Followers

Tuesday, 7 May 2024

 

अभिनव नवोपक्रमांनी साजरा

झाला लोकशाहीचा उत्सव

v वडवळ (ना.), जानवळ, ब्रम्हवाडी, लोदगा, निलंग्यात मतदारांचा उत्साह

v लातूर, उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

लातूर, दिनांक ७ (विमाका) : लातूर, उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हाभरात मतदारांचा उत्साह होता. चाकुर तालुक्यातील वडवळ नागनाथ इथं बीज वाटप, जानवळ इथं श्वानांची माहिती, ब्रम्हवाडी इथं पारंपरिक वेशात महिला, औशातील लोदगा इथं बांबूपासून वस्तूंची निर्मिती आणि निलंग्यात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याचे महत्त्व आदी अभिनव नवोपक्रम मतदान केंद्रांवर राबविण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांपासून दिव्यांग, नवमतदारांनी या उपक्रमांचे कौतुक करत भरभरून प्रतिसादही दिला.


चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील जिल्हा परिषद प्रशालेतील मतदान केंद्रावर संजिवनी बेटाची माहिती फलकांद्वारे प्रदर्शित करण्यात आली होती. संजिवनी बेटावर असलेल्या विविध वनस्पती त्यांचे पर्यावरणीय महत्त्व आदी बाबींचा यामध्ये समावेश होता. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदार उत्साहाने सहभागी होत होते. या मतदान केंद्रांवरील मतदारांना मतदानानंतर विविध प्रजातींच्या बियांचे वाटप याठिकाणी करण्यात आले. या उपक्रमांचा शुभारंभ तहसीलदार नरसिंग जाधव यांच्याहस्ते झाला. याप्रसंगी रेणापूर येथील पर्यावरण प्रेमी शिवशंकर चापुले, मंडळ अधिकारी श्याम कुलकर्णी, तलाठी शंकर लांडगे आदींची उपस्थ‍िती होती.

वनौषधीची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा’ याप्रमाणे प्रत्येकाने कृती करायला हवी. मतदान केंद्रांवर देण्यात आलेल्या बियांची रूजवण करून  रोपटांची निगा राखण्याचे आवाहन श्री. जाधव यांनी यावेळी मतदारांना केले. त्याचबरोबर श्री. चापुले यांनी मतदानाच्या दिवशी वडवळ नागनाथ याठिकाणी मतदान केंद्रावरील वनौषधींची माहिती याबाबतची पार्श्वभूमी सांगितली. त्याचबरोबर लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मतदान करणे अत्यावश्यक आहे, त्याचप्रमाणे पर्यावरणाला अधिक मजबूत करण्यासाठी झाडे लावणे, संवर्धन करणे अत्यावश्यक असल्याचे चापुले म्हणाले. तर मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावरील ज्येष्ठ नागरिक शिवाजी कल्याणे यांनी मतदानाचे महत्त्व यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या पर्यावरणपूरक अशा मतदान केंद्राची स्तुती केली.

जानवळ येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत पश्मी, कारवान या विशेष प्रजातींच्या श्वानांची माहिती असलेले फलक मतदान केंद्रावर लावण्यात आले होते. इथल्या श्वानांची प्रजाती उत्तम म्हणून ओळखल्या जाते. अतिशय हुशार, दिसायला देखणी अशी पश्मी श्वान असतात. ही अफगान जातीचे असतात. शिकार, शेतीची राखणदारी ही प्रजात उत्तम करते. मागील पाच-सहा पिढ्यांपासून श्वानांचे पालन आमच्या कुटुंबात केले जाते, असे गावचे नागरिक तानाजी पवार यांनी मतदानानंतर सांगितले.



