Followers

Thursday 30 April 2020

यशोगाथा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्यातून भूमच्या खवा क्लस्टरमध्ये 200 टन खव्याची कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणूक


यशोगाथा:
  



* पाच हजार तरुणांना कोल्डस्टोरेजचा आधार
 * या कालावधीत दहा लाख लिटर दूध संकलित

कोविड-१९ च्या आपत्ती मधील लॉकडाऊन परिस्थितीत मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील खवा बनवणाऱ्या छोट्या खवा व दुध उत्पादक शेतकरी या व्यवसायीकांना आलेल्या अडचणीच्या परिस्थतीत खवा क्लस्टर भूम ठरले वरदान.
         मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम,कळंब,वाशी येरमाळा, सरमकूंडी फाटा, या गावांना खवा व पेढा उत्पादनाचे कोठार म्हणून ओळखले जाते. राज्याच्या कानाकोपर्यात व परराज्यातही या ठिकाणावरुन खवा पाठवला जातो. खवा तयार करण्याची नैसर्गिक पद्धती व गुणवत्ता उत्तम असल्यामुळे या ठिकाणी तयार होणाऱ्या खव्याला चांगली मागणी असते. खवा व्यावसायामुळे या परिसरामधील लोकांना चांगील आर्थिक संपन्नता आली आहे. गेल्या अनेक कालावधीपासून राज्यामध्ये दुग्ध व्यावसाय हा शेतीपूरक व्यावसाय म्हणून केला जातो. दुग्ध व्यावसयाचे होणारे बाजारीकरण  व दुधाची वाढती मागणी यामुळे शेतकरी वर्गाला देखिल उभारी मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत या ठिकाणी सहकाराची गंगा कमी प्रमाणात पोहचली आहे. त्यामुळे या ठिकाणी चालणारा दुग्ध व्यावसाय हा खवा व्यावसायावर अवलंबून आहे.  हंगामानुसार येथील खव्याला चांगली मागणी असते, त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकर्यांना देखील चांगला दर मिळतो. राज्यामधील दुध संघाच्या दराच्या तुलनेत खवा उत्पादक व्यावसायिकांचा दर उच्च असतो. तसेच दुधाच्या पैशासाठी शेतकऱ्याना दुध संघाप्रमाणे थांबण्याची गरज नसते. खवा उत्पादक व्यापाऱ्याकडून सात दिवसाला मोबदला दिला जातो तसेच काही खवा व्यापारी शेतकऱ्यांना गाई पण खरेदी करून देतात त्यामुळे येथील लोकांची पहिली पसंती खवा व्यावसायाला आहे.
        साधारण 1960-1962 च्या कालावधीत खवा व्यावसायाला या परिसरामध्ये सुरूवात झाल्याचे येथील जाणकार सांगतात. मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले दुध व खवा तयार करण्यासाठी लागणारे इंधन म्हणून लाकूड या दोन गोष्टी या परिसरात मोठ्या प्रमाणात  असल्यामुळे या परिसरात खवा व्यावसायाला सुरूवात झाली. प्रारंभीच्या कालावधीत ग्रामिण भागात दुध संकलन करण्यासाठी दूध डेअरी हा प्रकार नव्हता त्यामुळे या परिसरात उत्पादित होणारे संपूर्ण दुध हे खवा व्यावसायासाठी जात असे. दुध मोठ्याप्रमाणात उपलब्ध असल्यामुळे उत्पादन ही मोठ्याप्रमाणात होवू लागले. संपूर्ण तयार होणारा खवा हे लोक पुणे,मुंबई,हैद्राबाद,औरंगाबाद,सातारा,नाशिक ,शिर्डी  अशा मोठ्या शहरात पाठवत असत. आज देखिल या शहरात येणारा खवा याच परिसरामधून येतो. त्या कालावधीमध्ये मालाची गरज किती आहे तेवढेच उत्पादन घेतले जात असे कारण जास्त माल तयार केला तर तो विकायचा कोणत्या ठिकाणी हा प्रश्न निर्माण होत असे
          प्रारंभीच्या कालावधीत खव्याचं पॅकेजिंग हे वडाच्या पानात होत असे. माल व्यावस्थित पॅक करुन त्याच्या वरती पोत्याचे आच्छादन घातले जायचे व तयार केलेलं गाठोड पाण्यात भिजवून ते पुढे पाठवलं जात असे. भिजवल्यामुळे  मालाला गारवा प्राप्त होत असे व त्याचा दर्जा जास्तीत -जास्त कालावधीसाठी चांगला रहात असे.
