Followers

Friday 24 April 2020

खरीप हंगामात बी-बियाणे उगवण क्षमतेबाबत एकाही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी -पालकमंत्री अमित देशमुख




* कृषी विभागाने फलोत्पादनात नवीन प्रयोग करावेत 
*जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी शेततळे घ्यावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे
* गाव हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळावे
* वीज जोडणी ची मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कृषी पंपाला वीज जोडणी वेळेत मिळाली पाहिजे
* बी-बियाणे व कृषी निविष्ठांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी

लातूर, दि.24:- कृषी विभागाने मागील वर्षी प्रमाणे सोयाबीन व इतर पिकांच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी येणार नाहीत याची यावर्षीच्या खरीप हंगामात योग्य ती दक्षता घ्यावी. व उच्च प्रती उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांचा पुरवठा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला पाहिजे, याबाबतचे काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश वैद्यकीय व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
       शासकीय विश्राम गृहाच्या सभागृहात आयोजित खरीप-2020 हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी संसदीय कार्य व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, कृषी सहसंचालक श्री जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने ,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीनिवासुलू, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे यांच्यासह कृषी विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. तर ऑनलाइन मीटिंग मध्ये माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर , लातूरचे खासदार सुधाकरराव शृंगारे ,उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार सुरेश धस, औसाचे आमदार अभिमन्यू पवार, अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
      पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्याकडून बियाण्यांच्या  उगवण क्षमतेबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तरी त्या तक्रारीच्या अनुषंगाने खरीप हंगाम 2020 मध्ये बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही यासाठी कृषी विभाग व महाबीजने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. त्याप्रमाणेच खरीप हंगामाच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्याला आवश्यक असलेला विविध प्रकारच्या खतांचा पुरवठा वेळेत झाला पाहिजे, ऐन हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येणार नाही. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बी बियाणे व इतर सर्व कृषी निविष्ठांची कमतरता भासणार नाही याचीही दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
          मागीलवर्षी लातूर जिल्ह्याला रब्बी हंगामासाठी एक ही विमा कंपनी मिळालेली नव्हती. यावर्षी असे होणार नाही याबाबत कृषी विभागाने काळजी घ्यावी. तसेच पिक विमा मंजूर करताना गाव हे केंद्र मानून शेतकऱ्यांच्या पिकाला विमा संरक्षण मिळाले पाहिजे, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. व जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवावा असे आवाहन त्यांनी केले.
          जिल्ह्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे नियोजन केलेले दिसून येत आहे. परंतु कृषी विभागाने फलोत्पादनात नावीन्यपूर्ण प्रयोग राबवावेत. लातूर जिल्ह्याचे हवामान खजूर व इतर कोणत्या फळपिकासाठी पोषक आहे त्याची माहिती घेऊन शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करावे व शेतकऱ्यांना फलोत्पादनात नवीन प्रयोग राबविण्याबाबत प्रोत्साहित करावे अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केल्या.

           जिल्ह्यात एकूण तीन हजार शंभर शेततळे आहेत.  त्यामुळे तीन हजार 100 हेक्टर क्षेत्र सिंचित झालेले दिसून येते. परंतु कृषी विभागाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेततळे घेण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाण्याची सोय उपलब्ध होईल व त्यांना हंगामी उत्पादन घेऊन त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होईल यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत असे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.
          मागेल त्याला शेततळे या धरतीवर मागेल त्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर देता येईल का? याबाबत संबंधित विभागाने माहिती घ्यावी. या लॉक डाउन च्या कालावधीत अनेक मजूर इतर जिल्ह्यातून परत आपल्या मूळ जिल्ह्यात आलेले आहेत; त्या मजुरांच्या हाताला ही मागेल त्याला सिंचन विहीर या योजनेतून काम मिळेल असे श्री. देशमुख यांनी सांगितले. त्याप्रमाणे जिल्ह्याचे सिंचित क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे आवाहन ही त्यांनी केले.
          जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रमुख पिक सोयाबीन आहे. तरी कृषी विभागाने सोयाबीन फूड ग्रेड आहे की नॉनफूड ग्रेड आहे तसेच जीएम आहे का? याची सविस्तर माहिती घ्यावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या. त्याप्रमाणेच पानगाव येथे जिनिंग फॅक्टरी आहे. त्यामुळे अहमदपूर -जळकोट या भागात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतची कार्यवाही संबंधित विभागाने करावी असे निर्देश त्यांनी दिले.
          जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी 1556 वीज जोडण्या कृषीपंपासाठी देण्यात आलेल्या आहेत. परंतु 1912 वीज जोडण्याचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. तरी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांनी पैसे भरूनही वीज जोडण्या प्रलंबित ठेवणे चुकीचे आहे. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून प्रत्येक मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी पंपासाठी वीज जोडणी तात्काळ देण्याचे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.
        यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तसेच ऑनलाइन मीटिंग द्वारे आमदार संभाजी पाटील निलंगेकर व खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही बी-बियाणे, खते व शेतीमाल खरेदी केंद्राबाबत सूचना मांडल्या. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मागील वर्षी रब्बी हंगामात लातूर जिल्ह्यात एक ही विमा कंपनी येण्यास उत्सुक नसल्याची माहिती दिली. त्याप्रमाणेच मागेल त्याला विहीर बाबत शासनाने लातूर जिल्ह्याला पाच हजार सिंचन विहिरीचे उद्दिष्ट दिलेले आहे त्या अंतर्गत कार्यवाही करण्याबाबत कृषी विभागाला सूचित केले. तसेच ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या लेखी सूचना घेऊन त्याबाबतच्या कार्यवाहीची माहिती त्यांना लेखी स्वरूपात प्रशासनाच्यावतीने देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने यांनी पीपीटी द्वारे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीतील माहितीचे सादरीकरण केले. यामध्ये या मध्ये जिल्ह्याचे पर्जन्यमान, कृषी विभागाची सर्वसाधारण माहिती, खरीप हंगामातील प्रमुख पिके,   खरीप हंगाम 2019 ची ठळक वैशिष्ट्ये, रब्बी हंगाम 2019 ची ठळक वैशिष्ट्ये, फलोत्पादन व शेततळ्यांची संख्या आदीबाबत माहिती सादर केली.
          या बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख यांनी बियाण्याची उगवणक्षमता, बियाणे व खतांचा पुरवठा शेततळे, सिंचन विहीर, प्रधानमंत्री पिक विमा योजना, शेतीशाळा, बीबीएफ, मत्स्यव्यवसाय, कृषी पंपांना जोडणी, मृद आरोग्य पत्रिका, कृषी विस्तार कार्यक्रम, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, रेशीम लागवड, पिक विमा, फलोत्पादन कार्यक्रम, आपत्कालीन पीक नियोजन आदी बाबींचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना मार्गदर्शन सूचना दिल्या.

No comments:

Post a Comment