Followers

Thursday 6 September 2018

विद्यार्थी दशेतच सामाजिक कार्य अंगी रुजल्यास यश हमखास मिळते-जिल्हाधिकारी जी.श्रीकांत





        * स्पर्धा परीक्षेतील यशासाठी लोकराज्य मासिकाचे नियमित वाचन आवश्यक
        * लोकराज्य वाचक मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उर्त्स्फूत प्रतिसाद
     
लातूर,दि.6:-  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगी सुरुवातीपासूनच सामाजिक भावना व कार्य रुजणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा व मुलाखती मध्ये हमखास यश प्राप्ती होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद सभागृहात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर व लोकराज्य वाचक मेळाव्यात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत बोलत होते. यावेळी विभागीय  माहिती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे, निलंगा उपविभागीय अधिकारी विकास माने, युनिफ ॲकडमीचे प्रा. अमोल मोसे , तहसिलदार अहिल्या गाठाळ, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के , दयानंदचे प्रा. सुभाष कदम, नायब तहसिलदार हरिदास काळे आदिसह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की,स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक भान असावे लागते. राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या लेखी परीक्षेत व मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांचे सामाजिक  कार्य व शासकीय उपक्रमात सहभाग असतो अशा विद्यार्थ्यांना हमखास यश मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करुनच स्पर्धापरीक्षेच्या तयारीला लागले पाहीजे. कारण पदवी हाच विविध केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचा पहिला निकष आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवीचा अभ्यास योग्य व नियोजनबध्द केला पाहीजे, असे सांगून जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वत:शीच स्पर्धा असते. याची जाणीव ठेवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर एक माहितीचे टूल म्हणून करावा. इंटरनेटवरुन माहिती शोधताना प्रथम आपल्याला काय शोधायचं हे पक्के ठरवावे व तेच  शोधावे म्हणजे आपल्याला हवी ती माहिती मिळते  व इंटरनेटचा वापर  व्यवस्थित न केल्यास विद्यार्थी भरकटला जाऊन तो अपयशी ठरण्याची शक्यता असते.  त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून इंटरनेटचा  वापर नीटनेटका केल्यास याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो,असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. तसेच लोकराज्य हे राज्य शासनाचे मासिक स्पर्धा परीक्षेच्या  दृष्टीने तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 महाराष्ट्र शासनाचे मुखपृष्ठ असलेल्या लोकराज्य मासिकातील माहिती ,मजकूर,शासकीय योजना व त्यासंबंधीची आकडेवारी ही  बिनचूक व अधिकृत असते.त्यामुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक  विद्यार्थ्यांसाठी  हे मासिक महत्वपूर्ण असल्याचे उपसंचालक भंडारे यांनी सांगून युवा माहिती दूत उपक्रमाची ही माहिती दिली.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांने अभ्यासात सातत्य ठेवल्यास यशाची प्राप्ती निश्चित होते असे त्यांनी सांगितले.
सी सॅट हा विषय केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची  तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असून याविषयी सविस्तर मार्गदर्शन प्रा. सोमे यांनी केले. तर विद्यार्थ्यांनी  ध्येय निश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेण्याचे आवाहन श्री.माने यांनी केले.
 यावेळी सर्व मान्यवरांनी लोकराज्य हे मासिक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण असल्याचे सांगून यातील माहिती व मजकूर अधिकृत असल्याचे स्पष्ट केले.
 प्रा.कदम यांनी प्रास्ताविकात विविध स्पर्धा परीक्षेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण धायगुडे व लखन दळवे यांनी केले.
महामित्र प्रमाणपत्र वाटप :-
माहिती व जनसंपर्क महासंचालनाय मार्फत मार्च 2018 मध्ये सोशल मिडिया  महामित्र हा उपक्रम राबविला होता.याअंतर्गत लातूर जिल्हयातून अमोल गोवंडे (लातूर तालुका ),विवेक जोशी (चाकूर) सतीश धडे, (निलंगा ) नरेश  कुलकर्णी (लातूर ग्रामीण ) व अमोल घायाळ (खोपेगाव) आदिंना मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे महामित्र हे प्रमाणपत्र जिल्हाधिकरी श्रीकांत यांच्या हस्ते देण्यात आले.
लोकराज्यला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद :-
येथे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत लोकराज्य वाचक मेळाव्याच्या अनुषंगाने मागील तीन चार वर्षात लोकराज्याच्या विविध अंकाचा स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी भेट दिली. त्याप्रमाणेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी हया  स्टॉलला भेट देऊन लोकराज्याचे अंक खरेदी केले तसेच लोकराज्यची  वार्षिक  100 रु.वर्गणी भरुन वार्षिक वर्गणीदार झाले.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत मान्यवरांचे महाराष्ट्र वार्षिक, महामानव व लोकराज्यचा अंक देऊन स्वागत करण्यात आले. राष्ट्रगीताने मेळाव्याचा समारोप करण्यात आला.

No comments:

Post a Comment