Followers

Wednesday 19 September 2018

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाने अस्वच्छतेच्या गुलामगिरीवर मिळवले स्वातंत्र्य


 खरं तर घरातील स्वच्छता दूत ही घरातील महिलांच असते. त्यांना स्वच्छतेच्या सवयीविषयी लहानपणापासूनच बाळकडू दिलेलं असतं . कुटुंबातील मुलं, पुरुष, वृध्द यांच्या स्वच्छताविषयी तीच जागरुक असते आणि कृती व काळजी ही तीच करते. पण ग्रामीण भागातील हा प्रश्न आतापर्यंत एवढ्या प्रमाणावर सुटला नव्हता तो आता मोठ्या प्रमाणावर सुटत आहे. तो स्वच्छतागृहाची बांधणी आणि वापर यामधून. यामुळे स्त्रियांचे आरोग्यही सुधारत आहे. सन्मानजनक वाटत असलेली भावनामुळे आत्मविश्वास वाढला आहे. शासकीय योजना आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्यामध्ये जेंव्हा लोक स्वत: सहभागी होतात. तेंव्हा खूप मोठा बदल घडत असतो आणि तो बदल ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनात झालेला आढळून येत आहे. येथे प्रामुख्याने महिलांचा बचतगट, ग्राम सभा सदस्य यांचा सहभाग बऱ्याच प्रमाणात आहे.
राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत खेड्यापाड्यात शौचालयाची उभारणी होत आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा प्रश्न होता तो स्वच्छतागृहाचा वापराचा, वेळी अवेळी नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जावे लागत होते. तसेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये कराव्या लागणाऱ्या कसरती आणि होणारी मानसिक कुचंबना यामधून बाहेर पडणारी ही योजना खऱ्या अर्थाने सार्थ ठरली आहे. अनेक महिलांनी स्वत:चे मंगळसूत्र अथवा दागदागिने विकून देखील स्वच्छतागृह बांधण्याचे काम केले आहे. या संदर्भात अनेक माता बहिणींचे मनं मोकळी झाली आणि मानसिक स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याप्रमाणातच त्यांचे उपयोग देखील जीवनात होत असलेला आढळून येत आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि समाजातील लोकांच्या मनोव्यवस्थेला जोपर्यंत एखादी गोष्ट पटत नाही तोपर्यंत कोणत्याही कार्यात यशस्वी होणं जरा दुरापास्तच असते. पण स्वच्छतेच्या या कामात सर्वांनीच आपला सहभाग घेतल्याने हे शक्य झाले. शासन आणि जनता यांच्यामधील सुसंवादी कृतीचा हा परिपाकच आहे.
शौचालयाची बांधणी , वापर, महिला स्वत: शौचालयाची बांधणी कर्जे घेऊन करताना दिसतात. यामुळे आरोग्य सुधारणा आणि आरोग्यावर होणारी खर्चाची बचत , वेळेची बचत तसेच आजाराचं प्रमाण कमी झालेलं दिसून येत आहे. याबरोबरच सर्पदंश, मानहानी, अपमानास्पद वाटणारी भावना, पोटाचे आजार, प्रतिष्ठा यासारख्या अटोक्याच्या बाहेर असणाऱ्या गोष्टीला प्राधान्यक्रम मिळाला. ग्रामीण स्त्री स्वातंत्र्यांची कथा रुदावण्यास मदत झाली. स्वातंत्र्यांचा खरा अर्थ मानसिक गुलामगिरीतून मुक्ती असा या ठिकाणी घेतला तर उचितच म्हणावं लागेल. ही गुलामगिरी होती अस्वच्छतेच्या एका सवयची, साधन सुविधाच्या अभावाची .
स्वच्छता गृहामुळे आर्थिक बचत आणि आरोग्य या सुत्रामुळे स्त्रियांच्या आजाराचे प्रमाण कमी झालेच. तसेच वेळेची बचत झाली. जो वेळ त्यांना गावाबाहेर नैसर्गिक विधी करण्यासाठी जावे लागत होते तो वेळ वाचला .  त्याचप्रमाणे आरोग्याच्या सुविधावर होणार खर्च देखील कमी झाला. वर्षानुवर्षे दुर्लक्षित केलेला हा प्रश्न समाज आणि शासन समन्वयाने सोडवत आहे. ही देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी खरच अभिमानाची बाब म्हणता येईल. यामध्ये विविध महिला बचतगटानी सक्रीय सहभागी होऊन या कार्याला पुढे नेले ही एक महिलांसाठी अभिमानाची बाब आहे.
अल्पबचत आणि विविध अर्थव्यवस्थेतील अर्थ पुरवठा करणाऱ्या योजनेची देखील मोठी साथ मिळाली. छोट्या-छोट्या समुहाने देखील साथ दिली . यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा मोलाचा वाटा उचलला आहे. ʿआज का ग्रामीण देश बदल रहा है या वाक्याचा प्रत्यक्ष अनुभव या स्वच्छतागृहाच्या बांधणीतून आणि त्याचा वापर करणाऱ्या ग्रामीण स्त्रियांच्या मानसिकतेतून दिसून आला आहे.
नुकतेच लातूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील महिलेला रक्षाबंधनाची भेट म्हणून तिच्या घरी स्वच्छतागृह बांधण्यासाठी अकरा हजार रुपयाची ओवाळणी म्हणून दिली. ही एक बदलांची चांगली सुरुवातच आहे. प्रशासन देखील तितक्याच तळमळीने काम करीत असल्याचे वृत्त प्रत्येक जिल्ह्यातील वृत्तपत्रामध्ये प्रतिबिंबित होताना दिसत आहे. राज्यातील विशेषत: मराठवाड्यातील ग्रामीण भागात ही मानसिक बदलाची झालेली सुरुवात नक्कीच गौरवास्पद आहे, अस मला नमूद करावसं वाटतं. कारण निसर्गाने केलेला अन्याय आणि पूर्वीपासूनची गुलामगिरीच्या निझामाच्या राजवटीतून मुक्त होण्यासाठी करावा लागलेली मराठवाडा मुक्ती संग्रामाची चळवळ आणि आताची अस्वच्छतेच्या मानसिक गुलामगिरीतून केलेली ही महिला चळवळ मराठवाडी मनोव्यवस्थेला परिवर्तनाकडे नेणारी ठरत आहे. मराठवाड्याच्या ग्रामीण माता भगिणीच्या जीवनावर परिणाम करणारी होती. याला शासकीय योजना, लोकसहभाग, अनेक संस्थाचे आर्थिक सहकार्य यामुळे Change is Accepteble  हे चित्र दिसून येत आहे. काळ बदलत आहे तसा समस्याही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतात. पण हम सब साथ है हा नारा जेव्हा कृतीत येता तो क्षण समस्येवर उपाय आणि विजयाचा ठरतो आणि हे स्वच्छतेचे स्वातंत्र्य हे त्या स्वातंत्र्यासारखेच आहे. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने या वेगळ्या दृष्टीने आपण स्वतंत्रता साजरी करुयात .

                                                                                                       --  मीरा ढास-काळकुटे
                                                                                                            सहायक संचालक (माहिती)
                                                                                                            विभागीय माहिती कार्यालय, लातूर

No comments:

Post a Comment