Followers

Saturday 29 September 2018

माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द - पालकमंत्री पाटील निलंगेकर





युवकांनी देश सेवेत येण्याचे आवाहन…
         लातूर, दि.29 : देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी, परकीय शक्तीपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी, आपत्ती काळात देशबांधवांच्या मदतीसाठी सज्ज असणारे, कोणत्याही अडचणीत आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारे भारतीय सैनिक हे आपल्या सर्वांसाठी आदर आणि अभिमान आहेत. भारतीय सैनिकांचे काम हे निश्चितच गौरवाचे, कर्तृत्वाचे आणि अभिमानाचे असून यांचे फार मोठे ऋण आपल्यावर आहेत. ते फेडण्यासाठी  युवकांनी देशाची सेवा करण्याची संधी सोडू नये, असे प्रतिपादन कामगार, भूकंप, पुनवर्सन, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर यांच्या कार्यालयाच्या वतीने डी.पी.डी.सी.हॉल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, लातूर येथे आयोजित शौर्य दिन 2018  या सत्कार समारंभात बोलतांना केले.
या कार्यक्रमास लातूरचे महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सुनिल गोडबोले, माजी सैनिक संघटनेचे  कृष्णा गिरी, व्ही.व्ही. पटवारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम तिरुके, उपमहापौर देवीदास काळे, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, बजरंग जाधव, या पदाधिकाऱ्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
पालकमंत्री पाटील निलंगेकर म्हणाले की, भारतीय सैन्य दलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकदवारे अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यामुळे 29 सप्टेंबर हा दिवस भारत वासियांसाठी अभिमानाचा दिवस आहे. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत जावी तसेच माजी सैनिकांचा सन्मान व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. हा दिवस येवढयापुरता मर्यादित न ठेवता त्यांचा सन्मान, लोकाच्या समस्या एकत्रित करुन मांडा सर्व प्रश्नांचे निराकरण केले जाईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.
देशाचे संरक्षणार्थ बलीदान दिलेल्या शहिदांचे कुटूंबिय,वीरपत्नी, वीर-माता, वीर-पिता आणि माजी सैनिक यांना सन्मानाची वागणूक देणे माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून माझी व जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. तिन्ही दलातील सैनिक दिवस-रात्र देशाची संरक्षण करतात त्यामुळे आपण येथे सुरक्षित आहोत. सैनिकांनी केलेल्या कामाची पावती सर्व जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी सर्व माजी सैनिकांनी प्रयत्न करावेत. माजी सैनिकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
 यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत म्हणाले की, सर्व प्रथम देशाची सेवा करत असताना जे वीर जवान देशासाठी शहीद झाले त्यांना मी वंदन करतो. देशाचे सेवा करणे हे भाग्य लागते. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शौर्य या दिनाची जागरुकता व्हावी, नवीन पिढीतील युवकांनी सैन्य दिलात सेवा बजावावी. देशासाठी शहीद झालेल्या जवानाबद्दल कृतज्ञता व सत्कार व्हावा, यासाठी शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे, असे सांगून पुढे म्हणाले की, सैन्य दलातील सेवा बद्दल युवकांनी पुढाकार घेऊन सैन्यात सेवा करावी. त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी माजी सैनिकांनी गावा-गावात जाऊन प्रयत्न करावे. माजी सैनिकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शौर्य दिनाच्या निमित्ताने सैनिकांप्रती आपल्याला असलेली आदराची भावना अधिक वृध्दीगंत व्हावी यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व विरपत्नी, विरमाता, विरपिता, शौर्यपदकधारक आजी / माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना शौर्यदिनानिमित्त पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व मान्यवरांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ देऊन यथोचित्त सत्कार करण्यात आला. प्रारंभी सर्व मान्यवरांनी शहीद सैनिकांना दोन मिनीटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण केली. 
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व आजी/माजी सैनिक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच एनसीसी व सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री.गोडबोले यांनी करुन शौर्य दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला तर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.आर पाटील यांनी केले.   

No comments:

Post a Comment