Followers

Thursday 16 November 2023

नंदन चौधरीला मिळाले व्यवसाय उभारणीस अण्णासाहेब पाटील महामंडळाचे बळ



धाराशिव : कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करायचे म्हटले तर हाती पैसा असेल तर ते शक्य होते.शासनाची योजना किंवा विविध महामंडळाने उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले तर युवावर्ग निश्चितच उद्योजक होऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी तर होईलच सोबत काही जणांना उभारलेल्या उद्योगातून रोजगार देखील उपलब्ध करून देता येतो.जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या परंडा येथील मराठा समाजातील नंदन चौधरी या २६ वर्षीय युवकाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतून ५ लक्ष रुपये कर्ज घेऊन टायर विक्री, टायर रिमोल्डिंग व पंचर दुरुस्तीचा व्यवसाय सुरू करून उद्योजकतेकडे वाटचाल तर सुरू केली.या व्यवसायामुळे आर्थिक सुबत्ता येण्यास नंदनला मदत झाली आहेच.एवढंच नव्हे तर त्याने एका व्यक्तीला या व्यवसायातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
नंदन आता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मिळालेल्या कर्जातून उत्तम प्रकारे टायर रेमोल्डिंग,टायर विक्री व पंचर दुरुस्तीचे दुकान थाटून या व्यवसायातून महिन्याकाठी ३० हजार रुपये कमावत आहे. नंदन चौधरीने वर्ष २०२० कोरोनानंतर परंडा- करमाळा रोड,पेट्रोल पंपासमोर गाडी पंचरचा छोटा व्यवसाय सुरू केला.त्यात दिवसाला त्याला ३०० रुपये शिल्लक राहायचे.त्यानंतर लोकांची नंदनच्या दुकानात नवीन टायरची मागणी वाढू लागली.टायरची वाढती मागणी लक्षात घेता व नंदनने मार्केटमध्ये फिरून ह्या विषयी माहिती घेतली. नवीन टायरचे दर व ग्राहक कोण व कुठले आहेत याचा अंदाज त्याने घेतला.आपण पूर्वी टायर रेमोल्डिंगचे दोन वर्षे पुणे जिल्ह्यातील कूर्डवाडी येथे पगार न घेता काम शिकलो आहेच.त्याचा आपण आता उपयोग करणे अवश्य आहे.हे मनात हेरून नंदनने टायर रिमोल्डिंगसुद्धा टायर विक्रीसोबत केले पाहिजे.जागा तर नंदनकडे उपलब्ध होतीच.या जागेचे महत्व लक्षात घेऊन आणि आपल्याकडे असलेले टायर रिमोल्डिंगचे कौशल्य लक्षात घेऊन आता आपण नक्कीच टायर रिमोल्डिंग,टायर विक्री आणि पंचर दुरुस्तीचे एकत्र दुकान सुरू करून तीन प्रकारचे काम करू शकतो हा नंदनचा विश्वास बळावला.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल कुठून उभे करायचे हा प्रश्न निर्माण झाला.मित्र व परिवाराच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेबद्दल माहिती मिळाली.प्रियदर्शनी अर्बन को.ऑप. बँक.लि.परंडा येथे बचत खाते असल्याने बँकेशी संपर्क केला.बँकेने नंदनला कळविले की,आपले कर्ज हा व्यवसाय उभारणीसाठी मंजुर होईल. अण्णासाहेब पाटील आर्थिक
मागास विकास महामंडळाअंतर्गत कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी अगोदर महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र काढले.बँकेने सांगितलेले महामंडळाकडून कर्ज घेण्यासाठी बँकेला पाहिजे असलेले आवश्यक कागदपत्रे जमा करून बँकने व्यवसायासाठी आवश्यक असलेले ५ लक्ष रुपये कर्ज उपलब्ध करून दिले. उपलब्ध झालेल्या महामंडळाच्या योजनेच्या कर्जातून टायर रेमोल्डिंग मशीन व टायर खरेदी करून व्यवसाय सुरू केला.
या व्यवसायातून महिन्याकाठी नंदनला ३० हजार रुपये शिल्लक राहतात. बँकेला वेळेवर हप्ता भरत असल्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नंदनने घेतलेल्या कर्जाचा वेळेवर व्याज परतावा करत आहे.नंदनने आवाहन केले की,जिल्ह्यातील मराठा समाजातील जास्तीत जास्त युवावर्गाने व्यवसायकडे वळावे.त्यासाठी लागणारे भांडवल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतून उपलब्ध करून घेऊन उद्योग व्यवसायाची उभारणी करून आपण तर स्वावलंबी होतोच सोबतच आपण काही जणांना रोजगार देखील उपलब्ध करून देऊ शकतो.त्यामुळे नंदनच्या जीवनात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेच्या लाभामुळे आर्थिक सुबत्ता तर येण्यास मदत झालीच सोबतच नंदनमध्ये एक उद्योजक तयार झाला.नंदनने महामंडळाच्या माध्यमातून सुरू केलेला हा व्यवसाय मराठा समाजातील इतर युवा वर्गासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

No comments:

Post a Comment