Followers

Monday 20 April 2020

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्पयात ही जिल्हयाच्या सर्व सीमा कडेकोटपणे बंद कराव्यात-पालकमंत्री अमित देशमुख




 
* जिल्हावासियांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये
* नाका-तोंडावर मास्क लावणे व  सामाजीक अंतर पाळणे बंधनकारक
* लातूर महापालिकेसह सर्व नगर पालिकांच्या हद्दीत चेकपोस्ट निर्माण करावेत
* परजिल्हा व परराज्यातील एक ही व्यक्ती जिल्हयात येणार नाही याची दक्षता घ्यावी
* पोलीस विभागाने दुचाकी-चारचाकी वाहनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी

लातूर,दि.20:- केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लॉकडाऊनचा कालावधी 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या या दुसऱ्या टप्प्यात लातूर जिल्हयात एक ही कोरोनाबाधित रुग्ण् नाही. त्यामुळे लातूर जिल्हयाच्या सर्व जिल्हा सीमा व राज्य सीमांवर कडेकोट नाकाबंदी करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
         शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय व महापालिकेच्या बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते.यावेळी संसदीय कार्य, भूकंप पुर्नवसन, पाणी पुरवठा, सार्वजिनिक बांधकाम, रोजगार हमी योजना व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर  चंद्रकांत बिराजदार    पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांच्यासह सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
        पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, जिल्हयाच्या बाहेरील एक ही व्यक्ती आपल्या जिल्हयात येणार नाही यासाठी सर्व जिल्हा सीमा व राज्य सीमांवर नाकाबंदी करावी. पोलीस विभाग व परिवहन विभागाने दक्षता घेण्याचे निर्देश दिले.त्याप्रमाणेच चेकपोस्टवर हाय रिझोल्युशनचे सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत. कोणत्याही प्रकारे बाहेरील अनाधिकृत व्यक्ती जिल्हयात येणार नाही या बाबत सतर्क रहावे, असे त्यांनी सूचित केले.
     लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेबरोबरच कृषि व कृषि आधारित उद्योग-व्यावसायांना परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु या बाबत महापालिका व प्रशासनाने योग्य त्या उपाय योजना राबवून शहरी भागात नागरिकांची गर्दी होऊ देऊ नये. प्रत्येक ठिकाणी सामाजीक अंतराचे नियम पाळले पाहीजेत. तसेच नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरात बसूनच प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच घराबाहेर पडताना नाका-तोंडावर मास्क लावावा किंवा रुमाल बांधावा व सामाजीक अंतराचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.
       दुचाकीवर फक्त एकच व्यक्ती व चारचाकीमध्ये वाहनचालक व दुसरी एक व्यक्ती यांनाच परवानगी आहे. तरी विनाकारण दुचाकी चारचाकी वाहन चालकांनी घराबाहेर पडू नये. या नियमांचे पालन न करणाऱ्यावर वाहनांवर पोलीस विभागाने कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.शहरी भागाच्या हद्दीबाहेरील धाबे, गॅरेज सुरु करण्याची परवानगी असली तरी या ठिकाणी सामाजीक अंतराचे पालन होत नसल्याचे निर्देशनास आल्यास ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.
      लातूर महापालिकेने शहरात प्रवेश करण्याच्या सर्व सहा ठिकाणांवर चेक पोस्ट तयार करुन नाकाबंदी करावी. शेतकऱ्यांना कृषि विषयक खरेदीसाठी मुभा असेल परंतु प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच लातूर शहरासह इतर सर्व नगर पालिकेच्या हद्दीबाहेरील रस्त्यावर चेक पोस्ट तयार करुन नाकाबंदी करावी, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले. महानगरपालिकेने आवश्यक असेल तरच बांधकाम परवानगी बाबतची कार्यवाही करावी. प्रत्येक चेक पोस्टवर वैद्यकीय अधिकारी, पोलीस कॉन्स्टेबल, महापालिका/नगरपालिकाचा कर्मचारी ठेवावा. त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची तपासणी व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.
        रमजान या सणास दिनांक 24 एप्रिल पासून सुरुवात होत आहे. तरी महापालिका व पोलीस  विभागाने शासनाच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी. पोलीस विभाग व परिवहन विभागाने परस्परांत समन्वय ठेवून जिल्ह्यात कोठेही अवैध वाहतूक होणार नाही याची  दक्षता घ्यावी. शासनाने ज्या आस्थापना चालू ठेवण्यास सांगितले आहे त्यासाठी आवश्यक परवानग्या प्रशासनाकडून घ्याव्यात, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले.
         जिल्हयातील नागरिकांनी कोरोनाच्या अनुषंगाने स्वत:हून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. त्याप्रमाणेच जिल्हयात कोठूनही इतर जिल्हयातील व्यक्ती आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ संबंधित शासकीय यंत्रणेला दयावी. जो पर्यंत संपूर्ण जग कोरोनामुक्त होणार नाही तोपर्यंत नागरिकांनी नियमांचे पालन करुन दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.
      जिल्हयाच्या राज्यसीमांवर अधिक दक्षता घ्यावी. हैदराबादहून येणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी अधिक कडक करावी, अशी सूचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली. त्याप्रमाणेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये याकरिता लहान लहान आजारावरील उपचारासाठी उदगीर येथे फिवर क्लिनीक व मोबाईल व्हॅन निर्माण केल्याची माहिती त्यांनी दिली.
   यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लॉकडाऊनच्या काळात महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी लातूर शहरात प्रवेश करणाऱ्या वासनगाव पाटी, वोरवटी, 12 नंबर पाटी, महाराणा प्रमाप नगर, पोलीस मुख्यालयासमोर बाभळगाव व कळंब टी पाईंट या सहा ठिकाणी चेक पोस्ट निर्माण करुन नाकाबंदी केल्याची माहिती दिली. त्याप्रमाणेच लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सुमारे 6 हजार वाहनचालकांकडून 26 लाखांचा दंड वसूली केली तर 350 वाहने जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ही विविध उपाय योजनांची माहिती दिली.

No comments:

Post a Comment