Followers

Tuesday 28 April 2020

उदगीर शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढणार नाही यासाठी उपाययोजना राबवाव्यात -पालकमंत्री अमित देशमुख




* कृषीशी निगडित सर्व उद्योग सुरू  करण्यास परवानगी तात्काळ द्यावी
* लातूर जिल्हा सर्वात अगोदर ट्रॅक वर आला पाहिजे
* काळ्याबाजारात धान्य विक्री करणाऱ्या रेशन दुकानांचे परवाने निलंबित करावेत
* आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव  
   पाठवावा
*  लातूर जिल्ह्यात व शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवली पाहिजे
* पोर्टेबिलिटी द्वारे लाभार्थ्यांना धान्य वाटप झाले पाहिजे
* खाजगी रुग्णालये सुरु न ठेवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा
* प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ई-पास बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी

लातूर, दि.28:- उदगीर शहरात कोरोना  कोविड-19 बाधित तीन रुग्ण आढळून आलेले आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने उदगीर शहरात व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी कोविड-19 आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या  उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

     शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व लॉक डाउन मधील शिथिलता अंतर्गत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी पर्यावरण व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी सुनील यादव, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप कुलकर्णी, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेशकुमार मेघमाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, तहसीलदार स्वप्निल पवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
      पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की,  उदगीर शहरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या घराशेजारील सर्व कुटुंबाची आरोग्य तपासणी झाली पाहिजे. त्याप्रमाणेच कोरोनाचा प्रार्दुभाव उदगीर शहराच्या इतर भागात होणार नाही याकरिता प्रशासनाने अधिक प्रभावीपणे उपायोजना राबवाव्यात. तसेच उदगीर शहरातील कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजना राबविण्यासाठी प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच पोलीस व आरोग्य विभागाने कोरोना पॉझिटिव्ह  केसचा सोर्स शोधून काढावा, असे ही त्यांनी सूचित केले.
    केंद्र व राज्य शासनाने लॉक डाऊन च्या दुसऱ्या टप्प्यात कृषी संबंधित सर्व उद्योग सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. तरी जिल्हा प्रशासनाने उपरोक्त उद्योग सुरू करण्याची परवानगी मागणाऱ्या उद्योजकांना तात्काळ परवानग्या प्रदान कराव्यात.  तसेच उद्योग ठिकाणी ये-जा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना व कामगारांना आवश्यक ट्रॅव्हल पासेस बाबत कृषी सचिवांशी बोलून निर्णय घ्यावा अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केल्या.
    लातूर जिल्ह्यातील 80 टक्के उद्योग हे कृषी क्षेत्राशी निगडित आहेत. त्यामुळे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी यांनी उद्योजकांनी सेल्फ डिक्लेरेशन दिल्यानंतर तात्काळ उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात याव्यात. लातूर मध्ये असलेले सर्व उद्योग सुरू होण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी व लातूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुरू होऊन आपला लातूर जिल्हा लवकरच ट्रॅकवर यावा यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
     लातूर जिल्ह्यातील नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे एप्रिल 2020 मधील अन्नधान्य वाटपाची माहिती घेऊन पालकमंत्री देशमुख यांनी प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचल्याची प्रशासनाने खात्री करावी अशा सूचना देऊन जे रेशन दुकानदार काळ्याबाजारात अन्नधान्याची विक्री करत आहेत त्या दुकानदारांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत असे निर्देश ही त्यांनी दिले. त्याप्रमाणेच शासनाने जूनअखेरपर्यंत लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप करण्याचे दिलेल्या सूचना प्रमाणे पुरवठा विभागाने कार्यवाही करावी असेही त्यांनी सूचित केले.
  जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणाली(SOP) प्रमाणेच  व्यवहार झाले पाहिजेत याबाबतची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा उपनिबंधक यांची राहील असे सांगून पालकमंत्री देशमुख यांनी सध्याच्या आपत्तीकालीन परिस्थितीच्या अनुषंगाने अहमदपूर जळकोट या भागात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवावा असेही त्यांनी सूचित केले.
     लातूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नोंद झाली पाहिजे व परजिल्ह्यातील आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविले पाहिजे. त्याप्रमाणेच लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व रस्त्यावर जे चेक पोस्ट तयार करून त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक वाहनाची व व्यक्तीची नोंद ठेवण्यात यावी. याकरीता आवश्यक मनुष्यबळ महापालिकेने उपलब्ध करावे असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
   जिल्ह्यातील 11 हजार 477 रेशन कार्ड धारकांना पोर्टेबिलिटी द्वारे अन्नधान्य वाटप करण्यात आल्याचे दिसून येत आहे तरी सदरचे धान्य संबंधित लाभार्थ्याला मिळाले की नाही याबाबतची खात्री करून घ्यावी तसेच नवीन रेशन कार्ड मिळण्यास पात्र असलेल्या लाभार्थ्यांनाही अन्नधान्य वाटप करावे अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या. व एक ही नागरिक अन्नधान्य पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.
   जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्सना पीपीई किट, मास्क हे त्यांच्या मागणीप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपलब्ध करून द्यावेत. तसेच जी रुग्णालये आरोग्य सेवा चालू ठेवणार नाहीत त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्यावर कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महामार्गावरील अवैध वाहतुकीबाबत योग्य ती कारवाई करावी. तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पासेस देण्याबाबत जनजागृती करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रूग्णालयात कोरोना विषाणूची लागण होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
       जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना फोर्सचे काम अतिशय चांगले असल्याचे सांगून राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण त्या त्या नागरिकांच्या गावाच्या बाहेरच करावे. तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमेवरील  चेक पोस्टवर पोलीस विभागाने अत्यंत दक्ष राहून काम करावे असेही त्यांनी सूचित केले. त्याप्रमाणेच उदगीर तालुक्यातील काही गावांमध्ये आंध्र, कर्नाटक  व तेलंगणा या राज्यातील किमान शंभर ते दोनशे ट्रक रोज ये-जा करत आहेत त्याठिकाणी कोणता उद्योग आहे का व त्या वाहनांना कोणी पासेस दिले याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने माहिती घेऊन अहवाल द्यावा असे निर्देशही श्री बनसोडे यांनी दिले. तसेच उदगीर शहर कंटेनमेंट झोनमध्ये प्रत्येक कुटुंबाची व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करावी असेही त्यांनी सूचित केले.
  उदगीर शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तीन दिवस कर्फ्यु चे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. तसेच तीन किलोमीटरच्या परिघाचे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला असून त्या भागातील अडीच हजार कुटुंबांचे आरोग्य तपासणी करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली तसेच शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील उद्योगांना परवानगी देण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. त्याप्रमाणेच पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनी पोलीस विभागामार्फत बजावण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली तसेच संबंधित विभाग प्रमुख आणि त्यांच्या विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती बैठकीत सादर केली.

No comments:

Post a Comment