Followers

Wednesday, 1 July 2026

बळीराजासाठी आश्वासक पाऊल...

 विशेष  लेख -1                                                                     दिनांक  01.07.2026

v पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे.  बळीराजा पेरणीच्या कामात व्यस्त आहे. अशा मोक्याच्या वेळी राज्य सरकारने ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' जाहीर करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी दिली आहे. राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे. ही केवळ एक कर्जमाफी नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा विश्वास आहे.

प्रशासकीय पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालून राबवण्यात येणारी ही योजना शेतकऱ्यांना पुन्हा सन्मानाने बँकिंग प्रवाहात आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. या योजनेच्या नावामागील प्रेरणा, त्यातील धोरणात्मक तरतुदींची सविस्तर माहिती आपण घेऊया.

महाराष्ट्र वारंवार अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात असतो, ज्यामुळे शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, शेती क्षेत्रात 'दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणा' (Long-term Structural Changes) सुचवण्यासाठी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींनुसार केवळ तात्पुरती मदत न देता, शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक आदर्श प्रशासक, रयतेचे कल्याण करणाऱ्या लोकमाता होत्या. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून या योजनेचे नामकरण करत सरकारने त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला अभिवादन केले आहे.

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' हा सरकारने महाराष्ट्राच्या ५६ लाख शेतकरी कुटुंबांना सन्मानाने जगण्यासाठी दिलेला आधार आहे. ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या या गुंतवणुकीमुळे ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढेल. शेती क्षेत्राला हवी असलेली स्थिरता प्राप्त होईल. 'बळीराजाचे राज्य' खऱ्या अर्थाने अवतरण्यासाठी आणि शेतकऱ्याला पुन्हा स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने टाकलेले एक आश्वासक आणि दूरगामी असेच हे पाऊल आहे.           (क्रमश:)

- डॉ. श्याम टरके,

 सहायक संचालक (माहिती)

                                                         विभागीय माहिती कार्यालय, लातूर

No comments:

Post a Comment