Followers

Saturday, 17 August 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ;

 






बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी

लाडक्या भावाकडून रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण

लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा-मुख्यमंत्री

            पुणे : महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा अहेर मिळणार आहे, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या

            म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछपत्रपती क्रीडानगरी येथे झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे आदी उपस्थित होते.

            आजचा दिवस लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणी मिळाल्या याचा मनापासून आनंद आहे. त्यांचे प्रेम ही जीवनातील मोठी शिदोरी आहे. या योजनेसाठी पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. या दीड हजार रुपयांचे मोल गरजू बहिणींसाठी खूप आहे. त्यांना या रकमेतून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबत आर्थिक उन्नती साधता येईल. आता मदतीसाठी कुणासमोर हात फैलावे लागणार नाही.

            महिलांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. काही महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले गेल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. प्रत्येक पात्र भगिनीला योजनेचा लाभ दिला जाईल. लाखो बहिणींच्या खात्यात दर महिन्याला निश्चित रक्कम जाईल याचे खूप समाधान आहे, अशा शब्दात श्री. शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जनतेची सेवा हेच शासनाचे ध्येय असून प्रत्येक योजना यादृष्टीनेच गतीने राबविण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

            महिला लखपती झालेल्या बघण्याची, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून महिलांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही, बहिणींच्या हितासाठी शासन आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू - देवेंद्र फडणवीस

राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, असेही ते म्हणाले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, आजचा हा सावित्रींच्या लेकींचा कार्यक्रम आहे. पुणे ही समाजकारणाची आणि परिवर्तनाची भूमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरूवात पुण्यापासून केली जात आहे. हे सरकार बहिणींना लाभ देणारे सरकार आहे. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे कार्यक्रमापूर्वीच जमा झाले आहेत. ऑगस्टमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची छाननी होईल, त्यांना जुलैपासूनच लाभ मिळेल. सप्टेंबरमध्ये ज्या महिलांच्या अर्जांची छाननी होईल, त्यांनाही जुलैपासूनच लाभ मिळेल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सचिव अनुपकुमार यादव यांच्या नेतृत्वात अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे.

            विकसित भारत करणे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. महिलांचा विकास झाला, तरच भारत विकसित होऊ शकतो असे प्रधानमंत्री कायम म्हणतात. त्यामुळेच केंद्र आणि राज्यात आम्ही स्त्रीकेंद्रित योजना सुरू केल्या. लखपती दिदी, लेक लाडकी, शिक्षण शुल्क माफी योजना आणि लाडकी बहीण योजना या दृष्टीकोनातूनच सुरू करण्यात आल्या गेल्या. राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी, असा आमचा प्रयत्न आहे. 

            ही योजना म्हणजे आम्ही महिलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. ही रक्षाबंधनानिमित्त दिलेली ओवाळणी आहे. आईचं आणि बहिणीचं प्रेम जगातील कोणतीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. माझ्या माय माऊलीला पंधराशे रुपयांचे मोल समजते, असेही ते म्हणाले.

रक्षाबंधन सणानिमित्ताने भावांकडून बहिणीला ओवाळणी-उपमुख्यमंत्री अजित पवार

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरीता अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेला माता-भागिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आजपर्यंत १ कोटी ३ लाख रुपये माता-भागिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहे.  या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान, हसू दिसून येत आहे. *रक्षाबंधन* सणानिमित्ताने ओवाळणी म्हणून भेट दिली आहे.


माता-भगिनी जीवन जगताना त्यांच्या आशा अपेक्षा असतात परंतु स्वतःचे हीत बाजूला ठेवून कुटुंबाच्या भल्याकरीता त्या काम करीत असतात. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आशा- अपेक्षापूर्तीसाठी काम करण्यात येत आहे. यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी श्री. सांगितले.  


            राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत व्यवसायिक शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याच्या हिताकरीता बेरोजगारी कमी करण्यासाठी, सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी, मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन मिळून काम करीत असून नागरिकांनी विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.


योजनेमुळे महिलांना दिलासा मिळेल-डॉ.नीलम गोऱ्हे


            तीन दशकांच्या महिला धोरणाच्या इतिहासात या कार्यक्रमाच्या कार्यक्रमपत्रिकेत मान्यवरांच्या नावापुढे आईचे नाव लावल्याबद्दल समाधान व्यक्त करून विधान परिषद उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, महिलांची संख्या निम्मी असून दोन तृतीयांश तास त्या काम करतात. जगातील १ टक्के संपत्ती महिलांच्या नावावर आहे. अशा स्थितीत या योजनेमुळे महिलांना निश्चितपणे दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रबोधनाची परंपरा आणि महिला विकासाचा वारसा असलेल्या पुण्यात या योजनेचा समारंभ होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.


योजनेद्वारे २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न-कु. आदिती तटकरे


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्री कु.तटकरे यांनी केले. दोन दिवसांनी रक्षाबंधन साजरा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तीन लाडक्या भावांनी आधीच ओवाळणी दिली. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला. १ कोटी ३५ लक्ष महिला लाभासाठी पात्र ठरल्या, त्यापैकी १ कोटी ३ लक्ष महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक आदींनी यासाठी खूप परिश्रम केले. २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.


            यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'यशस्विनी प्लॅटफॉर्म' पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात योजनेच्या धनादेशाचे आणि स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.


            कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार मेधा कुलकर्णी, सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार प्रा. राम शिंदे, उमा खापरे, योगेश टिळेकर, प्रसाद लाड, दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, राहुल कुल, महेश लांडगे, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, सुनील कांबळे, सुनील शेळके, महिला व बालविकास सचिव अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, एकात्मिक बालविकास योजना सेवा आयुक्त कैलास पगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

Wednesday, 17 July 2024

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी आषाढी एकादशीला राबविण्यात आला विशेष उपक्रम

 




·        अनेक मंदिर परिसरांमध्ये योजनेबाबत जनजागृती, अर्जांचे वितरण

लातूर : मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक गावामध्ये, तसेच शहरी भागात विविध ठिकाणी योजनेच्या अर्ज नोंदणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंदिर परिसरातही विशेष शिबिराचे आयोजन करून योजनेची माहिती देण्यात आली, तसेच विहित नमुन्यातील अर्जांचे वितरण करण्यात आले.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असून ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येणार नाहीत, अशा महिलांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत, अंगणवाडी येथे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून हे ऑफलाईन अर्ज, विहित नमुन्यातील हमीपत्र आणि आवश्यक कागदपत्रे इच्छुक पात्र महिलांकडून भरून घेणे, तसेच ऑफलाईन अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी ग्रामसेवककृषि सहायकतलाठीअंगणवाडी सेविकाआशा सेविकाग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे.

प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज भरला जावा, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असून महिलांचे अर्ज स्वीकारण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. 17 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्याची सुविधा काही प्रमुख मंदिर परिसरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. लातूर शहरात बालाजी मंदिर, कालिकादेवी मंदिर आणि रामलिंगेश्वर मंदिर, औसा येथील हनुमान मंदिर, जळकोट येथील विठ्ठल मंदिर, वांजरवाडा येथील संत गोविंद माऊली संस्थानासह जिल्ह्यातील इतरही काही प्रमुख मंदिर परिसरात आयोजित शिबिरामध्ये मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेबाबत जनजागृती करून विहीत नमुन्यातील अर्जांचे वितरण आणि ऑफलाईन अर्जांची स्वीकृती करण्यात आली.

विशेष लेख मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ‘नारी शक्ती दूत’ मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आहे सोपे

 

राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेतून राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला, मुलींना दरमहा 1 हजार 500 रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपये लाभ दिला जाणार आहे. या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून यासाठी ‘नारीशक्ती दूत-Narishakti doot’ हे मोबाईल ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून हे मोबाईल ॲप डाऊनलोड पात्र लाभार्थी महिलाही घरबसल्या आपला अर्ज भरू शकतात. या मोबाईल ॲपद्वारे अर्ज ऑनलाईन अर्ज भरणे अतिशय सोपे असून हा अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे आणि कार्यपद्धतीची माहिती देणारा हा लेख...._
राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे किंवा ज्या कुटुंबाकडे केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड आहे अशा कुटुंबातील महिला मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण याजानेसाठी पात्र आहेत. एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबाच्या व्याख्याते पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले, मुली यांचा समावेश असून एका कुटुंबातील विवाहित, घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या, निराधार महिला, तसेच एक अविवाहित महिला यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या महिलांच्या आधार सलंग्न बँक खात्यामध्ये थेट दरमहा 1 हजार 500 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असून ‘नारीशक्ती दूत’ अॅपद्वारे महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाहीत, त्यांच्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आली आहेत. तसेच अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका आणिमुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, महिला बचत गटातील समूह संसाधन व्यक्ती (सीआरपी), आशासेविका, वार्ड अधिकारी, शहर प्रकल्प संचालक, महानगरपालिका बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रथम गुगल प्ले स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत’ मोबाईल अॅप डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे. त्यानंतर अॅपमध्ये स्वतःची माहिती भरून लॉगिन आयडी तयार करुन घ्यावा. लॉगीन आयडीमधून योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या महिलेचा ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. या अॅपवरील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेवर क्लिक केल्यानंतर पात्र महिलांचा अर्ज भरण्यासाठी उपलब्ध होईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल किंवा अर्ज भरताना तांत्रिक अडचण येत असल्यास ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी अर्जाचा नमुना व हमीपत्र याची पीडीएफ फाईल अॅपवर उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून त्याप्रमाणे अर्ज व हमीपत्र भरावे आणि ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याकडे द्यावे. अर्जाचा विहित नमुना ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी येथे उपलब्ध आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना काही बाबी काळजीपूर्वक विचारात घेऊन माहिती भरावी. यामध्ये महिलेचे नाव, जन्मदिनांक, संपूर्ण पत्ता आधारकार्डवर नमूद असल्याप्रमाणे भरावा. महिलेची विवाहित, अविवाहित, घटस्पोटीत, विधवा, परितक्त्या, निराधार महिला याची नोंद अचूक नोंदवावी. महिलेचे आवश्यकतेप्रमाणे लग्नापूर्वीचेनाव व लग्नानंतरचे नाव नमूद करावे. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्ज भरतांना मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूक नोंदविणे आवश्यक आहे, जेणेकरून महिलेस अर्ज स्वीकृती व आर्थिक लाभाची रक्कम बँकेत जमा झाली असल्याची माहिती तसेच अन्य माहिती मोबाईल एसएमएसद्वारे प्राप्त मिळेल. महिलेच्या बँक खात्याचा तपशील नमूद करताना बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड अचूक नोंदवावा. बँक खाते आधार संलग्न केलेले असावे. बँक खाते आधार संलग्न असल्यास लाभ अदा करण्याची प्रक्रिया सुलभ होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खातेही ग्राह्य धरण्यात येणार आहे.
*योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी ग्रामस्तरीय समिती*
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज गावपातळीवर स्वीकारण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांचा या समितीमध्ये समावेश आहे. समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या समितीमार्फत योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी गावपातळीवर शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. ऑफलाईन प्राप्त झालेले अर्ज अॅपवर ऑनलाईन भरण्याची कार्यवाही समिती करणार आहे. तसेच लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करणे, यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिध्द करण्यात करण्याचे काम समितीमार्फत केले जाईल. यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्याचे आणि द्विरुक्ती टाळण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः निशुल्क स्वरुपाची असून यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.
*अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे*
• आधारकार्डची प्रत (दोन्ही बाजूने)
• महिलेचे जन्म प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्याऐवजी महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला व जन्म प्रमाणपत्र या पैकी कोणतेही एक प्रमाणपत्र.
• परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोवर विवाह केला असल्यास पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
• नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्त्पन्नाचा दाखल म्हाणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
• वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयेपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा पिवळी अथवा केशरी शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स प्रत.
• अर्जदाराचे विहित नमुन्यातील हमीपत्र.
• आधार लिंक बँक खात्याचा तपशील.

जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

Tuesday, 16 July 2024

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अतिशय सोपी, एजंटची मदत घेवू नका -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 



·         उदगीर येथील अर्ज स्वीकृती शिबिराला भेट

·         ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांना केले मार्गदर्शन

·         जास्तीत जास्त महिलांनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


लातूर : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करावेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी कोणत्याही एजंटची मदत घेण्याची किंवा शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही. तसेच अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचतगटातील प्रेरिका मदत करणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच एजंटपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी उदगीर नगरपरिषदेने तळवेस येथील सामाजिक सभागृहात आयोजित शिबिरात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी अधिकारी जावेद शेख, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना स्वावलंबी बनण्यास मदत होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी महिलांनी आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणे शक्य नाही, त्यांनी आपल्या नजीकच्या अंगणवाडीमध्ये किंवा अर्ज स्वीकृती शिबिरात आपले ऑफलाईन अर्ज द्यावेत. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गटाच्या प्रेरिका (सीआरपी) यांच्या माध्यमातून हे ऑफलाईन अर्ज कोणतेही शुल्क न आकारात ऑनलाईन करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. तसेच सर्व महिलांनी आपले स्वतःचे अर्ज भरून द्यावेत. आपल्या आजबाजूच्या महिलांनाही या योजनेची माहिती देवून अर्ज भरण्याचे आवाहन करावे, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने आयोजित शिबिरामध्ये सहभागी झालेल्या महिला, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी संवाद साधून त्यांच्याकडून योजनेबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तसेच यावेळी उपस्थित महिलांना मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले.

Thursday, 11 July 2024

महाराष्ट्र कृषी क्रांतीचा जनक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे





·       
मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार

·        कृषी मंत्री धनंजय मुंडे पुरस्कार सोहळ्यात उपस्थित

·       15 व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार

 

            नवी दिल्ली11 : पर्यावरण रक्षणअन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या  शाश्वत विकास धोरणांची दखल घेत15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार काल नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

                   15 व्या कृषी नेतृत्व समितीच्या- 2024 काँनक्लेव्हचे ॲग्रीकल्चर टुडे समूहाच्या  वतीने आयोजन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी  न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने राज्यातील पर्यावरण रक्षणअन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल दखल घेत महाराष्ट्राची सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली आहे.

            पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीकेंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहानॲग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ. एम.जे. खानराज्याच्या कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.

            पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कृषी विकासाच्या विविध योजना आणि शाश्वत विकासासाठीच्या प्रयत्नांची यावेळी माहिती दिली. श्री.शिंदे म्हणाले,  महाराष्ट्र हे कृषी क्रांतीचे जनक राज्य आहे. महाराष्ट्राला हरित क्रांतीची समृद्ध परंपरा असून कृषी व शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची गौरवशाली परंपरा आहे. राज्याचा प्रमुख म्हणून हा पुरस्कार स्वीकारताना  मला आनंद होत आहे. मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो असून हा पुरस्कार स्वीकारताना मला मोठा अभिमान वाटतो. महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्याच्या रूपात निवडल्याबद्दल  'ॲग्रीकल्चर टुडेआणि परीक्षक मंडळाचे  आभार मानलेमहाराष्ट्राला मिळालेला पुरस्कार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान आहे. शेतकऱ्यांचे कष्टमेहनत आणि मातीच्या प्रेमाची ही फलश्रुती आहे. आमच्या शेतकऱ्यांना 'अन्नदाताम्हणून मान दिला जातो आणि राज्य सरकारने त्यांच्या हितांसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

            महाराष्ट्रातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास उत्सुक असून राज्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान केला जातोजेणेकरून अधिकाधिक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील. बदलत्या काळानुसार आणि हवामानातील बदल पाहताआमचा शेतकरी सदैव जागरूक आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र कृषी क्रांतीत अग्रेसर असल्याची माहिती श्री.शिंदे यांनी यावेळी दिली.

            युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी तापमान वाढीचे युग संपले असूनहोरपळीचे युग सुरु झाल्याचे आणि तातडीच्या प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले होते. महाराष्ट्राने या आव्हानाला प्रतिसाद देत 21 लाख हेक्टरवर झाडे लावण्याचा आणि 5 टक्के बायोमास वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने जगातील मानव जात वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. राज्य शासनाने बांबू मिशनला प्राधान्य दिले असूनबांबू ही विशेष वनस्पती असल्याचे सांगतबांबू पासून  2000 प्रकारच्या वस्तू तयार होत आहेत. 'बांबू घास नही खास हैअसे म्हणत बांबूमुळे पर्यावरण संवर्धन आणि अन्न सुरक्षा यावरही भर दिला जात असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सहकार्य केलं आहे. तसेचपीक विमा योजनेत महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. लातूर जिल्ह्यात देशातील पहिला मायक्रो मिलेट क्लस्टर सुरू केला आहे आणि सिंचन प्रकल्पांद्वारे 17 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचा ध्येय निश्चित केले आहे.राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं ठरवले आहे आणि कपास व सोयाबीन शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.            राज्यातील कृषी क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णयांमुळे महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये मायक्रो मिलेटचे उत्पादन वाढपीएम किसान सन्मान निधी दुप्पटनॅनो-तंत्रज्ञान खतांचे वितरणतृणधान्यांना एमएसपीहरित पट्टा निर्माण आणि सिंचन क्षमता वाढ यांचा समावेश आहे.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून महाराष्ट्राचे कौतूक

