Followers

Tuesday, 30 June 2026

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

लातूर, दि. २९ (विमाका) : राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. या योजनेमुळे सुमारे ५६ लाख शेतकरी कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.


या योजनेअंतर्गत थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (ओटीएस) योजना, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद आहे.

योजनेची संपूर्ण प्रक्रिया आधार क्रमांकावर आधारित व ऑनलाइन आहे. अंतिम याद्या ग्रामपंचायत, बँका, आपले सरकार सेवा केंद्र तसेच गाव चावडीवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांना मोबाईल संदेशाद्वारेही माहिती दिली जाणार आहे.

पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ओटीएस योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम स्वतःचा हिस्सा जमा केल्यानंतरच शासनाकडून कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाणार आहे. तसेच तांत्रिक अडचणींचे त्वरित निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण समित्यांची स्थापनाही करण्यात आलेली आहे.

या योजनेमुळे लाखो शेतकरी पुन्हा कर्जपात्र होऊन नवीन पीक कर्ज मिळविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळण्याबरोबरच बळीराजाला आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment