Followers

Tuesday 5 November 2019

लोहा-कंधार तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची मंत्र्यांकडून पाहणी





नांदेड दि. 5 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सा.उ.), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या सर्व मान्यवरांनी लोहा तालुक्यातील जाणापुरी, सोनखेड, अंबेसांगवी, किरोडा आणि कंधार तालुक्यातील गुलाबवाडी, घोडज येथील अतिवृष्टी व बेमोसमी पावसामुळे बाधित झालेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी यासह अन्य पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हाती आलेले संपूर्ण पिकं वाया गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी आलेल्या संकटामुळे खचून न जाता धैर्याने सामोरे जावे. आपणास मदत मिळवून देण्यासाठीच हा पाहणी दौरा करत आहोत. आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शासन आणि प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. स्थानिक पातळीवर आमचे कार्यकर्ते प्रशासनाशी संपर्क साधून आहेत, असा दिलासाही उध्दव ठाकरे यांनी दिला.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे टाकले आहे, याची जाणीव झाल्यामुळेच आम्ही आपली भेट घेऊन धीर देण्यासाठी आलो आहोत. शासनातर्फे योग्य अशी मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता राज्य शासनाने दहा हजार कोटी रुपयांची आपल्या मदतीसाठी तरतूद केली आहे. यात आणखी वाढ करण्याचे प्रयत्न केले जातील, असे सांगून मंत्री महोदयांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास दिला.
या पाहणी दौऱ्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, उपविभागीय अधिकारी पी. एस. बोरगावकर, संबंधित तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.
***

No comments:

Post a Comment