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाकडून  हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सुमारे 10 लाख हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड करण्यात येत आहे. या क्रांतिकारी निर्णयाचे केंद्रीय कृषिमंत्री श्री. चौहान यांनी कौतुक केले.

Tuesday, 7 May 2024

 

अभिनव नवोपक्रमांनी साजरा

झाला लोकशाहीचा उत्सव

v वडवळ (ना.), जानवळ, ब्रम्हवाडी, लोदगा, निलंग्यात मतदारांचा उत्साह

v लातूर, उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

लातूर, दिनांक ७ (विमाका) : लातूर, उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हाभरात मतदारांचा उत्साह होता. चाकुर तालुक्यातील वडवळ नागनाथ इथं बीज वाटप, जानवळ इथं श्वानांची माहिती, ब्रम्हवाडी इथं पारंपरिक वेशात महिला, औशातील लोदगा इथं बांबूपासून वस्तूंची निर्मिती आणि निलंग्यात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याचे महत्त्व आदी अभिनव नवोपक्रम मतदान केंद्रांवर राबविण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांपासून दिव्यांग, नवमतदारांनी या उपक्रमांचे कौतुक करत भरभरून प्रतिसादही दिला.


चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील जिल्हा परिषद प्रशालेतील मतदान केंद्रावर संजिवनी बेटाची माहिती फलकांद्वारे प्रदर्शित करण्यात आली होती. संजिवनी बेटावर असलेल्या विविध वनस्पती त्यांचे पर्यावरणीय महत्त्व आदी बाबींचा यामध्ये समावेश होता. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदार उत्साहाने सहभागी होत होते. या मतदान केंद्रांवरील मतदारांना मतदानानंतर विविध प्रजातींच्या बियांचे वाटप याठिकाणी करण्यात आले. या उपक्रमांचा शुभारंभ तहसीलदार नरसिंग जाधव यांच्याहस्ते झाला. याप्रसंगी रेणापूर येथील पर्यावरण प्रेमी शिवशंकर चापुले, मंडळ अधिकारी श्याम कुलकर्णी, तलाठी शंकर लांडगे आदींची उपस्थ‍िती होती.

वनौषधीची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा’ याप्रमाणे प्रत्येकाने कृती करायला हवी. मतदान केंद्रांवर देण्यात आलेल्या बियांची रूजवण करून  रोपटांची निगा राखण्याचे आवाहन श्री. जाधव यांनी यावेळी मतदारांना केले. त्याचबरोबर श्री. चापुले यांनी मतदानाच्या दिवशी वडवळ नागनाथ याठिकाणी मतदान केंद्रावरील वनौषधींची माहिती याबाबतची पार्श्वभूमी सांगितली. त्याचबरोबर लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मतदान करणे अत्यावश्यक आहे, त्याचप्रमाणे पर्यावरणाला अधिक मजबूत करण्यासाठी झाडे लावणे, संवर्धन करणे अत्यावश्यक असल्याचे चापुले म्हणाले. तर मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावरील ज्येष्ठ नागरिक शिवाजी कल्याणे यांनी मतदानाचे महत्त्व यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या पर्यावरणपूरक अशा मतदान केंद्राची स्तुती केली.

जानवळ येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत पश्मी, कारवान या विशेष प्रजातींच्या श्वानांची माहिती असलेले फलक मतदान केंद्रावर लावण्यात आले होते. इथल्या श्वानांची प्रजाती उत्तम म्हणून ओळखल्या जाते. अतिशय हुशार, दिसायला देखणी अशी पश्मी श्वान असतात. ही अफगान जातीचे असतात. शिकार, शेतीची राखणदारी ही प्रजात उत्तम करते. मागील पाच-सहा पिढ्यांपासून श्वानांचे पालन आमच्या कुटुंबात केले जाते, असे गावचे नागरिक तानाजी पवार यांनी मतदानानंतर सांगितले.