    या जिल्ह्यामधील शेतकर्यांचे अर्थकारण या व्यावसायावर अवलंबून आहे. या व्यावसायाच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. दुग्ध व्यावसायाला खवा उत्पादनाची जोड दिल्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक संपन्नता लाभली आहे. अनेक व्यावसायिक पारंपारीक पद्धतीने हा व्यावसाय करत आहेत. या व्यावसायामध्ये अनेक जनांच्या दुसऱ्या-तिसऱ्या पिढ्या कार्यरत आहेत.
         सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त स्थिती पाहता येथील शेतकरी, महिला , युवक  हे दुध व खवा निर्मिती या व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्र भर असणारे मंदिरे व तेथील पेढा हा भूम  परिसरामधून बनविला जातो. खवा या पदार्थाची टिकाऊ क्षमता हि साधारण तापमानात  एक ते दोन दिवसाची असल्याने तो रोजच्या रोज विकावा लागतो अथवा शीतगृहात ठेवावा लागतो. सदरील शीतगृह सुविधेसाठी पुर्वी येथील खवा उत्पादकांना हैद्राबाद, पुणे, औरंगाबाद येथे जावे लागत असे  ते त्यांना खूप खर्चिक पडत व वेळही खूप लागत असे. तसेच तालुका व परिसरातील खवा व्यावसायिक हे असंघटीत रित्या कार्यरत असल्याने त्यांना व्यवसायात भरपूर अडचणी निर्माण होत असत.
   वरील सर्व खवा व्यवसायातील समस्या पाहता, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील उस्मानाबाद (आकांक्षित जिल्हा) जिल्ह्यामधील  अडचणीवर मात करून श्री. विनोद जोगदंड, यांच्या नेतृत्वाखाली  रियाज पिरजादे, सुनील पाटील यांनी पुढाकार घेऊन दुध व खवा व्यावसायिक शेतकऱ्यां एकत्रित करून उद्योग संचालनालयाच्या सहकार्याने राज्यातील दुध व खवा उत्पादकांसाठी राज्यातील पहिले खवा क्लस्टर एमआयडीसी भूम ता.भूम जि. उस्मानाबाद येथे सुरू केले आहे. यामध्ये खवा उत्पादक शेतकऱ्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर सामुहिक सुविधा केंद्र ( 1000 मे.टन कोल्ड स्टोरेज, प्रशिक्षण केंद्र, अत्याधुनिक  
  खवा तपासणी केंद्र, मूल्यवर्धित उत्पादन केंद्र) ची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे  उस्मानाबाद जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न वाढवत (जीडीपी) जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचाविण्यासाठी मदत होत आहे.
       तालुक्यातील व परिसरातील खवा उत्पादन करणाऱ्या खवा भट्ट्या ह्या लाकूड या इंधनावर आधारित असल्याने येथील परिसरामध्ये रोज अंदाजे ५०० झाडे तोडली जातात व या मुळे निसर्गावर व पावसावर याचा परिणाम होत असल्याचे जाणवू लागल्यामुळे खवा क्लस्टर भूम च्या माध्यमातून  विविध सामाजिक बांधिलकी निधीतून सौर उर्जा प्रणालीवर  आधारित इंडक्शन खवा मशीनवर खवा निर्मिती साठी सामुहिक सुविधा केंद्र बनवण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पातून ३५०, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील  महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे. सर्व खवा उत्पादकांच्या सहकार्याने तसेच शासनाच्या व बँकेच्या मदतीने खवा क्लस्टर भूम ने,  भूम तालुका व परिसरातील सर्व खवा  भट्ट्या या सौरउर्जा प्रणाली इंधनावर करण्याचे धोरण आखले आहे.
जिल्हाधिकारी श्रीमती. दीपा मुधोळ मुंढे (भा.प्र.से.) व जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद  यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी विविध सामाजिक बांधिलकी उपक्रमात निर्मल मिल्क प्रोडक्ट असोशिएशन खवा क्लस्टर  भूम पुढाकार घेत असते.   
निर्मल मिल्क प्रोडक्ट असोशिएशन खवा क्लस्टर  भूमला TATA Institute of Social Sciences (TISS) मार्फत रुरल इनोवेटर अवार्ड प्रदान करण्यात आला आहे. राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत राज्यातील नाविन्यपूर्ण क्लस्टर म्हणून गौरविण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी श्रीमती. दीपा मुधोळ मुंढे (भा.प्र.से.) उस्मानाबाद यांनी विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत 100 KW सोलर सिस्टम बसवून दिल्यामुळे राज्यातील पहिले विजेसाठी स्वयंपूर्ण असणारे सोलर क्लस्टर करण्याचा मान खवा क्लस्टर भूमला मिळाला आहे.
      काही दिवसांपासून जगभरात कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. या रोगाच्या प्रतिबंधासाठी सर्व पातळीवरून खबरदारीच्या आवश्यक त्या उपायोजना सुरू आहेत. प्रत्येक व्यक्ती आपआपल्या परीने शक्य आहे त्या स्वरूपात आपला सहभाग देत आहे. अशा आपत्तीच्या परिस्थितीत ‘सॅनिटायझर, मास्क, स्व स्वच्छता, खान पदार्थ स्वच्छता’ यांचा  जास्तीत जास्त लक्ष देण्यात येत      आहे. सद्यास्थितीत कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था युद्ध पातळीवर कार्यरत आहे. शासनाने घालून दिलेल्या वैयक्तिक स्वच्छता, संचारबंदी व सोशल डिस्टसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करत निर्मल मिल्क प्रोडक्ट असोशिएशन भूम (खवा  क्लस्टर ) समाजाप्रती आपले सामाजिक बांधिलकी या तत्वावर कर्तव्य पार पाडत आहे.          
       लॉकडाऊन परिस्थितीत राज्य व परराज्यातील  मंदिरे परिसरातील पेढा दुकाने, स्वीट दुकाने, लग्न सराई , सण उत्सव बंद असल्याने भूम व तालुका परिसरातील खवा व्यावसायिक, दुग्ध उत्पादक शेतकरी,महिला व पेढा विकणारे साधारणतः ५००० युवकावर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीवर हतबल न होता खवा क्लस्टर भूम व जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजनपूर्वक आणि जबाबदारीने खवा क्लस्टर चे शीतगृह सुविधाचा लाभ खवा उत्पादकासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या भागातील खवा उत्पादकांनी लॉकडाऊन च्या प्रशासकीय नियमांचे उल्लघन न करता व इतरत्र न विकता, आपला उत्पादित खवा क्लस्टर भूम च्या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला आहे. जेणेकरून जेव्हाही सदरील लॉकडाऊन उठल्यावर आपआपला खवा मार्केट मध्ये विकता येईल व खव्याची नासाडी ही होणार नाही. सदरील कोल्ड स्टोरेज मध्ये  खवा साधारणतः 10 ते 12 महिने (-16 डिग्री) तापमानात टिकत असल्यामुळे आतापर्यंत शेतकरी व खवा उत्पादक यांनी 10 लाख लिटर दुधाचा 2.5 कोटी रु किमतीचा 200 टन खवा कोल्डस्टोरेजमध्ये साठवणूक केला आहे. सदरील साठवणूक केलेल्या मालासाठी बँकेमार्फत माल तारण ठेऊन 75 टक्के लोन तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी मा.जिल्हाधिकारी व जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद यांचेमार्फत जिल्हा अग्रणी बँकेकडे पाठपुरावा सुरू आहे.
     खवा क्लस्टर भूम ने  भूम तालुका व परिसरातील सर्व पारंपारिक लाकूड या इंधनावर असणाऱ्या सर्व खवा भट्ट्या या सौरउर्जा प्रणाली इंधनावर करण्याचे धोरण आखले आहे . त्यातून सद्य कोविड१९ या जागतिक महामारीच्या परीस्थितीत ग्राहकांना खवा व पेढा हा पॅकिंग करून एकाच आकर्षक ब्रँड मध्ये उपलब्ध करून कोल्ड रूमच्या वाहनातून ग्राहकापर्यंत देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.  जेणेकरून दूध उत्पादक, खवा उत्पादक शेतकरी, महिला व्यावसायिक यांचे व्यवसाय ही बंद होणार नाही त व ग्राहकांना ही स्वच्छ, उत्तम दर्जाचे, चविष्ट व पौष्टिक पदार्थ योग्य किमतीत उपलब्ध होतील.
      
शब्दांकन:
श्री. रियाज पिरजादे     श्री. विनोद जोगदंड.


No comments:

Post a Comment