📍 पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाचे आवाहन
लातूर, दिनांक २८ (विमाका) :
राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान योजने'ची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. २५ जुलै रोजी या योजनेची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील तब्बल १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. याद्वारे त्यांना १३,६०० कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.
योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीबाबत माहिती देताना सहकार आयुक्त तावरे म्हणाले, शासनाने महाआयटीच्या (MahaIT) माध्यमातून एका विशेष पोर्टलची निर्मिती केली आहे. कर्जमाफी, एकवेळ तडजोड आणि प्रोत्साहन अशा तीन महत्त्वपूर्ण घटकांवर आधारित या योजनेची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक ठेवण्यात आली आहे.
आधार प्रमाणीकरण आवश्यक
ज्या शेतकरी बांधवांची नावे या पहिल्या यादीत समाविष्ट आहेत, त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रात' (CSC) जाऊन स्वतःचे आधार कार्ड किंवा यादीतील विशिष्ट क्रमांक देऊन आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रमाणीकरण यशस्वी होताच लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल. या प्रक्रियेसाठी 'ॲग्रीस्टॅक' (AgriStack) फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हा आयडी नाही, त्यांना सेवा केंद्रावरच तो तत्काळ काढून दिला जाईल.
३१ मार्च २०२६ पर्यंतच्या थकबाकीचा प्रश्न निकाली
व्यावसायिक बँकांमधील (Commercial Banks) थकीत कर्जाबाबत (NPA खाती) शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असू नये, यासाठी सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले की, ३१ मार्च २०२६ पर्यंतची थकबाकीची रक्कम पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तारखेनंतरच्या व्याजाचा भार संबंधित बँकांनी उचलण्याची जबाबदारी घेतली असल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे.
तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती
या प्रक्रियेदरम्यान एखाद्या शेतकऱ्याच्या नावात, बँक खाते क्रमांकात किंवा आधार क्रमांकात काही तांत्रिक चूक किंवा तफावत आढळल्यास शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा शेतकऱ्यांसाठी पोर्टलवरच थेट तक्रार (Grievance) नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे त्वरित निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना नव्याने उभे राहण्यासाठी आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. त्यामुळे लातूर, धाराशिव, हिंगोली, नांदेडसह राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून या ऐतिहासिक निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment