Followers

Sunday 23 September 2018

“आयुष्यमान भारत” योजना सर्वसामान्य लोकांसाठी आरोग्य कवच आहे -पालकंत्री संभाजी पाटील निलंगेकर





* पालकमंत्र्यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ
   -आरोग्य कार्डचे वाटप
*जिल्हयातील दोन लाख कुटुंबांना लाभ, जिल्हा योजनेत आघाडीवर राहील.

लातूर,दि. 23:- आयुष्यमान भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असून ही योजना गोर-गरीब, गरजू सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत महत्वाची असून ही योजना म्हणजे आरोग्य कवच असल्याचे प्रतिपादन कामगार कल्याण,कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री  संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
येथील डीपीडीसी हॉल मध्ये आयोजित आयुष्यमान भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री  जनआरोग्य योजनेच्या जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुनील गायकवाड,आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी श्रीकांत, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, आरोग्य सभापती प्रकाश देशमुख, उपमहापौर देवीदास काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता राजाराम पवार, आरोग्य उपसंचालक हेमंत बोरसे, जिल्हा शल्यचिकित्सक संजय ढगे, जिल्हा आरोग्यअधिकारी  गंगाधर परगे, जिल्हा समन्वयक  कुलदीप  शिरपूरकर इतर अधिकारी पदाधिकारी  आदि मान्यवर उपस्थित होते .
    पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते  हस्ते आज रांची झारखंड येथून जगातील सर्वात मोठया आरोग्य योजनेचा शुभारंभ झाला आहे.देशातील 50 कोटी लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळणार असल्याने  आजचा दिवस हा ऐतिहासीक असून सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा आहे. आजपासून देशातील गोर-गरीब, गरजू सर्व सामान्य लोकांना त्यांच्या आरोग्यावरील  5 लाख रुपया पर्यंतच्या  खर्चासाठी  शासन मदत करणार आहे. आरोग्यावरील अधिकच्या खर्चाने  मोडकळीस आलेल्या कुटुंबांना आधार मिळणार असून आर्थिक परिस्थिती नसलेल्या गरजू कुटुंबांसाठी ही योजना आरोग्य कवच, असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यापुढे देशात कोठेही आर्थिक परिस्थिती नसल्याने उपचार घेणे, उपचार अर्ध्यावर सोडणे या गोष्टी होणार नाहीत. कारण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरजू लोकांना 5 लाखापर्यंतच्या औषधोपचार शासकीय खाजगी रुग्णालयात विनामुल्य मिळणार आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळणार आहे, असे निलंगेकर यांनी  सांगून लातूर जिल्हयातील प्रत्येक गरजू पात्र लाभार्थ्यांना  या योजनेचा लाभ मिळावा याकरिता लोकप्रतिनिधी प्रशासनाची मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेची  प्रभावीपणे  अंमलबजावणी  व्हावी  याकरिता योजनेकडे फक्त  काम म्हणून पाहता ही एक आरोग्य सेवा पुण्यकर्म म्हणून जबाबदारी पार पाडावी असे  निलंगेकर यांनी सांगितले. या अंतर्गत महाराष्ट्रातील  3 कोटी 65 लाख लोकांचा डेटा बेस तयार झाला असून लातूर जिल्हा ही यात आघाडीवर असून दिनांक 7 ऑक्टोबर 2018 रोजी लातूर येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून या  योजनेचा जास्तीत जास्त फायदा रुग्णांना मिळावा म्हणून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी शासकीय यंत्रणेने सक्रीय सहभाग  देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या योजनेचे कार्ड देशपातळीवरील  कोणत्याही रुग्णालयात चालणार आहे. तसेच हया योजनेतंर्गत  दीडलाख वेलनेस सेंटर उभारली जाणार असून देशातील  50 कोटी नागरिकांना येजनेचा लाभ होणार असल्याची माहिती  खासदार डॉ.गायकवाड यांनी दिली.  तसेच राज्यात महात्मा फुले जनआरोग्य येाजनेबरोबरच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविली जाणार असून या योजनेत समाविष्ट  असलेल्या लातूर जिल्हयातील  रुग्णालयांनी प्रत्येक लाभार्थ्याला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध्करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले. यावेळी  आमदार सुधाकर भालेराव, माजी  खासदार गोपाळराव पाटील यांचीही भाषणे झाली.
      प्रारंभी पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन जिल्हास्तरावर आयुष्यमान भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योनेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात काही लाभार्थ्यांना -आरोग्य कार्डचे वाटप  ही   यावेळी करण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, यांनी केले तर आयुष्यमान भारत  योजनेंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची  माहिती  महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. कुलदीप शिरपूरकर यांनी पॉवर पाईंट प्रझेंन्टेशनव्दारे दिली. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी आभार  मानले. यावेळी रांची झारखंड येथील आयुष्यमान भारत  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हस्ते झाला.तो लाईव्ह कार्यक्रम  येथे दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उध्दव फड यांनी केले.

No comments:

Post a Comment