Followers

Tuesday, 7 July 2026

नांदेड-मुंबई, टनकपूर-नांदेड दरम्यान नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू


-
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हिरवा झेंडा

लातूर, दिनांक ०६ (विमाका): मराठवाड्याच्या रेल्वे संपर्कात आज मोठी भर पडली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज व्हिडिओ कॉन्सनसिंगद्वारे नांदेड-मुंबई आणि टनकपूर-नांदेड या नवीन एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. या सोहळ्यासोबतच टनकपूर-पिलीभीत रेल्वे सेवेचा शाहजहानपूरपर्यंत विस्तारही करण्यात आला. या विशेष प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे विचार मांडले आणि जनतेचे अभिनंदन केले.


नांदेड रेल्वे स्थानकांवर उत्साहाचे वातावरण

या  प्रसंगानिमित्त नांदेड, टनकपूर आणि पिलीभीत रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड रेल्वे स्थानकावरील सोहळ्याला खासदार अशोकराव चव्हाण, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण आणि खासदार बळवंत वानखेडे उपस्थित होते. विधान परिषदेचे सदस्य अमरनाथ राजूरकर, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रद्धा, पर्यटन आणि विकासाला मिळणार चालना

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले, टनकपूर-नांदेड एक्सप्रेसची सुरुवात ही जनतेच्या दीर्घकाळापासूनच्या अपेक्षेची पूर्तता आहे. ही नवीन रेल्वे सेवा उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंध अधिक मजबूत करेल. नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराला जाणाऱ्या भाविकांसाठी ही मोठी सुविधा ठरेल. नांदेड-मुंबई एक्सप्रेसमुळे मराठवाडा परिसरातील, विशेषतः वाशीम, हिंगोली आणि वसमत येथील प्रवाशांना मुंबईशी अधिक सुलभ रेल्वे संपर्क उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.

रेल्वे जाळ्यांचे सक्षमीकरण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारतीय रेल्वेने केलेल्या प्रगतीचा रेल्वेमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला. या कालावधीत ३७,००० किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वेमार्ग टाकले असून रेल्वे जाळ्याचे ९९.६ टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारा व सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. बुलेट ट्रेन आणि समर्पित मालवाहतूक मार्ग (Dedicated Freight Corridors) प्रकल्प वेगाने प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे अभिनंदन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नवीन रेल्वे सेवांच्या प्रारंभाबद्दल नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ही सेवा वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला आणि नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांसाठी थेट आणि अत्यंत सोयीची ठरेल, असे त्यांनी सांगितले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या गाडीमुळे दोन्ही राज्यांतील श्रद्धा, पर्यटन आणि विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

सामाजिक व आर्थिक विकासाला गती

नांदेड येथील कार्यक्रमात बोलताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले, या दोन नवीन रेल्वे सेवांमुळे नांदेड आणि मराठवाड्याचा देशातील प्रमुख शहरांशी संपर्क अधिक सुदृढ होईल. महापौर कविता मुळे यांनी ही एक्सप्रेस विद्यार्थी, भाविक आणि व्यावसायिकांसाठी विशेष लाभदायक ठरेल.परिसराच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देईल, असा विश्वास व्यक्त केला. खासदार डॉ. गोपछडे आणि खासदार चव्हाण यांनीही या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानत पर्यटनाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

No comments:

Post a Comment