Followers

Thursday 16 November 2023

नोकरदार तरुणाचे व्यावसायिक बनण्याचे स्वप्न आले पूर्णत्वास !

 यशकथा




• अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची मिळाली साथ
• स्वतःच्या व्यवसायातून दिला नऊ जणांना रोजगार
व्यावसायिक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अजय शेळके या तरुणाला बँकेचे कर्ज घेवून भांडवल उभा करावे लागले. या कर्जाची परतफेड करताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची त्याला साथ मिळाली. 9 लाख रुपयांच्या कर्जासाठी महामंडळाकडून त्याला आतापर्यंत सुमारे 2 लाख 95 हजार रुपये व्याज परतावा मिळाला. त्यामुळे अजयचे व्यावसायिक बनण्याचे स्वप्न पूर्णत्वास येण्यास मदत झाली…!
अजय शेळके हा लातूर तालुक्यातील मुरुड अकोला या खेडेगावातील तरुण. कुटुंबाचा मूळ व्यवसाय शेती. शेतीतील उत्पन्न हे पावसावर अवलंबून असल्याने त्यामध्ये चढउतार ठरलेला. त्यामुळे अजय याने शिक्षण घेवून नोकरी करावी, शेतीवर अवलंबून राहू नये, अशी आई-वडिलांची इच्छा.
अजयने लातूर येथून 2016 मध्ये एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. आता त्याने नोकरी करावी, यासाठी कुटुंबियांचा आग्रह सुरु झाला. स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, हे अजयचे खूप दिवसांपासूनचे स्वप्न होते. मात्र, व्यवसायासाठी लागणारे आर्थिक भांडवल हाती नसल्याने त्याला नाईलाजाने नोकरीचा मार्ग निवडावा लागला. 2017 मध्ये त्याने गोव्यातील एका फार्मा कंपनीत नोकरीला सुरुवात केली.
जेमतेम आठ महिने नोकरी केल्यानंतर त्याच्या मुरुड अकोला गावामध्ये एचपी गॅस एजन्सी देण्याबाबतची जाहिरात त्याला पाहायला मिळाली. यामाध्यमातून आपला व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे अजयला वाटले. त्यामुळे त्याने गॅस एजन्सीसाठी ऑनलाईन अर्ज केला. लॉटरी पद्धतीने त्याची यासाठी निवडही झाली. आता प्रश्न होता आर्थिक भांडवलाचा.
गॅस एजन्सी सुरु करण्यासाठी लागणारी अनामत रक्कम आणि इतर किमान बाबींच्या पूर्ततेसाठी त्याला किमान 10 लाख रुपयांची गरज होती. काहीही करून ही संधी हातची जावू द्यायची नाही, असा त्याचा निश्चय होता. यासाठी अजयने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्याकडून अजयने हे भांडवल उसनवारीवर जमा केले आणि गॅस एजन्सीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता सुरु केली. याच वेळी त्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामहामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची माहिती मित्राकडून मिळाली. महामंडळाच्या लातूर येथील कार्यालयात जावून जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील यांच्याकडून योजना जाणून घेतली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याने पात्रता प्रमाणपत्र (एलओआय) प्राप्त करून आवश्यक बाबींची पूर्तता केली.
अजयच्या व्यवसायाला चिंचोली (ब) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाने 9 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले. या कर्जाच्या व्याजाचा परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामहामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून होवू लागला. पहिल्याच वर्षी जवळपास सव्वा लाखापेक्षा अधिक व्याज परतावा मिळाला. 19 जानेवारी 2019 पासून आतापर्यंत अजयला या योजनेतून त्याच्या 9 लाख रुपये कर्जावर सुमारे 2 लाख 95 हजार रुपये व्याज परतावा मिळाला आहे.
वंदना एचपी गॅस एजन्सी सुरु केल्यानंतर पहिल्या वर्षी अजयकडे जवळपास एक हजार गॅस जोडण्या झाल्या होत्या. दोन डिलिव्हरी व्हॅन, तीन कर्मचारी अशी सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत जवळपास पाच वर्षात त्याच्याकडे 6 हजार गॅस घरगुती जोडण्या आणि 200 व्यावसायिक गॅस जोडण्या आहेत. तसेच डिलिव्हरी व्हॅनची संख्या पाचवर पोहोचली असून 9 कर्मचारी कार्यरत आहेत. एकेकाळी नोकरीच्या शोधात गोव्याला गेलेल्या अजयने व्यावसायिक बनण्याचे स्वतःचे स्वप्न पूर्ण केलेच, सोबतच्या 9 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याच्या या वाटचालीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामहामंडळाचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे तो आवर्जून सांगतो.
कोणताही व्यवसाय, उद्योग सुरु केला की त्याच्या सुरुवातीच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. अशात कर्ज घेवून उद्योग, व्यवसाय करणाऱ्यांना आपल्या व्यवसायाची घडी बसविणे कठीण बनते. कधी-कधी कर्जाचा हा भार उद्योग, व्यवसाय वाढीसाठी अडथळा बनतो. त्यामुळे उद्योग, व्यवसायांना सुरुवातीच्या काळात मदतीची आवश्यकता असते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामहामंडळाच्या कर्ज व्याज परतावा योजनेमुळे माझ्या व्यवसायाच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळाला, असे अजय शेळके म्हणतो.
उसनवारीवर घेतलेले पैसे परत दिल्यांनतर बँकेचे हप्ते नियमित भरण्यासाठी पहिल्या वर्षी या योजनेची मदत झाली. पहिल्याच वर्षी जवळपास सव्वा लाख रुपयांपेक्षा अधिक व्याज परतावा मिळाल्याने माझ्यावरील कर्जाचा आर्थिक बोजा कमी झाला. आतापर्यंत हा व्याज परतावा नियमितपणे मिळाल्याने माझ्या कर्जाची परतफेड होण्यात कोणतीही अडचण आली नाही. माझ्यासारख्या नवव्यावसायिकांना ही योजना अतिशय फायदेशीर आहे, असे अजय शेळके याने सांगितले.
आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील युवकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील, प्रामुख्याने मराठा प्रवर्ग आणि ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशा प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींना उद्योग, व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा व्याज परतावा देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची 10 लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी व्यावसायिक अथवा उद्योगासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जावर या योजनेंतर्गत 4.5 लाख रुपयेपर्यंत व्याज परतावा करण्यात येतो. व्याज परताव्याचा कालावधी 7 वर्षांपर्यंत व व्याजाचा दर दसादशे 12 टक्क्यापर्यंत आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजनेत 50 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 12 टक्के दराने व्याज किंवा 15 लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा दिला जातो या योजनेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी गटाने त्यांच्या शेतीपूरक व्यवसायासाठी बँकेमार्फत घेतलेल्या कर्जासाठीही व्याज परतावा दिला जातो. व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ‘एलओआय’ म्हणजेच पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील यांनी सांगितले. या दोन्ही योजनांची अंमलबजावणी https://udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून होत असून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


- तानाजी घोलप,
माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

No comments:

Post a Comment