गावात ४०० हून अधिक नागरिक श्वान विक्रीपासून उत्पन्न मिळवतात. यापैकीच एक असलेला अतुल काळे या युवकाने कारवान या श्वानाबाबत माहिती दिली. तिन्ही ऋतूमध्ये तग धरणारी प्रजाती कारवान आहे. शिकारी, राखणदारीसाठी कारवान प्रजात उत्तम आहे. चेहरा निमुळता, छाती भरगच्च भरलेली सेफ्टी नाजूक डोके, उंची  २८ ते ३० इंचांपर्यंत असते. खाण्यावरचा  खर्चही अत्यल्प असतो, असेही काळे यांनी सांगितले.

चाकूर तालुक्यातीलच ब्रम्हवाडी येथे मतदान अधिकारी, कर्मचारी यांनी मतदारांना गूळ आणि पाणी देऊन स्वागत केले. तर येथील महिला मतदारांनी पारंपरिक वेशात येऊन मतदानाचा हक्क बजावला.  




भर उन्हातही ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांवर असलेल्या सुविधांबाबत मतदारांनी समाधान व्यक्त केले. यापैकीच निलंग्यातील सखी मतदान केंद्रांवर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सुषमा एखंडे म्हणाल्या, सखी मतदान केंद्रावर उन्हापासून सावली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधांबाबत माहिती देण्यासाठी कर्मचारीही उपलब्ध असल्याने समाधान लाभल्याचे मत श्रीमती एखंडे यांनी व्यक्त केले.

निलंगा येथील मतदान केंद्रावर आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या उपक्रमावर आधारित तृणधान्याचे महत्त्व विषद करणारी माहिती, प्रतिकृती  तयार करण्यात आली होती. यामध्ये पौष्टीक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व आदी विषयाची माहिती मतदान केंद्रांवर लावण्यात आली होती. पारंपरिक तृणधान्याचे दैनंदिन जीवनात महत्त्‌व असून तृणधान्याचा वापर करण्याचा संदेश या मतदान केंद्राच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचे निलंग्याचे सहायक निवडणूक अधिकारी शरद झाडके यांनी सांगितले.    

नवमतदारांमध्ये पहिल्यांदाच मतदान केल्याचा उत्साह

यंदा पहिल्यांदाच मतदान करणारा जानवळ येथील जगदीश पाटील म्हणाला हा मतदानाचा अनुभव माझ्यासाठी खास होता. श्रीमती एखंडे, लोदग्यातील मोहिनी गायकवाड, अनुप सुरवसे, निलंग्यातील प्रणव तरंगे यांनीही पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. हक्क बजावल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. मी मतदान केलं, तुम्हीही करा, मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

लोदग्यात बांबूच्या वस्तूंचे प्रदर्शन


उस्मानाबाद सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतील औसा तालुक्यातील लोदगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मतदान केंद्र क्रमांक 30 वर बांबूपासून निर्मित वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वाहनाचाही समावेश होता.  किनीथोट येथील मंडळ अधिकारी टी.डी.चव्हाण यांनी मतदारांना बांबूच्या वस्तूंची माहिती मतदान केंद्रावर दिली. शेतकऱ्यांना परवडणारा असे बांबू उत्पादन असल्याचे या प्रदर्शनातून सांगण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदारांनीही या प्रदर्शनाबरोबरच याठिकाणी उभारलेल्या सेल्फी पॉइंटचाही लाभ घेतला.

*******

Thursday, 21 March 2024

भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा .पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

    


            मुंबई, : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

            आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवारप्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पणकाहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

            हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठीवापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणेउल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिलस्थानवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

वैशिष्ट्य

            सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा

            एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांकपत्तामतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख

            या ॲप्लिकेशनचा वापर करूननिवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्षनिवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृतीदेखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

लाईव्ह फोटो, व्हिडिओ

            या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटोव्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथकस्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई

            या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

डाटा सुरक्षा

            या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

०००

Saturday, 24 February 2024

'हे शक्य आहे, आधी स्वत:ला सांगा; न्यूनगंड न बाळगता पुढे जा- प्रशांत गिरबने



लातूर :  आज लातूरचे अनेक युवक जगभरात उच्चपदावर काम करत आहेत, काही शेकडो कोटी रुपयांच्या उलाढालीचे  उद्योग व्यवसाय सांभाळत आहेत, ही तीच मुलं आहेत जी आज तुमच्यासारखी सायकलवर शाळेत जात होती… ही तीच मुलं आहेत जी आज देशात येणाऱ्या परकीय चलनात भर घालत आहेत.  शिक्षण सामर्थ्य देते, कौशल्य त्या सामर्थ्याला बळ देतं हे जितकं खरं आहे तितकेच मला हे करणं शक्य आहे हे आधी स्वत:ला सांगितले पाहिजे आणि कुठलाही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकले पाहिजे असे अनुभवाचे बोल आज विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे महासंचालक श्री. प्रशांत गिरबने यांनी सांगितले.


उद्योग आणि उद्योजकता म्हणजे काय या विषयावर श्री. गिरबने उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. सुरुवातीला माजी कौशल्य विकास मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरचे सुपूत्र असलेल्या श्री.गिरबने यांचा परिचय करून दिला.  कामात कितीही व्यग्र असले आणि वेळ देता येत नसला तरी मी लातूरचा आहे हा पासवर्ड सांगितला की श्री. गिरबने यांची वेळ नक्कीच मिळते असं एक गुपितही श्री. निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.


लातूर ते लंडन असा प्रवास करणाऱ्या गिरबने यांनी आपल्या वाटचालीतील अनुभव आज मेळाव्यास उपस्थित युवक युवतींसमोर मनमोकळेपणाने सादर केले.


कोणते ही काम किंवा कौशल्य याला महत्व दिले गेलेच पाहिजे, तुम्ही काय शिकता यापेक्षा ते कसं शिकता यालाही महत्व आहे. वेल्डिंग, फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, थ्री डी प्रिंटर ऑपरेटर यासारख्या अनेक क्षेत्रात खुप नोकऱ्या उपलबद्ध आहेत मग त्या मिळत का नाहीत हा मुलभूत प्रश्न आहे, ज्याच्याकडे लक्ष द्यायला हवे,  यासाठी गरज आहे  उद्योग आणि कंपन्यांच्या मागणीप्रमाणे मनुष्यबळ विकसित करणे याला. उद्योजकांना जाऊन भेटणे, उद्योग, कंपन्यांमधील रोजगार संधींचा शोध घेणे या गोष्टी प्रत्येकाने करायला हव्यात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापलिकडेही खुप रोजगार संधी आहेत ज्याचा शोध आपण घेतला पाहिजे. यासाठी रोजगार मेळाव्यासारखे व्यासपीठ ही खुप महत्वाचे आहे, त्यामुळेच आजच्या या कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित होते.  मरिन इंजिनिअरिंगसारख्या क्षेत्रात वेल्डिंगचे स्पेशलाईज्ड स्किल लागते, ते काम अतिशय कौशल्याचे आहे… तिथल्या वेल्डरला असा भला मोठा पगार मिळतो हे कुणाला खरे वाटेल का असा प्रश्न करून त्यांनी उपस्थितांना अनेक उदाहरणांसह रोजगार संधींमधील कौशल्याचे महत्व, रोजगार संधींचा शोध, त्याची गरज सांगितली. जगभरात इंग्रजी  भाषेला व्यावसायिक भाषा म्हणून स्वीकारले जाते त्यामुळे मातृभाषेचा अभिमान बाळगतांना, व्यावसायिक भाषा म्हणून इंग्रजी भाषा येणं ही गरजेची असल्याचे प्रतिपादन ही त्यांनी केले. 


रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे व्हायला हवे, पदवीपर्यंत शिक्षण घेतलेली मुलं आज आत्मविश्वासाच्या, कष्टाच्या आणि प्रयत्नाच्या बळावर शेकडो कोटी रुपयांच्या उद्योग व्यवसायाची धुरा सांभाळत असल्याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. रोजगार संधीची उपलब्धता करून देणारे असे कार्यक्रम निरंतर व्हायला हवेत, ती काळाची गरज आहे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी मला हे शक्य नाही म्हणण्यापेक्षा अशक्य काहीही  नाही, मी हे करू शकतो हे स्वत:ला सांगत, मी कोणताही न्यूनगंड बाळगणार नाही हे समजवायला हवे, असे झाल्यास माझ्यासारखा लाजरा बुजरा लातूरकर ही मोठी पाऊले टाकू शकतो, हे स्पष्ट केले.

...

 

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात रोजगार संधीचा खजिना - रोहित पंढारकर



लातूर : शिक्षण, आरोग्य, संरक्षण, कृषी, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, मनोरंजन यासारख्या सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाचे योगदान देत आहेत. या क्षेत्रात येत्या तीन वर्षात जगभरात ४० लाख नोकऱ्यांची संधी आहे, अशी माहिती ओलएक्सचे डेटा सायन्सचे ग्लोबल हेड रोहित पंढारकर यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्यासाठी कोणते शिक्षण घ्यायला हवे आणि त्यातून कोणते रोजगार मिळू शकतील याची माहिती  त्यांनी आज लातूर येथील विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात दिली.  सुरुवातीला श्री. पंढारकर यांच्या वाटचालीचा परिचय माजी मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांनी करून दिला.


जगभरात या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. भले मोठे पगार या क्षेत्रातील लोकांना मिळणार आहेत, भारतात सुद्धा या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे, असे सांगतांना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ? याचा अर्थ खूप साध्या सोप्या शब्दात समजून सांगितला. ते म्हणाले इन्स्टाग्रामवर तुम्ही एखाद्या रिलला लाईक करता, त्यानंतर तुमच्या लक्षात येतं की, त्याच विषयावरच्या इतर रिल तुमच्यासमोर तुम्ही न मागताही समोर येत आहेत म्हणजे काय तर तुमची आवड संगणकाने कोडमध्ये जतन करून ठेवली आहे, तुम्ही क्रिकेट विषयावरील रिल लाईक केली तर सचिन तेंडुलकर, धोनी आणि इतर क्रिकेटरच्या रिल्स तुमच्यासमोर तुम्ही न शोधताही येतात..  कारण तुम्हाला काय आवडतं याचा अंदाज किंवा भाकित संगणकाने किंवा मोबाईलने लावलेलं असतं आणि त्याच विषयावरील इतर गोष्टी ते तुमच्यासमोर सादर करत.


कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक किंवा मशिनकडून आलेली हुशारी. हवमानाचा अंदाज, तुमच्या ह्दयाची गती सांगणारी यंत्रणाही अशाच पद्धतीने काम करते, ज्यामुळे अनेक संकट किंवा धोके टाळण्यास, अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचेही ते म्हणाले. अनेक कंपन्यांची उत्पादनेही याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चाचणीवर पुढे येतात.  कारण ग्राहकाची पसंती आणि गरज यांचे दोन्ही भाकित ते सांगू शकतात.  आपल्या अनेकप्रकारच्या मशिन्समध्ये आपल्याला त्याच्या चालू बंद असण्याचे संकेत मिळतात. वाहन चालवतांना इंधन उपलब्धता दर्शवली जाते या आणि यासारख्या अनेक गोष्टी या याच कृत्रिम बुद्धिमत्तेतून आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात. त्यामुळे या क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन करिअरसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मागदर्शन शिबिरात प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी सांगितले स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक'

 





·   स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ध्येय निश्चित करणे सर्वात महत्वाचे

·       ध्येय प्राप्तीसाठी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करण्याची गरज

·       स्टार्टअपमधील संधी, वैद्यकीय क्षेत्रातील करिअरबाबतही मार्गदर्शन

लातूर : कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. तसेच ते ध्येय प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयीन जीवनापसूनच जोखून देवून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल यांनी सांगितले. महाविद्यालयीन जीवन आणि त्यानंतरची एक-दोन वर्षे सर्व बाबींचा त्याग करून अभ्यासाला महत्व द्यावे, असे त्यांनी सांगितले.


आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


सोशल मिडिया, तसेच इतर करमणुकीच्या साधनांपासून काही दिवस दूर राहून अभ्यास केल्यानंतर यश हमखास मिळाले. दोन-तीन वर्षांच्या त्यागामुळे आयुष्यातील पुढील 40-50 वर्षे सुखाचे आयुष्य जगायला मिळेल. त्यामुळे आपल्या ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करावेत, असे श्री. गोयल म्हणाले.


आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे, तर कष्टाला पर्याय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवूनच स्पर्धा परीक्षेचा पर्याय निवडावा. या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय ठावून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी सांगितले.


जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनीही यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.


करिअरमध्ये नियोजन महत्त्वाचे : डॉ. राजीव रंजन


*स्टार्टअपमधील संधी व आव्हाने याबाबत मार्गदर्शन*


जिद्द आणि एखादी गोष्ट करण्याची धमक असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो. करिअर निवडताना ध्येय निश्चित करण्याची गरज आहे. करिअरमध्ये नियोजन महत्त्वाचे आहे, असे मत राजीव रंजन यांनी व्यक्त केले. ‘स्टार्टअपमधील संधी व आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  यावेळी त्यांच्यासोबत गणेश देसाई यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना राजीव रंजन म्हणाले, आजच्या प्रचंड धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिले तर यशाचा प्रवास अधिक सोपा जातो. पैशाने सर्व काही गोष्टी खरेदी करता येत नाहीत. आनंदी आयुष्य जगणे ही कला प्रत्येकाने आत्मसात केली आहे. यावेळी कुणाल क्षीरसागर यांनी टॅक्सबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.


*‘वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या संधी’बाबत मार्गदर्शन*


वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही. एखादे क्षेत्र जर आपण निवडले तर त्या क्षेत्रात मास्टरी मिळविल्याशिवाय मागे हाटायचे नाही, असा कानमंत्र डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी नमो महारोजगार मेळाव्यात आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात बोलताना दिला. ‘वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या संधी’ बाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय क्षेत्रासह आयुर्वेदिक, होमिओपॅथी याही क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. लातूरने अनेक डॉक्टर घडविले आहे. यावेळी बोलताना डॉ. पल्लवी जाधव म्हणाल्या, जिद्द आणि चिकाटीने यश हमखास मिळविता येते. युवकांनी शिक्षणाबरोबर कौशल्ये वृद्धिंगत करणे आवश्यक आहे.

शेतीकडे सकारात्मक आणि व्यावसायिकदृष्टीने पहाण्याची आवश्यकता-विलास शिंदे



विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर

लातूर, दि. 24 (जिमाका) : गुंतवणूकीच्या तुलनेत निर्माण होणारा रोजगार याचा विचार केला तर शेतीसारखं क्षेत्र शोधून सापडणार नाही. फक्त आता  शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आणि व्यावसायिक होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे यांनी केले. विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात ‘कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम’ या विषयावर ते बोलत होते. 

तत्पूर्वी शेतीकडे पहातांना केवळ शेती करणे एवढेच मर्यादित स्वरूपात न पाहता कशापद्धतीने त्याला कृषी पूरक व्यवसायाची जोड देऊ शकतो, त्यात नावीन्यता आणता येते हे श्री. शिंदे यांनी दाखवून दिल्याचे श्री. शिंदे यांच्या परिचयात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. श्री. शिंदे यांनी व्यग्र दिनक्रमात मराठवाड्याच्या मातीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. विलास शिंदे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमास मार्गदर्शन केले.

अडीच  एकर-तीन एकरच्या क्षेत्राला इंडस्ट्रीसारखे बघून उत्पनादन आणि उत्पन्नाचे नियोजन करायला हवे, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राचा  80 टक्के भाग कोरडवाहू आहे.  शेती म्हणजे धान्य किंवा कापूस पिकवणे नव्हे. शेतीचे मूल्यवर्धन करून त्याला फार्म इंडस्ट्रीचे स्वरूप त्याला द्यायला हवे. त्यातील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. डिजिटल अग्रीक्लचर मार्केटिंग हे शेती व्यवसायाचे भविष्य असून आज ॲग्रो स्टार्टअप्समध्ये आयआयटी- आयआयएमवाले शिरकाव करून रोजगार निर्माण करत आहेत. परंतू आपल्याकडे शेती हा विषय आला की प्रामुख्याने त्यातील नकारात्मक बाबींवर चर्चा होते.
 
आजच्या तरूणांना गाव सोडायचे आहे, शेती सोडायची आहे, ग्रामीण भागातील मुलगी ही शेतकरी नवरा नको म्हणते आहे,  थोडक्यात काय तर शेती आणि शेती रोजगार नको अशी एक मानसिकता तयार होऊ लागली आहे.  त्याची अनेक कारणं आहेत त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे  शेतीचे उत्पन्न शाश्वत राहिले नाही. त्यामुळे गुंतवूणक करून, वेळ देऊन,  कष्ट करून हक्काचे उत्पन्न मिळत नाही असे दिसते. त्या उलट एखाद्या नोकरीकडे आपण बघतो तर एक हमखास पगाराची रक्कम दर महिन्याला घरात येते.  त्यामुळे सोपे करिअर, सुरक्षितता याकडे माणूस वळायला बघतो, तसे प्रयत्न करतो, असे श्री. शिंदे म्हणाले.
एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहाते. त्यातील 45 टक्के लोक महाराष्ट्रात शेतीवर अवलंबून आहे.  या सगळ्यांनी शेती सोडली तर साधारणत:  यातील 30 ते 35 टक्के युवा वर्गाला आज शेती सोडून इतर क्षेत्रात रोजगार उपलब्ध होतील, का ही एक प्रश्न आहे, सरकारी नोकरीतही मर्यादा आहेत. कंपन्यामध्ये तयार होणाऱ्या नोकऱ्यात ऑटोमेशनमुळे मर्यादा येत आहेत.  खरं तर जे पुणे- मुंबईत शोधल्या जातं, अमेरिकेत शोधलं जातं त्यापेक्षा कितीतरी संधी तुमच्या भागात आसपास आहेत. फक्त गरज आहे शेतीकडे वेगळ्या नजरेने, सकारात्मकदृष्टीने बघण्याची. जगभरात जिथे समस्या तिथेच नवीन नोकऱ्या, रोजगार निर्माण झाले हे चित्र आहे, प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते त्या नजरेने शेतीकडे पाहिले तर शेतीक्षेत्राएवढ्या रोजगार संधी कोणत्याच क्षेत्रात नाहीत. तुमच्या गावात, आसपास हजारोनी अशा संधी तुम्हाला सापडतील. यात व्यक्तिगत करिअर घडवू शकता, इतरांच्या हाताला काम देऊन तुमच्या भागात समृद्धी आणू शकता. मराठवाड्यातील तरूण तरूणींनी या नजरेतून शेतीकडे पाहण्याची गरज आहे, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

इस्त्राईल सारख्या देशाने अनेक अडचणींवर मात करत, प्रादेशिक स्थितीवर मात करत ठिबक सिंचन आणि इतर संशोधने केली ती संशोधने जगभर विकली गेली. इस्त्राईलच्या बाहेर मोठ्याप्रमाणात व्यवसाय उभे केले. जगभरातून संपत्ती गोळा केली.  हीच मानसिकता आपल्याकडे तयार होण्याची गरज आहे. पाणी समस्या, उष्ण वातावरण हे इस्त्राईलमध्येही होते. पाणी नाही ही एक नवी संधी आहे, कमी पाण्यातील, कोरड्या मातीतील पिक घेण्याची. अन्न पदार्थ पोषक, पोषणमुल्याने युक्त आहे का याचा विचार आज होत आहे. लोकांना विषमुक्तय शेतीतील अन्नधान्य हवं आहे. लोक साखरेचे सेवन कमी करत आहेत.  जगभरात सर्वोत्तम फळं भाज्या कोरड्या वातावरणात येतात. कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळते.  हे आपण पहात आहोत. अशा स्थितीत फळे, भाजीपाला, बांबू, डाळिंब असे कितीतरी कमी पाणी लागणाऱी  उत्पादने मराठवाड्यात घेता येतील.  जागतिक बाजारात मागणी असलेली उत्पादने घेता येतील पिकांचे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय नियोजन करता येईल. असेही श्री. शिंदे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.
*****

लातूर येथील नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरामुळे हजारोंना मिळाली रोजगाराची संधी.

 









मराठवाड्यातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मिळाले मार्गदर्शन

लातूर : राज्य शासनाने प्रत्येक महसूल विभागात नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून छत्रपती संभाजीनगर विभागाचा मेळावा लातूर येथे 23 व 24 फेब्रुवारी रोजी पार पडला. शासकीय महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात झालेल्या या नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरा त मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. 24 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमधून उद्योजकांनी 4 हजार 548 उमेदवारांची जागेवरच निवड केली. तर 7 हजार 897 जणांच्या निवडीबाबतची कार्यवाही पुढील टप्प्यात होणार आहे. यावेळी झालेल्या करिअर मार्गदर्शन शिबिरालाही युवा वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

जागेवर निवड झालेल्या युवक-युवतींना आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात निवडपत्राचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, प्रेरणा होनराव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत 35 जणांना 1 कोटी 51 लाख 76 हजार रुपये, मुद्रा योजना अंतर्गत 5 व्यक्तींना 18 लाख रुपयांचे धनादेश उपस्थितांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या मेळाव्याचे औचित्य साधून जिल्हा परिषद अंतर्गत 14 संवर्गात अनुकंपा तत्वावर निवड झालेल्या 10 युवक-युवतींना एकाच वेळेस यावेळी नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आले.

इयत्ता दहावी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठीविभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. 23 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश दाखविण्यात आला, तसेच कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते. पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी करिअर विषयी मार्गदर्शन केले.

24 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 पासूनच रोजगार इच्छुक उमेदवारांची नाव नोंदणी आणि प्रत्यक्ष मुलाखतींना सुरुवात झाली. स्वतंत्र सभामंडपात 16 दालनांमध्ये 32 टेबलवर नाव नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उमेदवारांनी भरलेले अर्ज स्वीकारण्यासाठी 14 दालनांमध्ये 28 टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. या मेळाव्यासाठी ऑनलाईन स्वरुपात 18 हजार 530 उमेदवारांनी नोंदणी केली. तर ऑफलाईन स्वरुपात 12 हजार 945 जणांनी नोंदणी केली. तसेच 7 हजार 288 जणांनी स्वयंरोजगारसाठी नाव नोंदणी केली होती. सकाळपासूनच नाव नोंदणीसाठी युवक-युवतींची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी नाव नोंदणी कक्षांना भेटी देवून युवक-युवतींशी संवाद साधला. तसेच विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनीही विविध दालनांना भेटी देवून मुलाखतीला आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.


नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतानुसार उपलब्ध उद्योजक, आस्थापनेची आणि त्यामधील रिक्त पदांची माहिती देण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी मदत कक्ष तयार करण्यात आले होते. तसेच सर्व आस्थापनांची एकत्रित माहिती असलेला फलक दर्शनी भागात लावण्यात आला होता. विविध आस्थापना, उद्योजक यांच्या दालनांसाठी दोन स्वतंत्र सभामंडप उभारण्यात आले होते. यामध्ये तयार करण्यात आलेल्या कक्षांमध्ये उमेदवारांच्या मदतीसाठी एक-एक स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले होते. 264 उद्योग, स्वयंरोजगारविषयक आस्थापनांची दालने याठिकाणी तयार करण्यात आली होती.


नमो महारोजगार मेळावा दिशादर्शक उपक्रम ठरेल : महसूल मंत्री

राज्य शासनाने प्रत्येक विभागामध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून युवा वर्गाला करिअरच्या अनुषंगाने भविष्याची वाटचाल निश्चित करण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे. नागपूरनंतर आता लातूर येथे असा मेळावा होत असून यानंतर राज्यात प्रत्येक महसूल विभागात मेळावे होणार आहेत. या मेळाव्याचे अतिशय चांगले नियोजन झाले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून तीन युवतींना प्रत्येकी सुमारे अडीच लाखांचे पॅकेज मिळाले आहे. याचप्रमाणे इतरही उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याठिकाणी मिळालेल्या मार्गदर्शनातून भविष्यातील संधींचा वेध घेण्यासाठी आत्मविश्वास युवकांना मिळेल. हा आत्मविश्वास युवा वर्गाला उज्ज्वल भविष्य देईल, असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात सहभागी युवक-युवतींना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आगामी काळ हा कौशल्य विकासाच्या कार्यक्रमांचा आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींसाठी नमो महारोजगार मेळावा उपयुक्त ठरणार आहे. जगातल्या अनेक कंपन्या शाश्वत गुंतवणुकीसाठी भारतात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यावसायिक, उद्योग जगतात विश्वास निर्माण केल्याने  उद्योजकांची भारताला पसंती मिळत आहे. तसेच राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे उद्योगांची संख्या वाढणार आहे. अशा उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नमो महारोजगार मेळावे उपयुक्त ठरतील, असे महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले. लातूर येथील नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराच्या यशस्वी आयोजनाबाबत त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच मेळाव्याला उपस्थित युवक-युवतींना शुभेच्छा दिल्या.

स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करा : आमदार संभाजी पाटील निलंगेकर

तरुणांनी स्वतःच्या क्षमता ओळखून त्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपण स्वतःला सिद्ध केले तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो, असे आमदार संभाजी पाटील यावेळी म्हणाले. तसेच नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सर्वांना रोजगार मिळणार नसला तरी या मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला रोजगार मिळण्यासाठी त्यांना यापुढेही रोजगाराच्या संधींची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे त्यांनी सांगितले.


करिअर घडविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक : विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी मेळाव्याला भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, या मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच यावेळी आयोजित मार्गदर्शन शिबिरामुळे युवक-युवतींना भविष्यात करिअरची दिशा निश्चित करण्यास मदत होईल. करिअर घडविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. त्यामधून यश गाठता येते. त्यामुळे येथे मिळालेल्या मार्गदर्शनातून योग्य करिअरची निवड करून युवक-युवतींनी त्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधींची माहिती मिळण्यास मदत : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

मेडिकल एज्युकेशनचे हब म्हणून लातूरची ओळख आहे. यासोबत युवा वर्गाला विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधीची माहिती होण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोणत्या रोजगारासाठी आपण कोणते कौशल्य आत्मसात करावे, याची माहिती या मेळाव्यातून मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.

यावेळी आयोजित मार्गदर्शन शिबिरात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील तज्ज्ञ रोहित पांढारकर यांनी, तर स्टार्टअप मधील संधी व आव्हाने याविषयी राजीव रंजन आणि गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी अनमोल सागर, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. फिजिओथेरेपी व वैद्यकीय करिअरमधील संधी याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

*****