Followers

Sunday 2 September 2018

एकाच दिवशी-एकाच वेळी लोकराज्य मासिकाचं सामूहिक वाचन" हा उपक्रम यशस्वीपणे संप्पन्न

 १ लाख २६ हजार २२९ शिक्षक-विद्यार्थ्यांनी केले लोकराज्यचे सामूहिक वाचन_

उस्मानाबाद,दि.१--- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य वाचक अभियानांतर्गत " एकाच दिवशी एकाच वेळी लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन" हा उपक्रम आज जिल्ह्यात जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या एकत्रित प्रयत्नाने उत्साहाने, नीटनेटकेपणाने आणि यशस्वीपणे संप्पन्न झाला.
    सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण ५४० जिल्हा परिषद शाळांमधून २ हजार ८४५ शिक्षक,२९ हजार ५२२ मुले,२७ हजार ३२९ मुलींनी, खाजगी एकूण २०१ शाळांमधून २ हजार २७० शिक्षक,३३ हजार १२१ मुले,२८ हजार ६३५ मुलींनी आणि १० महाविद्यालयांमधील १०१ शिक्षक, १ हजार २०८ मुले, १ हजार १९८ मुलींनी लोकराज्यचे सामूहिक वाचन केले. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ५ हजार २१६ शिक्षकांनी, ६३ हजार ८५१ मुलांनी तर ५७ हजार १६२ मुलींनी (सर्व विद्यार्थी मिळून १लाख २१हजार १३) आज लोकराज्यचे सामूहिक वाचन केले.
    याची सुरुवात जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेतून म्हणजेच श्रीपतराव भोसले हायस्कूल येथून करण्यात आली.
         जवळपास तीन हजार विद्यार्थी आणि संस्थेचे अध्यक्ष सुधीरआण्णा पाटील , शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. कलीम शेख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिवाजी चंदनशिवे,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, विस्तार अधिकारी श्री.लोमटे, संस्थेचे प्राचार्य सुधीर पडवळ, उपप्राचार्य सिद्धेश्वर कोळी, संस्थेचे प्रशासकीय प्रमुख आदित्य पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीत हा अविस्मरणीय असा उपक्रम पार पडला.
      सुरूवातीस जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती देताना शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे मासिक मराठी, हिंदी,इंग्रजी,उर्दू आणि गुजराती या भाषांमध्ये प्रकाशित होते. वार्षिक सभासद शुल्क फक्त शंभर रुपये असलेले हे मासिक आपल्या ज्ञानात मोलाची भर घालते. महाविद्यालयीन तरुण-तरुणींपासून ते गावातल्या शेतकऱ्यांपर्यंत, समाजातील कोणत्याही घटकाला हा अंक म्हणजे माहितीचा स्त्रोत आहे,असे सांगून  जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी, जनतेने लोकराज्यचे जास्तीत जास्त वाचन करावे असे आवाहन केले तसेच यामुळे सर्वांना शासकीय योजना समजतील आणि त्यामुळे गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा आणि पर्यायाने आपल्या राज्याचा विकास होईल, ही जाणीव जागृती व्हावी म्हणूनच हा उपक्रम उस्मानाबाद जिल्ह्यात राबविण्यात आला आणि तो अशाच प्रकारे संपूर्ण राज्यातही राबविण्यात येत आहे,असे सांगितले.
      शिक्षणाधिकारी डाॅ.शेख म्हणाले,हा उपक्रम असाच चालू राहील यात शंकाच नाही.याबरोबरच लोकराज्य प्रश्नमंजुषा हा उपक्रमही शाळा-महाविद्यालयांद्वारे राबविण्यात येणार आहे तसेच लोकराज्यशाळा, लोकराज्य महाविद्यालय, लोकराज्यग्राम , लोकराज्य संस्था,लोकराज्य कार्यालय या उपक्रमांद्वारेही अधिकाधिक लोकांनी लोकराज्यचे सभासद व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी या उपक्रमाचे काैतुक करताना या अभियानाला जिल्ह्यात सर्वदूर पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
       यावेळी संस्थेचे प्राचार्य सुधीर पडवळ यांनी या विद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी लोकराज्य चे सभासद होतील आणि लोकराज्य विषयीचे विविध उपक्रमही या विद्यालयात सातत्याने राबविण्यात येतील,असे सांगितले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कमलाकर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य सिध्देश्वर कोळी यांनी केले.
      हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव ब्रिजेश सिंह,उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, संचालक अजय अंबेकर, संचालक शिवाजी मानकर, लोकराज्यचे संपादक सुरेश वांदिले आणि त्यांची  टीम लोकराज्य ,औरंगाबादचे प्रभारी संचालक आणि उपसंचालक  यशवंत भंडारे या सर्व वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आणि प्रत्यक्ष काम करताना शिक्षणाधिकारी डॉ. कलीम शेख, शिवाजी चंदनशिवे,सय्यद अख्तर, नारायण मुदगलवाड, विवेकानंद कदम आणि तानाजी खंडागळे या सर्वांचे अमोल सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment