Followers

Friday 17 April 2020

जिल्हयातील महिला बचत गटानी बनवला कोरोनाच्या लढाईत यशाचा लातूर पॅटर्न…..




*जिल्हयातील 65 महिला बचत गटांचा मास्क उत्पादनात सहभाग, 600 हून अधिक ग्रामीण महिलांच्या हाताला लॉकडाऊन च्या काळात काम
*3 लाख 50 हजाराहून अधिक मास्क ची विक्री करून  37 लाखाची उलाढाल
*मास्क उत्पादन व विक्री मध्ये लातूर जिल्हयाचा प्रथम क्रमांक, मास्क ची घरपोच विक्री

लातूर,दि.17:- कोरोनाच्या संकटात आता जिल्हयातील महिला बचत गटही मदतीसाठी सरसावले आहेत. कमी खर्चात दर्जेदार मास्क तयार करुन लोकापर्यंत पोहोचविण्याचे काम जिल्हयातील महिला बचत गट करीत आहेत.महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत  कार्य करणाऱ्या 65 गटातील महिलांनी आतापर्यंत 3 लाख 50 हजाराहून अधिक मास्क तयार करुन देण्याचे काम विविध गटातील 600 महिलांच्या मार्फत केले आहे. आणि या मास्क विक्री च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात लातूर जिल्हा प्रथम येऊन सर्वासमोर यशाचा लातूर पॅटर्न तयार केला आहे.
        जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अभियान व्यवस्थापन कार्यालय हे काम जोरदारपणे करीत आहे. जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे व जिल्हा व्यवस्थापक विपणन वैभव संग्राम गुराळे, जिल्हा व्यवस्थापक संस्था बांधणी अनिता माने, जिल्हा व्यवस्थापक वित्तीय समावेशन नीलेश सोमानी,सर्व तालुका अभियान व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांनी या कोरोनाच्या संकटातही संधी शोधण्याचे काम केले आहे. सतत लोणचे,पापडासह त्याच त्याच उत्पादनात व विक्रीत अडकलेल्या जिल्हयातील बचत गटांना या कोरोनाच्या लढयात सहभागी करुन घेतले आहे.
सध्या चांगल्या दर्जाच्या मास्कचा तुटवडा आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी महिला बचत गटांना मास्क तयार करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले आहे. सध्या सर्व लॉकडाऊन काळात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये या कारणाने सर्वांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. तसेच विना मास्क रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींकडून दंड वसूल केला जात आहे. त्यामुळेच प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या व शेजारील राज्यातील अनेक ग्राम पंचायतीकडून विविध NGO व संस्थांकडून ,शासकीय कार्यालयाकडून गटांच्या महिलांना मास्कची मागणी येत आहे. 

No comments:

Post a Comment