करण्यात आले. त्यामूळे पुढील पेरणीकरीता शेतकऱ्यांनी स्वत:चे बियाणे तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारचे बियाणे काढून ठेवावे याबाबत कृषि विभागाने प्रबोधन करावे. माननीय मुख्यमंत्री यांनी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरु केली असून ग्राहकांची जी मागणी आहे, त्याच पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे यासाठी प्रयत्न केले जाऊन शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार आहे व ग्राहकांनाही शेतकऱ्यांचा थेट माल पोहोच केला जाणार असल्याची माहिती श्री. भुसे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेअंतर्गत मराठवाडा व विदर्भाला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी शिक्षण घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांना सक्षम केले जाणार आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला झाला असल्याने रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढणार आहे, त्यामुळे प्रशासन व कृषी विभाग यांनी खते व बियाण्याच्या तयारीबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी असे निर्देश श्री भुसे यांनी दिले.
बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरु आहे. यासाठी गोडाऊन, शितगृहे, वाहतूक, प्रक्रीया उद्योग आदीबाबत नियोजन करुन शेतकरी उद्योजक निर्मित उत्पादन करण्यात येणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगून बँकांनी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. तसेच बँकाकडून पीक कर्जाच्या वेळेस शेतकर्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे दिसून येत आहे, त्याबाबत बँकांनी योग्य ती दक्षता घेऊन सर्व शेतकऱ्यांना सन्मानजनक वागणूक द्यावी अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही, असे निर्देश त्यांनी दिले. व यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी निर्देशीत केले.
लातूर जिल्ह्यात सततचा पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित सुरू करण्यात आली त्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. तसेच लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार घाडगे पाटील, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यु पवार, आमदार विजय चौगुले यांनी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणे, पीक विम्याचे ऑफलाईन अर्ज स्वीकारणे, पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणे, शेततळे, उस्मानाबाद व लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करणे आदी मागण्या करून त्याबाबत सकारात्मक विचार करावा व शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी असे आवाहन केले.
प्रारंभी लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गवसाने यांनी लातूर जिल्ह्यात सरासरीच्या 108 टक्के पाऊस झालेला असून 60 पैकी 24 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे व एकूण 99 हजार 551 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. उस्मानाबाद चे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या 103 टक्के पाऊस झालेला असून 21 मंडळात शंभर टक्के पाऊस झालेला असून सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती दिली तर 41 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे त्यांनी सांगितले.
*वांजरवाडा ता. जळकोट येथील पीक नुकसानीची पाहणी*
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील अतिवृष्टीने व सततच्या पावसाने शेती पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन केली. या भागातील सोयाबीनच्या पिकात पावसाचे पाणी साचल्याने पिके पिवळी पडली असून सोयाबीनच्या शेंगांना कोंबे आल्याचे त्यांनी पाहिले. यावेळी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याबरोबरच कृषि सह संचालक श्री. जगताप व उदगीरचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. तीर्थकर उपस्थित होते.

नांदेडच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक




▪️“माझे कुटूंब माझी जबाबदारी” आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनातर्फे सादरीकरण
नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करतांना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी लॉकडाउन सारखे उपाय योजून भागणार नाही. प्रत्येक कुटूंबाने आपली जबाबदारी ओळखत सुरक्षितता बाळगली तर जनजीवन सुरळीत होण्यासह रोजगार सुरक्षित होण्यास मोठा हातभार लागेल. यासाठी शासन पातळीवरुन जिल्हा प्रशासनाने “माझे कुटूंब माझी जबाबदारी” मोहिम कल्पक व प्रभावीपणे राबवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे या मोहिमेंतर्गत लोकसहभागासाठी कल्पक नियोजन केल्याबद्दल कौतुक केले. एखाद्या कुटूंबात कुणाला आरोग्य विभागाने गृहविलगीकरणाचा सल्ला दिला तर त्याला ही प्रक्रिया सहज आणि सुलभ लक्षात यावी व याचबरोबर अत्यावश्यक असलेली औषधोपचार देता यावीत यासाठी एक कल्पक कीट तयार करण्यात आले. या कीटचेही त्यांनी कौतुक करुन इतर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नबाब मलिक, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विशेष पोलीस महानिरिक्षक, जिल्हा पोलीस अधिक्षक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक आदी अधिकारी उपस्थित होते.
नांदेड जिल्हा प्रशासनाची सर्व टिम परस्परांशी योग्य समन्वय राखत कोविड-19 च्या या काळात अतिशय चांगले काम करीत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील आरोग्य सुविधेच्यादृष्टीने ऑक्सीजन वाहतुकीसाठी टँकरची उपलब्धी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेवा-सुविधा विस्तारासाठी करावे लागणारे नियोजन याकडे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सहमती दर्शविली. याबाबत तातडीने हा प्रश्न मार्गी लावू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
नांदेड जिल्ह्याचा विस्तार मोठा असून त्याप्रमाणात आव्हाने जास्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या आव्हानावर यशस्वी मात करता येणे जिल्हा प्रशासनाला सुकर झाले असून “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या मोहिमेच्या जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या मोहिमेंतर्गत गृहविलगीकरणासाठी आरोग्याच्यादृष्टिने एक परिपूर्ण अशी कीट तयार करण्यात आली असून ज्या व्यक्तींना वैद्यकीय टिमने विलगीकरणासाठी सूचविले आहे अशा व्यक्तींना ही किट दिले जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले. या कीटमध्ये मास्क, गृहविलगीकरण मार्गदर्शीका, अत्यावश्यक औषधे, डेटॉल साबण आदी साहित्य ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात या मोहिमेत अधिकाधिक सेवाभावी संस्थांचा सहभाग घेण्याचे नियोजन केले असून लोककला, पारंपारिक कला यांचा आरोग्य साक्षरतेसाठी प्रभावी उपयोग करु असे ते म्हणाले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख, डॉ. शरद पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पहाणी

 



*अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विहिरी, नदी काठावरील बंधाऱ्याचे पंचनामे करण्याचे निर्देश*
लातूर/उदगीर ,दि.26(जिमाका): उदगीर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसाने मुग , तुर सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे पर्यावरण, संसदीय कार्य पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.
उदगीर तालुक्यातील नागलगाव, सुमठाण, धडकनाळ येथील अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहाणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली. यावेळी उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तालुका कृषी अधिकारी श्री नाबदे, बस्वराज पाटील नागराळकर, पंचायत समिती सभापती प्रा.शिवाजी मुळे , कल्याण पाटील, चंदन पाटील नागराळकर व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यमंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. नुकसानग्रस्त एक ही शेतकरी पंचनामे पासून वंचित राहता कामा नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच नुकसान झालेल्या पीकाचे विमा मिळण्यासाठीचे अर्ज शेतकऱ्यांनी तात्काळ भरावे यासाठी कृषी विभागाने आँनलाईन /आँफलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बनसोडे यांनी केले. तसेच भारतीय कृषी विमा कंपनीने या नुकसानीचे पंचनामे बाबत अत्यंत तातडीने कार्यवाही पूर्ण करून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी असे निर्देश त्यांनी दिले.
या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे , नदी काठावर शेतकऱ्यांचे बंधारे वाहून गेले आहेत तसेच बंधाऱ्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे अशाचे सुद्धा पंचनामे करण्यात यावेत. या शेतकऱ्यांना मदत व पुनर्वसन विभागामार्फत मदत करण्यात येईल, आश्वासन राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी उदगीर उपविभागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती दिली. प्रशासनाकडून पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे ची कारवाई सुरू असून येथील एक ही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.