गावात ४०० हून अधिक नागरिक श्वान विक्रीपासून उत्पन्न मिळवतात. यापैकीच एक असलेला अतुल काळे या युवकाने कारवान या श्वानाबाबत माहिती दिली. तिन्ही ऋतूमध्ये तग धरणारी प्रजाती कारवान आहे. शिकारी, राखणदारीसाठी कारवान प्रजात उत्तम आहे. चेहरा निमुळता, छाती भरगच्च भरलेली सेफ्टी नाजूक डोके, उंची  २८ ते ३० इंचांपर्यंत असते. खाण्यावरचा  खर्चही अत्यल्प असतो, असेही काळे यांनी सांगितले.

चाकूर तालुक्यातीलच ब्रम्हवाडी येथे मतदान अधिकारी, कर्मचारी यांनी मतदारांना गूळ आणि पाणी देऊन स्वागत केले. तर येथील महिला मतदारांनी पारंपरिक वेशात येऊन मतदानाचा हक्क बजावला.  




भर उन्हातही ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांवर असलेल्या सुविधांबाबत मतदारांनी समाधान व्यक्त केले. यापैकीच निलंग्यातील सखी मतदान केंद्रांवर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सुषमा एखंडे म्हणाल्या, सखी मतदान केंद्रावर उन्हापासून सावली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधांबाबत माहिती देण्यासाठी कर्मचारीही उपलब्ध असल्याने समाधान लाभल्याचे मत श्रीमती एखंडे यांनी व्यक्त केले.

निलंगा येथील मतदान केंद्रावर आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या उपक्रमावर आधारित तृणधान्याचे महत्त्व विषद करणारी माहिती, प्रतिकृती  तयार करण्यात आली होती. यामध्ये पौष्टीक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व आदी विषयाची माहिती मतदान केंद्रांवर लावण्यात आली होती. पारंपरिक तृणधान्याचे दैनंदिन जीवनात महत्त्‌व असून तृणधान्याचा वापर करण्याचा संदेश या मतदान केंद्राच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचे निलंग्याचे सहायक निवडणूक अधिकारी शरद झाडके यांनी सांगितले.    

नवमतदारांमध्ये पहिल्यांदाच मतदान केल्याचा उत्साह

यंदा पहिल्यांदाच मतदान करणारा जानवळ येथील जगदीश पाटील म्हणाला हा मतदानाचा अनुभव माझ्यासाठी खास होता. श्रीमती एखंडे, लोदग्यातील मोहिनी गायकवाड, अनुप सुरवसे, निलंग्यातील प्रणव तरंगे यांनीही पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. हक्क बजावल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. मी मतदान केलं, तुम्हीही करा, मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

लोदग्यात बांबूच्या वस्तूंचे प्रदर्शन


उस्मानाबाद सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतील औसा तालुक्यातील लोदगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मतदान केंद्र क्रमांक 30 वर बांबूपासून निर्मित वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वाहनाचाही समावेश होता.  किनीथोट येथील मंडळ अधिकारी टी.डी.चव्हाण यांनी मतदारांना बांबूच्या वस्तूंची माहिती मतदान केंद्रावर दिली. शेतकऱ्यांना परवडणारा असे बांबू उत्पादन असल्याचे या प्रदर्शनातून सांगण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदारांनीही या प्रदर्शनाबरोबरच याठिकाणी उभारलेल्या सेल्फी पॉइंटचाही लाभ घेतला.

*******

Thursday, 21 March 2024

भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा .पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

    


            मुंबई, : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

            आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवारप्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पणकाहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

            हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठीवापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणेउल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिलस्थानवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

वैशिष्ट्य

            सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा

            एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांकपत्तामतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख

            या ॲप्लिकेशनचा वापर करूननिवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्षनिवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृतीदेखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

लाईव्ह फोटो, व्हिडिओ

            या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटोव्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथकस्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई

            या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

डाटा सुरक्षा

            या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

०००