Followers

Thursday 16 July 2020

जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी कोविड-19 च्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा निर्माण कराव्यात-पालकमंत्री अमित देशमुख





*खाजगी रुग्णालयांना कोविड वर उपचार करण्यासाठी येणाऱ्या सर्व अडचणी शासनाकडून सोडवल्या जातील*
 *जिल्ह्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत असलेल्या 13 खाजगी रुग्णालयांनी कोविड रूग्णांवर उपचार सूरू करावेत*

लातूर, दि.15(जिमाका):- जगातील अनेक देशांमध्ये covid-19 ची दुसरी लाट आलेली आहे. तसेच लातूर जिल्ह्यात हे दिवसेंदिवस कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे.  प्रशासनाने जवळपास 7 हजार बेडची व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे. त्या दृष्टीने सध्या बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी कमी असली तरी भविष्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे असलेल्या बेडच्या संख्येनुसार काही बेड कोरोना रुग्ण उपचारासाठी राखीव ठेवावेत व  रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, असे आववाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित covid-19 च्या अनुषंगाने तसेच खासगी रुग्णालयातून कोविंड रुग्णावर उपचार सुरू करण्याबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, IMA चे लातूर जिल्हा अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी यांच्यासह अनेक डॉक्टर्स उपस्थित होते.
         पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की आपण सर्वजण सुरुवातीपासूनच covid-19 याविरोधात लढा देत आहोत. लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तरी लातूर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी व खाजगी डॉक्टरांनी कोविड रुग्णावर उपचार सुरू करणे गरजेचे आहे. तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल व काही अडचणी असतील तर त्या त्वरित सोडविल्या जातील, अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.
         इंडियन मेडिकल असोसिएशन संस्थेने यापूर्वीच covid-19 उपचारासाठी डॉक्टर्सनी कोणत्या प्रकारचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। त्या तत्त्वांचा वापर करून जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांनी रुग्णावर उपचार सुरू करण्याबाबत तात्काळ आपल्या रुग्णालयात सुविधा निर्माण कराव्यात. तसेच जे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करणार आहेत त्याची यादी सात दिवसात आय एम ए नी तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर करावी, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.
           खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करत असताना रॅपिड टेस्टद्वारे रुग्णांची तपासणी करावी. ह्या टेस्ट साठी शासकीय दराने मोबदला अदा करावा. लातूर महापालिकेच्या वतीने लवकरच रॅपिड टेस्ट किट उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत साथरोग प्रयोगशाळेचे दैनंदिन तपासणी करण्याची मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच कन्टेन्टमेंट झोन मध्ये पूल टेस्टिंग प्रायोगिक तत्त्वावर करण्यास सुचित करण्यात आले असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
           निमा संघटनेचे जे आयुर्वेदिक, होमियोपॅथी व यूनानी डॉक्टर्स आहेत. त्या डॉक्टर्सनी नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रचार-प्रसार व प्रसिद्धी करावी असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी करून जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्सनी कोविड रुग्णा बाबत आपली भीती व मानसिकता बदलावी. डॉक्टर लोक येणार असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे पहावे असेही त्यांनी म्हटलं.
         जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे आवश्यक असलेला औषधी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सेस यांना विमा संरक्षण मिळण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जातील असे श्री. देशमुख यांनी सांगून जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी covid-19 च्या रुग्णावर उपचार करण्यासाठी स्वतःहून पुढे यावे. तसेच जिल्ह्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश असलेल्या 13 रुग्णालयांनी कोविड रुग्णनावर उपचार सुरू करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
         जिल्हा प्रशासनामार्फत खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यासंबंधी IMA व निमा या संघटनेशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. खाजगी डॉक्टर्सनी मनात कोणतीही भीती न बाळगता प्रोटोकॉल प्रमाणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले. तसेच खासगी रुग्णालयाच्या कोविड उपचार सुरू करण्याबाबत काही अडचणी असतील त्या सर्व अडचणी सोडविल्या जातील असेही त्यांनी सूचित केले.
      लातूर महापालिकेच्या वतीने अँटीबॉडी ला प्राधान्य देऊन रॅपिड टेस्ट पुढील काही काळात सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. तसेच खाजगी रुग्णालयाकडे उपलब्ध असलेला पूर्ण प्रशिक्षित असलेला पॅरामेडिकल स्टाफ महापालिकेच्या आरोग्य विभागाला उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी केली. त्याचप्रमाणे खाजगी डॉक्टर्सनी मानव सेवा म्हणून त्यांची सेवा दिवसातून किमान दोन-तीन तास महापालिकेला उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
           यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विश्वास कुलकर्णी यांनी कोविड उपचाराच्या अनुषंगाने प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास संघटना तयार असल्याचे सांगितले. पुढील आठ दिवसात काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्याबाबत तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. खाजगी डॉक्टर्स व नर्स ना शासनाकडून विमा संरक्षण देण्याची मागणी केली. खाजगी डॉक्टर्सना येणाऱ्या अडचणी ची माहिती त्यांनी दिली. यावेळी डॉ. अरविंद भातांबरे, डॉ. चेतन सारडा, डॉ. बरमदे,  डॉ. अशोक पोतदार यांनी ही सूचना मांडल्या.

No comments:

Post a Comment