Followers

Monday, 30 March 2020

जिल्ह्यातील नागरिकांनी जनता कर्फ्यू मध्ये घरीच थांबून सहकार्य करावे -जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे


उस्मानाबाद, दि.30(जिमाका):- कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. परंतु नागरिकांकडून आणखीही या उपाययोजनाना योग्य तो प्रतिसाद दिला जात नसून अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. नागरिकांना कोरोना आजाराविषयी गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिनांक 31 मार्च 2020 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात "जनता कर्फ्यू" चे आदेश दिले असून नागरिकांनी घरामध्ये बसूनच सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
    या जनता कर्फ्यू च्या दरम्यान 31 मार्च 2020 रोजी रुग्णालये, औषधी दुकाने व दूध विक्रीचे दुकाने हेच चालू राहणार आहेत. बाकीच्या सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये घरातच बसून राहावे. प्रशासन आपल्या सेवेसाठी घराबाहेर थांबले असून आपण प्रशासनाचा आवाहनाला प्रतिसाद देऊन घरातच बसून राहिल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही असे  जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी सांगितले.
    उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग बाबत अधिक जागरुक होऊन प्रशासन राबवत असलेल्या उपाय योजनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन घरामध्येच कुटुंबियासह थांबण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांनी केले.

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि भाव वाढ होणार नाही याकडे लक्ष द्या -पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या संबंधितांना सूचना



       लातूर, दि.30:- लातूर जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिककार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज लातूर येथील तेल उद्योजक अशोक भुतडा, दलमिल मालक हुकूमसेठ कलंत्री, लातूर कृषी उत्पन्नात बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा इत्यादीशी चर्चा केली. गहू, तांदूळ, ज्वारी, तेल , डाळ इत्यादी वस्तूंचा लातूर शहर आणि जिल्ह्यातील दहाही तालुक्यामधील गावांमध्ये तुटवडा जणवणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.  या वस्तूंची भाववाढ होणार नाही याकडे लक्ष ठेवण्याचे निर्देश लातूर जिल्ह्याधिकारी यांना  दिले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप जिल्ह्यातील रास्तभाव  धान्य दुकानातून टोकन पद्धतीने करण्यात येईल. जनतेने सर्व नियमांचे पालन करावे, करोनाला हरविण्याचे उद्दिष्ट गाठताना जनतेची अडचण होणार नाही याकडे लक्ष दिले जाईल असे आश्वासनही पालक मंत्र्यानी दिलेआहे.

करोनाच्य पार्श्वभूमीवर लातूर जिल्यात सर्वच तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा -पालक मंत्री अमित विलासराव देशमुख त्यांचे निर्देश


                 
      लातूर,दि.30:-कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता  तसेच कामगारवर्ग यांना अल्पदरात भोजन मिळावे यासाठी जिल्ह्यातील शिवभोजन योजनेचा विस्तार करून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी संबंधितांना दिले आहेत
लातूरचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेशी संपर्क करून पालक मंत्री देशमुख यांनी  लवकरात लवकर म्हणजे येत्या एक-दोन दिवसात   लातूर जिल्ह्यातील सर्व म्हणजे १०  तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन योजना सुरू होईल या पद्धतीने  तातडीने कारवाई करावी  अशा सूचना दिल्या आहेत .
करोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सध्या  लॉकडाउन ची स्थिती आहे. या परिस्थितीत गरीब जनता तसेच कामगारवर्ग भोजनावाचून वंचित राहूनये यासाठी शासनाच्या वतीने या शिवभोजन योजनेचा विस्तार केला जात आहे,   सर्व तालुक्याच्या ठिकाणी  योजना सुरु होत असताना  लातूर ग्रामीण साठी  मुरुड याठिकाणी  ही सोय केली जाणार आहे.  गरजूंनी या योजनेचा  लाभ घ्यावा असे आवाहन करून याठिकाणी  सामाजिक आंतर  आणि स्वच्छतेचे नियम पाळले जावेत  असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

खाजगी रुग्णालये आणि क्लिनिकच्या सेवा सुरू ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आव्हान



लातूर, दि. 30:-  लातूर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये आणि क्लिनिक यांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा  लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सुरूच ठेवाव्यात असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे. करोना विरुद्धच्या लढ्यात वैद्यकीय व्यावसायिकांची महत्वाची भूमिका आहे. .
सामान्य माणसांना  मिळणाऱ्या  आरोग्य सेवा सुरूच राहाव्यात हीच शासनाची भूमिका आहे.याबाबत लातूर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अजय जाधव यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे.  जिल्ह्यातील वैद्यकीय व्यावसायिकां प्रमाणेच इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा  असोसिएशन या क्षेत्रातील  अन्य संघटनांनीही   पुढाकार घ्यावा आणि कोविड 19 विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात शासनाला सहकार्य करावे असे आवाहनही  पालक मंत्री देशमुख यांनी केले आहे.