Followers

Monday 17 September 2018

लातूर येथे अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन -पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर



 लातूर दि.17: जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय मदत, उपचार शस्त्रक्रिया एकाच छताखाली मिळाव्यात म्हणून यासाठी जिल्ह्यात दोन टप्प्यात अटल महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कामगार कल्याण,भूकंप पुनर्वसन,कौशल्य विकास   माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री  संभाजी पाटील निलंगेकर निलंगेकर यांनी दिली.
 जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते.या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीन इटनकर,आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले,निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे,जिल्हा शल्यचिकित्सक संजय ढगे आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, दोन टप्प्यात ही आरोग्य शिबिरे घेण्यात येणार  आहेत.पहिला टप्पा लातूर येथे माहे ऑक्टोबर 2018  तर दुसरा टप्पा उदगीर येथे माहे नोव्हेंबर 2018 मध्ये होणार आहे.लातूर येथील शिबिरात लातूर,औसा,निलंगा,रेणापूर   शिरूर अनंतपाळ तर दुसऱ्या टप्प्यात उदगीर येथे होणाऱ्या आरोग्य शिबिरात उदगीर, अहमदपूर,चाकूर,जळकोट आणि देवणी  तालुक्यातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील लातूर येथील महाआरोग्य शिबिर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. लातूरसह शेजारच्या तीन जिल्ह्यातील रुग्णांना या महाआरोग्य शिबीराचा लाभ घेता येणार आहे. या शिबिरात लातूर शेजारच्या जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह राज्यातील नामांकित रुग्णालयातील नामवंत डॉक्टरही सहभागी होणार आहेत.आरोग्य सुविधा ग्रामपातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशी शिबिरे घेण्यात येत आहेत.
या शिबिरांच्या माध्यमातून किमान दोन ते अडीच लाख नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी असा प्रयत्न आहे.यासाठी शासकीय,सामाजिक खाजगी माध्यमातून ग्रामपातळीपर्यंत जनजागृती करणे आवश्यक आहे.यासाठी योग्य ते नियोजन आणि आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या .या शिबिरामध्ये शासकीय डॉक्टरांसोबत खाजगी डॉक्टरही सहभागी होणार आहेत.सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आपल्या परिसरातील रुग्णांना या शिबिराचा लाभ व्हावा यासाठी जनजागृती करावी तसेच रुग्णांची माहिती एकत्रित करून त्यांना या महाआरोग्य शिबीराचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही पालकमंत्री निलंगेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment