लातूर ,दिनांक ०७ (विमाका) : लातूर विभागातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, हळद आणि अंजीर या १० फळपिकांसाठी ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन २०२६’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत महसूल मंडळ हा घटक धरून लातूर विभागातील जिल्ह्यांमध्ये विमा संरक्षण दिले जाणार असून, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने शेतकऱ्यांना विहित मुदतीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी न होणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर बँकेला घोषणापत्र देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या खात्यातून विम्याचा हप्ता कापला जाणार नाही. अधिसूचित क्षेत्रात स्वतःची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरीही या योजनेस पात्र आहेत. मात्र, भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. योजनेअंतर्गत प्रति शेतकरी किमान क्षेत्र मर्यादा २० गुंठे (०.२० हेक्टर) आणि कमाल क्षेत्र मर्यादा दोन्ही हंगाम मिळून ४ हेक्टरपर्यंत राहील.
लातूर विभागातील जिल्ह्यांसाठी जिल्हा समूह निहाय विमा कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार परभणी, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांसाठी 'भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड' (AICIL), लातूर जिल्ह्यासाठी 'बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' तर हिंगोली जिल्ह्यासाठी 'इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.
पीकनिहाय अंतिम मुदत
मृग बहार २०२६ अंतर्गत संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, द्राक्ष आणि हळद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ जुलै २०२६ ही आहे. तर सीताफळ आणि अंजीर या पिकांसाठी शेतकऱ्यांना ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करता येईल.
आवश्यक कागदपत्रे व महत्त्वाच्या अटी
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, ॲग्रिस्टॅक नोंदणी (Agristak), बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा (७/१२ व ८अ) आणि जिओ टॅग फोटो असणे आवश्यक आहे. तसेच डिजिटल पीक सर्वेक्षण (DCS) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीएससी (CSC) सेतू केंद्रावरून अर्ज करण्यासाठी शासनाने प्रति शेतकरी ४० रुपये सेवा शुल्क निश्चित केले आहे. योजनेत कोणताही गैरप्रकार किंवा बोगस विमा उतरविल्याचे आढळून आल्यास संबंधित खातेदाराचा आधार क्रमांक पुढील ५ वर्षांकरिता विमा योजनेच्या लाभापासून वंचित केला जाईल, अशी माहितीही कृषी विभागाने दिली आहे. या योजनेची सविस्तर माहिती www.pmfby.gov.in किंवा www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आहे.
No comments:
Post a Comment