Followers

Monday 13 April 2020

प्रत्येक व्यक्तीला तीन महिने अन्नधान्य कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी -पालकमंत्री अमित देशमुख


* अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक व्यक्तीने सामाजिक अंतर पाळावे
* घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाने मास्क अथवा रुमालचा वापर करावा
* रेशन कार्ड न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्ड दयावे
* कोरोनाच्या अनुषंगाने प्रत्येक शासकीय कार्यालयाचा स्टॅडर्ड ऑपरेटींग प्लॉन तयार
करावा

  लातूर,दि.13-सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जिल्हयातील  प्रत्येक व्यक्तीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांपर्यंत अन्नधान्य कमी पडणार नाही याची योग्य ती दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक  कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  सभागृहात कोरोना कोव्हीड-19 च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हयातील एका ही व्यक्तीला अन्नधान्य कमी पडणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच शेल्टर कॅम्प मधील सर्व बेघर, स्थलांतरित मजुरांना ही अन्नधान्याचा मुबलक पुरवठा झाला पाहिजे. जिल्हयाच्या प्रत्येक व्यक्तीला पुढील तीन महिन्याच्या काळात योग्य प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
 कोरोना विषाणूच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन जिल्हयात झाले पाहिजे. त्याप्रमाणेच जिल्हयाच्या प्रत्येक शासकीय कार्यालयाचा स्टँडर्ड ऑपरेटींग प्लॅन तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
कोरोना विषाणूबाबत नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. परंतु शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.त्याप्रमाणेच अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने, औषधी दुकाने, दुध डेअरी, भाजीपाला व फळ विक्रेते यांनी तोंडावर मास्क घालावा अथवा तोंडाला रुमाल बांधावा. तसेच सामाजिक अंतर  (सोशल डिस्टींनिंग) चे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था व लातूर महापालिकेने पुढील 30 दिवसात बायो मेडिकल वेस्ट प्लँट कार्यान्वित करण्याचे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी देऊन लातूर महापालिकेने शहराच्या हद्दीत पोलिस विभागाच्या मदतीने चेक पोस्ट निर्माण करावीत, असेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणेच कोरोनाच्या अनुषंगाने महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश दिले. दंडाची रक्कम एक हजार पर्यंत ठेवावी, असे सांगितले.
आरोग्य विभागाने व्यक्तींचे थ्रेाट स्वॅब जागेवर जाऊन घ्यावेत. प्रत्येक व्यक्तीला रुग्णालयात पाठविण्याची आवश्यकता नाही. तसेच कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला तर प्रशासनाची पूर्ण तयारी  असली पाहिजे. तसेच पोलीस विभागाचाही ताण वाढला जाईल, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
तसेच कोरोनाबाबत प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे.  दिनांक 14 एप्रिल नंतर कदाचित लोकांची ये-जा वाढणार आहे. त्यावेळी  पोलीस विभागाने शासनाच्या नियमांनुसार काम करावे. गावातील पोलिस पाटील,कोतवाल यांचीही  ग्रामस्तरावर मदत घ्यावी, असे श्री.देशमुख यांनी सांगितले.
जिल्हयातील मजूर, हमाल व शेतमजूर यांना ही अन्नधान्य मिळेल याकरिता प्रशासनाने उपाय योजावेत. तसेच जिल्हयातील भटके/ विमुक्त कुटुंबे एका जागी वास्तव्य करत नाहीत परंतु रेशनकार्डसाठी पात्र आहेत अशा लोकांना रेशन कार्ड दयावे, असे ही पालकमंत्री  देशमुख यांनी सूचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून  प्रशासनाने केलेल्या विविध उपाय योजनांची माहिती दिली. तर आरोग्य यंत्रणेने  दिलेल्या विविध सुविधांची माहिती डॉ. ढगे व डॉ. ठाकूर यांनी दिली. तर पोलीस विभागाच्या कामाची माहिती पोलीस अधीक्षक माने यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाने राबविलेल्या उपाय योजनांची माहिती घेऊन त्या उपाय योजनांची अधिक कार्यक्षमपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. तर जिल्हयातील नागरिकांनी घरात बसून रहावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, कामासाठी बाहेर जात असाल तर मास्क वापरावा, असे आवाहन ही  त्यांनी  केले.
                                    ***

No comments:

Post a Comment