Followers

Tuesday 24 November 2020

05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे -जिल्हा निवडणूक अधिकारी जी.श्रीकांत

 


* जिल्ह्यातील 38 हजार 198 मतदारांसाठी 88 मतदान केंद्रावर मतदान होणार
लातूर,दि.3(जिमाका)- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम -2020 जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी- कर्मचारी यांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्व नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे यांच्यासह औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की,औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया ही लोकसभा-विधानसभा निवडणूक प्रक्रियेसारखीच आहे. त्यामुळे त्या निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाने ज्या पध्दतीने आदर्श आचारसंहिता लागू केलेली होती.त्याच पध्दतीने या निवडणूकीसाठी सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे त्यांनी सूचित केले.
तसेच या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक पथकांची व कक्षांची निर्मिती करण्यात आलेली असून संबंधित नोडल अधिकाऱ्यांकनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले.त्याप्रमाणेच सद्या राज्यात कोवीड साथ रोगाचा प्रसार झालेला असून त्यामध्ये ही होणारी निवडणूक पहिली आहे.तर सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोवीडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन दिलेली जबाबदारी पार पाडावयाची असल्याचे त्यांनी सूचित केले.
या निवडणूकीसाठी जिल्हयात एकूण 38 हजार 198 मतदार आहेत. तर 88 मतदान केंद्रावर प्रक्रिया होणार असून यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिककाऱ्यांना संबंधित विभाग व विभाग प्रमुखांनी वेळेत कार्यमुक्त करावयाचे आहे. तसेच या अधिकाऱ्यांना आरोग्याची कोणतीही समस्या नसावी याची दक्षता घ्यावी,असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले.
अद्यापपर्यंत ज्या शासकीय-निमशासकीय कार्यालयात अधिकारी -कर्मचारी पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केली नाही त्यांनी त्वरित मतदार म्हणून नोंदणी करावी. तसेच आचार संहिता कालावधीत कोणतेही शासकीय कार्यक्रम, उद्घाटन, भूमीपूजन करता येणार नाहीत. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हा दौऱ्यावर येणारे मंत्री यांना भेटता येणार नाही, या सर्व बाबींची योग्य ती दक्षता घेऊन आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले.
प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सूचिता शिंदे यांनी दिनांक 2 नोव्हेंबर 2020 ते 7 डिसेंबर 2020 या कालावधीत औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती दिली.या निवडणूकीसाठी 38 हजार 198 मतदार असून यात पुरुष मतदार 29 हजार 661, स्त्री मतदार 8 हजार 535 व इतर मतदार संख्या 2 इतकी आहे. जिल्हयातील 88 मतदान कंद्रावर मतदान होणार असून 31 झोन असून 45 क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्याप्रमाणेच 424 मतदान केंद्राध्यक्षाची आवश्यकता असून मतदानासाठी 212 जेम्बो मतपेटया लागणार आहेत, अशी माहिती श्रीमती शिंदे यांनी देऊन सर्व नोडल अधिकाऱ्यांनी निवडणुक काळात करावयाच्या कामाची माहिती दिली.
05-औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम पूढील प्रमाणे आहे.
अधिसूचना जाहीर करणे दि. 5 नोव्हेंबर,2020 (गुरुवार),नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक 12 नोव्हेंबर, 2020 (गुरुवार),नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 13 नोव्हेंबर, 2020 (शुक्रवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर, 2020 (मंगळवार), मतदानाचा दिनांक 01 डिसेंबर, 2020 (मंगळवार), मतदानाची वेळ सकाळी 08.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत. मतमोजणी दिनांक 03 डिसेंबर, 2020 (गुरुवार), निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिनांक 07 डिसेंबर, 2020 (सोमवार) राहील.
*****

No comments:

Post a Comment