Followers

Thursday 16 April 2020

प्रत्येक गावात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अँटी कोरोना फोर्सची स्थापना -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत


* प्रत्येक गावातील तरुणांनी अँटी कोरोना फोर्स मध्ये सहभागी व्हावे

* या फोर्समध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांना प्रशासनाकडून प्रशस्तीपत्र मिळणार

लातूर, दि.16:- केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 3 मे 2020 पर्यंत लॉक डाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्यानुषंगाने लातूर जिल्ह्यात ही संचारबंदीचे आदेश जारी केलेले आहेत. जिल्ह्याच्या प्रत्येक गावात कोरीना विरुद्ध लढण्यासाठी गावातीलच पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी, सैन्य भरतीची तयारी करणारे विद्यार्थी व विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन कोरोना विषाणूचा आपल्या गावात शिरकाव होणार नाही यासाठी अँटी कोरोना फोर्स (ACF)ची निर्मिती केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.
           जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. प्रशासनाच्या दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून विविध प्रकारचे आदेश देण्यात आलेले असून पोलीस विभाग त्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही गावातील तरुण मंडळींनी एकत्र येऊन आपल्या गावात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होणार नाही यासाठी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी गावातील पोलीस व सैन्य भरतीची तयारी करणारे विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षा ची तयारी करणारे विद्यार्थी व गावातील माजी सैनिक यांनी एकत्रित येऊन आपल्या गावाचा कोरोना पासून संरक्षणासाठी अँटी कोरोना फोर्सची (#AntiCoronaForce) स्थापना करावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.
         लॉक डाऊनच्या पहिल्या 21 दिवसाच्या टप्प्यात लातूर जिल्ह्याच्या एक ही स्थानिक नागरिकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. परंतु बाहेरून आलेले आठ यात्रेकरू त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. यातील तीन व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले असून उर्वरित पाच व्यक्ती ही लवकरच निगेटिव होतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी व्यक्त केली.
      पहिल्या टप्प्यात लातूरकर नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्याने लातूर जिल्ह्यात स्थानिक एकही रुग्ण कोरोना बाधित नाही. त्यामुळे दिनांक 15 एप्रिल ते 3 मे 2020 या कालावधीत  म्हणजेच लॉक डाऊन च्या दुसऱ्या टप्प्यात ही लातूर जिल्हा नाबाद राहिला पाहिजे. म्हणजेच जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसला पाहिजे यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून जिल्ह्यातील नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी अँटी कोरोना फोर्स च्या माध्यमातून आपल्या गावाच्या सीमेवर/प्रमुख रस्त्यावर चेक पोस्ट तयार करावेत व गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गावात येण्याचे कारण विचारले पाहिजे व तो व्यक्ती अधिकृत असेल तरच त्याला गावात प्रवेश दिला जावा अन्यथा बाहेरील व्यक्ती गावात येणारच नाही याची दक्षता घ्यावी. जर कोणी व्यक्ती पुणे, मुंबई व जिल्ह्याच्या बाहेरून आलेले असेल तर त्याबाबतची माहिती तात्काळ जवळच्या आरोग्य विभागाला देऊन त्या व्यक्तीचे आरोग्य तपासणी करावी. त्याप्रमाणेच गावातील एकही व्यक्ती विनाकारण गावाच्या बाहेर जाणार नाही याबाबतही ही अँटी कोरोना फोर्स मधील तरुणांनी काळजी घेतली पाहिजे. गावातील प्रत्येक व्यक्तीकडून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन  फोर्स मधील तरुणांनी करून घ्यावे अथवा लक्ष ठेवावे, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले.
     अँटी कोरोना फोर्स मधील प्रत्येकी दोन-दोन तरुणांची एक तुकडी करून  गावात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यावर चेक पोस्ट तयार करून त्याठिकाणी तीन शिफ्टमध्ये या फोर्समधील तरुणांनी काम करावे. एका चेकपोस्टवर दोन तरुण याप्रमाणे गावातील दोन तीन प्रमुख रस्त्यावर दोन-दोन च्या गटाने व तीन शिफ्टमध्ये या तरुणांनी चेक पोस्टवर काम केल्यास आपल्या गावात कोणीही त्रयस्थ व्यक्ती येणार नाही व गावातील कोणतीही व्यक्ती विनाकारण गावाबाहेर जाणार नाही यावर शंभर टक्के नियंत्रण राहील. व यातून आपले गाव कोरोना विषाणूच्या संसर्गापासून शंभर टक्के दूर राहील. याप्रकारे प्रत्येक गावात ACFची स्थापना झाल्यास संपूर्ण लातूर जिल्हा कोरोना मुक्त होण्यास मदत होणार आहे असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी स्पष्ट केले.
       गावातील सरपंच, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी आपल्या गावात अँटि कोरोना फोर्सची स्थापना त्वरित करून घ्यावी. प्रत्येक गावातील तरुणांनी या फोर्स मध्ये सहभागी व्हावे. कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या गावामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अँटी कोरोना फोर्स मधील तरुणांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिली.
      केंद्र राज्य व जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूचा प्रतिबंधासाठी विविध उपाय योजना राबवत आहे. त्यासाठी नागरिकांनी ही तेवढेच आपले सहकार्य अथवा योगदान देणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक गावातील तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावात एसीएफ ची स्थापना करावी व आपल्या गावाचे कोरोना विष्णुपासून संरक्षण करावे व या  विषाणूला  जिल्हा, देश व जगातून हद्दपार करण्याच्या मोहिमेत आपले योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
"कोरोना या संसर्गजन्य आजारविरोधात लढा देण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन लढा देणे आवश्यक आहे.कोरोना प्रतिबंधक उपाययोजना मध्ये Social distancing पाळणे ही सर्वात महत्वाची आणि आवश्यक उपाययोजना आहे.Social distancing सक्रिय रित्या पाळले जावे यासाठी आपण लातूर जिल्ह्यामध्ये अँटी कोरोना फोर्स तयार करत आहोत.पोलीस दलातील भरती साठी तयारी करणारे युवक,स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक,सशस्त्र दलातील सेवानिवृत्त कर्मचारी, केंद्र व राज्य शासनाचे सेवानिवृत्त कर्मचारी आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे युवक यांनी प्राधान्याने   https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdV7N_VV9-ZiHopREwEHYq0z_EVdeWe5-RfFUoeu3-J-5U--g/viewform या लिंक वर जाऊन आपली नोंदणी अँटी कोरोना फोर्स मध्ये करावी"
             जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातूर.

 
 


No comments:

Post a Comment